लहानपण देगा देवा

लेख

लहानपण देगा देवा

"लहानपण देगा देवा
मुंगी साखरेचा रवा"
बालपण ही निसर्गाची, ईश्वराची किती छान देणगी आहे. म्हणून तर लहान मुलांनी लहानांसारखंच असलं पाहिजे, वागलं पाहिजे आणि मोठ्यांनीही लहानांना मोठ्यांची लहान आवृत्ती न बनवता लहानांसारखंच राहू दिलं पाहिजे.
‘लहानपण देगा देवा’, असं कितीही आळवलं तरी एकदा बालपण सरलं की ते पुन्हा येणार नसतं. लहानपणी मोठं होण्याची ओढ असते, पण मोठं झाल्यावर मात्र लहानपणाची ओढ लागते. ‘प्रौढत्वी निज शैशवास जपणे’ आवश्यक ठरतं. आता लहान असलेल्यांच्या नशिबी मात्र लहानपणच नाहीये. कारण बालपणच हरवलंय...मुले ही देवाघरची फुले असली, तरी ही फुलं अकाली फुलताहेत आणि अकाली कोमेजताहेत.

आजकालची लहान लहान मुलं मुली ब्युटी पार्लरमध्ये जाऊन चॉकलेट फेशियल,नेल आर्ट इत्यादी मोठ्यांसाठीच्या सौंदर्यसाधना करवून घेऊ लागले आहेत आणि कशी मोठ्यांचं अनुकरण करताहेत,एका मर्यादित सीमारेषेपाशी थबकलेलं लहानपण केव्हाच ती सीमारेषा पुसून टाकून प्रौढपणाची झूल पांघरून मोठ्यांचं अंधानुकरण करू लागलंय...नव्हे,बालपण संपलंय !
हाय सोसायटीतल्या बायका शॉपिंग करण्यात, किट्टी पार्ट्यांत मग्न आहेत. त्यांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ कुठेय? मग मुलं वाईट मार्गाला लागताहेत. आपली मुलं ड्रग्ज घेताहेत, लहान वयातच दारू-सिगरेट यांच्या आहारी जाताहेत, याकडे त्यांचं लक्षच नाहीय.
विक्री वाढवण्यासाठी आता लहानग्यांना लक्ष्य केलं जात असावं. चित्रपटसृष्टीतले तारे आणि तारका हेच ज्यांचे एकमेव आदर्श आहेत, ती लहान मुलं आपसूकच ह्या व्यसनांच्या विळख्यात अडकताहेत.
कौटुंबिक सोहोळ्यांना सात्विकतेचं, मायेचं, आपुलकीचं अस्तर असायचं. जिवाभावाच्या मित्रमैत्रिणी, त्यांनी आणलेली भेटवस्तू यांमुळे वाढलेली वाढदिवसाची गोडी पुढच्या वाढदिवसापर्यंत टिकायची. पण आताशा कुणी-म्हणजे निदान संपन्न घरातली मुलं तरी घरी वाढदिवस साजरे करीत नाहीत; घरी वाढदिवस साजरे करणं मागासलेपणाचं मानलं जाऊ लागलंय.
आईवडील दोघंही ऑफिसमध्ये, घरी मुलांना सांभाळायला कुणी नाही. हसरं, निरागस मूल बघितल्यावर कुणालाही छान वाटतं, ओळख नसूनही आपण त्याच्याकडे बघून हसतो, त्याच्याशी बोलतो. बालपण ही निसर्गाची, ईश्वराची किती छान देणगी आहे. म्हणून तर लहान मुलांनी लहानांसारखंच असलं पाहिजे, वागलं पाहिजे आणि मोठ्यांनीही लहानांना मोठ्यांची लहान आवृत्ती न बनवता लहानांसारखंच राहू दिलं पाहिजे.

जीवनाची रुळावर चालते
आयुष्याची झुकझुक गाडी
अनेक थांबे पार करत
चालत राहते जीवनगाडी

बालपणीचा काळ सुखाचा
ताणतणाव विरहीत असतो
मनमौजी जीवन जगतांना
आनंद मात्र लुटत असतो

तरुणपणी पडते ओझे
जबाबदारीचे खांद्यावर
यश अपयशांना तोंड देत
आगेकुच चालते आयुष्यभर

प्रयत्न,कष्ट व मेहनतीने
वेग वाढतो जीवनाच्या गाडीचा
मजल दर मजल करीत
ध्येय जीवनात गाठण्याचा

वृद्धापकाळात मंदावतो वेग
अंतिम थांबा आल्यावर
आत्मा अमर,अविनाशी असतो
फक्त शिल्लक राहते कलेवर

©® श्री सुहास अजितकुमार मिश्रीकोटकर वेरूळ औरंगाबाद