हसा चकटफू .... नमुनेदार शेजारी!

Funny experiences

खरी कमाई
आठवी नववी ला स्काऊट गाईडला खरी कमाई करायची असते. शेजारची मनी माझ्यापुढे एक वर्ष. तिची जोरदार खरी कमाई चालू होती. मस्त गाईडचा युनिफॉर्म घालून बिल्डींगमधे एककांकडे जायचं ते सांगतील ते छोटंसं काही काम  करायचं साधारण पाच एक रुपये मिळायचे. त्या दिवशी ती जरा गुश्शातच होती. "काय झालं?" "आज सकाळी वरच्या काकूंकडे गेले तर म्हणाल्या दुपारी ये. दुपारी गेले तर त्यांनी एक मोठा डबा समोर ठेवला आणि म्हणाल्या हे निवडून दे. दोन तास लागले डबाभर तांदूळ निवडायला. निघताना दोन रुपये टेकवले हातावर आणि म्हणाल्या उद्या दुपारी पुन्हा ये."
आता हे वेगळं सांगायची गरज नाही की त्या नंतर खरी कमाई साठी त्या काकूंचं घर आम्ही सोयिस्करपणे  हमखास विसरायचो. ????????
***
पावती पुस्तकं
 शाळेचे रौप्य महोत्सवी वर्ष होते, १९८७-८८ ची गोष्ट. आम्हाला बाईंनी पावती पुस्तके दिली आणि शाळेसाठी निधी गोळा करायचाय असं सांगितले. २ रु, ५रु, १०रु , २५ रु. घ्याल तशी. आईने मोठ्या हौसेने १० रुपयांचे पावते पुस्तक घेतलं. एका काकूंची दोन्ही मुले आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी . सहाजिकच त्यांच्या कडे पुस्तक घेऊन गेले. काकांनी दार उघडले. माझ्या येण्याचा हेतू ऐकल्यावर मला आत काकुंकडे पाठवले. काकू कपाटाचे दार उघडून बसल्या होत्या. त्यांच्या हातात दहाच्या नोटांचे जाडजुड  बंडल होते आणि त्या पैसे मोजत होत्या. 
तिसरीतल्या मुलीच logic, आपलं काम पटकन् होईल येवढ्या सगळ्या नोटांपैकी एक  पटकन् देऊन टाकतील. " काकू, रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शाळेत वर्गणी मागितली आहे. १० रुपयांची पावती आहे."
"१० रुपये? येवढढे?? कुठल्या बाई आहेत ? त्यांना विचार २ रुपये नाही का चालणार??" " पण माझ्याकडे दहाचचं आहे" "नाही तू बाईंना विचार परत एकदा " नोटा मोजणं चालूचं होतं.
तिसरीतल्या माझी convincing power तिथेच संपली. ती( न) फाडलेली शेवटची पावती! मनात आईचा पण थोडा राग आला "१० चं कशाला घ्यायचं २चं सोडून?"
शाळेत गेल्यावर बघितलं तर २वाल्यांची पुस्तकं संपली होती. माझ्या थोड्याशाच पावत्या संपल्या होत्या, म्हणून बाईंचं पण ऐकायला लागलं. 
त्यानंतर आजतागायत पावती पुस्तकं म्हटलं की डोळ्यासमोर दहाच्या नोटांची बंडलं येतात   ????????