#जलद कथा लेखन स्पर्धा#मे #लग्नाची बेडी# लक्ष्मी भाग १

धनुच्या दादाच्या एका महत्वाच्या निर्णयाने कुटुंब झाले सुखी

      धनुच्या घरात धावपळ सुरू होती. आत्या, काकी, मामी , मावशी सगळेच जमले होते. कारणच
तसं होतं. आज धनूच्या दादाच्या लग्नाचा बस्ता
बांधायचा होता. सगळे मिळून बस्ता बांधायला
निघाले होते. सगळ्यांच्या आवडीचा बस्ता
निवडायचा म्हणून सगळ्यांना बोलवून घेतलं होतं. 
          दादाचं लग्न ठरलं तसं घरातलं वातावरण
आनंदून गेलं. रोज बैठकी, पाहुणे रावळे, पोरं सोरं
सगळी धमाल चालली होती. एकमेकांची तर उडवणं, टिंगल टवाळी करण्यात मुले मश्गूल होती. वरमायला काम मात्र खूपच करावं लागत होतं, पण तरी घरी सूनबाई येणार म्हणून सगळेच आनंदून गेले होते. लग्नात काय काय करायचं याच प्लॅनिंग प्रत्येक जण करत होतं. मोठे कामांच्या प्लॅनिंग मध्ये बिझी होते. साड्या, कपडे, दागिने, पत्रिका, आमंत्रण अनेक गोष्टी करायच्या होत्या.
मुलाचं मात्र कुठले कपडे घालायचे, रंगसंगती कुठली, लग्नात डान्स कुठला करायचा, दादाचे उखाणे यांच्यावर चर्चा सुरू होत्या. एक एक नवीन नवीन उखाणे प्रत्येक जण सांगत होता. उखण्यांची भाली मोठी लिस्टच तयार झाली होती.
सगळ्यांनी भारीतले आपआपल्या आवडीचे
कपडे निवडले. पोरी सोरी मॅचींग बांगड्या टिकल्या सगळं गोळा करू लागल्या. सगळी तयारी अगदी जय्यत झाली होती. दादाचे पण वेगवेगळ्या कार्यक्रमांचे पोशाख तयार होते. मनासारखी मुलगी मिळाली म्हणून दादाही खुश होता. घरात नुसता आनंदी आनंद होता.
पार्लरवाली बोलवली. सगळ्यांचं फेशियल, आय ब्रो सगळं झालं. सासवा, नणंदा, भावजया, पोरी सोरी सगळ्या सुंदर दिसत होत्या. हळदीचा कार्यक्रमाला तर खूपच मजा आली. लहान मोठे सगळे भरपूर हळद खेळले.
          मेहंदीच्या कार्यक्रमाला तर खूप मजा आली. दादा नाही म्हणत असतांनाही सगळ्यांनी त्याला मेहंदी लावली, वाहिनीचे नावही त्यात दडवून ठेवले. संगीताच्या कार्यक्रमात सगळ्यांचे डान्स झाले. अगदी धनुच्या आईबाबा, मोठ्या काकांपासून ते मामा मामी आत्या सगळ्यांचे डान्स झाले. अख्खी रात्र सगळ्यांनी जागवून काढली.
लग्नाचा मुहूर्त जवळ येऊ लागला. सगळेच
वधू वरांच कौतुक करत होते. सगळ्यांना तो लक्ष्मी
नारायणाचा जोडा वाटत होता. लग्न लागलं, जोडे
लपविण्याचा घाट करवल्यांनी घातला होता आणि
दादा कडून चांगलेच पैसे कमावले. आज दादाही
खुश असल्याने त्यानेही सढळ हाताने दिले होते.
सगळे कार्यक्रम उत्साहात पार पडले. 
रात्री वरात घरी जायला निघाली. वधुपित्याने
भरपूर वस्तू लग्नात भेट म्हणून दिल्या. अगदी फ्रिज,
टीव्ही, वॉशिंग मशीन सगळं सगळं. संसाराला काही
कमी पडणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. 
           वरात घरी आली. लक्ष्मी स्वागतासाठी फुलांच्या पायघड्या, रांगोळ्या सजवल्या होत्या. औक्षण झाल्यावर वधू वरांनी उखाणे घेतले आणि माप ओलांडून सूनबाई लक्ष्मीच्या रूपाने घरात प्रवेश करती झाली.
लक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला. वधूवरांसोबत सगळ्यांचे उखाणे झाले.
वरमायनी नव्या सुनेला लक्ष्मीपूजनाला घसघशीत
दागिना आणि भारीतली साडी भेट दिली.  कौतुकाला कुठेच कमी नव्हती. कार्यक्रम नीट पार पडल्याने धनुच्या आई बाबांना समाधान वाटले होते.


सौ. मंजुषा गारखेडकर