लग्नगाठ - एक बंधन.. भाग ८

लग्नगाठ - एक बंधन..


अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
चौथी फेरी :- कौटुंबिक कथा
कथेचे नाव :- लग्नगाठ - एक बंधन..
निशा थोरे (अनुप्रिया)

लग्नगाठ - एक बंधन.. भाग ८

तेजश्री तिच्या सासरी छान रूळली होती. घरात ती, तिच्या सासूबाई, विश्वासराव आणि त्यांची दोन मुलं इतकीच माणसं होती. एकमेकांवर जीवापाड प्रेम करत, एकमेकांना जपत छान आयुष्य सरत होतं. विश्वासरावांच्या आईंनी, आनंदीबाईंनी आपल्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर दोन वर्षाच्या मुलाला, विश्वासरावांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतं. पती निधनाचं दुःख करत न बसता त्यांनी उद्योगाचा हा संपूर्ण डोलारा उत्तमरित्या सांभाळला होता. विश्वासरावही कळत्या वयापासून आनंदीबाईंना मदत करत होते. पुढे उद्योग सांभाळण्यासाठी सक्षम झाल्यानंतर सर्व कारभार आपल्या मुलावर सोपवून आनंदीबाईंनी या सर्व व्यापातून निवृत्ती स्विकारली. विश्वासरावांच्या पहिल्या पत्नी बाळंतपणात दगावल्यामुळे आनंदीबाई खूपच हळव्या झाल्या होत्या. त्यामुळे त्या तेजश्रीची मुलीसारखी काळजी घेत होत्या. तिला तिच्या माहेरची आठवणही होऊ देत नव्हत्या. विश्वासरावांची दोन्ही मुलं गौरी आणि समर तिच्याच वयाचे असल्याने त्यांच्यातही छान मैत्री झाली होती. तेजश्रीच्या येण्याने वाडा पुन्हा हसू लागला. आता घरातलं सुतकी वातावरण जाऊन हसण्या खिदळण्याचे आवाज निनादू लागले. यंदाच्या वर्षी गौरी दहावीला आणि समर आठवीत गेला होता. गौरीने पूर्ण संस्कृत विषय घेतला होता.

एक दिवस विश्वासराव त्यांच्या खोलीत आराम करत बसले होते. तेजश्री तिथेच घुटमळत होती. तिला काहीतरी सांगायचं होतं.

“तुला माझ्याशी काही बोलायचं आहे का? मगाचपासून अवतीभवती घुटमळतेयस. बोल, काय सांगायचं आहे?”

विश्वासराव पुस्तकात खुपसलेलं डोकं बाहेर न काढताच म्हणाले.

“मला पुढे शिकायचं आहे. मी गौरी सोबत दहावीच्या परीक्षेला बसू? रोज शाळेत जावं लागणार नाही. मी घरात राहूनच अभ्यास करेन. फक्त परीक्षेला परीक्षाकेंद्रावर जावं लागेल. म्हणून मी म्हणत होते की, परीक्षेला बसण्याचा फॉर्म भरला असता.”

तेजश्री खाली मान घालून अडखळत म्हणाली.

“जमेल तुला? तू सातवीतून शाळा सोडलीस मग पुढच्या तीन वर्षाचा अभ्यास कसा पूर्ण करशील? घर, आई, मुलं, पाहुणेरावळे हे सारं सांभाळून करू शकशील?”

“हो, जमेल मला. मी दिवसरात्र मेहनत करेन. सगळं सांभाळून अभ्यास करेन. तुम्हाला कोणत्याही तक्रारीची संधी देणार नाही पण मला शिकू द्या निदान ते माझं स्वप्नं तरी पूर्ण होऊ द्या.”

तेजश्री काकुळतीला येऊन म्हणाली. तिच्या डोळ्यात त्यांना शिकण्याची तीव्र इच्छा त्यांना दिसत होती. तिची प्रामाणिक तळमळ पाहून विश्वासरावांनी तिच्या पुढील शिक्षणाला होकार दिला.

“ठीक आहे, तुला शिकण्याची आवड असेल आणि मेहनत करण्याची इच्छा असेल तर करूया तुझं ऍडमिशन. उद्याच तुझा फॉर्म भरून टाकूया.”

विश्वासरावांचं बोलणं ऐकून तेजश्रीला खूप आनंद झाला. शिक्षणाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याची संधी तेजस्वला मिळणार होती. दुसऱ्या दिवशी विश्वासराव स्वतः तालुक्याला जाऊन फॉर्म भरून आले आणि तेजश्रीसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आले होते.

“आई, ए आई.. बाहेर ये बघू.”

खुर्चीत बसत त्यांनी त्यांच्या आईला आवाज दिला. आनंदीबाई, तेजश्री आपल्या मुलांना म्हणजेच गौरी आणि समरला घेऊन बाहेर आली. विश्वासरावांनी वह्या पुस्तकांचा एक सेट पिशवीतून बाहेर काढला आणि त्यांनी तेजश्रीला देत बोलायला सुरुवात केली.

“तेजश्री, हे तुझ्यासाठी. मी आजच तुझा दहावीच्या परीक्षेचा फॉर्म भरून आलोय. आता अभ्यासाला लागा. त्यात अजिबात खंड पडता कामा नये. हं, आणि अजून एक गोष्ट., उद्यापासून तालुक्याच्या शाळेतले शिक्षक अभिराज देशमाने तुम्हाला शिकवायला आपल्या घरी येतील. ते आपल्यासोबतच गेस्टहाऊसमध्ये राहतील. तेजश्री, तुला ते सगळे विषय शिकवतील कारण तुझ्या शिक्षणात मधल्या काही वर्षात खंड पडलाय त्यामुळे तुझ्याकडून जास्त तयारी करून घ्यावी लागेल. गौरीला आणि समरला गणित, विज्ञान, इंग्रजी शिवाय गौरीला संस्कृतही शिकवतील. आता खूप अभ्यास करायचा आणि चांगल्या गुणांनी पास व्हायचं. समजलं?”

त्या सर्वांनी होकारार्थी माना डोलावल्या. तेजश्रीला नवीन वह्यापुस्तकं पाहून खूपच आनंद झाला होता.

“हे मात्र तू छान केलंस विश्वासराव. माझ्याही मनात बऱ्याच दिवसापासून हा विचार घोळत होताच. सुनबाई, मुलींनी शिकलंच पाहिजे. चांगलं शिकून सवरून स्वतःच्या पायावर उभं राहिलंच पाहिजे. आता तुझ्या नवऱ्यानेच मनावर घेतलंय म्हटल्यावर तुला मन लावून अभ्यास करावाच लागेल. समजलं का सुनबाई?”

आनंदीबाई हसून म्हणाल्या तशी तेजश्री लाजली आणि तिच्या खोलीत पळत निघून गेली. गौरी आणि समरही त्यांच्या खोलीत निघून गेले.

आपल्या सासूबाईंची, नवऱ्याची सेवा करत असताना, मुलांसोबत हसत खेळत असताना तेजश्री आता अभ्यासही करू लागली होती. हळूहळू विश्वासराव आणि तेजश्री यांच्यात संवादाला सुरुवात झाली होती. विश्वासराव आजपर्यंत कधीच तिच्याशी पत्नी म्हणून बोलले नव्हते. तो मान तिला दिला नव्हता. कधीच त्यांच्या प्रेमाचा सहवास लाभला नव्हता. लग्न होऊनही तिला विश्वासरावांचा स्पर्श झाला नव्हता. तेजश्रीही फार मोठी नव्हती. अडनिड्या वयात लग्न झालं होतं. वयात आलेल्या मुलांच्या मनात ज्या प्रेमसुलभ भावना, जाणीवा जागायला हव्या होत्या. त्याची सुरुवात झाली होती. हळूहळू विश्वासरावांनाही तेजश्रीचं वागणं बोलणं आवडू लागलं होतं.

“इतकी लहान पोर पण घर कसं जाणत्या बाईसारखं सांभाळलंय. माझ्या गौरीला तर अजून साधा चहाही करता येत नाही पण हिने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी उत्तमरित्या सांभाळलीय. एक सुन, माझ्या मुलांची आई, मैत्रीण म्हणून तिने साऱ्या भूमिका नीट बजावल्यात. खरंच फार गुणी आहे पोर.”

विश्वासरावांच्या मनात तिच्याबद्दल प्रेम वाटू लागलं होतं. तिच्या आवडी निवडीची ते काळजी घेऊ लागले होते. आणि म्हणूनच तिच्या आनंदासाठी त्यांनी तिला पुढे शिकण्याची परवानगी दिली होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी एक तरुण युवक पाटलांच्या वाड्यासमोर येऊन उभा राहिला.

“कोण पाहिजे?”

नोकराने विचारताच त्याने बोलायला सुरुवात केली.

“मी अभिराज देशमाने, तालुक्याच्या शाळेतून आलोय. विश्वासरावांना भेटायचंय. त्यांनी बोलावलं होतं.”

“अहो सर, या.. या ना आत. आम्ही तुमचीच वाट पाहत होतो.”

विश्वासराव खोलीतून बाहेर येत म्हणाले. आनंदीबाईही बाहेर आल्या. त्यांनी सरांना आत बोलावलं आणि दोघेही बाहेर हॉलमध्ये बसले. इतक्यात नोकरांनी त्यांच्या चहापाण्याची व्यवस्था केली. चहापाणी झाल्यावर विश्वासरावांनी बोलायला सुरुवात केली.

“सर, ही माझी आई आनंदीबाई कदम. हा सगळा डोलारा आमच्या आईनेच उभा केलाय आणि आई, हे अभिराज सर तालुक्याच्या गावावरून आलेत. मी म्हटलं होतं ना तुला? आपल्या मुलांना आणि तेजश्रीला शिकवण्यासाठी एक शिक्षक येणार आहेत, हेच ते अभिराज देशमाने.”

अभिराजने त्यांना हात जोडून नमस्कार केला. आनंदीबाईंनीही अभिवादन केलं.

“मी तुम्हाला आमच्या बाकीच्या सदस्यांची ओळख करून देतो. गौरी, समर..”

विश्वासरावांनी मुलांना आवाज दिला. तिघेही त्यांच्या खोलीतून बाहेर आले.

“सर, ही आमची मुलगी गौरी आणि हे सुपुत्र समर. गौरी दहावीला गेलीय. तिने संस्कृत विषय घेतलाय आणि आमचा समर यंदा आठवीला आहे. त्याला विज्ञान आणि इंग्रजी विषय कठीण वाटतात. भीतीच वाटते म्हणा ना. ती भीती घालवण्याचं काम तुमचं. ”

विश्वासराव खळखळून हसले.

“आणि या आमच्या सुनबाई म्हणजे आमच्या विश्वासरावांच्या धर्मपत्नी. यांनाही तुम्हाला शिकवायचं आहे. बरं का?”

आनंदीबाई तेजश्रीकडे पाहून म्हणाल्या. अभिराजने तेजश्रीकडे पाहिलं.

“या विश्वासराव पाटलांच्या पत्नी? इतक्या लहान? मला तर वाटलं त्यांची मोठी मुलगी असेल. जाऊ देत. आपल्याला काय करायचंय? आपण त्यांना शिकवण्याचं काम करायचं आणि निघून जायचं. तेवढेच चार पैसे गाठीशी राहतील.”

अभिराज मनातल्या मनात बडबडला.

“कसला विचार करताय सर? घाबरू नका. आमची मुलं खूप चांगली आहेत. अजिबात वात्र नाहीत. तुम्हाला मुळीच त्रास देणार नाहीत. काळजी करू नका. बरं, आता तुम्ही थोडं आराम करा. दुपारचं जेवण झालं की बाकीच्या व्यवहाराचं म्हणजे तुमच्या शिकवणीच्या फीबद्दल वगैरे बोलू. आमच्या गेस्टहाऊसमध्ये तुमच्या राहण्याची सोय केलीय. चालेल ना?”

विश्वासरावांच्या बोलण्यावर अभिराजने मान डोलावली.

“सदा, सरांना आपलं गेस्टहाऊस दाखव. त्यांचं सामान घेऊन जा.”

सदाने मान डोलावली.

“चला सर.”

सदा त्याची सामानाची बॅग उचलून घेत म्हणाला. अभिराजही निमूटपणे सदाच्या मागे गेस्ट हाऊसच्या दिशेने चालू लागला. तेजश्री त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होती.

सारं काही सुरळीत सुरू आहे असं वाटत असतानाच नियती मात्र गालातल्या गालात हसत होती. सुखाची वाट तेजश्रीसाठी इतकी सहज सोप्पी कधीच नव्हती.

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all