लग्नगाठ - एक बंधन.. भाग १३

लग्नगाठ - एक बंधन..



अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
चौथी फेरी :- कौटुंबिक कथा
कथेचे नाव :- लग्नगाठ - एक बंधन..
निशा थोरे (अनुप्रिया)

लग्नगाठ - एक बंधन.. भाग १३


दुसऱ्या दिवशी विश्वासराव सकाळी लवकर उठले. सकाळच्या विधी उरकल्या आणि ते बाहेर दिवाणखान्यात येऊन बसले. आनंदीबाईंनी सकाळच्या नाष्ट्याला कांदेपोहे बनवले होते. त्यांनी विश्वासरावांसमोर कांदेपोहेंची डिश सरकवली. इतक्यात मुलंही बाहेर आली आणि आनंदीबाईंनी त्यांनाही नाष्टा दिला. सर्वांचा नाष्टा झाला. मुलं अभ्यासाला त्यांच्या खोलीत गेली.

“आई, मी आलोच गं.”

असं म्हणत विश्वासरावांनी पायात चपला अडकवल्या आणि ते बाहेर जाण्यास निघणार इतक्यात दारावर टकटक झाली. नोकराने दार उघडलं. समोर केशव आणि तेजश्री उभे होते.

“सुभेदार तुम्ही? या ना.. मी आज तुमच्याकडे येण्याचा विचारच करत होतो.”

विश्वासराव हसून म्हणाले. केशव आणि तेजश्री आत आले. केशव दिवाणखान्यातल्या सोफ्यावर जाऊन बसला. तेजश्रीचे डोळे निरंतर वाहत होते. तिथे क्षणभरही न थांबता ती धावत तिच्या खोलीत गेली. केशव उठून हात जोडून उभा राहत म्हणाला,

“विहीणबाई, जावईबापू, आम्हाला आमच्या मुलीच्या कृत्याने शरमेने मान खाली घालावी लागत आहे. विहीणबाई, आमच्या मुलीची एवढी चुक पदरात घ्या. अजून लहान आहे, अल्लड आहे. तिला बाहेरच्या जगाचं इतकं ज्ञान नाही म्हणून पाय घसरता घसरता राहिला. जावईबापू, आम्ही तिला आमच्या परीने समजवण्याचा प्रयत्न केलाय. ती पुन्हा असं काही वागणार नाही आणि समजा ती पुन्हा तसंच वागली तर तुम्हाला तिच्याबाबतीत जो काही निर्णय घ्यायचा असेल तो आम्हाला मान्य असेल. खरच आम्हाला माफ करा.”

“तुम्ही कशाला वाईट वाटून घेताय. चुक तर आमचीही झालीय. घरात तरुण पोरी असताना एका परक्या माणसाला आमच्या घरी ठेवून घेतलं. विस्तवाजवळ लोणी ठेवलं तर ते वितळणारच ना! जिथे आपलंच नाणं खोटं असेल तर इतरांना दोष देण्यात काय अर्थ?”

आनंदीबाई रागाने म्हणाल्या. त्यांचा राग योग्यच असल्याने केशवने शरमेने मान खाली घातली. केशवची अवघडलेली अवस्था पाहून विश्वासराव उठून उभे राहत म्हणाले,

“काहीही काय! तुम्ही असे हात जोडू नका. तुमचा गैरसमज झाला असेल. मी बोलतो तिच्याशी. तुम्ही शांत व्हा. आई, तू यांच्या चहापाण्याचं बघ बरं. सुभेदार तुम्ही या, बसा.”

विश्वासरावांनी केशवला सोफ्यावर बसवलं. आनंदीबाईंनी नोकराकरवी केशवला चहापाण्याची व्यवस्था केली. विश्वासरावांनी त्याची, घरातल्या लोकांची, शेतीवाडीविषयीची चौकशी केली. थोडा वेळ बोलून केशवने त्यांचा निरोप घेतला. जातानाही त्याच्या डोळ्यात अपराधीपणाची भावना साठली होती. केशव निघून गेला. दुपारची सर्वांची जेवणं झाली पण तेजश्री तिच्या खोलीतून बाहेर आली नाही. आनंदीबाईंनी नोकरांकरवी तिला बोलावणं धाडलं तरी ती आली नाही.

“आई राहू देत. मी पाहतो. तिचं जेवणाचं ताट बनव. मी खोलीत घेऊन जातो.”

विश्वासराव त्यांच्या आईला म्हणाले. आनंदीबाईनी नाखुशीनेच ताट तयार केलं. ते जेवणाचं ताट घेऊन त्यांच्या खोलीत आले. रडून रडून तेजश्रीचे डोळे सुजले होते. ते येताच ती त्यांच्याकडे पाठ फिरवून बसली. विश्वासरावांनी जेवणाचं ताट टेबलवर ठेवलं.

“जेवून घे. सकाळपासून काही खाल्लं नाहीयेस तू.”

“नको मला. मला नाही जेवायचं.”

“का? का जेवायचं नाहीये? काय हवंय तुला? का अशी वागतेस?”

त्यांनी प्रश्न केला.

“या तुरुंगातून मला सुटका हवीय. मला तुमच्यासोबत राहायचं नाहीये. मला इथून जायचंय.”

“तुरुंग? आपलं घर तुला तुरुंग वाटतो? का? काय कमी आहे इथे? कोणी सासुरवास केला तुला? कशाचं दुःख आहे तुला? राहायला एवढा मोठा वाडा, चांगलं खायला प्यायला, ल्यायला चांगले कपडे , पैसापाणी, सोनंनाणं, दिमतीला नोकरचाकर सगळं तर आहे. एखाद्या राणीसारखी राहतेस की इथे?”

विश्वासराव उद्विग्न होऊन बोलत होते. तेजश्रीने मागे वळून पाहिलं. तिचे डोळे पुन्हा भरून आले होते.

“इतकंच हवं असतं का? चांगलं खायला, प्यायला, ल्यायला अंगभर कपडे आणि राहायला घर दिलं म्हणजे झालं? हेच नवऱ्याचं कर्तव्य असतं का? त्या दिवशी तुम्ही म्हणालात की, माझ्या मुलांना, माझ्या म्हाताऱ्या आईला सांभाळण्यासाठी तुम्ही माझ्याशी लग्नगाठ बांधलीत. मग सांगा मला, तुमच्या आयुष्यात माझं काय स्थान आहे? मी काय फक्त घरात काम करायला आणि तुमच्या मुलांना, सासूबाईंना सांभाळण्यासाठी आणलेली बाई आहे? एक मोलकरीण? कोण आहे मी?”

तेजश्री खूप चिडली होती. मनातला सारा संताप तिच्या डोळ्यातल्या अश्रूवाटे वाहू लागला. तिच्यासाठी पाण्याचा तांब्या घेऊन आलेल्या आनंदीबाई तिचा आवाज ऐकून दारापाशीच थबकल्या. तेजश्री बोलत होती. आज पहिल्यांदा ती मनातली भडास ओकून टाकत होती. विश्वासरावांना पहिल्यांदा तिचं हे रूप दिसलं होतं. एरवी शांत दिसणारी तेजश्री आज तिच्या नावाप्रमाणेच तेजाळली होती.

“तुम्हाला काय वाटलं? नवरा मारहाण करतो, शिव्या देतो, अन्न, वस्त्र, निवारा नाही म्हणून फक्त एवढ्याचसाठी एखादी स्त्री पुरुषाला सोडून जाते? फक्त हीच कारणं असू शकतात? नाही, यापेक्षाही वेगळं काहीतरी हवं असेल ना तिला? कधी जाणून घ्यायचा प्रयत्न केलात? कधी दिसली तुम्हाला माझ्या मनातली हुरहूर, ती तडफड? नाही दिसली ना? आठवून सांगा, तुम्ही कधी मला प्रेमाने जवळ घेतलंत? कधी तुमच्या मायेचा हात पाठीवरून फिरवलात?”

तेजश्रीच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. आज तिच्या रागाने संयमाची परिसीमा ओलांडली होती. तिचं बोलणं दाराच्या कडेला उभं राहून ऐकणाऱ्या आनंदीबाईंना खूप धक्का बसला होता. तेजश्रीच्या बोलण्याने त्यांच्या काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या. त्यांच्याही डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. तेजश्री पुढे बोलू लागली.

“मी आक्काच्या घरी गेले आणि मला नवरा बायकोच्या नात्याचा किंचितसा अंदाज आला. मला ते सारं अनुभवायचं होतं. ते नातं हळुवारपणे जाणून घ्यायचं होतं. तुम्ही माझे पती होतात. घरी आल्यावर मी तुम्हाला आवेगाने मिठी मारली. ती काळजातली हुरहूर जाणवली. हृदयाच्या ठोक्यांची धडधड मला ऐकू येतं होती. माझ्या आत काहीतरी होतंय असं जाणवत असतानाच तुम्ही मला दूर लोटलंत. मला झिडकारलंत. मी पुन्हा पुन्हा तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होते पण तुम्ही माझ्याकडे साफ दुर्लक्ष करत होतात. अशावेळी सांगा मी काय करायला हवं होतं? झुरत होते तुमच्यासाठी? कधी समजून घेतलंत?”

विश्वासराव निःशब्द झाले होते. तेजश्रीचे शब्द त्यांच्या मनावर वार करत होते. तेजश्रीने साडीच्या पदराने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि म्हणाली,

“तो समजूतदारपणा मला अभिराज सरांमध्ये दिसला. त्यांनी माझ्या भावना समजून घेतल्या. माझ्या दिसण्याचं, माझ्या हुशारीचं ते कायम प्रशंसा करतात. हो.. मला ते आवडतात. मला त्यांच्यासोबत राहायचंय. त्यांनाही मी आवडत असावी. त्यांनाही माझ्याबद्दल प्रेम वाटत असेल. त्याशिवाय का त्यांनी मला इतकं शिकवलं? त्यांच्या नजरेत मला आपलेपणा दिसतो, प्रेम दिसतं. माया दिसते. जे मला तुमच्या नजरेत दिसत नाही. तुम्हाला माझ्याबद्दल साधे आपलेपणा सुद्धा नाही. म्हणून मला तुमच्यासोबत राहायचं नाही. मला तुमच्यापासून घटस्फोट हवाय. मला खरंच या लग्न बंधनातून मोकळं करा. मला इथे राहायचं नाही. मला सरांसोबत माझा संसार थाटायचा आहे. मला जाऊ द्या. असंही माझ्या जाण्याने तुम्हाला काहीच फरक पडणार नाही. तेंव्हा मला वाटतं, तुम्हाला मला मोकळं करण्यात काहीच हरकत नसावी.”

इतकं बोलून तेजश्री रागाने पाय आपटत खोलीच्या बाहेर निघून गेली. दारात उभी असलेल्या सासूबाईंकडेही तिचं लक्ष गेलं नाही. ती तिरमीरीत खोलीतून बाहेर पडली. विश्वासराव तिच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे अवाक होऊन पाहत राहिले. इतक्यात आनंदीबाईंनी खोलीत प्रवेश केला. त्यांना असं अचानक समोर पाहून विश्वासराव चपापून गेले. आनंदीबाई त्यांच्याकडे रोखून पाहत होत्या.

“आई तू? ते.. मी..”

विश्वासराव अडखळत म्हणाले.

“काय झालं? अजून काय लपवतोयस? मी सगळं ऐकलंय.”

आनंदीबाईंचं बोलणं ऐकून विश्वासरावांनी खाली मान घातली.

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all