
" नकोय मला ही औषधे. मी मेलो तर सुटशील तरी तू. " तिचा पती तिला म्हणाला.
" अहो अस काय बोलताय ?" ती हुंदका देत म्हणाली.
" मग काय बोलू ? अग नवरा म्हणून मी काय सुख दिले तुला ? कॉलेजमध्ये असताना माझ्या कवितांना भुलून गेलीस आणि माझ्याशी पळून जाऊन लग्न केले. मला कधीच नोकरी जमली नाही. मला तर लेखणी हातात घेऊन वेगवेगळ्या पात्रांशी खेळायला आवडायचे. स्वतःच निर्माण केलेल्या भावविश्वात गुंग व्हायला आवडायचे. सुरुवातीला माझ्या कवितांना आणि कथांना चांगला प्रतिसाद भेटत होता. पण नंतर कालचक्रे फिरली. जमाना बदलला. लिव्हइनच्या जमान्यात माझ्या प्रेमपत्रे असलेल्या कथा कुणालाच पसंत पडत नव्हत्या. त्यात माझ्या आजारपणामुळे आपले हक्काचे घरही विकावे लागले. तुला घरकाम करत बसावे लागले. उपासमारीची वेळ आली. तुला आठवते एका कथेत मी राणीचे पात्र तुझ्या नावावर ठेवले होते ? किती खुश झाली होतीस ना तू ? पण खऱ्या जीवनात मी तुला लंकेची पार्वती बनवून ठेवले. हाच का माझा पुरुषार्थ हा प्रश्न मला सतत छळतो. नियती इतकी निष्ठुर बनली की आपले बाळपण अंगणात खेळले नाही. दत्तक घ्यावे म्हणले तर पैसे नाही आणि ऐपतही. " तिचा लेखक असलेला आजारी पती मोठमोठे श्वास घेत म्हणाला.
" अहो असे का म्हणताय ? तुम्ही आहात की मला सतावणारे बाळ. अजून दुसरा कुणी झेपणार नाही मला. तुमचा पुरूषार्थ अचाट आहे. आताच येताना गणपतीची मिरवणूक निघत होती. तेव्हा ज्या गाण्यावर ते नाचत होते ते गाणं माझ्या नवऱ्याने लिहिले आहे याचा मला किती अभिमान वाटला. तुम्ही लिहिलेल्या कथांवर बनलेले चित्रपट किती गाजले. तुमचे संवाद आजही लोकांच्या ओठांवर तरळत असतात. खऱ्या जीवनात राणी नसले म्हणून काय झाले ? पण तुम्ही लिहीलेल्या सर्व कथांची मालकीण मीच आहे. आता झोपा बर. " ती म्हणाली.
तिचा पती हसला.
" किती सुंदर समजवते ना तू ? मला खूप अभिमान वाटतो तुझा. " तिचा पती म्हणाला.
दोघेही झोपी गेले.
◆◆◆
" काका , मला एकदा तुमच्या साहेबांना भेटू द्या ?" तिने कळवळीने विनंती केली.
" अहो इतका मोठे संगीतकार तुम्हाला का भेटतील ? साहेब एका रिपोर्टरला मुलाखत देत आहेत. हे बघा वीस रुपये घ्या आणि निघा. " त्या आलिशान बंगल्याचा वॉचमन चिडून म्हणाला.
" माझा नवरा खूप मोठा कवी आहे. त्याने या संगीतकाराच्या वडिलांसोबत खूप काम केले होते. खूप गाजलेली गाणे लिहून दिली. मी तुमच्या मुलीच्या वयाची आहे. एकदा भेटू द्या. " तिने हात जोडले.
वॉचमनला दया आणली. त्याने साहेबांना फोन लावला.
" सर , एक बाई आली आहे. तिच्या नवऱ्याने म्हणे तुमच्या वडिलांसाठी खूप गाणी लिहिली होती. " वॉचमन म्हणाला.
" माझ्या वडिलांसोबत काम केलंय ? पाठवून द्या बर." तो तरुण संगीतकार म्हणाला.
परवानगी मिळाली. ती धावतच आशेने बंगल्यात शिरली. किती आलिशान बंगला होता तो. तिला तर एखादा राजवाडाच भासत होता. भिंतीवर एका गतप्राण झालेल्या संगीतकाराची फोटो लटकत होती. त्यावर हार चढवलेला होता. तिचे डोळे भरून आले. कारण हा मृत संगीतकार तिला खूपदा भेटला होता. तिच्या हातचे जेवणही खाल्लेला होता. तो संगीतकार जिवंत असेपर्यंत कवीवर उपासमारीची वेळ आली नव्हती.
" बोला. " समोरून आवाज आला.
दोन तरुण व्यक्ती समोरासमोर बसले होते. त्यातला एक तरुण संगीतकार होता.
" साहेब , नमस्कार. माझ्या पतीने खूप काम केले आहे तुमच्या वडिलांसोबत. तुमच्या वडिलांची कितीतरी गाजलेली गाणी ह्यांनीच लिहिली आहेत. आम्ही खूप हलाखीचे जीवन जगत आहोत. " ती म्हणाली.
" मग मी काय मदत करू शकतो तुमची ? तुम्हाला पैसे हवे असतील तर देऊ शकतो. " तो तरुण संगीतकार म्हणाला.
" साहेब , मला मदत नको. कष्टाची कमाई हवी. माझ्या पतीने लिहिलेल्या काही कविता आणल्या आहेत. त्यावर जर गाणे बनली तर माझ्या नवऱ्याला हक्काची कमाई भेटेल. " ती म्हणाली.
त्या तरुण संगीतकारासमोर एका मोठ्या चॅनेलचा रिपोर्टर बसला होता. नुकताच त्यांची मुलाखत संपली होती.
" कविता लिहायला कुठे कष्ट पडतात ? मी पण कॉलेजला असताना कविता लिहायचो. कुणी पण येडागबाळा उठून कविता लिहू शकतो. फक्त यमक तर जुळवायचे असतात. " तो समोर बसलेला रिपोर्टर हसून म्हणाला.
" सरस्वती सर्वानाच प्रसन्न होत नाही साहेब. एकदा कविता वाचून तर बघा. " ती म्हणाली.
तिने फाटलेल्या बॅगमधून जुनी वही काढली. त्या धुळाने दोघांनाही खोकला आला. तरीही दोघे कविता वाचू लागले. त्या दोघांनाही हसू आले.
" हे बघा ही कविता तुमच्या पतीची
देते पाणी अंगणातल्या तुळशीला
कुटुंबाचे सुख हेच वर मागते तिला
होऊ दे भरभराटीचा माझा संसार
लक्ष्मीसाठी सदा उघडे असावे दार
आता तुम्हीच सांगा आता अंगणात तुळशी उरल्या तरी आहेत का ? अंगणच उरले नाही आजकाल. " तो तरुण संगीतकार हसत म्हणाला.
" आणि ही कविता बघा.
तुळस वंदावी वंदावी माऊली
संतांची सावली तुळस वंदावी
वासुदेव आला तुझिया दारी
बाहेर ये गृहलक्ष्मी तू उद्धारी
हाती तुझ्या संसाराची दोरी
टाक धान्य थोडेसे तू पदरी
अहो आता सांताचा जमाना आहे. गिफ्ट हवे लोकांना. वासुदेव कोण हे माहीत नाही लोकांना. " रिपोर्टर म्हणाला.
" मी तर गाणे बनवले होते. खूप गाजले होते.
बनेल मी सांता सांग गिफ्ट कोणते हवे तुला
चार पप्प्या की रात्रभर मिठीत आसरा
सांग सांग बेबी काय गिफ्ट हवे तुला " तरुण संगीतकार म्हणाला.
" साहेब , तुमच्या वडिलांना हीच गाणी आवडली होती. सातासमुद्रापारहून आलेला आणि गिफ्ट देणारा सांता जवळचा वाटतो पण आपल्या मातीतला आशीर्वाद देणारा वासुदेव परका का वाटतो ?" तिने विचारले.
" तो जमाना गेला मॅडम. बर तुम्ही तुमचा अड्रेस द्या. आम्ही कुणी संगीतकार अश्या टाईपची फिल्म बनवत असेल तर कळवतो. " रिपोर्टर म्हणाला.
ती सातव्या आसमंतात पोहोचली. जर कुण्या संगीतकाराला या कविता आवडल्या तर तिचे भाग्य उजळणार होते. आजारी पतीचा औषधोपचाराचा खर्च भागणार होता. तिने आभार मानले. वही तिथेच ठेवून ती प्रसन्न मुद्रेने एक लढाई जिंकली या आविर्भावात बाहेर पडली. ती जाताच त्या रिपोर्टरने ती वही डस्टबिनमध्ये टाकली.
" तू का म्हणाला तिला तसे ?" संगीतकाराने विचारले.
" आजकाल गरिबी खूप टीआरपी देते. ही बाई स्वतःहून गरिबीचा बाजार नाही मांडणार पण मी माझी एक रिपोर्टर संगीतकार म्हणून पाठवेल. ती व्हिडिओ बनवेल आणि मग आम्ही न्यूज तयार करू. #लक्ष्मी रुसली , सरस्वती रडली. " रिपोर्टर म्हणाला.
" ग्रेट यार. तू तर खूप हरामी निघालास. पण तिला कळले तर ?" तरुण संगीतकाराने विचारले.
" न्यूज भेटत नसते तर बनवावी लागते. आणि खायला महाग असलेल्या बाईकडे टीव्ही तरी असेल का ?" रिपोर्टर म्हणाला.
दोघेही हसले.
◆◆◆
ठरल्याप्रमाणे एकेदिवशी महिला रिपोर्टर संगीतकार म्हणून त्यांच्या घरी गेली. अत्यंत हुशार असलेल्या त्या रिपोर्टरने स्वतःला संगीतकार भासवून आजारी लेखक आणि त्याच्या पत्नीची चौकशी केली आणि सर्वकाही रेकॉर्ड पण करून घेतले.
" हे सारे पुरस्कार तुमचे आहेत ?" संगीतकार बनलेल्या रिपोर्टरने विचारले.
" हो. मला वाटले विकून द्यावे पण हिने अडवले. " लेखक म्हणाला.
" ह्यांच्या कामाची पोचपावती आहे ती. अशी कशी विकणार ?" लेखकाची पत्नी म्हणाली.
" हम्म. बर मी कळवते तुम्हाला. बाय. " संगीतकार बनलेल्या रिपोर्टरने निरोप घेतला.
तिच्या डोळ्यात टीआरपीचे वाढलेले आकडे चमकत होते.
तिने लगेच ऑफिसमध्ये जाऊन चोरून घेतलेल्या व्हिडिओची एडिटिंग सुरू केली. हृदयद्रावक न्यूज तयार करण्यात आली. पैश्यासाठी याचना करण्यात आली. चॅनेलची टीआरपी वाढली. त्या रिपोर्टरचे प्रोमोशनही झाले. जमा झालेले पैसे चॅनेलच्या खिश्यात गेले.
या सर्वांपासून अनभिज्ञ असलेली लेखकाची पत्नी मात्र तिच्या मालकीणच्या घरी भांडे घासण्यात व्यग्र होती.
मालकीणचा मुलगा एक कविता भाषणासाठी पाठ करत होता. ती गालातल्या गालात हसली कारण ती कविता तिच्याच पतीने लिहिली होती. हॉलमध्ये टीव्ही बघत असलेली मालकीण पाय आपटत तावातावाने टेरेसवर आली.
" काय झाले मालकीण ?" तिने विचारले.
" बघ टीव्हीवर काय चालू आहे ? लाज नाही वाटत का भीक मागून जगायला आणि गरिबीचा बाजार बनवायला ? माझा मुलगा एका रियालिटी शोमध्ये गेला होता. तिथे तुमच्यासारखाच गरीब स्पर्धक गरिबीमुळे सहानुभूती मिळवून जिंकला आणि माझा मुलगा हरला. हे घे पैसे. तुझ्यासारख्या भिकारड्यासाठी माझ्या घरात काहीच स्थान नाही. " मालकीणने पैसे फेकून तिला हाकलले.
घरी जात असतानाच घरमालकाने अडवले.
" आता काय टीव्हीवर येऊन सेलेब्रिटी झालात तुम्ही ? मग भाडे पण पटकन भरून टाका. " घरमालक खोचकपणे म्हणाला.
ती लाकडी जिना चढून घरात शिरली. पतीच्या छातीवर डोके टेकवून जोरजोरात रडू लागली.
" तुमची लेखणी बोथट झाली नाही तर समाजच बोथट झालाय. मला माफ करा हो. तुमचा स्वाभिमान नाही राखू शकले. मला कधीच कुणाची भीक नको होती. फक्त हक्काची कमाई हवी होती. तुमच्या साहित्याला त्याची खरी जागा मिळवून द्यायची होती. पण मी विसरले की आजकालच्या लोकांना मदत कमी करायची आणि त्याचा बडेजाव मोठा करायचा ही घाणेरडी सवय लागली आहे. गाजलेल्या चित्रपटाच्या अभिनेता-अभिनेत्री यांना लक्षात ठेवता. संगीतकार-गायक यांना डोक्यावर घेतात. मग लेखकांना इतके उपेक्षित का ठेवतात ? समाजाच्या सांस्कृतिक विकासात लेखकाचे काहीच योगदान नसते का ? हीच खरी लायकी असते का लेखकाची ? सरस्वतीपूजनाने विद्याभ्यासाला सुरुवात होणाऱ्या देशात सरस्वतीउपसकाची इतकी हलाखीची अवस्था का ? खरेच म्हणतात की लक्ष्मी आणि सरस्वती सवती असतात. एकमेकांचा मत्सर करतात. एकच गोष्ट शिल्लक होती आपल्याकडे तो म्हणजे स्वाभिमान. तोपण या समाजाने हिरावून घेतला. अहो तुम्ही गप्प का ? बोला ना. " तिने तिच्या पतीला हलवले.
बाजूला एक तोडलेला पेन होता. तिच्या पतीने केव्हाच आपला प्राण त्यागला होता. तिने आभाळ भेदनारा आणि काळीज चिरणारा आक्रोश केला. हंबरडा फोडला. तिनेही आपला प्राण त्यागला. तीन दिवस कुणालाही कळले नाही की या दोघांनी प्राण त्यागला आहे. वास असह्य होऊ लागल्यावर घर मालकाला संशय आला. त्याने पोलीसांना कळवले. अंतिम संस्कार झाले. घरमालकाने लेखकाच्या पत्नीचे मंगळसूत्र चोरून ते विकून भाडे वसूल केले. काही दिवसांनी काही रिपोर्टर पुन्हा शोधत तिथे आले. त्यांनी पण न्यूज बनवल्या. विकल्या. खाल्ल्या. युट्यूबवर लोक हळहळ व्यक्त करू लागले.
" गणपतीवर गाणे लिहिले म्हणून उपाशी मेला. आला का गणपती धावून ? आमच्या राजकीय नेत्यावर आणि धर्मावर जर गाणी लिहिली असती तर ही वेळ आली नसती. " कुणीतरी कमेंट करून "संवेदनशीलता" प्रकट केली.
आज आपण किती गाणी , चित्रपट पाहतो. कधीतरी आपले लक्ष लेखकाकडे जाते का ? गुलझार , जावेद अख्तर , चेतन भगत अशी काही मोजकी नावे वगळली तर खरच लेखकांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे मानधन किंवा प्रसिद्धी भेटली आहे का ? त्या लेखकावर लक्ष्मी रुसली होती. एक दुर्गा त्याच्या हक्कासाठी जगाशी भांडत होती. सरस्वती मात्र आपल्या मानसपुत्राची ही अवस्था पाहून ब्रह्मलोकात नक्कीच रडत बसली असणार.
समाप्त