चौथी फेरी :- कौटुंबिक कथा
कथेचे नाव :- लग्नगाठ - एक बंधन..
निशा थोरे (अनुप्रिया)
लग्नगाठ - एक बंधन भाग ३
थोड्या वेळाने रमा शुद्धीवर आली. डोळे किलकीले करून तिने बाळाकडे पाहीलं.
“रमे, पुन्हा एकदा मुलगीच झाली पण पोर खूप गोंडस आहे हो. अगदी प्राजक्ताच्या फुलांसारखी पांढरी शूभ्र.. जावळ तर बघ किती गोड आहे!”
छाया मावशी बाळाला रमेला दाखवत म्हणाली.
“काय करतेय माय, तिचं देखणं रूप घेऊन! मुलीचा जन्म घेऊनच आली नां! आता तिच्या नशिबी आजन्म वनवासच.”
रमाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. ते पाहून छायामावशीला गलबलून आलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवत ती म्हणाली,
“रमा, बाईचा जन्म सोसण्यासाठीच गं. तिलाही सवय होईल. तुझ्या-माझ्यासारखी तीसुद्धा बाईपणाचं कर्ज चुकवेल.”
डोळ्यातलं पाणी पदराने टिपत छाया मावशी निघून गेली. रमाने त्या इवल्या जीवाला कुशीत घेतलं. अलगद तिच्या भाळावर ओठ टेकवले. तिचं लोभसवाणं रूप पाहून तिला भरून आलं होतं. रमा विचार करू लागली.
“तीन मुलींवर पुन्हा मुलगी झाली. घरातले तिच्याशी, माझ्याशी कसे वागतील? सुभेदार घराणं म्हणजे….”
रमाला जेव्हा ती या घरात सुन म्हणून आली तो दिवस आठवला. एक मध्यमवर्गीय कुटुंब. डोक्यावर कायम पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा. घरातल्या स्त्रीला नेहमीच दुय्यम दर्जा दिला जायचा. रमेच्या सासूबाईसुद्धा घरातल्या कर्त्यापुरुषापुढे काहीच बोलायच्या नाहीत. घरचे मोठे पुरुष जे बोलतील तसंच वागायचं. अगदी उठण्या बसण्यापासून, खाण्या-पिण्यापासून, कपडे वापरण्यापासून सगळे पुरुषांचे नियम असायचे. रमाचे सासरे घरातले जेष्ठ पुरुष असल्याने ते म्हणतील तोच कायदा असायचा. सगळी सत्ता पुरुषांच्या हाती असायची. घरातल्या बायकांनी स्वयंपाकघर सांभाळायचं. स्वयंपाकघर ते अंगण इतकाच त्यांचा वावर असायचा. पैसा अडका व्यवहार याचा त्यांना गंधही नसायचा. त्यामुळे कधी पैशांची गरज लागली तर त्यांना नेहमी पुरुषांच्या पुढे हात पसरावे लागायचे आणि तेही मिळतीलच याची शाश्वती नसायची. पदोपदी होणारी अवहेलना, कुचंबणा नेहमीचंच झालं होतं.
रमा सुन म्हणून सुभेदारांच्या वाड्यात आली आणि तिला वाटलं, तिच्या सासूच्या रूपात एक छान मैत्रीण मिळेल, आईचं प्रेम मिळेल पण तसं घडलं नाही. आईचं प्रेम तर सोडाच पण तिला गोकुळ वाड्यात एक सुन म्हणूनही कधी मान मिळाला नाही. त्यात तिच्या सासूचा दोष होता असं म्हणता येणार नाही कारण मुळात स्त्रियांना सन्मानाने वागवायला हवं हे तिथे कोणाच्याच गावी नव्हतं. रमाला जेंव्हा पहिल्यांदा दिवस गेले तेंव्हा तिच्या सासूबाई खूप आनंदून गेल्या होत्या.
“सुभेदार घराण्याला वारस येणार. रमे, काळजी हो. दगदग करू नकोस.“
तिच्या सासूबाईंनी फर्मान सोडलं. त्या दिवसांत रमाच्या सासूबाईंनी तिची खूप काळजी घेतली होती. खाण्या पिण्याची, कपडेलत्ता सगळ्याची नुसती चंगळ होती. मोठ्या थाटामाटात तिचं डोहाळेजेवण केलं होतं. तेच काही सुखाचे दिवस रमाच्या वाटयाला आले म्हणायचे. संपूर्ण सुभेदार कुटुंबिय आनंदात होते. रमाला पहिली मुलगी झाली आणि सर्वांचा भ्रमनिरास झाला. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या खेपेसही सर्वांची निराशा झाली. सुभेदारांच्या घरी मुलगा झाला तर आनंदोत्सव होईल वाटलं होतं पण मुलगी झाली आणि साऱ्या वाड्यात अवकळा पसरली. सुतकी वातावरण निर्माण झालं. आता तीन बहिणींच्या पाठीवर पुन्हा एकदा झालेलं चौथं नावडतं अपत्य. रमाच्या सासूबाई हिरमुसल्या. मुलीच्या जन्माच्या वेळीस तर त्यांनी मोठ्याने गळा काढला होता. हळूहळू दुःखाची तीव्रता कमी होऊ लागली. जखमांवर खपली धरू लागली आणि मग काही दिवसांनी हीच देवाची मर्जी म्हणून रमेच्या सासूबाईंनी चौथ्या अपत्याच्या जन्माचा स्वीकार केला. त्या बाळाची पाचवी पूजली गेली आणि तिचं नाव ठेवण्यात आलं ‘तेजश्री.’
केशवने तर तिचं तोंडही पाहण्यास नकार दिला होता. त्याचा राग लोभ स्वीकारत तेजश्री हळूहळू मोठी होत होती. ती दोन वर्षांची झाली आणि रमाला पुन्हा दिवस गेले. नेमकं त्याच दिवसांत रमाचे सासरे आजारी पडले. अल्पशा आजाराने अंथरुणाला खिळून राहिले. हळूहळू आजार बळावत गेला आणि काही महिन्यातच त्यांचं देहवसान झालं. रमाच्या सासूला वैधव्य आलं. आतापर्यंत मिरवलेलं सौभाग्यलेणं अंगावरून उतरवताना त्यांना प्रचंड त्रास होत होता. डोळे निरंतर बरसत होते. इतके दिवस मोठ्या तोऱ्यात वावरलेल्या रमाच्या सासूबाई एकदम हतबल दिसू लागल्या. थोड्याच दिवसांत तेजश्रीच्या पाठीवर रमाने पुन्हा एका मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्माने घरात आनंदी वातावरण आलं.
“केशवा, तुझे बाबाच पुन्हा नवा जन्म घेऊन तुझ्या पोटी आलेत बघ. त्यांचा चांगला सांभाळ कर हो.”
डोळ्यातलं पाणी पदराने टिपत रमाच्या सासूबाई कुशीतल्या बाळाकडे पाहत म्हणाल्या. केशवने हसून मान डोलावली. चार मुलींच्या पाठीवर केशवला मुलगा झाला होता. वाड्यात जणू चैतन्य आलं. रमाच्या सासूबाईंचा नवस फळास आला. त्यांनी गावच्या देवीला जाऊन नवस पूर्ण केला. अगदी परिस्थिती नसताना केशवने कर्ज काढून मोठं बारसं घातलं. थाटामाटात मुलाचं नामकरण केलं. साऱ्या गावाला गावजेवण दिलं. मुलाचं नाव ‘संदीप’ ठेवण्यात आलं.
पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)