लग्नगाठ - एक बंधन.. भाग १

लग्नगाठ - एक बंधन


अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
चौथी फेरी :- कौटुंबिक कथा
कथेचे नाव :- लग्नगाठ - एक बंधन
निशा थोरे (अनुप्रिया)


लग्नगाठ - एक बंधन.. भाग १

“काय? काय बोलतेय तू? तेजू, अगं तुला लाज कशी वाटत नाही? जरा समाजाचं तरी भान ठेव. जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळग. लोकं तोंडात शेण घालतील. कुठे तोंड दाखवायला जागा उरणार नाही. आणि नातेवाईकांना काय सांगायचं? बघा, आमच्या मुलीने काय दिवे लावलेत असं सांगायचं का? आपल्या संपूर्ण घराण्यात कोणीही असं केलेलं नाही. तुझी आजी, तुझी आत्या यांच्याही वाट्याला हेच आलं होतं नां! त्यांना कधीच काही वाटलं नसेल? पण त्यांनी त्यांच्या भावनांना आवर घातला ना! त्यांना आपल्या घराण्याच्या इभ्रतीची काळजी होती. त्यांना त्यांची मर्यादा चांगली माहित होती. आणि तू? सगळं सोडून उंडगी झालीस. तेजू, मी तुला पुन्हा एकदा सांगतोय; स्वतःच्या मर्यादा सांभाळ. उगीच चारचौघांत आमचं हसं करू नकोस. गाठ माझ्याशी आहे. समजलं? तुझ्या मनात जे सुरू आहे ते कधीच शक्य होणार नाही.”

तेजश्रीचे बाबा तावातावाने बोलत होते. ती एका कोपऱ्यात उभी राहून अश्रू ढाळत उभी होती.

“बाई गं, काय हे निर्बंध वागणं म्हणायचं! सारी लाज लज्जा वेशीला टांगलीय की काय ह्यांनी! तरीच बायकांत कुजबुज सुरू झालीय. मी आले की लगेच विषय बदलतात. माझ्याशी मनमोकळंपणे कुणी बोलतही नाही. तेजू वन्स, का करताय असं? तुमच्या दादांना पाहुण्यांरावळ्यात खूप मान आहे. लोक त्यांच्याशी आदराने बोलतात. त्यांनी इतक्या मेहनतीने हा सन्मान, ही प्रतिष्ठा कमावलेली आहे आणि तुम्ही ती धुळीला मिळवायला निघालात? हे शोभतं का तुम्हाला?”

तेजश्रीची वहिनी नाक मुरडत म्हणाली.

“तेजू, बाईच्या जातीला हे शोभत नाही. पुरुषांची गोष्ट वेगळी असते. त्यांना समाजाने फार पूर्वीपासूनच अनुमती दिलीय. लोक तुझ्याच वागण्याला बोल लावतील. तुलाच चुकीचं ठरवतील. तुला हे असलं वागायचं होतं म्हणून त्याची साथ सोडलीस असं म्हणतील. बाळ, बाईच्या जातीने मर्यादा सांभाळून राहावं. समाजाने आखून दिलेली लक्ष्मणरेखा कधीच ओलांडू नये. नाहीतर हा समाज तुला वाईट चालीची म्हणून बोल लावेल. इतकी वर्ष तू जो वनवास भोगलास त्याची सारी माती होईल गं. बाळा, ऐक माझं. असा वेडेपणा करू नकोस गं. आई म्हणून नाही तर एक बाई म्हणून सांगतेय, बाईचा जन्म फारच कष्टाचा!”

तेजश्रीच्या आईने डोळ्याला पदर लावला. ते पाहून तेजश्रीला भरून आलं.

“आई निदान तू तरी समजून घे गं! बाकीच्यांना समजावण्यात काही अर्थ नाही पण तुला सगळं माहित आहे नां! मग तरी तू असं बोलतेस?”

तेजश्रीच्या डोळयातलं पाणी ओसंडून वाहू लागलं. जन्मदात्री आईसुद्धा तिला समजून घेत नव्हती. आईचे शब्द कानात घुमत होते. ‘जन्म बाईचा.. खूप कष्टाचा.’

“पूर्वी आजी असं म्हणायची आता आई बोलतेय. बाईचा जन्म इतका नकोसा व्हावा? ‘बाई म्हणून पुन्हा जन्म नको रे देवा!’ असं आत्या म्हणायची. तेंव्हा नीटसं कळलं नव्हतं पण आता अर्थ लागतोय. बाईला तिच्या बाईपणाची, बाई असण्याची शिक्षा तर भोगावी लागणारच!”

तेजश्री स्वतःशीच पुटपुटली. तिच्या मनाचा सुरू असलेला कोंडमारा कोणालाच दिसत नव्हता.

“तीन मुली झाल्यानंतर पुन्हा एकदा मुलगी म्हणून आपल्या जन्मदात्रीच्या पोटी जन्म घेणाऱ्या मुलीच्या यातना ती मुलगीच जाणे! नावडती, सर्वांना नकोशी असलेली मुलगी जन्माला आल्याबरोबरच सटवाई भाळावर दुःखाचं प्राक्तन लिहून जाते आणि ती मुलगीही रडतखडत तिचा प्रवास करत राहते. मीही तेच केलं; अजूनही करतेय. खडतर वाटेवरची अग्निफुले वेचताना किती रक्तबंबाळ झाले हे माझं मला आणि हे जगदीश्वरा, तुलाच ठाऊक रे!”

गॅसवर ठेवलेलं दूध भसभसा उतू जावं तशा जुन्या आठवणी डोळ्यांचा काठ ओलांडून सांडू लागल्या. मनाचे वारू भूतकाळाच्या दिशेने चौफेर उधळू लागले. वीस वर्षांपूर्वी घडलेल्या घटना जणू काल परवा घडल्यासारख्या तिच्या डोळ्यासमोर फेर धरू लागल्या.

कोण होती ही तेजश्री? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all