Feb 27, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

लग्नगाठ - एक बंधन.. भाग ४

Read Later
लग्नगाठ - एक बंधन.. भाग ४अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
चौथी फेरी :- कौटुंबिक कथा
कथेचे नाव :- लग्नगाठ - एक बंधन..
निशा थोरे (अनुप्रिया)

लग्नगाठ - एक बंधन.. भाग ४

पाच मुलांना जन्म दिल्यानंतर रमेची प्रकृती दिवसेंदिवस खालवत चालली होती. पाच बाळंतपणं सोसतांना तिला किती त्रास झाला असेल ते तिलाच ठाऊक! पण तिच्याकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नव्हता. सर्वजण नवजात बालकाच्या जन्माने आनंदून गेले होते. संदीप घरात सर्वांचा लाडका होता. तो जरा रडला तर लगेच त्याच्यासाठी सगळे उभे असायचे. साधी शिंक आली तरी लगेच दवाखान्यात घेऊन जायचे. तळहाताच्या फोडाप्रमाणे सगळेच त्याला जपत होते. तेजश्रीच्या पाठीवर मुलगा झाल्यामुळे काही दिवस तिचेही थोडेफार लाड झाले. कौतुक झालं.

“पोरीच्या पाठीवर मुलगा झाला. पोर नशीबवान आहे. तिच्यामुळे सुभेदार घराण्याला वारस मिळाला. आमचं भाग्य उजळलं.”

आजी तिच्यावरून कडाकडा बोटं मोडत म्हणाली होती. संदीपच्या येण्याने मुलींचे काही दिवस मजेत गेले पण त्यानंतर मात्र त्या चौघी बहिणी दुर्लक्षित झाल्या त्या कायमच्याच. रमाला सगळी मुलं सारखीच होती पण तिला तिच्या नवऱ्याचा, सासूचा स्वभाव चांगला माहित होता. काही दिवसांनी पुन्हा घरात ‘जैसे थे’ पूर्वीचं वातावरण दिसू लागलं. संदीप आणि त्यांच्या बहिणीत भेदभाव होऊ लागला. दुधातुपाचा घास संदीपसाठी आणि शिळं रात्रीचं उरलेलं जेवण मुलींना दिलं जाऊ लागलं. नवीन कपडे संदीपला आणि रमा तिच्या जुन्या वापरलेल्या साड्यातून मुलींना फ्रॉक शिवायची आणि नंतर तेच फ्रॉक तेजश्रीला दिले जायचे. हळूहळू मुली मोठ्या होतं होत्या. एकदा मोठया ताईने रमाला विचारलं,

“आई, आपल्या दादाला कायम नवीन वस्तू, नवीन कपडे असतात. तू त्याला गरम गरम जेवण करून वाढतेस. मग आक्काला, ताईला, मला आणि तेजूला जुनं का असतं गं? त्या कधीच काही बोलत नाही पण आई, तेजूला साय टाकून दूध फार आवडतं आणि आक्कालाही गरम गरम भात अन त्यावर तूप साखर फार आवडतं गं पण आजी कधी त्यांना दूध तूप खाऊ देत नाही. नेहमी दादालाच भरवते. असं का आई?”

रमाला तिला काय उत्तर द्यावं ते सुचेना. ती काहीतरी बोलणार इतक्यात मुलांची आजी आत आली. मुलींचं बोलणं तिच्या कानावर पडलं तशी आजी खवळली.

“ कार्ट्यांनो, तुम्हाला दूध, तूप कशाला हवंय गं? तो मुलगा आहे. सुभेदार घराण्याचा वंशाचा दिवा. तो पुढे जाऊन कष्टाची कामे करेल. त्याला शक्ती मिळायला हवी म्हणून त्याला पौष्टिक अन्न मिळायला पाहिजे आणि तुम्ही काय गं सटव्यानो, घरातच बसून राहाल. तुम्ही दही तूप खाऊन जाड व्हाल तर मग पुढे जाऊन तुमची लग्न कशी जमायची? तुम्हाला काही गरज नाही याची. उगी आईला प्रश्न विचारून त्रास देऊ नका. समजलं? चला पळा बाहेर. आल्या मोठ्या शहाण्या, आपल्या आईला प्रश्न विचारताहेत म्हणे.”

आजीने दटावल्यावर त्या चौघी बाहेर पळल्या आणि अंगणात जाऊन खेळू लागल्या. रमाला तिच्या सासूबाईंचं खूप नवल वाटलं.

“अहो, मुलांच्या आजी नां तुम्ही? मग का असा भेदभाव करता? कमाल आहे तुमची. तुम्ही स्वतः एक स्त्री असून माझ्या लेकींना इतकी दुय्यम वागणूक का देता? मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करून असमानतेचे धडे तुम्हीच का गिरवता?”

रमाच्या डोळ्यातून मुलींसाठी पाणी वाहू लागलं आणि त्यांच्या भवितव्याची चिंता सतावू लागली. केशवचा राग काही केल्या कमी होत नव्हता. तो आणि रमाच्या सासूबाई चारी मुलींशी अजिबात प्रेमाने वागत नव्हते. सारखा मुलींचा राग राग करायचे आणि संदीपचे प्रमाणापेक्षा जास्त लाड व्हायचे. अतिलाडाने तो उद्धट झाला होता. रमा त्याला काही सांगायला गेली की, तिच्या सासूबाई रमालाच डाफरायच्या.

“रमे, पोराला काही बोलायचं नाही. अगं, सुभेदार घराण्याचा एकुलता एक वारस आहे तो. त्याला जर काही बोलशील तर माझ्याशी गाठ आहे. सांगून ठेवते तुला. याद राख आणि तुला जे काही शिकवायचं, वळण लावायचं ते तुझ्या पोरींना लाव. त्यांना चांगलं वळण असलंच पाहिजे. परक्याचं धन हाईत त्या! आज ना उद्या उजवायला लागतीलच.”

सासूबाईच्या बोलण्याने रमाचा नाईलाज होऊ लागला. तिने संदीपला बोलणं सोडलं आणि संदीपही आईचं ऐकेनासा झाला. आईला उलट उत्तर देऊ लागला.

दिवसांमागून दिवस सरत होते. ऋतुचक्र त्याच्या वेगाने फिरत होते. अशा प्रतिकुल परिस्थितीत हळूहळू तेजश्री आणि तिची भावंडे लहानाची मोठी होतं होती. तेजश्री लहानपासूनच अभ्यासात हुशार होती. शिकण्याची आवड होती त्यामुळे प्रत्येक वर्षी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत होती. एकीकडे शालेय जीवनात तेजश्री प्रगती करत होती आणि दुसरीकडे घरामध्ये तिची आई आणि आजी तिला घरकामाचे धडे देत होती. आजी नेहमी म्हणायची,

“मुलींनी शिकून करायचं काय? मुलीच्या जातीला स्वयंपाक येणं गरजेचं. शिकून कुठे दिवे लावायचेत भाकरीच तर बडवायच्या आहेत.”

आजी सतत मुलींच्यामागे भुणभुण लावायची. वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी तेजश्री उत्तम स्वयंपाक करायला शिकली होती. ती मन लावून तिचा अभ्यास करत होती. प्रत्येक इयत्तेत चांगले गुण मिळवून पुढच्या वर्गात जात होती आणि रमेला घरकामात मदतही करत होती. घरात मुलींना सतत उपेक्षित वागणूक मिळत होती. तिच्या मोठ्या बहिणी निमूटपणे सारं सहन करत होत्या पण तेजश्रीला तिच्या बाबांचं आणि आजीचं वागणं मुळीच आवडायचं नाही. तेजश्री हळूहळू बंडखोर बनत चालली होती. कोणावरही अन्याय झाला तर तिला तो सहन होत नसायचा. लगेच ती सर्वांसाठी भांडायला जायची. सर्वांच्या मदतीला धावून यायची. एकंदरीत तिचं वागणं पाहून रमेला अनेकदा छाया मावशीचे शब्द आठवायचे,

“ही मुलगी तुझ्या इतर मुलींपेक्षा खूप वेगळी होईल. खूप तेजस्वी होईल. समाजाची जाचक बंधने झुगारून देईल. स्वतःची तिची एक वेगळी पाऊलवाट बनवेल.”

पुढे काय होतं? अशा बंडखोर तेजश्रीच्या आयुष्यात काय वाढून ठेवलंय? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

निशा थोरे (शिवप्रिया - शब्दस्पर्श)

Service

मला शब्दांच्या विश्वात रमायला खूप आवडते.

//