लग्नगाठ - एक बंधन.. भाग १०

लग्नगाठ - एक बंधन..



अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
चौथी फेरी :- कौटुंबिक कथा
कथेचे नाव :- लग्नगाठ - एक बंधन..
निशा थोरे (अनुप्रिया)

लग्नगाठ - एक बंधन.. भाग १०


थोडा वेळ गप्पा मारून तेजश्री झोपण्यासाठी आक्काच्या खोलीच्या दिशेने निघाली. दारापाशी येताच ती जागीच थबकली. आतून कुजबुज ऐकू येत होती.

“अहो काय करताय? नको ना. कोणीतरी येईल. घरात माणसं आहेत. ती तेजू येईल इतक्यात. सोडा बरं.”

“येऊ देत की मग. तिला काय हे माहित नाही का? नवरा बायको म्हटल्यावर हे चालणारच.”

“अहो, असं काय करता? लग्नाचे हे चार दिवस पण तुम्हाला धीर धरवत नाही का?”

“धीरच धरवत नाही ना तुझ्या मिठीशिवाय. मला झोप तरी कशी येईल सांग बरं?”

“नको नं.. सोडा बरं.”

आक्का आणि भाऊजींचा तो संवाद आणि त्यांचे अधीरतेने अवघड झालेले आवाज ऐकून तेजश्रीला आधी तर हसू आलं पण थोड्या वेळाने आतून दोघांचे कसेनुसे हुंकार ऐकू येऊ लागले. आता मात्र तिची उत्सुकता वाढली. तिच्याही नकळत तिच्या आत काहीतरी सुरू झालं होतं. लग्नानंतर नवराबायको म्हटलं की काहीतरी गंमत असते इतकंच तिला माहीत होतं. आडनिड्या वयात लग्न झालं होतं. तेजश्री गौरीच्याच वयाची होती. आतून येणारे ते आवाज ऐकताना आता तिच्या शरीराला थरथरी भरायला लागली होती. तिची उत्सुकता आता शिगेला पोहचली होती. इतक्यात आतून कुणीतरी दरवाज्याजवळ येण्याची चाहूल तिला लागली. ती घाबरून तिथून निघाली आणि थेट बाहेर अंगणात आली. बराच वेळ झालेला प्रकार तिच्या मनात घोळत राहिला. तिचा चेहरा एकीकडे लाजेने लाल होत होता पण उरातली धडधड आज तिला वेगळीच जाणवत होती. आयुष्यात पहिल्यांदा तिला ही जाणीव होत होती. तिचे श्वास जोरात सुरू होते. न राहवून तिने अंगणात मांडलेल्या डेऱ्यातल्या थंड पाण्याचा तोंडावर छिडकावा केला. त्यानंतरही बराच वेळ ती एकटीच अंगणात बसून होती. मनात एक विचित्र खळबळ माजली होती. काही जाणीवा नव्याने जाग्या झाल्या होत्या. मनाला कसली तरी अनामिक ओढ लागली होती.

“अगं तेजू, अशी एकटीच का बाहेर बसलीस? आत जा. तुझी आक्का वाट पहातेय.”

भावोजींच्या आवाजाने ती भानावर आली.

“अं.. हं.. हो भावोजी जाते.”

काहीशी गडबडतच त्यांच्याकडे न पाहताच तेजश्री आक्काच्या खोलीकडे निघाली. आत जाऊन पाहते तर आक्का तिची विस्कटलेली साडी नीट करत होती. तेजश्रीला पाहून ती लाजेने गोरीमोरी झाली.

“ये तेजू, झोप इथे. तुझे भावोजी झोपतील दुसऱ्या खोलीत.”

आक्का गालातल्या गालात हसत म्हणाली आणि पलंगावर आडवी झाली. तेजश्री पलंगावर दुसरीकडे तोंड करून झोपली. आक्काला अंथरुणात पडल्या पडल्या झोप लागली पण तेजश्रीच्या डोळ्यावरच्या झोपेने जणू बंड पुकारलं होतं. ती बिछान्यात तळमळत पडली होती. या कुशीवरून त्या कुशीवर वळणं सुरू होतं. मधेच आक्काला जाग आली तेजश्रीला जागी पाहून ती मिश्किलपणे म्हणाली,

“काय गं तेजू, अजून झोपली नाहीस? विश्वासरावांची आठवण येतेय?”

“नाही आक्का, तसं काही नाही. नवीन जागा आहे नं, त्यामुळे होत असेल.”

“बरं बरं.. झोपण्याचा प्रयत्न कर. हळूहळू डोळा लागेल.”

असं म्हणून आक्काने कूस बदलली आणि ती झोपी गेली. बराच वेळाने तेजश्रीला डोळा लागला.

दुसऱ्या दिवशी हळदीची, घाणा भरणी आणि बांगड्या भरण्याचा कार्यक्रम होता. घरात लगबग दिसून येत होती. तेजश्रीही आक्काला मदत करत होती पण मन पाखरू मात्र विश्वासरावांकडे पोहचलं होतं. तिचे डोळे त्यांच्या वाटेकडे लागून राहिले होते. त्यांची आजइतकी आठवण तिला यापूर्वी कधीच आली नव्हती.

इकडे विश्वासरावांच्या वाड्यावरही शांतता पसरली होती. अभिराज मुलांना शिकवत होता पण तो हसण्याचा आवाज गायब झाल्यासारखा वाटत होता.

“सुनबाई घरात नाहीत तर किती उदास वाटतंय नाही! ती असली घर कसं हसतं खेळतं असतं. मुलं तर किती हिरमुसलीत बघ.”

आनंदीबाई म्हणाल्या. त्यांच्या बोलण्यावर विश्वासरावांनी नुसता हुंकार भरला. खरंतर त्यांनाही चुकल्यासारखं वाटत होतं.

“ती असली की घरात एक चैतन्य असतं. सगळीकडे आनंद पसरवत असते. ती नाहीये तर घर खायला उठलंय.”

विश्वासराव मनातल्या मनात पुटपुटले. दोन दिवसांनी विश्वासराव आपली आई आणि मुलांसमवेत आक्काच्या गावी लग्नस्थळी पोहचले. त्या सर्वांना पाहून तेजश्रीला खूप आनंद झाला. खासकरून विश्वासरावांना पाहून तिची कळी भलतीच खुलली होती. मुळातच सुंदर असलेली तेजश्री लग्नात खूपच छान दिसत होती. आज एक विलक्षण आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.तिचं वागणं, बोलणं, विश्वासरावांच्या दिशेने तिरपा कटाक्ष टाकत पाहणं आज सारंच खास होतं. ती त्यांच्या जवळ आली. शेजारी उभं राहून सलगीने वागू लागली. भर लग्नात कोणाचीही पर्वा न करता त्यांचा हात हातात पकडून तिच्या आणि आक्काच्या नातेवाईकांशी ओळख करून देत होती. त्यांना जाणिवपूर्वक स्पर्श करत होती. तिच्या वागण्यातला तो बदल विश्वासरावांच्याही लक्षात आला होता.

आक्काच्या दिराचं लग्न छान पार पडलं. त्यानंतर हळूहळू सर्व पाहुण्यांनी निरोप घेतला. आक्का आणि भावोजीनी आनंदीबाई, विश्वासराव आणि तेजश्री यांचा योग्य ते मानपान केला. त्यानंतर सर्वांचा निरोप घेऊन तेजश्री आपल्या कुटुंबियांसोबत आपल्या सासरी निघाली.


पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all