Mar 02, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

लग्नगाठ - एक बंधन.. भाग ७

Read Later
लग्नगाठ - एक बंधन.. भाग ७


अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
चौथी फेरी :- कौटुंबिक कथा
कथेचे नाव :- लग्नगाठ - एक बंधन..
निशा थोरे (अनुप्रिया)

लग्नगाठ - एक बंधन.. भाग ७

फार गाजावाजा न करता साध्या पद्धतीने मोजक्या पाहुण्यांच्या साक्षीने विश्वासराव आणि तेजश्रीचा विवाह सोहळा पार पडला. देवा-ब्राह्मणांच्या साक्षीनं ते दोघे पतिपत्नी झाले. इतकी वर्षे प्रेमानं जतन केलेल्या हृदयाच्या तुकड्याला विश्वासरावांच्या हाती स्वाधीन करताना रमेला भरून आलं. तिने भरल्या डोळ्यांनी लेकीचा निरोप घेतला. कधीही आपल्या आईला, घराला सोडून न राहिलेली तेजू आता सर्वांना सोडून सासरी निघाली होती. डोळ्यांत आसवं होती आणि नवीन संसाराची स्वप्नंही.

विश्वासरावांची अर्धांगिनीं, पंचक्रोशीतील जमीनीचे मालक असलेल्या \"जमीनदाराची पत्नी\" म्हणून तेजश्रीने पाटलांच्या दिव्य भव्य वाड्यात गृहप्रवेश केला. पुढे सगळे सोपस्कार, विधी आटोपल्या आणि तिच्या सासूबाईंनी तेजश्रीला त्यांच्या नातेवाईकांशी ओळख करून दिली.

विवाह सोहळा आटोपल्यानंतर काही पाहुणेमंडळी आपापल्या घरी गेले आणि काही दूर गावची पाहुणेमंडळी वाड्यावर मुक्कामी राहिली. तेजश्रीच्या सासूबाईं त्यांच्या पुतणीला म्हणाल्या,

“मनीषा, जा सुनबाईंना तिच्या खोलीत सोडून ये. तिथेच बसून राहू नकोस लगेच परत ये.”

मनीषाने मान डोलावली आणि ती तेजश्रीला घेऊन तिच्या खोलीपर्यंत आली.

“जा वहिनी, आत जा. मी उद्या सकाळी येते. रात्री काय झालं ते सांगशील मला.”

ती मिश्किलपणे हसत म्हणाली.

तेजश्रीने लटक्या रागाने तिच्याकडे पाहिलं आणि गालातल्या गालात लाजली. तिला तिच्या खोलीत सोडून मनीषा निघून गेली. तेजश्री आत आली. खोलीतलं दृष्य खूपच मोहक होतं. एक सुंदर भव्य खोली. विविध रंगी, सुगंधी फुलांनी सजवलेला मोठा पलंग. अत्तरदाणीतून अत्तर शिंपडलं असावं इतका मनाला धुंद करणारा सुगंध साऱ्या खोलीत पसरला होता. तेजश्री सजवलेल्या पलंगावर येऊन बसली.

बरीच रात्र झाली होती. दिवसभराच्या दगदगीने ती दमली होती. पलंगाला टेकताच तिचा डोळा लागला. मध्यरात्र उलटून गेल्यावर विश्वासराव खोलीत आले. त्यांच्या पावलांच्या आवाजानं तेजश्रीला जाग आली. त्यांनी अंगातला सदरा काढून खुंटीला अडकवला आणि दुसरा सदरा अंगावर चढवला आणि ते तेजश्रीजवळ येऊन बसले. त्यांच्या हातात कसली तरी कागदपत्रे होती. तेजश्रीकडे पाहत विश्वासराव म्हणाले,

“तेजश्री, ही जमिनीची कागदपत्रं आहेत. तुझ्या बाबांच्या नावावर पंचवीस एकर जमीन केलीय. एक बैलजोडी आणि दोनचार दुभत्या गाईपण दिल्यात. तुझ्या आजीला मोठ्या डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहे आणि तुझ्या भावाला तालुक्याच्या शाळेत ऍडमिशन करून दिलंय. अजून काय हवंय का?”

“पण तुम्ही हे सर्व का करताय? मी तुम्हाला कुठे काय मागितलं होतं?”

“बरोबर आहे तुझं. तू काहीच मागितलं नव्हतं पण तुझ्या बाबांना हवं होतं. त्यांनीही काही मागितलं नाही पण आम्ही दिलं कारण या उपकाराच्या ओझ्याखालीच त्यांना आयुष्यभर दाबून ठेवायचं होतं. माझी तुझ्याकडूनही काही अपेक्षा नाही. माझ्या वृद्ध आईचा आणि माझ्या दोन मुलांचा सांभाळ करण्यासाठी मी तुझ्याशी लग्नगाठ बांधली. बाकी काहीही नाही. या बंधनात स्वतःला बांधून घ्यायची माझी मुळीच इच्छा नव्हती. मी फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी तुझ्यासोबत या बंधनात अडकलो.”

त्यांचा प्रत्येक शब्द तिच्या जिव्हारी लागत होता. त्यांचं स्पष्ट बोलणं तिच्या मनावर सपासप वार करत होतं.

“म्हणजे याचा अर्थ ही लग्नगाठ एक तडजोड आहे? माझ्या शालूच्या पदराशी यांच्या उपरण्याला मारलेली गाठ निव्वळ एक औपचारिकता आहे? काय अर्थ आहे मग या लग्न बंधनाला?”

तेजश्रीच्या डोळ्यातलं तळं रितं होऊ लागलं. मनात नाना प्रश्न उभे राहत होते. त्यांनी निर्विकार चेहऱ्याने तिच्याकडे एकदा पाहिलं. पलंगावर ठेवलेली उशी आणि चादर घेतली आणि शेजारी मांडलेल्या सोफ्यावर जाऊन झोपला. तेजश्री तशीच टिपं गाळत बसून राहिली. बऱ्याच उशिरा पहाटे तिला झोप लागली.

सकाळी पाखरांच्या किलबिलाटामुळे तेजश्रीला जाग आली. विश्वासराव तिच्या आधीच उठून सकाळच्या विधी आटोपून पेपर वाचत बसले होते. तेजश्री पलंगावरून उतरली. पटकन बाथरूममध्ये गेली आणि फ्रेश होऊन बाहेर आली. इतक्यात खोलीचं दार ठोठावलं. दार उघडताच समोर तिला तिच्या सासूबाई उभ्या दिसल्या.

“उठलीस का सुनबाई? झोपली लागली ना? नवख्या घरात तुझा हा पहिलाच दिवस. सवय व्हायला थोडं वेळ लागेल ना!”

तिच्या सासूबाई हसून म्हणाल्या. तिनेही मान डोलावली.

“चला, खाली जाऊ. आज स्वयंपाक घरातला तुझा पहिला दिवस. काहीतरी गोड पदार्थ बनवावं लागेल. तशी पद्धत आहे ना. चल तुला स्वयंपाकघर दाखवते.”

सासूबाईंच्या बोलण्यावर तेजश्रीने मान डोलावली आणि काही न बोलता गुपचूपपणे त्यांच्या मागोमाग चालू लागली. पाटलांचं स्वयंपाकघर म्हणजे अगदी भव्य, आलिशान. आश्चर्याने तिचे डोळे विस्फारले. आयुष्यात पहिल्यांदाच इतकं मोठं स्वयंपाकघर तिनं पाहिलं होतं. सासूबाईं तिला स्वयंपाक घरातल्या प्रत्येक गोष्टीची ओळख करून देत होत्या. स्वयंपाक करणाऱ्या बायांची ओळख करून दिली. नंतर त्यांनी तिला वरच्या फडताळीतल्या पितळेच्या डब्यातून रवा, तूप, साखर आणि सुकामेवा परातीत काढून दिला. तेजश्रीने छान गोड शिरा बनवला. बटाट्याची भाजी पोळी, वरणभात, कांदेभजी, कोशिंबीर, पापड आणि लोणचं असा छान साग्रसंगीत जेवणाचा बेत आखला. सासूबाई आणि स्वयंपाकघरात काम करणाऱ्या मावश्या तिच्या मदतीला होत्याच. त्यांच्या मदतीनं तिने संपूर्ण स्वयंपाक बनवला. रोज ताटात चटणी आणि शिळी भाकरी पाहणाऱ्या तेजश्रीने आयुष्यात पहिल्यांदाच इतकं साग्रसंगीत जेवण पाहिलं होतं. तिला या गोष्टींचं खूप अप्रूप वाटत होतं. जेवणाची वेळ झाली. घरातली पुरुष मंडळी जेवायला बसली. विश्वासरावांनी पहिला घास तोंडात घातला आणि त्यांचा तृप्त चेहरा सांगून गेला.

“छान..”

त्यांच्याही नकळत त्यांच्या मुखातून शब्द बाहेर उमटले. जेवण खूपच स्वादिष्ट झालं होतं. सर्वांनी पोटभर जेवणाचा आस्वाद घेतला. तृप्तीची ढेकर दिली. सर्वांनी नव्या सुनेच्या हातच्या जेवणाचं कौतुक केलं.

"सुनबाईंच्या हाताला चव आहे. जेवण खूपच स्वादिष्ट झालं होतं. सुगरण आहेस.”

असं म्हणत विश्वासरावांच्या आईंनी, आनंदीबाईंनी नव्या सूनबाईंना नको नको, म्हणत असतानाही आशीर्वाद म्हणून काही रुपये तेजश्रीच्या हातात दिले. तिने खाली वाकून सासूबाईंना नमस्कार केला. झालेल्या कौतुकाने तेजश्री आनंदून गेली होती.

“आज इतक्या वर्षांनी पहिल्यांदा कोणतरी माझं असं भरभरून कौतुक केलंय. आयुष्यभर आम्ही चारी बहिणींनी फक्त अवहेलनाच सहन केलीय. खूप छान वाटतंय.”

तेजश्रीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्यानंतर रितीरिवाजानुसार सगळे सोपस्कर यथासांग पार पडले. सत्यनारायणाची पूजा झाली. देवदर्शन झालं. दिवस खूप छान सरत होते. नवखी तेजश्री आता सासरी छान रुळली होती.

पुढे काय होतं? कोणतं संकट तेजश्रीच्या आयुष्यात दबा धरून बसलं होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

निशा थोरे (शिवप्रिया - शब्दस्पर्श)

Service

मला शब्दांच्या विश्वात रमायला खूप आवडते.

//