Lalpari

ईरा : शब्दांचे अनोखे रत्न
आपल्या जीवनाशी एसटीची प्रवासी सेवा अत्यंत महत्त्वाची आहे.ग्रामीण भागात तिच्या नसा सर्वत्र जोडल्या गेल्या आहे.माणुसकीचा धागा जपताना अहोरात्र तिची सेवा चालू आहे.सर्वसामान्यांची ती जीवनवाहिनी आहे.कर्मचाऱ्यांचा सेवाभाव जनमाणसांत रुजलेला आहे त्यामुळे एसटी चा प्रवास सुखकर वाटतो.शाळा , काॕलेजमधिल मुलांना वेळेवर येण्यासाठी आणि नागरिकांना आपल्या ठिकाणी सुरक्षितपणे पोहचवण्यासाठी एसटी हे मुख्य साधन आहे.आपल्या जीवनातील ती अविभाज्य भाग आहे अशा या लालपरीबद्दल सुचलेल्या काव्यपंक्ती ...!!


लाल परी

सुन सान रस्त्यावर एक गाडी दिसायची
लाल रंगाची उधळण करीत ती यायची

गावात तिला भरपूर मान असायचा
दुरचा प्रवास अगदी सुखात व्हायचा

रात्रीच्या मुक्कामाला कायम हजर असायची
सकाळी मात्र रुबाबात ती सुटायची

शाळेच्या मुलांना ती आई भासायची
दररोज ती न चुकता प्रेमाने भेटायची

म्हाताऱ्या माणसाला ती आदराची सेवा द्यायची
आवाजाने तिच्या सारी गावं जागी व्हायची

बाजाराला जाताना तुडुंब गर्दी व्हायची
चेंगराचेंगरीतुनही कंडेक्टरची डब्बल बेल वाजायची

कॉलेजच्या पोरांसाठी तीची लगबग असायची
वेळेवर पोहचवण्याची तीची जिद्द दिसायची

कर्मचाऱ्यांचा जीवनाचा आसरा असायची
सारेजण तिला नेहमी जीवापाड जपायची

खेड्यापाड्यातील खड्यातुन ती सुसाट धावायची
माणसाने भरलेली एस टी भरगच्च वाटायची

गतीमान चाके तुझी कधी थांबलीच नाही
तु दिसलीस नाही तर जीव कासावीस होई

सगळीकडे नाळ तुझी घट्ट बांधलेली असायची
तुझ्याविना रस्याची शोभा हरवलेली दिसायची

अशी तु आमची जीवनवाहिनी आहेस खरी
प्रवाशांच्या सुखासाठी झटणारी ही लालपरी

                 ©®नामदेव पाटील