चौथी फेरी :- कौटुंबिक कथा
कथेचे नाव :- लग्नगाठ - एक बंधन..
निशा थोरे (अनुप्रिया)
लग्नगाठ - एक बंधन.. भाग १२
हळूहळू तेजश्री आपलं मन अभ्यासात रमवू लागली. घरातली कामं पटकन उरकून ती लगेच अभ्यासाला बसायची. आता ती जास्तीत जास्त वेळ अभिराज सोबत घालवू लागली. एकदा अभ्यास करत असताना तिने अभिराजला प्रश्न केला.
“सर, एक विचारू?”
“हं, बोला नं.”
“सर, लग्न म्हणजे काय? सर्वजण लग्न का करतात?”
तेजश्रीच्या प्रश्नाने अभिराजने तिच्याकडे चमकून पाहिलं. तिच्या प्रश्नांनी त्याच्या मनात उडालेला गोंधळ चेहऱ्यावर न दाखवता स्वतःला सावरत त्याने उत्तर दिलं.
“लग्न म्हणजे एक पुरुष आणि एक स्त्री अशा दोन व्यक्तीमधील सामाजिक बंधन. हिंदू धर्मात हा एक संस्कार आहे. विवाह हा संतती किवा वंश पुढे नेण्यासाठीचा कायदेशीर व सामाजिक मार्ग आहे.”
तिला नीट समजलं नाही. तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. तो पुढे बोलू लागला.
“मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. तो एकटा राहू शकत नाही. आयुष्य जगताना प्रत्येकाला सोबतीची गरज असते. एका जोडीदाराची गरज असते. आता तुम्ही म्हणाल, दोन पुरुषांची सोबत नसते का? किंवा दोन बायका एकत्र राहू शकत नाहीत का? तर राहू शकतात पण ज्याप्रमाणे शरीरातल्या धगधगत्या दाहाला थंड चंदनाचा लेपच शांत करू शकतो. रखरखत्या उन्हात शीतल सावलीची गरज पडते. अगदी तसंच प्रत्येक पुरुषाला स्त्रीच्या आधाराची गरज भासते. पुरुष जर धगधगता दाह असेल तर स्त्री थंड चंदनाचा लेप आहे. दोघेही एकमेकांना पूरक असतात म्हणून सर्वजण लग्न करतात. लग्न म्हणजे दोन जीवांचं मीलन, दोन कुटुंबाचं एकत्र येणं असतं. समजलं?”
तिने मान डोलावली. ‘दोन जीवांचं मिलन.’ अभिराजचे हेच शब्द तिच्या डोक्यात घोळू लागले. अभिराजचं वागणं, बोलणं तिला आवडू लागलं. अभ्यासापेक्षा त्याच्यासोबत वेळ घालवताना तिला तिच्या वेदनांचा विसर पडू लागला. जणू जखमेवर खपली धरू लागली होती. चेहऱ्यावरचं लपलेलं हसू पुन्हा दिसू लागलं. अभिराज शिकवत असताना त्याला न्याहाळणं आता नित्याचं झालं होतं. शिकवताना नकळतपणे होणारे त्याचे स्पर्श तिला जाणवू लागले. ते स्पर्श तिच्या देहात शिरशीरी निर्माण करत होते. त्या स्पर्शाने जणू तिच्या तप्त देहाला चंदनाचा लेप लावल्याचा भास तिला होऊ लागला होता. विश्वासरावांनी झिडकारल्याच्या, तिला नाकारल्याच्या दुःखाचा आता तिला हळूहळू विसर पडू लागला. विश्वासरावांबद्दल वाटणाऱ्या भावना आता तिला अभिराजबद्दल वाटू लागल्या. अभिराज तिला आवडू लागला. तिच्या नजरेत त्याच्याबद्दल आकर्षण दिसू लागलं. आता तिला अभिराजच्या मिठीत असल्याची स्वप्नं पडू लागली आणि त्याचबरोबर नैतिकता हळूहळू गळून पडू लागली. देहाची गरज तीव्र होऊ लागली.
तिच्यात झालेला बदल कोणाला जाणवत नसला तरी आनंदीबाईंच्या जाणत्या नजरेतून ही गोष्ट सुटली नव्हती. तेजश्रीचं बदलेलं वागणं त्यांना खटकत होतं. हल्ली घरातल्या कोणत्याच गोष्टींकडे तिचं लक्ष नव्हतं. ती सतत अभिराजसोबत असायची. त्यांनी एक दोनदा टोकलंही पण तेजश्री आपल्याच दुनियेत मशगुल होती. अखेरीस उद्विग्न होऊन आनंदीबाईंनी तेजश्रीच्या आईबाबांना बोलावून घेतलं आणि त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली.
“रमा वहिनी, मला वाटतं तुम्ही सुनबाईंना दोन दिवस माहेरी घेऊन जावं आणि तिची समजूत घालावी. प्रकरण हाताबाहेर जाण्याआधी वेळीच आवर घातला पाहिजे.”
रमेच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. केशव उद्विग्न झाला होता पण आनंदीबाईंसमोर त्याला काही करता येत नव्हतं. रमा आणि केशव तेजश्रीला माहेरी घेऊन आले. सर्वजण तिलाच बोल लावत होते. तिला नावं ठेवत होते. त्यांच्या बोलण्याने आतापर्यंतचा घडलेला सारा इतिहास तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला. संपूर्ण बालपण, तिचं लग्न, तिचं सासर, विश्वासराव, अभिराज सारं काही काल परवा घडल्यासारखं तिच्या डोळ्यासमोर तरळून गेलं.
“काय करायचं काय तुला? सासर सोडून इथं कायमचं राहायची इच्छा आहे? नवऱ्याने टाकलेली बाई म्हणून आमच्या उरावर मूग दळत बसायचं आहे? काय हवंय तुला?”
केशवने खडसावून विचारलं. त्याचा संताप विकोपाला पोहचला होता. तेजश्रीच्या सासूबाईंसमोर त्याला शरमेने मान खाली घालावी लागली होती. त्याचा त्याला प्रचंड राग आला होता. तेजश्रीही उद्विग्न होऊन म्हणाली,
“मला त्यांच्यासोबत राहायचं नाही. मला त्यांच्यापासून घटस्फोट हवाय. मला अभिराज सरांसोबत राहायचंय. मला ते आवडतात.”
तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच त्याने खाडकन तेजश्रीच्या कानाखाली लगावली.
“कार्टे, घराण्याची लाज वेशीला टांगायला निघालीस? लाज कशी वाटली नाही तुला? एवढं तालेवार, श्रीमंत घराणं मिळायला नशीब लागतं आणि हिला मिळालंय तरी किंमत नाही. नरडीचा घोट घ्यावासा वाटतोय. जन्माला आली तेंव्हाच मेली असती तर बरं झालं असतं.”
केशव संतापून बोलत होता. तेजश्री गाल चोळत आसवं गाळत तशीच कोपऱ्यात उभी राहिली. रमा तिला समजावण्याचा प्रयत्न करत होती. डोळ्यातलं पाणी पुसत ती म्हणाली,
“बाळा, हे योग्य नाही. घरंदाज स्त्रीला हे शोभत नाही. लग्न झालेल्या बाईने असं वागणं म्हणजे खूप चुकीचं आहे.”
“ते काही नाही केशवा, उद्याच्या उद्या हिला तिच्या सासरी घालवून या. तेच काय ते तिच्या भविष्याचा निर्णय घेतील. आपण लग्न करून दिलंय, आता पुढे त्यांनी ठरवायचं. एकदा लग्न लावून दिलं त्याच दिवशी तिचा या घराशी संबंध संपला. माहेरवाशीण म्हणून इथे माहेरात मान मिळाला असता पण तोही तिने स्वतःच्याच कर्तृत्वाने घालवलाय.”
आजी चिडून एकदम निर्वाणीचं बोलली. तेजश्री काय बोलावं ते समजेना. सगळेजण तिलाच बोलत होते. कोणीही तिच्या मनाचा विचार करत नव्हतं.
“हो आई, तुझं बरोबर आहे. उद्याच सोडून येतो. त्याने सांगेन आमच्या परीने आम्ही समजावलंय. तिने ऐकलं तर ठीक नाहीतर तुम्हाला तिच्या बाबतीत जो निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ शकता पण या घरात परत तिला स्थान नाही. समजलं?”
केशव तावातावाने बोलून घराबाहेर पडला. रमा स्वयंपाकघरात गेली. तेजश्री मात्र तिथेच आसवं गाळत उभी राहिली.
इकडे विश्वासराव घरी आले. आनंदीबाई बाहेरच बसल्या होत्या. चेहऱ्यावर उदासी पसरली होती. विश्वासरावांनी त्यांना विचारलं,
“काय झालं आई? अशी का एकटीच बसलीस? मुलं कुठं आहेत? आणि तुझी लाडकी सुन?”
लाडकी सुन हा शब्द ऐकताच आनंदीबाई चिडल्या.
“ती तिच्या माहेरी गेलीय. तिचे आई वडिल आले होते म्हणजे मीच बोलावून घेतलं होतं. ते तिला माहेरपणासाठी घेऊन गेलेत. दोन चार दिवसांत येतील. का तुला चैन पडत नाहीये का?”
त्या एकदम तिटकाऱ्याने म्हणाल्या. आईचं काहीतरी बिनसलंय ही गोष्ट विश्वासरावांच्या लक्षात आली.
“काय झालं आई? अशी का चिडचिड करतेस? ती माहेरी गेली हे तुला आवडलं नाही का?”
“तसं काही नाही. उलट मीच त्यांना घेऊन जायला सांगितलंय आणि दुसरी गोष्ट, आधी त्या मास्तरला इथून जायला सांग. त्याची लक्षणं काही मला ठीक दिसत नाही. घरात तरण्याताठ्या पोरीबाळी आहेत. उगीच नवीन संकट नको. तो मला इथे दिसता कामा नये. समजलं?”
आनंदीबाई प्रचंड चिडल्या होत्या.
“अभिराज सर? आता त्यांनी काय केलं? आई अशी चिडू नकोस. मला नीट सांग काय झालंय?”
विश्वासरावांनी प्रश्न केला. मग आनंदीबाईंचा नाईलाज झाला आणि त्यांनी आतापर्यंत जे पाहिलं, त्यांना खटकलं त्या साऱ्या गोष्टी सविस्तरपणे सांगितलं. विश्वासरावांना खूप नवल वाटलं.
“अगं आई, अभिराज सर तसे नाही. मी त्यांना चांगलं ओळखतो. तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. आपल्याला मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणूनच तर त्यांना आपण बोलावलं आणि तेही कसलीही तक्रार न करता आलेही. तुला उगीच काहीतरी वेगळं वाटतंय.”
“काही वेगळं वाटत नाही. तरण्या पोरी बघितल्या की भल्या भल्यांची नियत डगमगते मग हा तर एक साधा मास्तर आहे त्याचा पाय घसरायला जास्त वेळ लागणार नाही. ते काही नाही, तो उद्याच्या उद्या इथून गेला पाहिजे. एक क्षणही तो मला माझ्या नजरेसमोर नकोय. समजलं?”
विश्वासराव त्यावर काहीच बोलले नाहीत पण मनात विचार सुरू झाला.
“अभिराज सरांना तर आपण आधीपासून ओळखतो. ते असं काही करू शकणार नाहीत. पण आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. काहीतरी नक्की घडलंय. एकदा तिला जाऊन भेटावं का? तीच सांगू शकेल. उद्याच तिच्या गावाला जातो.”
विश्वासरावांनी मनातल्या मनात ठरवलं आणि ते त्यांच्या खोलीत निघून गेले.
पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)
क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा