Feb 25, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

लग्नगाठ - एक बंधन.. भाग १४ (अंतिम)

Read Later
लग्नगाठ - एक बंधन.. भाग १४ (अंतिम)अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
चौथी फेरी :- कौटुंबिक कथा
कथेचे नाव :- लग्नगाठ - एक बंधन..
निशा थोरे (अनुप्रिया)

लग्नगाठ - एक बंधन.. भाग १४ (अंतिम)


“काय चुकलं तिचं? आणि असं तिचं वय तरी काय रे की, आपण तिच्याकडून अपेक्षा करू शकतो? आपल्या गौरीच्याच तर वयाची पण तरी तिने एका पोक्त बाईसारखं घर सांभाळलं. तिच्यामुळे घराला घरपण आलं. पण आपण काय केलं? तिचं मन सुद्धा जाणून घेण्याचा कोणी प्रयत्न केला नाही. सांग मला, तिला एक माणूस म्हणून तू कधी पाहिलंस? तिलाही भावना असतात. ती म्हणजे घरात राबणारं यंत्र नाहीये. रोज होणारी तिची घुसमट तुला कधी दिसली?”

आनंदीबाईंचे डोळे पाण्याने गच्च भरले होते. त्या पुढे बोलू लागल्या.

“विश्वास, तू दोन वर्षाचा होतास, तेंव्हा तुझे बाबा आपल्याला सोडून देवाघरी गेले. मी एकटी राहिले. तुला काय वाटतं रे तो प्रवास सोप्पा होता? तुझ्या बाबाच्या मागे मी कशी जगले हे माझं मला माहित. किती कुचंबना झाली असेल ते तुला कधीच समजणार नाही. विश्वास, अन्न, वस्त्र आणि निवारा या पलीकडेही आपल्या काही वेगळ्या गरजा असू शकतात ना? स्त्रियांनाही मन असतं. त्यांच्याही आपल्या नवऱ्याकडून काही अपेक्षा असू शकतात हेच तुम्हा पुरुषांना मान्य करायचं नाही. त्यामुळं वर्षानुवर्षे स्त्रियांची कुचंबना होतच आली आहे. मी तिच्या भावना समजू शकते कारण मी त्यातून गेलीय. ते दुःख, त्या यातना मी भोगल्यात.”

आनंदीबाई बोलत होत्या. त्यांचं बोलणं ऐकून विश्वासरावांना गलबलून आलं. आईने भोगलेल्या आणि आजवर कधीही कोणासमोर व्यक्त न केलेल्या दुःखाची त्यांना जाणीव होऊ लागली. आनंदीबाई पुढे म्हणाल्या,

“विश्वास, मला माहित आहे, तुझं तुझ्या पहिल्या बायकोवर खूप प्रेम होतं. दोन सोन्यासारख्या मुलांना जन्म दिलात पण तुझी पहिली बायको बाळंतपणात गेली यात नव्या सुनबाईंचा काय दोष? तिच्या अपेक्षा चुकीच्या आहेत का? ज्या गोष्टींवर तिचा अधिकार आहे त्या तिला मिळायला नकोत का? अडनिड्या वयात तिची लग्नगाठ तुझ्याशी बांधली गेली. तू आहेस तसा तिने तुला स्वीकारलं. मला, मुलांना आणि आपल्या घराला तिने विनातक्रार स्वीकारलं. जर तिने आपल्या सुखासाठी स्वतःच्या इच्छा, अपेक्षांचा त्याग केला असेल तर आपणही तिच्या इच्छा, आवडीनिवडी नको सांभाळयला? विश्वास, तू आता लहान नाहीस की नवरा बायकोच्या नात्याबद्दल मी तुला काही समजावून सांगावं पण इतकंच सांगते. घरची स्त्री समाधानी असेल तरच घरात सुख शांती नांदते. बघ, विचार कर. यापेक्षा मी तुला जास्त काही सांगणार नाही. कसं वागायचं आता हे तुझ्या हातात आहे.”

इतकं बोलून आनंदीबाई जेवणाचं ताट घेऊन खोलीतून बाहेर पडल्या. विश्वासरावांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला होता.

इकडे तेजश्री दिवाणखान्यात टिपं गाळत बसली होती. हातात वही पेन होतं. मनात प्रचंड काहूर माजलं होतं.

दाटला अंधार काळोखी जीव पेटला
याचसाठी का मी जन्म घेतला
तीक्ष्ण त्या यातनांनी रक्त झाला देह का
आसमंत शांत झाला धुंद वारा मंद का

मनाची व्यथा अलगद पानावर उमटली. पुन्हा पुन्हा जुनेच प्रश्न नव्याने उभे रहात होते.

“काय चाललंय हे? नेमकं काय हवंय मला? मी एकदा अभिराजसरांशी बोलू? त्यांच्या मनातही माझ्याबद्दल प्रेम असेल? की हे सगळे माझ्याच मनाचे खेळ आहेत? मला एकदा त्यांच्याशी बोलायला हवं कारण माझ्या मनातलं त्यांना सांगितल्याशिवाय ते पुढचं नियोजन करू शकणार नाहीत.”

तेजश्री आपल्याच विचारात इतकी मग्न होती की, आनंदीबाई समोर येऊन बसल्या तरी तिला कळलं नव्हतं.

“सुनबाई..”

त्यांनी तेजश्रीला आवाज दिला तशी ती भानावर आली. आनंदीबाई तिच्यासमोर जेवणाचं ताट धरत म्हणाल्या,

“चला, जेवून घ्या. कोणत्याही गोष्टीचा राग जेवणावर काढायचा नाही. अन्नाचा अपमान होतो आणि अन्नपूर्णा नाराज होते.”

“पण मला भूक नाहीये.”

“का? भूक नसायला काय झालं? थांब, मीच तुला घास भरवते.”

असं म्हणून त्यांनी ताटातल्या भाजी भाकरीचा घास तिच्या तोंडासमोर धरला. आता मात्र तेजश्रीला नकार देता येईना. आनंदीबाई तिला भरवता भरवता बोलू लागल्या.

“सुनबाई, मी मघाशी तुझ्यासाठी पाणी घेऊन आले होते. तेंव्हा तुमचं बोलणं माझ्या कानावर पडलं. तू इतकी रागात होतीस की, दारात मी उभी असलेली तुला दिसलीच नाही.”

“माफ करा आई, मी प्रचंड रागात होते. पण आई….”

“सुनबाई, कोणतंही स्पष्टीकरण देऊ नकोस. मला सगळं समजलंय. सुनबाई, तुझ्या मनाची व्यथा मला समजतेय. तुझा काही दोष नाही. या सर्व गोष्टींना जर कोणी कारणीभूत असेल तर ते म्हणजे तुझं अल्लड वय आणि विश्वासचं वागणं. त्यांनी तुला समजून घेतलं असतं तर कदाचित तुझ्या मनात घर सोडून जाण्याचे विचार आलेच नसते.”

आनंदीबाई तिला घास भरवता भरवता बोलत होत्या. तेजश्रीने शरमेने मान खाली घातली.

“सुनबाई, तसं तुझं लग्नाचं वय देखील नव्हतं पण तुझी माझ्या विश्वासशी लग्नगाठ बांधली गेली आणि तू या घरात सुन बनून, विश्वासरावांची मालकीण बनून आलीस. पण पोरी, या साता जन्माच्या गाठी असतात. त्या अशा सहजपणे उसवून कशा चालतील? नाहीच चालणार. विश्वासचं चुकलं आहेच पण त्यामुळे हे बंधन असं लगेच तोडून टाकायचं? विश्वास चुकीचं वागला म्हणून तुही ही लग्नगाठ अशी सोडून टाकायची? बरं, तुझ्या म्हणण्यानुसार विचार करू. तुला मास्तर आवडतात. विश्वासरावांना घटस्फोट देऊन तुला मास्तरांसोबत रहायचंय. तुला त्यांच्याबद्दल प्रेम वाटतंय. पण मला सांग, तुला जे वाटतंय ते त्यांना वाटत असेल का? ते तुझा स्वीकार करतील याची तुला खात्री आहे? मुळात तुला जे मास्तरांबद्दल वाटतंय ते नक्की प्रेम आहे की आकर्षण? आणि मग या आकर्षणाला बळी पडून निर्माण झालेली भावना किती काळ तग धरू शकेल? जोपर्यंत तू तरुण आहेस. तू छान दिसतेस तोपर्यंतच तुझ्या त्या शरीराचं आकर्षण, ओढ राहील. एकदा का तारुण्य ओसरलं तर ती ओढ, ते आकर्षणही संपून जाईल. मग पुढे काय? बाळ, लग्न म्हणजे आपल्या जोडीदाराला त्याच्या गुणादोषासकट स्वीकारणं. त्याला दिलेली आयुष्यभराची साथ, जन्मोजन्मीचं बंधन. एक असं नातं जे असल्या तकलादू गोष्टींमुळे डळमळीत होत नाही. शरीराला लागणारी ओढ ही त्या प्रेमाचाच एक भाग आहे पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे एक असं अतूट नातं जे तारुण्याचा बहर ओसरल्यावर अबाधित राहतं. बाळ, तुला या गोष्टी आता समजणार नाहीत कारण अजून तू खूप लहान आहेस. हळूहळू याचा उलगडा होत जाईल आणि चांगल्या वाईटाची जाण तुला येत जाईल.”

त्यांचं बोलणं ऐकून तेजश्री विचारात पडली. आनंदीबाईं पुढे म्हणाल्या,

“सगळं नीट होईल. प्रत्येक गोष्टीला थोडा वेळ दयावा लागेल. तू स्वतःला थोडा वेळ दे. तुला अजूनही मास्तरांबद्दल काही वाटत असेल आणि त्यांच्याबरोबर तू सुखी राहशील याची तुला खात्री असेल तर आताच मी त्यांना बोलवून घेते आणि या गोष्टीचा सोक्षमोक्षच लावून टाकते. त्यांच्या मनातही तुझ्यासाठी त्याच भावना असतील तर सर्वस्वी तुझा निर्णय असेल. मी कोणत्याच गोष्टीसाठी तुला जबरदस्ती करणार नाही.”

आनंदीबाई बोलता बोलता थांवल्या आणि ताट घेऊन त्या उठणार इतक्यात तेजश्रीने त्यांचा हात पकडला.

“आई..”

तिने आनंदीबाईना घट्ट मिठी मारली. डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. आनंदीबाईंनाही गलबलून आलं. डोळ्यातल्या आसवांनी काही न बोलता त्यांची क्षमा मागितली होती. मौनाची भाषा बरंच काही सांगून गेली होती. आनंदीबाई प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवत म्हणाल्या,

“गुणाची गं माझी पोर.”

इकडे विश्वासरावही बैचेन झाले होते. मनात नाना विचार फेर धरू लागले होते. अपराधीपणाचं शल्य टोचू लागलं.

“खरंच माझं खूप चुकलं. एकीच्या प्रेमापोटी मी दुसरीवर अन्याय करत होतो. एका निरागस मुलीला तिच्या हक्काच्या सुखापासून वंचित करत होतो. आईने कानउघाडणी केली नसती तर मला माझी चुक कधीच समजली नसती. मला तिची माफी मागितली पाहिजे.”

रात्रीची जेवणं झाल्यावर तेजश्री तिच्या खोलीत आली. पलंगावर येऊन बसली. विश्वासराव सोफ्यावर बसले होते. ती आलेली पाहताच ते उठून उभे राहिले. खोलीचं दार लावून घेतलं आणि ते तिच्याजवळ येऊन पलंगावर बसले. अचानक असं त्यांच्या जवळ येण्याने ती बावरली. त्यांनी तिचा हात हातात घेतला.

“तेजू..”

आज पहिल्यांदा विश्वासरावांच्या ओठी तिचं नाव ऐकून तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. विश्वासराव बोलू लागले.

“तेजू, आजवर तुझ्याशी जे काही वागलो त्यासाठी प्लिज मला क्षमा कर. मी तुला समजून घेऊ शकलो नाही. फक्त स्वतःचा स्वार्थ पाहिला. तेजू, तिच्या जाण्याने मी पुरता कोलमडून गेलो होतो. कोणाविषयी प्रेम, जिव्हाळा वाटणंच बंद झालं होतं. यंत्रावत जगत होतो. आईच्या मागे लागण्याने मी लग्नाला तयार झालो पण यातही मी माझ्या आईचा आणि मुलांचा विचार केला. स्वार्थी झालो होतो गं. पण खरं सांगू तुला? तुझ्याशी लग्न केलं आणि तू माझ्या आयुष्यात आलीस पण ती कधी मनातून गेलीच नव्हती. त्यामुळे मी तुला सुरुवातीला म्हणालो होतो, ही लग्नगाठ फक्त आणि फक्त माझ्या आईसाठी आणि मुलांसाठी बांधली आहे. तुझा माझ्याशी बाकी कुठलाही संबंध नाही पण तेजू, जेव्हा तू तुझ्या आक्काकडे गेलीस तेंव्हा मला माझ्या आयुष्यातली तुझी कमतरता जाणवली. तुझ्याशिवाय या घराला घरपण नाही हे मला कळून चुकलंय. तुझ्या अवतीभवती असण्याची मला सवय झालीय पण कळत नव्हतं हे नेमकं काय आहे? तेजू, मी चुकलो हे खरं आहे. तुझ्या मनाचा विचार नाही केला. तुझ्या भावनांचा सन्मान नाही केला. चुकलो गं. पण आज मी तुला मनापासून सांगतोय तुझ्या सुखाशिवाय माझी कसलीच इच्छा नाही. तुला आताही जर अभिराज सरांविषयी…”

त्यांचं वाक्य अर्धवट तोडत तिने पटकन त्यांच्या ओठांवर आपलं बोट ठेवलं आणि शांत केलं.

“जे झालं ते झालं. असं म्हणतात लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात. तुम्हीच माझे आयुष्यभराचे साथीदार आहात. मीही चुकले. प्रेम आणि आकर्षण यातला फरक समजू शकले नाही. नातं कसं असावं, प्रेम म्हणजे नेमकं काय हे मला आज आपल्या आईंकडून उमगलं. मी फार चुकीचा विचार करत होते. चुकीच्या गोष्टींना प्रेम समजत होते पण आता मला माझं प्रेम समजलंय. तुमच्याशिवाय माझ्या असण्याला काहीच अर्थ नाही हे मला समजलंय. तुम्ही माझ्या सुखाचा, माझ्या इच्छांचा विचार करता. माझ्या आवडी निवडी समजून त्या जोपसता. आताही बघा ना तुम्ही स्वतः पेक्षा माझ्या सुखाचा विचार केलात आणि अभिराज सरांविषयी विचारलंत. कोण करतं असं? मी खूप भाग्यवान आहे की तुम्ही मला माझा जोडीदार म्हणून लाभलात. आता यापुढे आपण कायम एकमेकांना जपायचं आहे. ही लग्नगाठ कधीही उसवणार नाही याची काळजी घ्यायचीय. जन्मोजन्मी याच बंधनात स्वतःला बांधून घ्यायचंय. कायमच..,”

तेजश्री खूपच भावुक होऊन बोलत होती. विश्वासरावांनी अलगद तिला मिठीत घेतलं. तेजश्री त्या स्पर्शाने मोहरली. त्या आनंदाच्या तरंगात तेजश्री विश्वासरावांच्या कुशीत कधी विरघळली तिलाही कळलं नाही. विश्वासरावांनी अलगद तिचा चेहरा हातांच्या ओंजळीत घेतला आणि तिच्या गुलाबी ओठांवर त्यांचे ओठ टेकवले. त्याचवेळी पूर्व दिशा उजळली. क्षितिजावर पसरलेली लाली तेजश्रीच्या गालीच्या लालीचे जणू प्रतिबिंबच होते. गात्रे सैल होत गेली. तेजश्री विश्वासरावांमध्ये विरघळत गेली आणि तिच्याही नकळत तिचा अवघा देह कस्तुरी झाला. विलग होणारी रेशीमगाठ कायमसाठी पुन्हा एकदा घट्ट बंधनात बांधली गेली.

समाप्त
©निशा थोरे (अनुप्रिया)
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

निशा थोरे (शिवप्रिया - शब्दस्पर्श)

Service

मला शब्दांच्या विश्वात रमायला खूप आवडते.

//