Login

लक्ष्मी भाग 1

Gosht Mulichya Agamanachi
उमाबाई धीमी पावले टाकत गणपतीच्या मंदिरापाशी आल्या. सावकाश एक एक पायरी चढून त्या आत येऊन त्यांनी प्रसादाचे ताट तिथल्या पुजाऱ्यांच्या हाती दिले आणि
गणपतीच्या शेंदरी रंगाच्या मूर्तीसमोर त्यांनी मनोभावे हात जोडले. मनातल्या मनात प्रार्थना करून त्या प्रदक्षिणा घालण्यासाठी बाहेर आल्या. 

इतक्यात त्यांची सेविका धावत आली. "बाईसाहेब, अशा अवघडलेल्या अवस्थेत प्रदक्षिणा घालू नये असा आईसाहेबांचा आदेश आहे." 
मात्र याकडे दुर्लक्ष करत डोक्यावर पदर घेत उमाबाई हळूहळू प्रदक्षिणा घालू लागल्या. 

"काही होत नाही गं मला. त्या गजाननाने बुद्धी दिली तसेच वागायचे आपण. बाकी तो सांभाळून घेईल." 

"बाई ऐकतच नाहीत मुळी. पाचवा महिना नुकताच सरला आहे. तरीही इथे येण्याचा हट्ट करतात. आता देवदर्शन घेण्याची इच्छा होते म्हणून आईसाहेब नाही म्हणत नाहीत. पण त्यांची वाटणारी काळजी लपत नाही. बाईंना नवसाने दिवस गेले. मग काळजी वाटणारच ना?" एक सेविका दुसऱ्या सेविकेला म्हणाली.

उमाबाईंनी कशीबशी एक प्रदक्षिणा घातली आणि त्या चाफ्याच्या झाडाखाली विश्रांतीसाठी येऊन बसल्या. सकाळची प्रसन्न वेळ होती. कोवळी उन्हं नुकतीच पसरली होती. त्याचा पिवळा धमक रंग मंदिराच्या सोनेरी कळसात मिसळू पाहत होता. इटूकले पक्षी झाडांवर बागडत होते. हे वातावरण पाहून उमाबाई खूप प्रसन्न झाल्या. 
'आमच्या ह्यांना चाफ्याची फुले कित्ती आवडतात! खाली पडलेली चाफ्याची फुले त्यांनी वेचून आपल्या ओट्यात ठेवली. ती फुले पाहून उमा बाईंच्या चेहऱ्यावर हसू पसरले.
त्यांच्या दोन्ही सेविका लांब उभा राहून आपल्या बाईसाहेबांचे सौंदर्य न्याहाळत होत्या. गोऱ्या कपाळावर शोभेल इतके मोठे कुंकू, कानात मोत्याच्या कुड्या, नाकात टपोऱ्या मोत्याची नथ, गळ्यात लांबसर मंगळसूत्र, हातात हिरवा चुडा आणि अंगावर मऊसूत जरीची साडी..

"काय गं पोरींनो? काय पाहता? अशा इकडे या बघू." उमाबाई आपल्या दोघी सेविकांना म्हणाल्या. " चला, चाफ्याची फुले गोळा करायला मदत करा. 
दोघींनी मिळून खूप सारी चाफ्याची फुले गोळा केली. 

इतक्यात केशवरावांचे आगमन झाले. इकडे मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पहारे बसले. आता काही काळासाठी मंदिरात कोणीच येऊ शकणार नव्हते.

केशवरावांना पाहताच उमाबाईंच्या दोन्ही सेविका आदबीने उभ्या राहिल्या. उमाबाई हळुवारपणे उभा राहण्याचा प्रयत्न करू लागल्या. मात्र केशवरावांनी त्यांना हातानेच खाली बसण्याचा इशारा केला.

झपाझप मंदिराच्या पायऱ्या चढत आत जाऊन केशवरावांनी गजाननाचे दर्शन घेतले. अकरा प्रदक्षिणा घालून केशवराव उमाबाईंच्या जवळ येऊन बसले. तशा दोघी सेविका दूरवर जाऊन उभ्या राहिल्या.

"फार कष्ट तर नाही ना झाले?" केशवराव आपल्या पत्नीला म्हणाले.

"नाही तर. देवाच्या दर्शनास कष्ट कसले?" उमाबाई किंचित हसून म्हणाल्या.
केशवराव उमाबाईंना बराच वेळ न्याहाळत राहिले. 

"निघावं का? जनता गजाननाच्या दर्शनासाठी खोळंबली असेल." उमाबाई म्हणाल्या तसे केशवराव झटकन उठून उभे राहिले. त्यांनी उमाबाईंना उठण्यास मदत केली.
केशवराव घोड्यावरून तर उमाबाई मेण्यातून वाड्यावर आल्या. 

"उमा, अहो किती वेळ? काळजी लागून राहिली होती आम्हाला." लक्ष्मीबाई म्हणाल्या.
पाठोपाठ केशवराव आत आले. 
"केशवराव सोबत होते होय? मग काळजीचे काही कारणच नव्हते म्हणायचे आणि ही इतकी चाफ्याची फुले कोणासाठी?"
हे ऐकून उमाबाईंनी केशवरावांकडे एक कटाक्ष टाकला. "आईसाहेब, ते.."

"समजलं. बरं स्वयंपाकघरात जाऊन आम्ही दिलेल्या सूचनांचे पालन होते की नाही ते पाहून या आणि थोडी विश्रांती घ्या. जास्त दगदग बरी नव्हे." उमाबाईंनी मान हलवली आणि त्या आईसाहेबांच्या दालनातून बाहेर पडल्या. 

"केशवराव तुम्ही इथेच थांबा. थोडी सल्ला मसलत करायची आहे."