Login

आकाशकंदील

Story about diwali and lantern

आकाशकंदील
सिद्धी भुरके ©®

"आई अगं बघ ना.. स्वराची ऑनलाईन शाळा म्हणजे माझ्या डोक्याला ताप झालाय.. काय तर म्हणे घरीच कंदील बनवायचा आहे आणि काही पणत्या रंगवायच्या  आहेत आणि त्याचे व्हिडिओ दाखवायचे आहेत.. आता मला सांग ही दुसरीतील मुलं हे सगळं काय एकटं करणार आहेत का??मला माझं ऑफिसचं काम बाजूला ठेवून हे सगळं करावं लागणार आहे.. आणि त्यात मला हे आर्ट आणि क्राफ्ट अजिबात जमत नाही.. पेंटिंग तर सोडूनच दे..." प्रियाने त्रस्त होऊन आईला फोन केला होता.

"अगं हो हो.. किती चीडशील..ते तुमचं काय.. हा.. यू ट्यूब वर बघून कर काहीतरी.. एवढं काय त्यात?" आई प्रियाला समजावत होती.

"हो ना.. शेवटी यू ट्यूब हाच पर्याय आहे.. माझ्यासारखे असे कितीतरी पालक असतील त्यांना आर्ट आणि क्राफ्टची आवड नसेल ना.. पण खरं सांगू आई.. मला स्वरामध्ये ही आवड निर्माण करायची आहे.. तिला हे सगळं शिकवायचं आहे.."प्रिया बोलते.

"त्यासाठी आधी तुला शिकावं लागेल.. मुलं असं पण मोठ्यांचे अनुकरण करतात..."आई बोलते.

"हम.. बरॊबर आहे तुझं आई.. चल मी बाजारात जाऊन आता त्यासाठी लागणारे सामान घेऊन येते.. बाय.."
म्हणत प्रियाने फोन ठेवला.तिने सगळ्या सामानाची लिस्ट तयार केली आणि बाजारात जायला निघाली.
लिस्टप्रमाणे तिने सगळं लागणारं सामान खरेदी केलं आणि घरी जायला निघाली. तोच तिला एका इमारतीच्या बांधकामाच्या साईट वर रुक्मिणी विटा घेऊन जाताना दिसली. ही रुक्मिणी म्हणजे प्रियाची मुलगी जेंव्हा दोन -तीन वर्षांची होती तेव्हा तिला सांभाळायला येत असे. आता स्वरा मोठी झाली होती, पूर्ण वेळ शाळेत जात होती त्यामुळे रुक्मिणीने काम सोडले होते. पण तीच रुक्मिणी आज विटा डोक्यावर उचलून जातीये हे बघून प्रियाला धक्काच बसला. तिने गाडी थांबवून रुक्मिणीला आवाज दिला,
"रुक्मिणी अगं रुक्मिणी.."प्रियाचा आवाज ऐकून रुक्मिणी इकडे तिकडे बघू लागली तोच तिला रस्त्याचा पलीकडे प्रिया गाडीवर बसलेली दिसली. आधी मास्कमुळे रुक्मिणीने प्रियाला ओळखले नाही मात्र नंतर तिची ओळख पटली.

"अहो ताई.. तुम्ही.. किती वर्षांनी भेटला.. माझं स्वरा पिल्लू कसं आहे??" रुक्मिणीने विचारले.
"एकदम मजेत आहे स्वरा.. आता दुसरीत शिकतीये.." प्रिया सांगते.

"इतकं मोठं झालं माझं पिल्लू.. माझी आठवण येते का हो तिला ताई? मला ओळखेल का आता ती?"रुक्मिणीने  विचारले.

"अगं काढते कधीतरी ती तुझी आठवण.. अगं पण तू हे इथे काय काम कारतीयेस?? इतकी चांगली बारावी पास तू.. कुठेतरी नोकरी का नाही करत??"प्रिया म्हणते.

"अहो ताई एका ऑफिसमध्ये फोन उचलायची नोकरी करत होते.. नवरा बोलला मी कमवतोय ना.. तुला काय गरज कामाची.. म्हणून मग घरीच बसले.. नंतर नवऱ्याला झाला कॅन्सर.. आणि तो घरीच बसला... त्याच्या औषध पाण्यात लई पैसा खर्च केला.. पण अजून बरा झाला नाही .. पदरात दोन लेकरं.. इतक्या वर्षांनी मला परत नोकरी मिळेना.. मग सुरु केली धुणं भांड्याची कामं.. पण कोरोना आला आणि काही कामं सुटली... घर भाडं थकलं.. खायचे हाल झाले.. शेवटी विटा वाहून न्यायच काम सुरु केलं.." रुक्मिणीच्या सांगताना डोळ्यात पाणी आलं..
प्रियाला फार वाईट वाटलं. तिने पटकन पर्समध्ये हात घालून काही पैसे बाहेर काढले आणि रुक्मिणीला देऊ लागली तोच रुक्मिणी तिला म्हणाली,
"ताई नको.. फुकटचा पैसा नको.. कष्टाच्या पैशाला मरण नाही.. थोडं कमी कामवेन पण दोन घास सुखाचे खातीये मी.."रुक्मिणी बोलली. प्रियाने तिचा नंबर घेतला... तिच्यासाठी काही काम असेल तर सांगायला आणि घरी निघाली.

       घरी आल्यावरही तिच्या डोक्यातून रुक्मिणीचा विचार जात नव्हता.सतत तिचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. पण काय करणार.. परिस्थिती माणसाला काय काय करायला भाग पाडते प्रियाला वाटले.. आपण रुक्मिणीसाठी काहीच करू शकत नाही याचं प्रियाला वाईट वाटत होतं.हताश होऊन ती लेकीसाठी आकाशकंदील बनवायचा यू ट्यूबवर व्हिडीओ बघू लागली. त्यामधील कंदील बघून तिला आठवलं कि रुक्मिणी इथे कामाला असताना असाच सुंदर कंदील बनवून द्यायची.. रांगोळी पण काय सुरेख काढायची.. आणि तुळशीच्या लग्नासाठी कुंडी पण किती सुंदर रंगवायची.. आत्ता खरं रुक्मिणी इथे पाहिजे होती म्हणजे तिने पटकन कंदील बनवायला शिकवला असता.. असा प्रियाच्या मनात विचार आला. तिने पटकन फोन उचलला आणि दुसऱ्या दिवशी रुक्मिणीला घरी बोलावले.

                दुसऱ्या दिवशी रुक्मिणी प्रियाकडे गेली.
"ताई काही काम मिळालं का माझ्यासाठी?" रुक्मिणीने विचारले.
"रुक्मिणी मला एक सांग.. तुला कंदील बनवणे, रंगकाम करणे हे सगळं येतं ना गं?? हे सगळं तू शिकवू शकतेस?" प्रिया म्हणाली.
"मला आवडतं हे सगळं करायला.. ताई तुम्हाला शिकवू का?? सोपं काम आहे ते.."
"फक्त मलाच नाही तर तुला स्वरा सारख्या पंधरा वीस मुलांना कंदील बनवणे आणि पणत्या रंगवणे शिकवायचं आहे..."प्रियाने सांगितलं.
"ताई मला काही समजलं नाही.."रुक्मिणीने गोंधळून विचारले .
"अगं... स्वराच्या शाळेतून त्यांना कंदील बनवणे आणि पणत्या रंगवणे हे दिवाळीसाठी काम दिले आहे.. आता मला असलं काही जमत नाही आणि वेळसुद्धा नाही मला..आणि माझ्यासारखे काही पालक आहेत ज्यांना हे सगळं जमत नाही.. आणि त्या पेक्षाही मुलांना काहीतरी नवीन शिकायला मिळेल असं पण मुलं घरी बसून कंटाळली आहेत.. म्हणून काल मी माझ्या ग्रुप मध्ये विचारलं.. ते सगळे आर्ट आणि क्राफ्ट क्लासला तयार झाले आहेत.. आता मुलांसाठी हा क्लास तू घ्यायचा आहे... कळलं?"प्रियाने सांगितले.
"अहो ताई पण क्लास घेणं कसं शक्य आहे? कोरोना मुळे मुलं एकत्र नाही जमू शकत.."
"अगं वेडे तुला हे सगळं ऑनलाईन शिकवायचं आहे.. माझ्या घरी येऊन लॅपटॉपवर तू कंदील बनवणे आणि पणत्या रंगवणे मुलांना शिकव..."प्रिया बोलली.
"ताई..मला आवडेल मुलांना शिकवायला.."रुक्मिणी खुश होऊन म्हणाली.
"मला माहित होतं तू नाही बोलणार नाहीस.. मला सगळं सांग त्यासाठी काय काय सामान लागणार आहे... तसं सगळी मुलं ते आणून ठेवतील.. मग परवा पासून तू क्लास सुरु कर.. आणि हो फक्त यावर थांबायचं नाहीये.. तू रांगोळीचे क्लास सुद्धा सुरु करायचे आहेत.."प्रिया बोलली.
     रुक्मिणीचे डोळे पाणावतात.. आणि ती म्हणते,
"ताई तुमचे उपकार झाले हो.. आम्हा गरीबाची एवढी काळजी करताय बघून खूप बरं वाटलं.. मला तुमच्यामुळे जे आवडतं ते करून पैसा कमवण्याचा रस्ता सापडला.."
"अगं वेडे उपकार कसले.. तुझ्या अंगात ही कला आहे ना त्याची जादू आहे ही सगळी... ते म्हणतात ना माणसातील कला त्याला कधीच उपाशी झोपु देत नाही.. शेवटपर्यंत त्याची साथ देते ते अगदी खरंय.. आणि सगळ्यांना हे वरदान मिळत नाही.. मला बघ. यातलं काहीच येत नाही.. त्यामुळे मला अजिबात मोठेपणा देऊ नकोस.. चल बास रडणं थांबव आणि पदर खोचून कामाला लाग.."प्रिया सुद्धा डोळे पुसत बोलली.

     दोन दिवसांनी रुक्मिणीचा ऑनलाईन आर्ट,क्राफ्ट आणि पेंटिंगचा क्लास सुरु होतो. मुलं सुद्धा काहीतरी वेगळं शिकायला मिळाल्याने खुश होतात आणि रुक्मिणीला उदरनिर्वाहाचे नवीन साधन मिळते. यावर्षी दिवाळीत सगळ्या मुलांच्या घरी रुक्मिणीने शिकवलेला आकाशकंदील लावण्यात आला होता. तो काही साधासुधा कंदील नव्हता तो दुःखरुपी अंधःकारावर सुख समृद्धीच्या प्रकाशाने केलेली मात याचे प्रतीक होता. 

वाचकहो कथा कशी वाटली ते मला नक्की सांगा. आवडली तर like आणि कंमेंट नक्की करा. धन्यवाद.
सिद्धी भुरके ©®

0