लग्नगाठ - एक बंधन.. भाग ५

लग्नगाठ - एक बंधन.. भाग ५


अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
चौथी फेरी :- कौटुंबिक कथा
कथेचे नाव :- लग्नगाठ - एक बंधन..
निशा थोरे (अनुप्रिया)

लग्नगाठ - एक बंधन.. भाग ५

कालचक्र त्याच्या वेगानं फिरत होतं. मुलं मोठी होत होती. बघता बघता मुलींचं बालपण सरलं आणि त्यांनी तारुण्यात पदार्पण केलं. अशात ऋतूचक्रानेही कौल दिला आणि एका पाठोपाठ चारही मुली मोठ्या झाल्या. एक दिवस रमाने मुलींना मायेने जवळ घेतलं आणि ती त्यांना समजावून सांगू लागली.

“मुलींनो, ऋतुचक्राच्या रूपानं ईश्वराने तुम्हाला बाईपणाचा ऐवज बहाल केला आहे आणि तो ऐवज तुम्हाला जीवापाड जपायचा आहे. प्रत्येक मुलीच्या आयुष्यात एक ना एक दिवस हा क्षण येतोच. मी जेंव्हा तुमच्या वयाची होते नं तेंव्हा माझ्या आयुष्यातही हा दिवस आला होता आणि मीही अशीच तुमच्यासारखी गोंधळून गेले होते. त्यानंतर हळूहळू मला साऱ्या गोष्टी समजत गेल्या. तुम्हालाही नक्की समजतील. आता एका छोट्याशा कळीचं फुलात रूपांतर होत आहे. यापुढे तुम्हाला स्वतःला अधिक जपावं लागेल. आता तुम्ही शहाण्या झालात. मोठ्या झालात. हळूहळू तुम्हाला तुमच्या शरीरात वेगवेगळे बदल जाणवतील. काही जाणीवा जिवंत होतील. हळूहळू चांगल्या वाईट स्पर्शांची तुम्हाला कल्पना येत जाईल. मुलींनो, आता तुमचा बाईपणाचा प्रवास सुरू झाला आहे. ईश्वराने तुम्हाला आई होण्याची देणगी दिली आहे. काळजी घ्या स्वतःची. समजतंय का मी काय बोलतेय ते?”

मुलींनी एकसाथ माना डोलावल्या तसं रमाला हसू फुटलं.

“येडाबाई, काय कळलं तुम्हाला? नुसत्या माना डोलावल्या.”

खरंतर रमाची काळजी वाढू लागली होती. केशव आणि तिच्या सासूबाईंची भुणभुण सुरू झाली.

“पोरी आता वयात आल्या. तरण्याताठ्या पोरींना घरात बसवून ठेवणार का? पोरींची लाज म्हणजे काचेचं भांडं. लवकर उजवून टाकल्या पाहिजेत.”

गावात सरकारी शाळा सातवीपर्यंतच होत्या. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तालुक्याला जावं लागे. त्यामुळे आपोआप मुलींच्या शाळा बंद झाल्या. एकटा संदीप शिकत होता. अखेर वर्षभरात फार काही विचार न करता आलेल्या स्थळांना होकार देऊन केशवने तिन्ही मुलींची घाईघाईने लग्नं उरकून टाकली. तिन्ही मुली आपापल्या घरी, सासरी नांदायला निघून गेल्या आणि आता तेजश्रीसाठी वरसंशोधन सुरू झालं. तेजश्री तिन्ही बहिणीत दिसायला अधिक देखणी होती. गव्हाळ रंग, लांबसडक काळेभोर केस, बोलके डोळे, तरतरीत नाक अगदी चारचौघीत उठून दिसावी अशीच होती. केशवला तिच्यासाठी मुलगा शोधायला जास्त प्रयास पडले नाहीत. शेजारच्या गावातल्या पाटलांचं म्हणजे विश्वासराव कदमांचं स्थळ सांगून आलं. मुलाकडचे पहायला येणार होते. इतकं तालेवार स्थळ सांगून आलं म्हटल्यावर घरातले सगळेच खूष होते पण तेजश्री मात्र लग्नाला तयार नव्हती.

“आई, मला शिकायचं गं. खूप मोठं व्हायचंय. शिकून कलेक्टर व्हायचंय. तुला सुखात ठेवायचंय. मला इतक्यात लग्न करायचं नाही. संसार, मुलं बाळं इतक्यात नकोय मला आई. ‘रांधा,वाढा उष्टी काढा’ यात मला इतक्या लवकर अडकायचं नाहीये गं.”

तेजश्री पोटतिडकीने रमाला सांगत होती.

“तेजू, मला कळतंय गं. तुझी शिकण्याची आवड मला माहित नाही का? पण घरातल्या मोठ्या माणसांनी एकदा ठरवलंय म्हटल्यावर कोण आणि काय समजवणार? तुझ्या आजी आणि बाबांसमोर कोणाचं काही चालतं का?”

रमा तिला समजावण्याचा प्रयत्न करत होती पण तेजश्री चिडून म्हणाली,

“आई, ते काही मला माहित नाही. मला लग्न करायचं नाही म्हणजे नाही. समजलं तुला?”

तिचं वाक्य पूर्ण होण्याच्या आत तिच्या कानाखाली एक जोरात आवाज आला. तेजश्रीच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. केशव समोर उभा होता. संतापाने त्याचा चेहरा लाल झाला. रमा उठून उभी राहिली.

“अहो काय करताय? तरण्याताठ्या मुलीवर हात उचलणं बरं दिसतं का? शांत व्हा.”

रमा केशव समोर उभं राहून त्याला अडवत म्हणाली, केशव तेजश्रीकडे रागात पाहत म्हणाला,

“काय म्हणालीस? मोठ्या माणसांना उलट उत्तर द्यायला तुझी हिंमत कशी झाली? मुळात तुला कोणी तुझी इच्छा विचारली का? मग कशाला तोंड चालवतेस? गप गुमान लग्नाच्या बोहल्यावर उभं राहायचं. समजलं?”

तेजश्री गाल चोळत आसवं गाळत कोपऱ्यात उभी होती. रमाने तिला कुशीत घेतलं होतं.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तेजश्रीला पाहण्यासाठी विश्वासराव कदम आणि त्यांची घरची मंडळी घरी आली. केशवने पुढे होऊन त्यांचं स्वागत केलं. त्याने सर्वांना बाहेर दिवाणखाण्यात बसवलं आणि रमाला त्यांच्या चहापाण्याची सोय करण्यास सांगितलं.

“या, या पाटील, या बसा. प्रवासात काही त्रास नाही ना!”

“नाही ओ, फारसा नाही. मी ओळख करून देतो.”

खाली बसत विश्वासराव म्हणाले. त्यांनी त्यांच्या सोबत आलेल्या सर्वांची ओळख करून दिली. केशवने सर्वांना हसून हात जोडून नमस्कार केला. त्यानंतर केशवनेसुद्धा रमा आणि आपल्या आईची ओळख करून दिली,

“ही आमची आई आणि ह्या आमच्या धर्मपत्नी, रमा.”

रमाने हात जोडून नमस्कार केला. थोड्या वेळात ती सर्वांसाठी चहा आणि नाष्टा घेऊन आली. चहापाणी झाल्यानंतर विश्वासराव म्हणाले,

“ज्या कामासाठी आलोय, ते उरकून घेऊया. मुलीला बाहेर बोलवा.”

केशवने मान डोलावली. रमा तेजश्रीला घेऊन बाहेर आली. गुलाबी रंगाच्या साडीत तेजश्रीचं रूप अजूनच खुलून आलं होतं. रमाने तिला एका कोपऱ्यात बसवलं. त्यांनी तिला जुजबी प्रश्न विचारले. तेजश्री खाली मान घालून मंद आवाजात उत्तर देत होती. पाहताक्षणीच पाहुण्यांना तेजश्री पसंत पडली. विश्वासरावांच्या सांगण्यावरून त्यांच्यासोबत आलेल्या बायकांनी तेजश्रीची खणानारळाने ओटी भरली. विश्वासराव पुढे म्हणाले,

“केशवराव, आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे. तुम्ही तुमच्या घरच्यांशी चर्चा करून तुमचा निर्णय लवकरात लवकर कळवा. आम्हाला तुमच्याकडून हुंडा, मानपान वगैरे काही नको. फक्त एक नारळ आणि तुमची मुलगी द्या. लग्नाचा सगळा खर्च आम्हीच करू. उलट तुमच्याच काही अपेक्षा असतील तर आम्हाला सांगा. आम्ही शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करू. चला तर मग आम्ही येतो. तुमच्या निरोपाची वाट पाहतो.”

विश्वासराव उठून उभे राहिले. त्याचबरोबर बाकीची मंडळीही जाण्यास निघाली. केशवने पुरुष पाहुण्यांना टॉवेल टोपीचा आहेर दिला. खडीसाखर आणि पानाचा विडा दिला. रमेने बायकांना हळदीकुंकू लावलं. खणानारळाने ओटी भरली. आणि मग सर्वांनी त्यांचा निरोप घेतला.

पुढे काय होतं? तेजश्रीच्या आयुष्यात काय वाढून ठेवलंय? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all