असे करा लक्ष्मी पूजन

Lakshmi Poojan information and some rules to be followed .

आश्विन महिन्यात पाच दिवसीय दिपोत्सव संपुर्ण देशात साजरा केला जातो. आश्विन कृष्ण अमावस्येला स्वाती नक्षत्रावर लक्ष्मीची पूजा करून आपल्या घरावर तिचा कृपा-आशीर्वाद राहावा, यासाठी मनोकामना केली जाते. घर असो अथवा व्यवसाय दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला प्रत्येक ठिकाणी अनन्यसाधारण महत्त्व आहे.

  लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी विशिष्ट मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा केली जाते. लक्ष्मीपुजनाचा शुभ मुहूर्त, पूजनाविषयी जाणून घेऊया...

लक्ष्मीपुजनाचा मुहूर्त

दर्श अमावस्या अश्विन कृष्णपक्ष, दिनांक ४ नोव्हेंबर २०२१ सायंकाळी ६.०९ मिनिटापासून ते ८ वाजून २० मिनिटापर्यंत.

लक्ष्मीपुजनाची पूर्वतयारी

साहित्य - दोन चौरंग, तांबडा कलश, ताम्हण, पळी पंचपात्र, दोन समया, मातीच्या पणत्या, एक चांदीचे निरांजन, शंख, घंटी, लाल कापड, पिवळे कापड, दोन नारळ धूप,पंचामृत, उदबत्ती, हळदीकुंकू, केशर, अष्टगंध, चंदन, केरसुणी, हिशोबाची वही, पेन, अखंड तांदूळ, धने, लवंग, वेलची, नागरमोथा, पिवळी मोहरी, पिवळ्या कवड्या, कमळाचे मणी, गुंजा (सात किंवा अकरा) अत्तर, कमळ, गुलाबाचे फुल, शेवंतीची वेणी. विड्याची दोन पाने, सरस्वती लक्ष्मी गणपती एकत्र असलेला फोटो, लक्ष्मीची छोटी मुर्ती, श्रीयंत्र, कुबेर यंत्र नैवैद्यासाठी साळीच्या लाह्या, बत्तासे, चने, खडीसाखर, पेढे, केळी, डाळींब, फराळ, करंजी, लाडू, बनवलेले सगळे पदार्थ, खीर पुरी, छोले, चने किंवा पुरणपोळी

 लक्ष्मीपूजना दिवशी सकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याची पाने आणि झेंडुच्या फुलांचे तोरण लावावे. मुख्य दरवाजावर कुंकवाने स्वस्तिक काढावे. दारात रांगोळी काढावी. तुळशीची पुजा करावी, देव्हाऱ्यातील देवांना सुगंधी स्नान घालावे. लाल रंगाचे वस्त्रावर पुजा मांडावी व धूप, दिप व फुलांचा हार घालून पुजा करावी.

लक्ष्मीपुजनाचा विधी

लक्ष्मीपुजनाला बसताना सगळे साहित्य टोपलीत जवळ घेऊन बसावे. दोन चौरंग घ्यावे. चौरंगावर लाल रंगाचा कपडा घालावा. 

 चोरंगा भोवती, लक्ष्मीची पाऊले, स्वस्तिक रांगोळी काढावी. चौरंगावर अखंड अक्षतांचे स्वस्तिक काढावे. उजव्या बाजूला प्रथम दोन विड्याच्या पानावर एक रुपयाच्या नाण्यावर सुपारी ठेवून गणपतीची स्थापना करावी. हळद, कुंकू, अक्षता कापसाचे वस्त्र, फुले वाहावे. लक्ष्मी, सरस्वती गणपतीचा फोटो ठेवून कापसाचे वस्त्र, फुलांचा हार घालावा. एका तांबड्या कलशात पाणी भरुन त्यावर कुंकवाची बोटे ओढावी, पाण्यात अक्षता एक रुपया टाकावा त्यावर आंब्याचा डहाळा ठेवावा, वर एका नारळाला पिवळे वस्त्र गुंडाळून कलशांवर ठेवावे व चौरंगावर तांदळाच्या स्वस्तिकावर ठेवून दयावे. कलशाला हळद कुंकू लावावे आणि शेवंतीची वेणी घालावी. कलशाला एखादा दागिना, ठुशी घालावी. डाव्या बाजूला शंख ठेवावा.

 लक्ष्मीची मुर्ती आणि श्रीयंत्राला ताम्हणात घेऊन. पंचामृताने 'ओम महालक्ष्मी दैव्यै नम:' हा मंत्र म्हणत अभिषेक करावा, नंतर कलशापुढे तांदळाच्या दोन राशी कराव्या आणि त्यावर लक्ष्मी आणि श्रीयंत्राची स्थापना करावी. दुसऱ्या चौरंगावर अन्नपुर्णा आणि कुबेर यंत्र ठेवावे. हिशेबाची वही (चोपडी) ठेवावी. एका वाटीत सुट्टे पैसे ठेवावे, नोटा, सोने चांदी ठेवावे.

अशा प्रकारे पुजा मांडून झाल्यावर दोन समया लावाव्या, एक तुपाचे निरांजन आणि मातीची पणती अवश्य लावावी. धूप, उदबत्ती लावावी. आता सर्व मुर्तींना हळदी, कुंकू, केशर, चंदन लावावे. अखंड अक्षता वाहाव्या. गुलाब आणि कमळाचे फुल अर्पण करावे आणि पुजेचे इतर साहित्य कवड्या, गुंजा, गोमती चक्र देवीला, श्रीयंत्राला अर्पण करावे. धुप, उदबत्ती लावावी.

  साळीच्या लाह्या, बत्तासे, मकाणे, केळी, डाळींब पुढे मांडावे. धुप दीप लावून आरती करावी.

आरती झाल्यावर करंजी लाडू, फराळाचे सर्व पदार्थ, तांदळाची खीर, पुरी, दुधभात, पेढ्याचा नैवेद्य दाखवावा.

शेवटी नारळ फोडावा.अशा प्रकारे मनोभावे लक्ष्मीची पूजा करून प्रसन्न होऊन घरात वास्तव्य कर अशी विनंती करावी. घरातील सर्वांनी फुले, अक्षता वाहून नमस्कार करावा.

तिजोरी,लॉकरची पुजा करावी.नंतर सर्वांनी प्रसाद ग्रहण करावा.

  काही नियम

 रात्री बारा वाजेपर्यंत घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवावा. अंगणात, तुळशीजवळ पणत्या रात्री बारा वाजेपर्यंत प्रज्वलित असाव्यात.रात्रभर असतील तर उत्तम.पूजेच्या वरती भिंतीवर शुभ लाभ लिहावे. मुख्यपुजेसमोर चांदीच्या, पितळेच्या समया असल्या तरी मातीची पणती ही लावावी. लक्ष्मीला मातीची पणती प्रिय आहे. घरातील सर्वांनी पुजेला उपस्थित रहावे. पुजा पती पत्नी दोघांनी करावी. पुजेला बसताना आसनावर बसावे. पुजेला बसण्यापुर्वी पुरुषांच्या कपाळावर कुंकवाचा टिळा असावा. डोक्यावर टोपी घालावी. स्रियांनी केसात फुलांची वेणी घालावी. शंख असेल तर शंखनाद करावा. डमरूचा नाद करावा.

लक्ष्मीपुजनानंतर वाहनांची पुजा करावी. 

शक्यतो वर सांगितल्याप्रमाणे पूजन करावे.

सर्व वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा....

सर्वांना लक्ष्मीचा कृपाप्रसाद लाभो.....

©सौ. सुप्रिया रामचंद्र जाधव