लग्नगाठ - एक बंधन.. भाग ११

लग्नगाठ - एक बंधन..


अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
चौथी फेरी :- कौटुंबिक कथा
कथेचे नाव :- लग्नगाठ - एक बंधन..
निशा थोरे (अनुप्रिया)

लग्नगाठ - एक बंधन.. भाग ११

तेजश्री घरी आली खरी पण पूर्वीची ती अल्लड तेजश्री कुठेतरी हरवली होती. जणू तिच्या आयुष्याचा कायापालट होत होता. घरात वावरतानाही पूर्वीसारखी सहजता नव्हती. तिच्या वागण्यात एक विचित्र अस्वस्थता जाणवत होती. घरी आल्यावर विश्वासराव त्यांच्या कामासाठी बाहेर निघून गेले. आनंदीबाई प्रवासाच्या दगदगीने दमल्या होत्या म्हणून त्या त्यांच्या खोलीत आराम करायला गेल्या. मुलंही त्यांच्या खोलीत अभ्यास करत बसली होती. तेजश्री फ्रेश होऊन आली आणि लगबगीने रात्रीच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागली.

“हेच ते सहजीवन असतं का जे आक्का मला सांगत होती? हेच का ते पती-पत्नीचं नातं जे ती मला विचारत होती? आमच्यात तर असं काहीच झालं नाही. ते अवघडलेले आवाज, ते अस्पष्टसे कसनुसे हुंकार नक्की कसले असतील? काय असेल ते? मलाही ते सगळं हवंय मला. पण हे कळणार कसं? चित्रपटात दाखवतात तसं मिठीत आल्यावर होत असेल? का वेगळं काही?”

तिचा स्वतःशीच संवाद सुरू होता. त्या विचारांच्या तंद्रीतच तेजश्रीने स्वयंपाक केला. नंतर तेजश्री तिच्या खोलीत येऊन फ्रेश झाली. बऱ्यापैकी छान असलेली साडी नेसली. स्वतःचा अवतार आवरला. स्वतःचं रूप आरश्यात न्याहाळत असताना कसल्याशा विचाराने ती लाजून हसली. त्यानंतर खाली येऊन मुलांना आणि सासूबाईंना जेवण वाढलं.

“हे काय? तुझं पान? तू जेवणार नाहीस का?”

आनंदीबाईंनी प्रश्न केला.

“मी ते आले की त्यांच्यासोबतच जेवेन.”

तिने काहीसं कचरत पण लाजून उत्तर दिलं. आनंदीबाईंना थोडं नवल वाटलं पण त्या फक्त गालातल्या गालात हसल्या. सासूबाईं आणि मुलांची जेवणं झाली. तेजश्री विश्वासरावांची वाट पाहत बसली. रात्री बऱ्याच उशिरा विश्वासराव घरी परतले. फ्रेश होऊन जेवायला बसले. तेजश्रीने दोन पानं वाढून घेतली.

“अगं, तू अजून जेवली नाहीस? तुला किती वेळा सांगितलं की, माझ्यासाठी थांबत जाऊ नकोस. माझं काही खरं नसतं. एकदा कामासाठी घराबाहेर पडलो की कितीवेळ लागेल काही सांगता येत नाही. तू माझ्यासाठी उगीच ताटकळत बसत जाऊ नकोस. आई आणि मुलांसोबत जेवून घेत जा.”

तेजश्रीकडे न पाहताच विश्वासराव म्हणाले. तेजश्री मात्र काहीच न बोलता मान खाली घालून त्यांना जेवण वाढत होती आणि स्वतःच्या ताटात वाढून घेत होती. काही वेळाने दोघांची जेवणं झाली. विश्वासराव जेवण आटोपून त्यांच्या खोलीत येऊन बसले आणि तेजश्री स्वयंपाकघर आवरू लागली. भांडीकुंडी झाली. स्वयंपाकघरही आवरून झालं. एकदा तिने स्वयंपाक घरात सर्वत्र नजर फिरवली. सगळं स्वच्छ झाल्याची खात्री केली आणि ती तिच्या खोलीत आली. विश्वासराव पलंगावर पुस्तक वाचत बसले होते. तेजश्री येताच त्यांनी पुस्तक बंद करून टेबलवर ठेवून दिलं. ते उठून उभे राहिले. नेहमीप्रमाणे पलंगावरची उशी आणि चादर घेतली आणि सोफ्याकडे चालू लागले. इतक्यात काय झालं कुणास ठाऊक! तेजश्री काहीशा धुंदीत त्यांच्याजवळ आली आणि तिने त्यांना घट्ट मिठी मारली. उरात धडधड वाढली होती. अडनिड्या वयातील ती अनामिक ओढ शिगेला पोहचली होती. तेजश्रीचं हे वागणं अनपेक्षित होतं. बेसावध असलेले विश्वासराव एकदम गोंधळून गेले. त्यांना ते रुचलं नाही.

“हे काय चाललंय तुझं? दूर हो.”

त्यांनी तिला त्यांच्यापासून दूर लोटलं. त्यांचा पारा चढला होता.

“पण का? मी तुमची बायको आहे ना?”

अचानक झालेल्या त्या प्रतिक्रियेने घाबरलेल्या तेजश्रीच्या तोंडून जेमतेम शब्द बाहेर पडले.

“मी तुला आधीच सांगितलं होतं. तुझ्याशी माझी लग्नगाठ बांधली गेलीय ती फक्त आणि फक्त माझ्या म्हाताऱ्या आईसाठी आणि माझ्या मुलांसाठी. त्याव्यतिरिक्त आपल्यात कोणतंच नातं नसेल. समजलं तुला?”

तेजश्रीचे डोळे पाण्याने डबडबले. विश्वासरावांचे शब्द तिच्या मनावर सपासप वार करत आत गेले. त्यांचं इतकं अपमानास्पद बोलणं आणि तिला झिडकारणं तिच्या जिव्हारी लागलं होतं. सगळा अपमान निमूटपणे गिळत ती पटकन खोलीच्या बाहेर आली. खाली दिवाणखान्यात येऊन बसली. अपराधीपणाने इतका वेळ दाबून ठेवलेला आसवांचा बांध अखेर फुटलाच. ती हमसून हमसून रडू लागली. रडून रडून तिला ग्लानी आली आणि ती तिथेच सोफ्यावर झोपी गेली.

दुसऱ्या दिवशी पहाटे तिला जाग आली. ती ओसरीवर येऊन उभी राहिली. सहज तिचं लक्ष गेस्ट हाऊसच्या दिशेने गेलं. अभिराज नुकताच उठला होता आणि अंगणात व्यायाम करत होता. गव्हाळ रंग, उंचपुरा, काळेभोर दाट केस, धारदार नाक, तीक्ष्ण नजर, ओठांवर मिशीची महिरप, घामाने भिजलेली त्याची पिळदार शरीरयष्टी पाहून क्षणभर तिची नजर त्याच्यावर खिळून राहिली. एक विचित्र भावना मनात दाटून आली. अचानक अभिराजचं तिच्याकडे लक्ष गेलं. तो एकदम गांगरून पटकन आतल्या बाजूला खोलीत गेला तशी तेजश्री भानावर आली. मनातले विचार झटकून टाकत ती तिच्या रोजच्या सकाळच्या कामाला लागली. विश्वासरावांसाठी, मुलांसाठी न्याहारी, सासूबाईंचा चहा, घरातली बाकीची कामे उरकली. विश्वासराव खाली आले. तेजश्री त्यांच्याकडे पाहत होती. त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी मुद्दाम त्यांच्याशी बोलत होती. विश्वासराव मात्र तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होते. ऐकून न ऐकल्यासारखं वागत होते. थोड्याच वेळात न्याहारी उरकून ते घराबाहेर पडले.

आक्काच्या घरून आल्यापासून तेजश्री फारच वेगळी वागू लागली. सारखी विश्वासरावांच्या मागे पुढे करू लागली. त्यांचं मन वळवण्याचा ती हरेक प्रयत्न करत होती पण तिच्या प्रयत्नांना यश येत नव्हतं. दुसरीकडे विश्वासराव तिच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हते. तिच्यापासून ते दूर राहत होते. तेजश्रीच्या अशा विचित्र वागण्याला कंटाळून हल्ली रात्रीचेही ते घराबाहेर राहू लागले. इकडे तेजश्रीचा जीव तळमळत होता. काय करावं तिचं तिलाच समजत नव्हतं.

नाकीडोळी सुंदर अशा तिच्या चेहऱ्यावरचं ओसंडून वाहणारं ते हसू पाहून तिच्या नवऱ्याला त्याची भुरळ पडू नये? ती म्हणजे फक्त घरात काम करायला आणि मुलांना, म्हाताऱ्या आईला सांभाळण्यासाठी आणलेली एक बाई! इतकंच तिचं स्थान असावं त्यांच्या आयुष्यात? घरात राबणारी एक मोलकरीण? जिच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली की झालं? लग्न करून तिच्या खाण्यापिण्याची, शिक्षणाची सोय केली म्हणजे तिच्या नुकत्याच वयात येताना गोंधळलेल्या स्त्रीत्वाची पदोपदी अवहेलना करण्याचा अधिकार मिळाला त्यांना? तो हक्क त्यांना कुणी दिला?”

हे आणि असे अनेक प्रश्न तेजश्रीला पडत होते पण एकाही प्रश्नाचं उत्तर तिला सापडत नव्हतं. याहून अधिक संभ्रमात टाकणारे बदल तिच्या शरीरात तिला जाणवत होते. तिच्यातली स्त्री बंड करू पाहत होती पण विश्वासरावांच्या निर्धारापुढे तिचं काही एक चालत नव्हतं. परिणामी हळूहळू घरात तेजश्रीचा वावर यंत्रावत होत चालला होता. तिला त्या अनामिक सुखाची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. रात्री अपरात्री तिला मधेच जाग येऊ लागली. देहाची नुसती लाही लाही होत होती. तो दाह शांत करण्यासाठी ती न्हाणीघरात जाऊन हंडेच्या हंडे पाणी डोक्यावरून ओतून घ्यायची. जाईच्या फुलासारख्या नाजूक आणि टवटवीत तेजश्रीच्या आता फक्त नावातच तेज उरलं होतं. एव्हाना गोबऱ्या गालावरचं निरागस हसू कुठच्या कुठे विरलं होतं. त्या सर्व गोष्टींवरून स्वतःचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी तेजश्रीने आपलं लक्ष अभ्यासाकडे वळवलं पण तिथेही आता पहिल्यासारखं मन लागत नव्हतं. कामात स्वतःला व्यस्त करून घेण्याचा ती आटोकाट प्रयत्न करत होती.

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all