दिवा - भाग पहिला
"बाळा, उद्यापासून रोज संध्याकाळी देवापुढे दिवा लावशील का गं?", आईने विचारलं.
तशी वयाच्या अठराव्या वर्षी वैधव्य आलेली रमा तिच्या तंद्रीतून बाहेर आली.
अगं मला पुढचे काही दिवस संध्याकाळी निर्मला ताइंसोबत वैद्याकडे जायचंय. त्यांना हल्ली खूप त्रास होतो.
दुसऱ्या दिवशी रमा पुन्हा तिच्या विचारात हरवली. तिच्या वयाच्या मुलींना नटलेलं थटलेलं बघितलं की हिला स्वतःचाच राग यायचा. संध्याकाळ झाली. आईने सांगितलेला निरोप आठवला तशी रमा देवघरात गेली. दिवा लावला तसा देवघर उजळून निघालं, नकळत रमाचे हात जोडले गेले. थोड्या वेळाने ती तिच्या खोलीत निघून गेली कारण बाबा यायची वेळ झाली होती आणि त्यांनी जर तिला देवघरात पाहिलं असतं तर काही खरं नव्हतं.
असेच काही दिवस निघून गेले, हळू हळू आपल्याच विश्वात हरवणारी रमा देवाशी बोलू लागली, समोरून उत्तर काहीच यायचं नाही पण रमाचं मन मोकळं होत होतं. आता ती तिन्हीसांज व्हायची वाट बघायला लागली. आईला तिच्यातला बदल जाणवला म्हणून तिनेही रमाला अडवलं नाही.
रोज देवाशी बोलता बोलता रमाला स्वतःची नव्याने ओळख झाली.
ती नमस्कार करून घाईने तिथून उठून आईपाशी स्वयंपाकघरात गेली. आईचा हात हातात घेऊन ती म्हणाली, आई मला पुढे शिकायचंय. खूप मोठ्ठं व्हायचंय. तसे आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. तिने मायेने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, खूप शिक, मोठ्ठी हो. या समाजातल्या तुझ्यासारख्या मुलींसाठी असं काहीतरी कर की त्यांना त्यांचं आयुष्य मानाने, स्वाभिमानाने जगता येईल. देव आहे तुझ्या सोबत.
पदराने डोळे पुसत आई देवघरात गेली. रमाने लावलेल्या दिव्याने देवघर आणि तिने घेतलेल्या निर्णयाने तिचं आयुष्य उजळून निघणार होतं. आईने रमाला तिची नव्याने ओळख व्हावी, तिला मार्ग सापडावा, म्हणूनच हा सगळा दिवेलावणीचा प्रपंच उभा केला होता. तिचा हेतू साध्य झाला होता.
आता प्रश्न होता तो म्हणजे बाबांना समजवण्याचा. मोठं कठीण काम होतं ते. जुन्या विचारांच्या माणसाला बदल पटकन पचवता येत नाही. आणि हा तर काळाच्या कितीतरी पावलं पुढे जाऊन करायचा बदल होता. पण आता रमाचं ठरलं होतं. कोण काय बोलतं यापेक्षा मला काय करायचंय, हे तिला उमगलं होतं. आता हे नवीन पर्व खडतर होतंच पण अशक्य नव्हतं.
कसा वाटला पहिला भाग नक्की सांगा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा