Sep 28, 2020
नारीवादी

लाल रंग लालीचा (2)अंतिम

Read Later
लाल रंग लालीचा (2)अंतिम

जॉब साठी फोन आल्यापासून श्रावणीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता, परंतु आता घरी सांगायचं कसं काही प्रश्न होता. तीने अगोदर मायाशी बोलण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी कॉलेजला जाताना तिने विषय काढला तर माया जोरात हसायला लागली आणि तिची चेष्टा करू लागली.

माया-" अग बाई, तुला कोण देणार जॉब आणि जरी दिला तरी तुझे आबा थोडच पाठवणार आहेत"
श्रावणीला खूप राग येतो पण ती सध्यापुरती सारवासारव करते.
श्रावणी-" हो ग ,खरंच बोलते तु, बरं जाऊ दे पण प्लीज हे कुणाला सांगू नको हा"

दोघी कॉलेजमध्ये जातात. श्रावणीच्या मनात दिवसभर जॉब बद्दल विचार चालू होता. ती घरी कुणालाही न सांगण्याचं ठरवते. जेव्हा तिथे पोहचु तेव्हा तिथूनच फोन करू, असा विचार करते.
सर्व डॉक्युमेंट जमा होतात. ती आता फोनची वाट पाहत असते. एक दिवस फोन येतो.
फोनवरील व्यक्ती-" हॅलो, मी गुलशन. रेड लिप्स या कंपनीतून बोलत आहे. तुम्ही डॉक्युमेंट जमा केले का?"

श्रावणी -"हो सर,माझी सर्व तयारी झाली आहे. मी केव्हा जॉईन होऊ शकतो?"

व्यक्ती (गुलशन)-"ओके मॅम,पण तुम्हाला अगोदर बँक अकाउंट ओपन करावं लागेल.  तुमच्या अकाउंट वर तुम्हाला ॲडव्हान्स सॅलरी पाठवतो. त्यातूनच तुमचे येण्याची तिकीट बुक करा, त्यानंतर उरलेले सर्व पैसे तुमच्या गावाजवळील एखाद्या एटीएम मधून काढून येताना स्वतःकडे ठेवा. वेळेवर तुम्हाला गरज पडेल आणि तुम्ही इथे येऊ शकता.  मी तुम्हाला ऍड्रेस सेंड करतो"

श्रावणी-" हो सर, चालेल. मी कळवते तुम्हाला. थँक्यू"

श्रावणी बँकेत अकाऊंट ओपन करते. आलेल्या नंबर वर सर्व डिटेल्स पाठवते आणि काही वेळातच अकाउंटवर पैसे जमा होतात. तीला आता खात्री पटली की ती जे करत आहे ते योग्यच आहे. फोन वरील व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे ती बसचे तिकीट बुक करते. पैसे काढून स्वतःकडे घेते आणि सर्व डॉक्युमेंट घेऊन कोणालाही न सांगता घराबाहेर पडते.

श्रावणी चा प्रवास सुरू झाला होता. घरी ती दिसेनाशी म्हणून सर्वांची शोधाशोध सुरू होती.  बातमी गावभर पसरली होती. गावात अनेक नकोशा कुजबूज सुरू झाली होती. मायाला अंदाज आला होता कि ती जॉब साठी गेली असेल परंतु ती कुणालाही सांगत नाही.  अख्खं घर बिथरलं होतं. आई आणि आजी रडुन बेहाल झाल्या होत्या.

श्रावणी दिलेल्या पत्त्यावर पोहोचते.  समोर दिसणारं मोठं ऑफिस पाहून तिचे डोळे चमकू लागतात.  आत मध्ये प्रवेश करून चौकशी केल्यावर श्रावणीला घेऊन रिसेप्शनीस्ट दुसर्‍या सेक्शनमध्ये जायला लागते.

रिसेप्शनिस्ट-" मॅम तुम्हाला तुमची सर्व सामान येथे जमा करावे लागेल, तुमचे डॉक्युमेंट ही द्या आणि काही मौल्यवान वस्तू पैसे असतील तर त्या आपण सध्या लॉकरमध्ये ठेऊ आणि तुमचा मोबाईल माझ्याकडे द्या. आमचा माणूस तुमच्याकडे सर्व सामान नंतर पोहोच करेल".

अगोदर एवढं हाय-फाय प्रशस्त ऑफिस पाहुन भारावलेली श्रावणी होकारार्थी मान हलवते आणि सर्व सामान तिथेच ठेवून रिसेप्शनिस्ट सोबत चालू लागते.
रिसेप्शनीस्ट  पुढे आणि श्रावणी मागे.

रिसेप्शनिस्ट दार उघडते दोघी आत प्रवेश करतात आणि श्रावणी समोर जे बघते त्याने तीला थोडीफार ग्लानीच येते.
समोर गजबजलेली वस्ती, अनेक चिल्लीपिल्ली खेळत होती ,सूर्यही दिसणार नाही एवढी कोंदट जागा. तीन ते चार माळे असणार्‍या इमारती.
श्रावणी दुसर्‍या मार्गाने ऑफिसच्या बाहेर पडलेली होती. आपण फसलो हे तिला कळालं होतं, पण ती खूप गोंधळलेली होती आणि जेव्हा भानावर आली तेव्हा खूप आरडाओरडा केला पण काहीच उपयोग झाला नाही. कुणाला संपर्क करावा तर सोबत काहीच नाही. सगळे डॉक्युमेंट, सामान जप्त केलेलं.

असंच एक दिवस गावातील एक व्यक्ती नकळत तिच्या समोर आली तेव्हा तिला घरच्यांबद्दल कळालं. ती गेल्यावर त्यांचे झालेले हाल तिच्या आईवडिलांनी खूप शोध घेतला तेव्हा चौकशी केल्यावर पोलिसांनी सांगितले की स्वतःच्या मर्जीने ती या व्यवसायात गेली. गावात खूप बदनामी झाली. कुणीही घराबाहेर पडत नाही. त्या व्यक्तीने स्वतःची बदनामी होईल त्यामुळे तिला मदत करण्यास नकार दिला व गावात हे कोणाला काहीच सांगितले नाही.

एकदा तीने पळून जाण्याचा प्रयत्न केला.परंतु  गुलशनने हे पटवून दिलं की ती स्वतःच्या मर्जीने येथे आली आहे याचे सर्व पुरावे त्यांच्याकडे आहेत ,त्यामुळे तिला कोणीही स्वीकारणार नाही आणि आता बाहेर जाऊनही काहीच उपयोग नाही. श्रावणी हतबल झाली होती. तीने नशीबाने समोर आलेलं स्विकारायचं ठरवलं.
अशीच श्रावणीची आज लाली झाली होती.

लाली- " का? का सोडलं मी घर? आबा धाकात ठेवायचे, आजीही बोल लावायची पण माझ्या काळजीपोटीच ना?  त्यांनी बाहेरचं जग पाहिलं होतं हे मला तेव्हा का नाही कळालं? आई-वडील आपल्याला बोलतात पण ते आपल्या भल्यासाठीच हे उमजायला हवं होतं मला. माझ्या एका चुकीमुळे माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं. माझे स्वप्न संपली. गावात बदनामी झाली. ती साधी श्रावणी तीही संपली. मग ह्या लालीने तरी का जगाव? काहीच अधिकार नाही जगण्याचा .

लाली खूप रडते.
२५ व्या वाढदिवशीच पश्चातापाणे प्राण सोडते.

समाप्त.
धन्यवाद????????
©® प्रज्ञा लबडे

कथा कृपया नावासहीतच शेअर करा.