लग्नगाठ - एक बंधन भाग ९

लग्नगाठ - एक बंधन..



अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
चौथी फेरी :-
कौटुंबिक कथेचे नाव :- लग्नगाठ - एक बंधन.
निशा थोरे (अनुप्रिया)

लग्नगाठ - एक बंधन.. भाग ९

तेजश्रीचं शिक्षण पुन्हा सुरू झालं. अभिराज तिघांनाही शिकवत होता. तेजश्री घरातली सगळी कामं उरकून मग अभ्यासाला बसत असे. तेजश्री मुळातच हुशार असल्याने अभिराज सरांनी शिकवलेलं पटकन आत्मसात करत असे. गौरी, समरही मन लावून अभ्यास करत होते. एक दिवस तेजश्री मुलांसोबत अभ्यास करत बसली होती. इतक्यात तेजश्रीला दारातून कोणीतरी आवाज दिला.

“तेजू..”


तेजश्रीने मान वर करून पाहिलं. दारात तिची मोठी आक्का आणि तिचे यजमान उभे होते. तिने पटकन पुस्तक खाली ठेवलं आणि धावतच दारापाशी आली. आपल्या मोठ्या बहिणीला आणि भावोजींना दारात पाहून तेजश्रीला खूप आनंद झाला होता. तिने पुढे येऊन आक्काला घट्ट मिठी मारली. दोघींच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते.

“अगं आक्का तू? भावोजी तुम्ही? कशी आहेस आक्का?”

मी ठीक आहे तेजू. तू सांग. तू कशी आहेस? घरातली बाकीची माणसं?

आक्काने तेजश्रीला विचारलं.

“मी छान आहे. घरातली सर्वजण ठीक आहेत. मला सांग.. आई, आजी कशा आहेत? आणि आपला संदीप…”

तेजश्रीने दारातच प्रश्नांचा भडीमार करायला सुरुवात केली.

“घरात तर घे. की दारातच सगळे प्रश्न विचारणार?

आनंदीबाई खोलीतून बाहेर येत हसून म्हणाल्या.

“अरे हो खरंच की. या ना, आत या.”

जीभ चावत तिने त्या दोघांना आत बोलावलं. आक्का मुलांसाठी आणलेल्या खाऊची पिशवी तेजश्रीच्या हातात देत म्हणाली,

“आपल्या घराच्या बागेतली फळं आहेत. मुलांना आवडतील. नंतर त्यांना कापून खायला दे.”

तेजश्रीने मान डोलावली. बहिणीला कुठे ठेवू कुठे नको असं तिला झालं होतं.

“अरे व्वा साडूसाहेब! या, या.. बऱ्याच दिवसांनी आलात. या ना बसा.”

विश्वासरावांनी हसून त्यांचं स्वागत केलं आणि दिवाणखान्यात बसवलं.

“सुनबाई, पाहुण्यांसाठी काही चहापाण्याचं पहायचं की नाही? की फक्त गप्पांवर पोट भरणार?”

तेजश्रीच्या सासूबाई हसून म्हणाल्या. तेजश्रीने हसून मान डोलावली. त्यानंतर तिने सर्वांसाठी चहा आणि नाष्टा बनवून आणला. चहापाणी झाल्यावर गप्पा सुरू झाल्या. तेजश्रीच्या भावोजींनी पिशवीतून एक लग्नपत्रिका बाहेर काढली आणि विश्वासरावांच्या हातात देत म्हणाले,

“विश्वास दादा, आम्ही तुम्हा सर्वांना लग्नासाठी आमंत्रण द्यायला आणि सर्वांना चार दिवस मुक्कामी घेऊन जायला आलो आहोत. चार दिवसांनी माझ्या धाकट्या भावाचं लग्न आहे. नाही म्हणू नका. आम्हालाही कधीतरी पाहुणचार करण्याची संधी द्या.”

“बरोबर आहे तुमचं पण तुम्हाला तर माहित आहे ना, आमच्या मागे किती व्याप असतात. मग इतके दिवस मुक्कामी कसं येणार? चार दिवसांसाठी येऊ शकणार नाही. हं.. पण लग्नाला मात्र नक्की पोहचतो.”

असं म्हणत विश्वासरावांनी त्यांना लग्नाला येण्याचं वचन दिलं.

“मग तुमची हरकत नसेल तर चार दिवसांसाठी तेजूला आमच्याकडे माहेरपणाला पाठवाल का? म्हणजे तुमची इच्छा असेल तरच नाहीतर काही सक्ती नाही.”

तेजश्रीची आक्का घाबरत म्हणाली.

“अगं आक्का, मी गेल्यावर यांच्या जेवणाचं काय? आईंची औषधं सुरू आहेत, पथ्यपाणी सुरू आहे. शिवाय मुलांच्या शाळा सुरू आहे. त्यांच्या जेवणाची हेळसांड होईल गं. नको, नको.. आम्ही लग्नालाच येतो. अक्षदा टाकण्याच्या वेळेपर्यंत पोहचू.”

तेजश्री आपल्या कुटुंबियांच्या काळजीने बोलत होती.

“अगं काही हरकत नाही. मी आहे ना? तू तुझ्या आक्काच्या घरी बिनधास्त जा. मस्त मज्जा कर. मी चार दिवससर्व सांभाळून घेईन. आणि हो, तुझ्या मुलांची आणि तुझ्या नवऱ्याचीही काळजी घेईन हो.”

आनंदीबाईं मिश्किलपणे म्हणाल्या. आनंदीबाईंनी तिला आक्कासोबत जाण्याची परवानगी दिली.

“आई, तू जा. मस्त धमाल कर. आमची काळजी करू नको. मी समर, बाबा आणि आजीचीही काळजी घेईन. तू जा पण चारच दिवस हं.. मावशी, आईला लवकर पाठवून दे. आम्हाला तिच्याशिवाय करमत नाही. ती आजूबाजूला असली तरी बरं वाटतं.”

गौरी तेजश्रीच्या कुशीत शिरत म्हणाली.

“हो आई, तू जा पण लवकर ये.”

समरही तिला बिलगत म्हणाला. तेजश्रीने दोन्ही मुलांना मायेने जवळ घेतलं आणि डोक्यावरून हात फिरवला.

“हो रे बाळांनो, मी लवकर परत येईन.”

तिने व्याकुळ नजरेने विश्वासरावांकडे पाहिलं. त्यांनी खुणेनेच जाण्याची परवानगी दिली. ते पाहून तेजश्रीला खूप आनंद झाला. चार दिवस ती तिच्या आक्काबरोबर खूप मज्जा करणार होती. गप्पा मारणार होती. ती पटकन तिच्या खोलीत गेली आणि दोन चार साड्या बॅगेत भरल्या. लग्नात नेसण्यासाठी छान भरजरी शालू घेतला. त्यावर घालण्यासाठी छान दागिना घेतला आणि ती आपल्या आक्कासोबत जायला तयार झाली. निघताना तेजश्रीने आनंदीबाईंना वाकून नमस्कार केला.

“लवकर ये गं सुनबाई. आता तुझ्याशिवाय मलाही चैन पडत नाही.”

आनंदीबाईं तिच्या पाठीवरून हात फिरवून आशीर्वाद देत म्हणाल्या.

“सर्वांनी लग्नाला नक्की या. आम्ही वाट पाहतोय.”

तेजश्रीचे भावोजी आनंदीबाई आणि विश्वासरावांकडे पाहत म्हणाले.

“हो नक्की येतो.”

विश्वासराव हसून म्हणाले. थोड्याच वेळात सर्वांचा निरोप घेऊन तेजश्री, आक्का आणि तिचे भावोजी परत त्यांच्या घरी जाण्यास निघाले. एस.टी स्टॅण्डवर त्यांनी गाडी पकडली आणि आता गाडी तिच्या वेगाने रस्त्यावरून धावू लागली. तेजश्री आणि आक्काच्या गप्पा रंगात आल्या. गप्पांच्या नादात गाव कधी आलं हे त्यांनाच समजलं नाही. ते तिघे एस.टीतून खाली उतरले आणि घराच्या दिशेने चालू लागले. तेजश्री आळीपाळीनं आक्का आणि भावोजींकडे पाहत होती.

“आक्का भावोजींसोबत किती आनंदी दिसतेय! संपूर्ण प्रवासात ते तिची काळजी घेत होते. काय हवं, काय नको सारखं तिला विचारत होते. इतकी काळजी तर बाबांनीही आईची घेतली नाही. आणि माझी? माझ्या नवऱ्याने कधी?”

तेजश्री मनातल्या मनात विचार करू लागली. थोड्याच वेळात ते तिघे घरी पोहचले. घरात बरीच पाहुणे मंडळी आली होती. लग्नाची लगबग दिसत होती. आक्काच्या घरच्यांनी तेजश्रीचं आनंदाने स्वागत केलं. तिच्या सासूबाईंनी तेजश्री पहिल्यांदा घरी आली म्हणून औक्षण केलं.

“एकटीच आलीस? आणि जावईबापू?”

आक्काच्या सासूबाईंनी प्रश्न केला.

“हो ते सर्वजण लग्नाच्या दिवशीच येणार आहेत.”

तेजश्रीने उत्तर दिलं.

“हो का? बरं. त्यांच्या मागे काय व्याप कमी आहेत? लग्नाला आले तरी खूप झालं. सुनबाई, तेजूला आतल्या खोलीत घेऊन जा. तिची बॅग तिथल्या तुझ्या कपाटात ठेव. तुम्ही सर्वजण हातपाय धुवून या. तोपर्यंत मी तुमच्यासाठी चहा बनवते.”

“आई, तुम्ही बसा. मी करते. चल तेजू.”

आक्का तेजश्रीला घेऊन आतल्या खोलीत आली. तेजश्रीने हातपाय तोंड धुवून अंगावरची साडी बदलली आणि तिची बॅग आक्काच्या कपाटात ठेवून दिली. थोड्या वेळात आक्काने सर्वांसाठी चहा बनवला आणि तिने तिच्या सासूबाईंना, तेजूला आणि घरातल्या बाकीच्या लोकांना दिला. त्यानंतर आक्का रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागली. तेजश्रीही तिच्यासोबत स्वयंपाकघरात आक्काच्या मदतीला गेली. आक्काने विचारलं,

“तेजू, कशी आहेस तू बाळ? तिथे जास्त बोलता आलं नाही. सासूबाई कशा आहेत आणि मुलं?”

“सगळं छान आहे आक्का. मी आनंदात आहे. मुलं आणि मी मित्रमैत्रिणीसारखं वागतो. सासूबाई खूप प्रेमळ आहेत. त्यांना पाहिलं की मला आईची आठवण येते पण आक्का, माझ्या आयुष्यातली आईची कमी त्यांनी भरून काढलीय गं. माझं लग्न झालं तेंव्हा मी खूप दुःखी होते पण खरं सांगायचं तर या लग्नामुळे मी खरंच खूप सुखी झाले. चांगली माणसं मिळाली.”

तिच्या डोळ्यात पाणी जमा झालं. कांदा चिरता चिरता तिने डोळ्यातलं पाणी पुसत उत्तर दिलं.

“आणि विश्वासराव? ते कसे आहेत? तुझ्याशी बरे वागतात नं?”

आक्काच्या प्रश्नांसरशी तेजश्री थोडी दचकली. काय सांगावं तिला समजेना पण स्वतःला सावरत ती म्हणाली,

“तेही चांगले आहेत. ते माझी किंबहुना घरातल्या सर्वांची काळजी घेतात. त्यांनीच मला पुढे शिकण्याची परवानगी दिलीय.”

तिने हसून उत्तर दिलं.

“अरे व्वा छानच! बरं झालं. तू तुझ्या सासरी सुखात आहे हे ऐकून फार बरं वाटलं.”

“आक्का, एक विचारू?”

आक्काने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं.

“तू खूष आहेस? इथे सासरी काही त्रास वगैरे?”

“नाही गं तेजू, मला कसलाच त्रास नाही. सासू सासरे घरातली सगळी माणसं खूप चांगली आहेत. मला कधीच कसलाच त्रास झाला नाही. तुला सांगते तेजू, माझ्या घरातले सगळे चांगले आहेतच पण त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे तुझ्या भावोजींचं माझ्यावर खूप प्रेम आहे. माझ्या डोळ्यात जरा जरी पाणी आलं ना की, त्यांचा जीव कासावीस होतो. काय झालं म्हणून सारखं विचारत राहतील, माझ्या मागे मागे काय काय करतील. मध्येच स्वयंपाकघरात काय येतील, माझ्या पाठीमागून येऊन माझ्या कमरेला विळखा का घालतील, मला काय धरतील. तुला एकेक सांगावं ते नवलचं! मला तर बाई, सर्वांसमोर फार शरमल्यासारखे होतं बघ.”

हे सांगताना आक्काचा चेहरा गोरामोरा झाला होता. तेजश्री विचार करू लागली.

“कसला विचार करतेय तेजू? अगं नवरा बायकोचं नातं असंच फुलत जातं. एकमेकांवर प्रेम करत, एकमेकांना जपत, एकमेकांची काळजी घेत जगायचं असतं. हेच तर सहजीवन आहे. यालाच तर संसार म्हणतात.”

आक्का हसून म्हणाली. तेजश्रीच्या डोळ्यासमोर विश्वासराव तरळून गेले. थोड्याच वेळात रात्रीचा स्वयंपाक झाला. सगळ्यांची हसत खेळत, गप्पा मारत जेवणं झाली. भांडीकुंडी घासून पुसून झाली.

“तेजू, आपण दोघी आतल्या खोलीत झोपू. तुझे भावोजी बाहेर अंगणात बाकीच्या पुरुष मंडळींसोबत झोपतील. चल आता, उद्या सकाळी आपल्याला लवकर उठून पुढची हळदची तयारी करायची आहे.”

🎭 Series Post

View all