Sep 25, 2020
नारीवादी

लाल रंग लालीचा (1)

Read Later
लाल रंग लालीचा (1)

अनेकांनी ओरबाडून टाकलेलं ,भोगलेलं हे बोथट शरीर मेकअपचा थराने तात्पुरते झाकता येईल पण ह्या मनाचा काय करावं ते कायम तडफडत राहणार का ?ओठावर सजलेली ही लाल लाली ,अंगावर चढवलेली लाल साडी, कधीकाळी स्वप्न होती. ती आज इतकी किळसवाणी का वाटू लागली? कसा फेकावा हा लाल रंग? आज जो सर्वांगाला चिकटलाय, की आयुष्यभर रंग पेलावाच लागेल.

आपल्या रूम मध्ये एकटीच बसलेली लाली आरशासमोर स्वतःला न्याहळत विचार करत होती. डोळे अश्रुनी भरले होते परंतु आता तिला त्याचाही तिटकारा वाटत होत.
तेवढ्यात दारावर थाप पडते.
दरवाज्यावर शब्बो असते.
" जन्मदिन मुबारक हो लाली, आज तो बडी कमाल लग रही है बोल क्या चाहिये जनमदिन का गिफ्ट"

लाली-" शब्बो हा लाल रंग काढू शकतील का ग?

शब्बो-" लाली अब इस दलदलसे बाहर निकलना नामुमकीन है. जब ये वेश्या का लेबल लगा ना तब सब रास्ते बंद हो गये है ,अभी लाल रंग ही इस लाली की पहचान है समज, अभी मरने के बाद ही मिटेगा."

लाली रडत असते "काश! माझे आबा असते इथे, ते खुप ओरडले असते फेकून द्यायला लावला असता हा लाल रंग, चुकले गं शब्बो मी. असा अतातायी निर्णय घ्यायला नको होता."

शब्बो-"रो मत लाली. देख अभी हमारा नसीब है समज"

तेवढ्यात तेथे गुलशन येतो.
गुलशन-"अरे क्या पटरी पढा रही हे शब्बो, जा कुछ नही लडकी आई है देख उनको"
एवढं बोलून गुलशन निघून जातो.
तेवढ्यात लाली आणि शब्बो त्या मुलींकडे जातात. खूप रडत असतात त्या, पण काय करणार त्या दोघीही हतबल असतात.
त्यातली एक मुलगी जवळपास लालीच्याच वयाची, लगेच पळत येऊन त्यांच्या पाया पडते.

"मॅडम ,मॅडम ,मला नाही करायचं हे सगळं मला फसवून आणलय, प्लीज मला जाऊ द्या ना घरी. जाऊ द्या ना घरी मला "

तिला बघून लालीला खूप वाईट वाटतं तिच्या डोळ्यातही अश्रू येतात आणि तिला काही महिन्यापूर्वीची तीच त्या मुलीत दिसते. लाली त्या मुलीला जोरात झटकते आणि रूम कडे पळत जाते. शब्बो त्या मुलींना समजावत असते. लाली जोरात रूमचा दरवाजा बंद करते.
तिला लगेच तिला तिचा भूतकाळ आठवू लागतो.
  वाढदिवसाचा दिवस होता तो. लाली म्हणजे तेव्हाची श्रावणी सहा वर्षाची झाली होती. अगदी हट्ट करून आईला बाजारात घेऊन गेली होती. वाढदिवसाला तिच्या आवडत्या लाल रंगाचा फ्रॉक घ्यायचा होता तिला, परंतु गावाकडे असं लालभडक घातलेले चालत नाही म्हणून आई सारखा नकार देत होती. परंतु  श्रावणी ऐकायला तयार नव्हती त्यामुळे आईने एक वेगळा आणि एक लाल रंगाचा असे फ्रॉक तिच्यासाठी घेतले, परंतु अगदी ठणकावून सांगितलं. लाल फ्रॉक बद्दल आबांना काही कळता कामा नये. तीनेही तात्पुरती मान हलवली परंतु घरी गेल्यावर लाल फ्रॉक घालून अगदी घरभर हिंडत बसली.
आजीने पाहिलं आणि आजी किती जोरात ओरडली आईला
"अगं हे काय? या घरात हे असं चालत नाही पोरगी फडावर नाही नाचवायचे मला, असे लालभडक कपडे घालून"
आजीचा राग बघून श्रावणी खूप घाबरली होती. आणि तिला राग आला होता तेव्हापासून नकळत ती आजीचा तिटकारा करू लागली होती कारण लाल रंग खुप आवडायचा तीला. श्रावणी फरसबें ची धाकटी मुलगी, रंगाने सावळी, सतत स्वप्नांमध्ये रमणारी, तीलाही वाटायचं कधीतरी आपण खूप नटावं, सुंदर दिसावं परंतु घरात शिस्तीचं वातावरण.
श्रावणी च्या आबांना जास्त उधळपट्टी केलेली चालत नसे, मुलींनी नटणं वगैरे तर विरोध होता.
श्रावणी चे आबा गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती, गावातील सगळे राजकारण त्यांच्याभोवती फिरायचं परंतु एकही पद त्यांनी कधी घेतलं नव्हतं परंतु घरात कायम लोकांचा राबता असायचा. श्रावणीची आई साधी गृहिणी आणि एक मोठा भाऊ आणि आजी असं कुटुंब .  गावचे सरपंच श्रावणीचे बाबांचे खूप चांगले मित्र त्यांची मुलगी माया ही श्रावणीची मैत्रीण होती. तीच्या पूर्ण विरुद्ध गोरीपान, उंच आणि सतत महागडे कपडे घालणारी.
श्रावणीला वाटायचं आपणही मायासारखं राहावं, सुंदर कपडे घालावे, छान मेकअप करावा ,छान दिसावं परंतु घरातील वातावरणामुळे तिला ते शक्य नव्हतं.  श्रावणी कायमच मन मारून जगत होती तिला आता प्रत्येकाचा राग येत होता. सगळे का आपल्याला असं बंधनात ठेवतात म्हणून ती खूप चिडायची.
असेच दिवस जात गेले. श्रावणी व माया कॉलेजला जायला लागल्या होत्या. कॉलेज शहरात होते. त्यामुळे दोघाींच्याही वडिलांनी त्यांना मोबाईल घेऊन दिले होते. जाणे-येणे सोबतच असायचे.
एक दिवस श्रावणीला एका दुकानात छान लाल रंगाची लिपस्टिक दिसते तिला खूप आवडते आणि ती घरी घेऊन येते. आपल्या रूम मध्ये ती लिपस्टीक लावून पाहत होती. तेवढ्यात आबा येतात आणि जोरजोरात आईला हाका मारू लागतात .
"सुमे, काय थेरं लावली, पोरी कडे लक्ष नाही का तुझं ?आपल्या इथे हे असं चालत नाही माहित नाही का तुला?"
श्रावणीने सगळं ऐकलं होतं तिने तशीच ती लिपस्टिक घेतली आणि फेकून दिली. श्रावणी खूप नाराज झाली होती. दिवसभर रूम मध्ये बसून होती. मोबाइल चाळताना तिला असंच एक सोशल साईटवर जॉब बद्दल जाहिरात दिसते. एका मोठ्या कॉस्मेटिक कंपनीत एक वेकन्सी असत। घरातील वातावरण शिस्तप्रिय पण तिने बऱ्यापैकी कॉस्मेटिक बद्दल अभ्यास करून माहिती मिळवलेली होती. त्या जॉब साठी apply करते. तीन चार दिवस जातात आणि अचानक एक दिवस तिला फोन येतो.
फोनवरील व्यक्ती-" मी रेड लिप्स या कंपनीकडून बोलत आहे, मी श्रावणी फरसबे यांच्याशी  बोलू शकतो का ?"
श्रावणी -" हो मी श्रावणी बोलते"
व्यक्ती -"आपण काही दिवसापूर्वी आमच्या कंपनीत जॉब साठी apply केलं होतं तर आम्ही सर्वांमधून तुम्हालाच select केलं आहे.
श्रावणीला खूप आनंद होतो. तीला वाटतं आता आपण जर ही नोकरी केली तर आपण येथून बाहेर पडू शकू आणि आपल्या मनाप्रमाणे जगू शकू.
व्यक्ती -"मॅम तुम्ही तुमची सर्व डॉक्युमेंट जमा
करून ठेवा मी तुम्हाला काही दिवसांनी फोन करेन "
श्रावणी होकार देते आणि फोन बंद करते.

क्रमशः
©®प्रज्ञा लबडे

श्रावणीचा निर्णय काय असेल हे पाहण्यासाठी पुढचा भाग नक्की वाचा.
कथा आवडल्यास नावासहीत शेअर करा.
धन्यवाद.????????