Feb 29, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

लग्नगाठ - एक बंधन.. भाग २

Read Later
लग्नगाठ - एक बंधन.. भाग २


अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
चौथी फेरी :- कौटुंबिक कथा
कथेचे नाव :- लग्नगाठ - एक बंधन
निशा थोरे (अनुप्रिया)

लग्नगाठ - एक बंधन.. भाग २

तेजश्रीला तिच्या आईने तिला सांगितलेली तिच्या जन्माची गोष्ट आठवली.

“अरे केशवा, रमेला बाळंतकळा सुरू झाल्यात. जा पटकन, गावातल्या छाया सुईणीला बोलवून आण. वेळ दवडू नकोस.”

शेजारच्या वत्सला वहिनी घाईघाईने केशवच्या ‘गोकुळ’ वाड्यातल्या आतल्या खोलीतून बाहेर येत म्हणाल्या. केशवची बायको रमा तिसऱ्यांदा गरोदर राहिली होती. नववा महिना सरला आणि दोन दिवसांनी अचानक तिला प्रसववेदना सुरू झाल्या. केशवच्या आईने आजूबाजूच्या आया बहिणींना गोळा केलं आणि सर्वांनी मिळून रमेला आतल्या खोलीत नेलं आणि खाटेवर झोपवलं. तिला प्रचंड त्रास होत होता म्हणून मग वत्सला वहिनींनी केशवला छाया सुईणीला बोलावून आणायला सांगितलं होतं. केशवने पटकन अंगावर सदरा चढवला. पायात चपला अडकवल्या आणि तो हातात पेटवलेला कंदील घेऊन छाया सुईणीला बोलावून आणण्यासाठी घराबाहेर पडला. रमेच्या तिन्ही मुली रात्रीचं जेवण करून अंगणात निजल्या होत्या. त्यांची आजी देवासमोर हातात जपमाळ घेऊन नामस्मरण करत बसली होती. देव्हाऱ्यात मंद प्रकाशात नंदादीप तेवत होता.

“हे रामेश्वरा! तुझ्यासमोर तेवणाऱ्या या नंदादीपाची शपथ आहे बघ तुला. माझ्या सुनेची ही चौथी खेप. पहिल्या तीन लक्ष्म्या तिच्या पदरी घातल्यास. तरी बिचाऱ्या त्या माऊलीने कसलीच तक्रार न करता जे तू दिलंस; ती तुझी मर्जी म्हणून स्वीकारलंही पण देवा, आतातरी माझ्या रमेला मुलगा होऊ दे रे बाबा! सुभेदारांच्या घराण्याला वंशाचा दिवा मिळू दे. आता अजून हिरमोड करू नकोस. इतकंच दान दे रे, अनवाणी पायाने तुझ्या भेटीला येईन.”

रमेची सासू म्हणजेच केशवची आई केशवला मुलगा व्हावा म्हणून देवाला साकडं घालत होती. काळाकुट्ट अंधार पसरला होता आणि सोबतीला रातकीड्यांची किरकिर. केशव कंदीलाच्या अंधुक प्रकाशात झपाझप पाऊल टाकीत छाया सुईणीला सोबत घेऊन रस्ता कापत होता. वाट लवकर संपावी म्हणून तो अधनंमधनं छाया मावशीशी बोलत चालला होता.

“छायामावशी, मुलगा होईल या आशेवर रमेच्या पोटी तिन्ही वेळेस मुलीच जन्माला आल्या. प्रत्येकवेळी निराशाच पदरी पडली आणि आता पुन्हा रमा पोटूशी राहिली. या खेपेस मुलगाच व्हायला हवा. नाहीतर सुभेदार घराण्याचा वंश बुडेल. मी ऐकलंय की, तुमच्या हातून बाळंत होणाऱ्या बाळंतिणीला म्हणे मुलगाच होतो. मी आधीच तीन मुलींचा बाप आहे आणि आता पुन्हा मला अजून एक मुलगी नकोय तर रमेला आज मुलगाच व्हायला हवाय म्हणूनच तर वत्सला काकूंनी तुमचं घर इतक्या लांब असूनही मला तुम्हाला घेऊन यायला सांगितलं. मला खात्री आहे तुमच्या हातून मला मुलगाच होणार. चला भरभर.. रमा खूप त्रासात आहे.”

केशव मोठ्या आशेने छाया मावशीकडे पाहत म्हणाला.

“असं नसतंय पोरा, रामेश्वराच्या मर्जीपुढे कोणाचंच काही चालत नाही. त्याच्याशिवाय काहीच घडत नाही. तू त्याच्यावर विश्वास ठेव. जो पण जीव जन्माला येईल तो सुखरूप येऊ दे असं म्हण. बाकी त्यालाच आपली काळजी!”

भरभर पावलं टाकत छाया सुईण केशवला म्हणाली. केशवने मान डोलावली. छाया मावशी गावाच्या वेशीबाहेर राहत होती. वयोमानानुसार तिच्या चेहऱ्यावर आलेली प्रगल्भता आणि कामात आलेलं नैपुण्य वाखाणण्याजोगं होतं. तिचा हातगुण इतका चांगला होता की, प्रसव वेदनेने कळवळणारी बाई तिचा हात लागला की, लगेच मोकळी व्हायची. त्यामुळे गावात नेहमी तिलाच बोलावलं जायचं. गावातल्या बऱ्याचजणींची बाळंतपणं तिच्याच हातून झाली होती. गावातली बरीच मुलं तिच्याच हातून जन्माला आली होती. छाया मावशी आणि केशव भरभर चालत होते. घर नजरेसमोरच दिसत असताना अचानक निसर्गाने कूस पालटली. सोसाट्याचा वारा सुरू झाला. केशवच्या हातातला कंदील विझून गेला. छाया मावशी पटकन आत शिरली आणि तिने दार लावून घेतलं. केशव बाहेरच येरझऱ्या मारत राहिला.

“वत्सला, बयो, पाणी गरम करायला ठेव गं. बायानो तिला थोडं वारं लागू द्या. जास्त घोळका करू नका. रमा वेदनेनं विव्हळत होती. छाया मावशीने तिच्या पोटावर हात ठेवला. दुसरा हात तिच्या केसांवरून फिरवत तिला धीर देत म्हणाली,

“रमे, पोरी, धीर धर गं बाय. लवकर मोकळी होशील.”

“माय, तुझ्या हातून मला मुलगाच होऊ दे गं. एकदाची या जीवघेण्या फेऱ्यातून मी सुटेल गं. सोडव गं मला.”

रमा कळवळून म्हणाली. इतक्यात वीज चमकली. त्या अंधाऱ्या खोलीत क्षणभर का होईना लख्ख प्रकाश पसरला.

“पोरी, पोरगा होईल की पोरगी हे सांगता यायचं नाही. शेवटी त्याची मर्जी! पण रमे, आज जे मुल तुझ्या पोटी जन्म घेईल ते खूप तेजस्वी असेल.”

असं म्हणून छाया मावशी तिच्या पोटावरून हात फिरवत होत्या. आणि अखेरीस रमाची या वेदनेतून सुटका झाली. बाळाचा जन्म होताच तिची शुद्ध हरपली. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकताच केशव आनंदून गेला.

“काय झालं असेल? मुलगा की मुलगी? मुलगाच असेल. छायामावशीने तिचं बाळंतपण केलंय. रमेला मुलगाच झाला असेल.”

केशवची उत्सुकता शिगेला पोहचली होती. कधी एकदा मावशी बाहेर येतेय आणि त्याला मुलगा झाल्याची आनंदाची बातमी सांगतेय असं केशवला झालं होतं. तो आतुरतेने मावशीच्या बाहेर येण्याची वाट पाहू लागला. छाया मावशीने इवल्याशा जीवाला स्वच्छ करून एका स्वच्छ कापडात गुंडाळलं. बाळाला दुसऱ्या जागी निजवलं आणि दार उघडलं. केशव धावतच दारापाशी आला.

“मावशे, काय झालं गं? मुलगा झाला न! मला माहित होतं मला मुलगाच होणार.”

केशव आनंदाने म्हणाला.

“केशवा, सावर स्वतःला. तुला पोरगा नाही पोरगीच झालीय. लक्ष्मी आलीय घरी.”

केशव मटकन खाली बसला. पुन्हा एकदा निराशा वाट्याला आली होती. डोळ्यातून आपोआप पाणी वाहू लागलं.

“पुन्हा मुलगी. कसले भोग आहेत हे? आता आई आप्पांना काय उत्तर देऊ? वंशाला दिवा हवा म्हणून मुलाची वाट पाहत राहिलो आणि हे माझ्या नशिबी आलं. मुलगा होईल आशेने मुलांना जन्म देत राहिलो आणि खाणारी तोंडांची संख्या वाढवत राहिलो. कुटुंबाचा आर्थिक भार सोसताना दिवसेंदिवस खचत गेलो, अजूनही जातोय.”

दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये डोकं खुपसून तो रडू लागला. इतक्यात वत्सला वहिनी कपड्यात गुंडाळलेल्या नवजात बाळाला केशवला दाखवण्यासाठी बाहेर घेऊन आली.

“केशवा, अरे एकदा बघ तरी किती गोंडस पोर जन्माला आलीय! अगदी आपल्या रमेसारखीच दिसतेय.”

“काकू, दूर करा तिला माझ्या नजरेसमोरून. मला तिचं तोंडही पाहायचं नाहीये. घेऊन जा तिला. नाहीतर मीच तिच्या नरडीचा घोट घेईन.”

केशव खूप संतापला होता. त्याचा तो उग्र रूप पाहून वहिनी घाबरल्या आणि बाळाला घेऊन आत गेल्या.

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

निशा थोरे (शिवप्रिया - शब्दस्पर्श)

Service

मला शब्दांच्या विश्वात रमायला खूप आवडते.

//