लग्नगाठ - एक बंधन.. भाग ६

लग्नगाठ - एक बंधन..


अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
चौथी फेरी :- कौटुंबिक कथा
कथेचे नाव :- लग्नगाठ - एक बंधन..
निशा थोरे (अनुप्रिया)

लग्नगाठ - एक बंधन.. भाग ६

विश्वासराव कदमांकडील पाहुणेमंडळी तेजश्रीला पाहून गेली. रात्रीच्या जेवणानंतर केशव आणि त्याची आई अंगणात बोलत बसले होते.

”केशवा, पाटलांना मुलगी आवडलीय तर आपण पुढची बोलणी लवकर उरकून घेऊ. वेळ दवडायला नको ना! काय म्हणतोस?”

आईच्या बोलण्यावर केशव काही बोलणार इतक्यात रमा बाहेर आली. त्यांच्या हातावर बडीशेप ठेवत म्हणाली,

“मी काय म्हणते आई, आपण पुढच्या गोष्टी ठरवायच्या म्हणतोय पण आपण मुलाला कुठे पाहिलं? मुलाकडचे सगळे आले पण मुलगाच आला नव्हता. त्याला न पाहताच लग्न कसं ठरवणार? तेजूलाही आवडायला हवा नं!”

“तू जरा गप्प बसतेस का? तुला यातलं काय कळतं गं? तू तुझी अक्कल चुलीपुढं चालवायची. मला शिकवायचं नाही समजलं? आणि तिला काय आवडायचंय? आपल्याकडे मुलींच्या पसंती विचारत नाहीत. आम्हाला, घरातल्या मोठ्या माणसांना मुलगा आवडलाय शिवाय पाटलांनाही ती आवडलीय. मग विषयच संपला.”

केशव रमावर डाफरत म्हणाला.

“अहो, पण त्यांच्या मुलाला तरी आवडायला नको का? त्यांना एकट्याला आवडून काय उपयोग?”

“नवऱ्या मुलालाच आवडलीय ती. विश्वासरावच नवरा मुलगा आहे.”

केशव तिच्याकडे पाहत शांतपणे म्हणाला.

“काय? अहो काय बोलताय?”

त्याचं बोलणं ऐकून रमा खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसला.

“ इतक्या थोराड माणसाला? अहो आपल्या तेजूच्या वयाची दोन मुलं आहेत त्यांना? दोन पोरांच्या बापाला आपली सोन्यासारखी पोर कशी द्यायची? मी असं होऊ देणार नाही. माझा जीव गेला तरी चालेल पण माझ्या सोन्यासारख्या पोरीला असं कसायांच्या हाती मी देऊ देणार नाही.”

ती ठामपणे निर्धाराने म्हणाली.

“ठीक आहे. तुला मरणाची इतकीच हौस आहे तर काही हरकत नाही. तुझा जीव गेला तरी बेहत्तर पण तिचं लग्न विश्वासराव कदमांशीच होईल आणि जर तू हे करू दिलं नाहीस तर आधी तिचा जीव घेईन मग तुला विहिरीत ढकलून देईन. समजलं? मी कदम पाटलांना शब्द दिलाय. आता मी कोणाचंच ऐकणार नाही.”

केशवने त्याचा शेवटचा निर्णय सुनावला. केशवची आई रमाला समजावण्याच्या सुरात म्हणाली,

“अगं रमे, तुझ्या धाकट्या लेकीने नाव काढलं बघ. इतकं तालेवार, श्रीमंत स्थळ तिच्यासाठी स्वतःहून चालून आलंय. आणि विश्वासराव इतके काही थोराड दिसत नाही. तिसऱ्या बाळंतपणात त्यांची पत्नी आणि त्यांच्या पोटात असलेलं बाळ दोन्ही एकाच वेळी दगावले. आता त्यांच्या वयस्कर आईबाबांना आणि दोन मुलांना सांभाळायला घरात एक बाई हवी. रमे, बाईशिवाय घराला घरपण नाही. तुझी लेक तिथे राणीसारखी राहील. दोघांचा जोडा छान शोभतोय.”

“अहो पण सासूबाई ते तेजूपेक्षा निदान पंधरा- सोळा वर्षांनी मोठे असतील. आपण असं कसं लग्न लावून द्यायचं? तेजूच्या मनाचा तरी विचार करा.”

रमेच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं.

“त्याला काय होतंय? आमची लग्न झाली नाहीत का? तुझे सासरे आणि माझ्यात वीस वर्षाचं अंतर होतं. आम्ही संसार नाही केला का? आम्हाला मुलं झाली नाहीत का? अगं, पाटलांच्या घरात आपली लेक सुखात राहील. पैसा अडका, दागदागिने, कपडेलत्ता, चांगलंचुंगलं खायला प्यायला कशाची कमतरता भासणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी तुझ्या नवऱ्याला त्यांच्या साखर कारखान्यात भागीदार करून घेतलंय आणि वर पंचवीस एकर जमीन पण देणार आहेत. संदिपला तालुक्याच्या शाळेत दाखला करून दिला. आपल्या लेकीच्या अंगावर तीस चाळीस तोळे सोनं घालणार आहेत. शिवाय आपल्याला लग्नाचा खर्चही नाही. मग अजून काय हवं? एका लग्नामुळे सगळ्यांचं भलं होणार असेल तर मग लग्न करायला काय हरकत आहे सांग बरं?“

आतल्या खोलीत बसलेल्या तेजश्रीच्या कानावर सारं संभाषण पडत होतं. डोळ्यात महापूर दाटून आला. सगळ्या स्वप्नांचा चुराडा झाला होता. मौनातला संवाद सुरू होता.

“माझ्या लग्नामुळे संपूर्ण घराचं कल्याण होणार असेल तर लग्नाला होकार सांगू? असंही माझा होकार, नकार कोणी विचारलाय? पण मग मी आजवर पाहिलेल्या माझ्या स्वप्नांचं काय? सर्वसामान्य लोकांप्रमाणे एखाद्या किड्या मुंगीचं जिणं जगायला का माझा जन्म झालाय? हेच माझं नशीब आहे का?”

ती खिन्नपणे हसली. पुढे काही दिवसांतच केशवने तेजश्री आणि विश्वासराव कदम यांचा विवाह सुनिश्चित केला. रमाने आपल्या सासूला नवऱ्याला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण दोघांच्या हट्टापुढे तिचा नाईलाज झाला. शेवटी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी तेजश्रीचा विवाह तिच्यापेक्षा पंधरा वर्षांनी मोठ्या असलेल्या विश्वासरावांशी ठरवण्यात आला.

विश्वासराव कदमांच्या वाड्यासमोर दारात मांडव घातला गेला. वाड्याच्या दाराला आंब्याच्या पानांची तोरणं सजली. दारासमोर रांगोळी रेखली. होणाऱ्या नवरीच्या घरी नवरीचा शालू, घरातल्या सर्वांसाठी नवीन कपडे, काही गोड जिन्नस पाठवण्यात आलं. तेजश्रीच्या अंगावर पाटलांच्या सुनेला शोभतील इतके दागिने घालण्यात आले. घरातल्या मोजक्याच आप्तजनांना आमंत्रणं देण्यात आली. विश्वासरावांचं हे दुसरं लग्न होतं. सोयरीक तोलामोलाची नव्हती.

“काय सोयरीक केलीय! कुठे राजा भोज कुठे गंगू तेली. निदान सोयरीक तरी आपल्या बरोबरीच्या लोकांशी करावी ना. पाटलांचं डोकं ठिकाण्यावर नाहीये की काय?”

आप्तेष्टांमध्ये कुजबुज सुरू होती. पूर्ण दिवसभर लग्नसोहळ्यात पाटलांचे सगळे आप्तजन केशव आणि त्याच्या नातेवाईकांकडे घृणास्पद नजरेने पाहत होते. केशवला त्याच्याशी काही घेणंदेणं नव्हतं. एकदाचं लग्न उरकून टाकायचं आणि डोईवरचा भार कमी करायचा. इतकंच त्याचं काम होतं. पुढे काही का होईना त्याला फरक पडणार नव्हता. त्यामुळे लग्नात कोणालाही फारसा उत्साह नव्हता. तेजश्रीला ते सगळं दिसत होतं. पाहुण्यांमधली कुजबुज तिच्या कानावर पडत होती.

“यात माझा काय दोष? त्यांनी मागणी घातली. माझ्या वडिलांनी ती स्विकारली. माझं मत, माझी पसंती कोणी विचारलीही नाही. माझं मन कोणालाच कसं कळत नाहीये? त्यांचं जरी हे दुसरं लग्न असलं तरी माझं तर पहिलंच आहे ना! प्रत्येक मुलीच्या मनात आपल्या नवऱ्याविषयी, सासरविषयी काही स्वप्नं असतात तशी माझीही होती. आपल्या नवीन संसाराची स्वप्नं मीही पाहिली होती पण म्हणतात ना.. गरिबांच्या मुलींना स्वप्नं पाहण्याचा अधिकार मुळी नसतोच. आधी शिक्षणाचं स्वप्न अर्धवट राहिलं आणि आता लग्नाचीही सुंदर स्वप्नं धुळीस मिळाली.”

तेजश्रीच्या डोळ्यातून आपोआप अश्रूधारा वाहू लागल्या.

पुढे काय होतं? तेजश्रीच्या वैवाहिक आयुष्यात काय वाढून ठेवलं होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all