लग्नाला पहावे जावून.....

नवरदेव पारावर गेला, त्याच्यासाठी शेवया पापड दूध घेवून परी राधा आत्ता, मावशीची सून बरीच मंडळी गेली, पारावर एक हास्य फवारे उडत होते, लाडकी साली स्वतःच्या हाताने नवरदेवाला शेवया भरवत होती



लग्नाला पहावे जावून.....

©️®️शिल्पा सुतार

राधा आत्या अण्णा एक सुखी जोडपं, त्यांची परी नावाची एकुलती एक मुलगी , परी शाळेत होती, ते नौकरी निम्मीत् शहरात रहात होते

घरात राधा आत्या म्हणतील ती पूर्व दिशा, अण्णांच काहीच चालत नव्हत, त्यांनी पूर्वी पासून हार मानली होती, राधा आत्या होतीच तशी

राधा आत्या म्हणजे एक भारदस्त व्यक्तिमत्व, नेहमी आनंदी असायच्या त्या, त्यांच्या अवती भोवती नेहमी मैत्रिणीचा गराडा असे, एखादी गोष्ट करायची असेल किंवा कुठे जायचं असेल तर हा मैत्रिणींचा ग्रुप तासनतास चर्चा करत राहायचा, त्यानंतर सगळ्यांचा एखाद्या गोष्टीवर एकमत झाल्यानंतर त्या निघायच्या

राधा आत्या जिथे जाणार तिथेच बसून राहणार, तिच्या गप्पा संपायच्या नाहीत, घरचे वाट पाहून थकायचे मग कोणीतरी राधा आत्याला शोधायला जाणार, ते ही तिकडेच गप्पा मारत बसणार, नेहमीचंच झालं होतं, त्या जिथे असल्या तिथे आनंदाचा झरा वाहत असायचा, नेहमी हसत मुख अशी आत्या सगळ्यांना प्रिय होत्या, प्रत्येक कार्यक्रम त्यांची उपस्थिती मेन असायची

एवढ्यातच राधा आत्याच्या भावाच्या मुलीच प्रियाच लग्न होत, उद्या निघायचा होत गावाला जायला, आज थोडी खरेदी बाकी होती ती करायची होती, संध्याकाळी बॅग भरायची होती

सकाळ पासून राधा आत्याची धावपळ सुरू होती , भाची च्या लग्नासाठी साडी खरेदीचा मोठा कार्यक्रम होता आज, तिकडे गिफ्ट द्यायला साड्या घेणार होत्या आज , म्हणजे आज पूर्ण दिवस इतर काहीच काम नाही, सकाळचे दोन तास तर साडी वाल्याला बोलवण्यात गेले, तो कुठे फिरत होता याची कोणालाच कल्पना नव्हती, तो आला म्हणजे बिल्डिंग मधल्या सगळ्या बायका पाच-सहा तास तरी काहीच काम करणार नव्हत्या,

बाजूची माया आणि आरती दोघी म्हणजे राधा आत्याचं दुसरं रूपच, जिथे राधा आत्याला खरेदीला चार तास कमी पडायचे दोघी सोबत असल्या म्हणजे विचारायची सोय नाही, एकदाच पूर्ण दिवस खपवून राधा आत्याने तीन चार साड्या पसंत केल्या, किमतीसाठी घासाघीस करण्यात पुढचे दोन तास गेले, शेवटी संध्याकाळी सहाला साडीवाल्याला एक कप भर चहा राधा आत्याने करून दिला तेव्हा घरच्यांनी एक सुस्कारा सोडला....

लग्नाला जायची तयारी करण्या साठी भली मोठी बॅग रात्रीच अण्णांकडुन आत्याने खाली काढून घेतली होती, आत्याने बॅग भरायला घेतली, बागेच्या तळाशी साड्यांची चळत दुसऱ्या बाजूला रुखवताचे सामान, परिचे अण्णांचे कपडे ठेवले,

"काही विसरू नका कपडे वगैरे , मागच्या वेळी माझा लग्नाच्या ड्रेस घरी राहिला होता, पूर्ण 4-5 दिवस मी एका ड्रेस वर होतो",..... अण्णांनी परत तोच प्रसंग सांगितला, जो बर्‍याच वेळा सांगून झाला होता, त्या वरुन घरात बर्‍याच वेळा भांडण झाल होत

तेव्हा काय झाल ते आठवून परी खूप हसत होती,.....

"लक्ष्यात आहे हो माझ्या, किती वेळा तेच सांगताय, त्या नंतर 25 लग्न अटेंड केले आपण, कधी राहिले का तुमचे कपडे घरी",...... बडबड करत राधा आत्या बॅग भरत होती

"सगळ रुखवत घेतल ना व्यवस्थित ",...... परी

"अग ती बिस्कीट ची गाडी कुठे गेली? काल दोन तास खपवून मी ती केली होती, नवरी प्रियाने खास करून ती बिस्किट ची गाडी बनवायला सांगितली होती मला , आता इथे तर ठेवली होती मी",...... राधा आत्या

बॅगेत भरायचं म्हणून नुकताच सगळं रुखवत खाली घेतलं होतं...

"आई बिस्किटाची गाडी बाजूच्यांच्या मोती कुत्र्याने खाल्ली, तो बघ जिभल्या चाटत आहे ",..... परी

मोती कुत्र्याला ओरडायच सोडून सगळे हसतच बसले, पन्नास वेळा बँग उपसुन एकदाची बॅग भरून झाली, तसं अण्णांनी जाहीर केलं,.... "एवढी मोठी बॅग मी उचलणार नाही",

झालं का आता एवढं सामान आधीच घेतलं होतं,....." आधी नाही का सांगता येत तुम्हाला",.... राधा आत्या ची परत धावपळ झाली

परत सामानाची उचलबांगडी झाली, दोन वेगवेगळ्या बॅगा केल्या, कपड्याची बॅग अण्णा धरतील आणि रुखवताची बॅग राधा आत्या धरतील असे एकमताने ठरले

दुसऱ्या दिवशी सकाळच्या गाडीने राधा आत्या अण्णा आणि परी निघाले, तीन चार तास प्रवासात गेले, सगळे लग्न घरी पोहोचले, भावा कडेच लग्न म्हणजे राधा आत्या अण्णा यांना खूपच भाव, ते म्हणतील तसं सगळे ऐकत होते, आत्तापर्यंत तिकडंन फोनवरून विचारून लग्नाची तयारी सुरू होती

राधा आत्यांच्या माहेरचं लग्न म्हणजे अण्णांचा प्रत्येक कार्यक्रमात रुसणं ठरलेल, त्यानुसार बस मध्ये राधा आत्याने अण्णांना सांगितलं..... "आता आपल्या लग्नाला बरीच वर्ष झाली, आता जरा हे रुसणं फुगणं कमी करा, उगाच तुम्हाला कोणी मनवायला आलं नाही अजून अपमान होईल तुमचा, आणि तिकडे स्वतःची कामे स्वतः करा, आम्हाला सारख्या हाका मारू नका " ,

एवढे बोलून राधा आत्या बस मध्येच खोखो हसत होत्या, परीनेही त्यांना सपोर्ट केला, त्यामुळे अण्णांना आता प्रश्नच पडला की वागावं कसं? नाहीतर त्यांचं ठरलं होतं पूर्ण कार्यक्रमात दोन-तीनदा तरी रुसून बसायचं

राधा आत्या परी आण्णा लग्न घरी पोहोचले, सगळे आनंदने येवून भेटले

घर पाहुण्यांनी गच्च भरलेले होत, आत्या तू आता लग्नाचा पूर्ण चार्ज हाती घे, स्वैपाकाला बाई आहे तिच्या कडे लक्ष दे, नवरी प्रिया आनंदात होती

कल्याण ची आत्या, तिचा मोठा मुलगा सून आले होते, त्या सासू सुनेची एकमेकींवर कुरघोडी सुरू होती ,

नवरीचे मामा मामी अगदी वेळेवर आले म्हणून भाऊ रुसलेला होता, त्यांचा रुसवा फुगवा काढायच काम सुरू होत,

लांबची मावशी तिच्या मुली आल्या होत्या, एका मुलीच आता लग्न झाल होत, ती तिच्या सासुबाई नवरा आणि बाळा सोबत आली होती, ती मावशी लग्न घरी बाळाला घेवून बसली होती, बाळाची कीर कीर सुरू होती, तिची मुलगी नवरा सासूची सेवा करण्यात मग्न होती, मावशी राधा आत्याला तिच्या मुलीला सासरी किती जाच आहे हे पूर्ण वेळ सांगत होती,

मध्येच कल्याण च्या आत्याच्या नवर्‍याची बॅग घरी राहिली म्हणून ते रुसलेल्या होते तर आत्या तेव्हा कपडे खरेदीला मार्केट मध्ये गेली

नवरी प्रियाच्या फोन वर सारखा नवरदेवाचा फोन येत होता, तिच्या हाताला मेहेंदी होती, सगळ्या मुली तिला खूप त्रास देत होत्या, उतावीळ झालेल्या नवरदेवाला नवरीशी बोलायचा चान्स मिळत नव्हता

जेवण झालं, कशी तरी कोपर्‍यात जागा बघून राधा आत्या आडवी झाली,

"आई अण्णांनी पायजमा मागितला आहे" ,..... परी

राधा आत्याला कंटाळा आला होता बॅग उघडायचा, घरीच बोलले होते मी की तुमचे कपडे वेगळ्या बॅगेत घ्या, पण माझ ऐकत कोण, काय करणार , त्यांनी बॅगेतुन कपडे काढून दिले बदलायला,

मावशीची नात रात्र भर रडत होती, त्या माय लेकी बाळाला आलटून पालटून सांभाळत होत्या

दुसऱ्या दिवशी हळदीचा कार्यक्रम होता.....

पहाटे पाच पासून अंघोळीची घाई उडाली, राधा आत्या अंघोळीला बसणार तेवढ्यात मावशीने सांगितल तिच्या मुलीच्या सासूला करू दे आंघोळ, राधा आत्या वापस बाहेर आली, तसच तिथे दारात बसुन आपल्या नंबरची वाट बघत होती, परत मावशी मुलीच्या सासुबाई चे गार्‍हाणं राधा आत्याला सांगायला सुरुवात केली

हळदीची तयारी सुरू होती, चहा नाश्ता बाकी होता म्हणून मावशीचे जावई घरात बसुन होते, कोणाला आवरता येत नव्हत, मध्येच नवरीची हळदीची साडी सापडत नव्हती तो गोंधळ पार पडला

हळद राधा आत्या आणि अण्णांच्या हातून होती,

"अण्णा कुठे गेले बघ ग परी, चहा व्हायचा आहे त्यांच्या अजून " , ...... राधा आत्या काळजीत होती


अण्णा आलेच तेवढ्यात समोरून, ते चिडलेले होते,

"काय झाल? आहो, मी काय सांगितल होत बस मध्ये रुसून बसू नका",..... राधा आत्या

"रुसून बसू नको तर काय करू? बाथरूम मधे अडकून पडलो होतो मी, एक तासा पासून, मी म्हणतो बाहेरून कडी कोणी लावली" ,....... अण्णा

राधा आत्याला हसू आवरत नव्हत,

"तुझा मोबाईल कुठे आहे? केव्हाचा फोन करतो आहे मी? किती आरोळ्या दिल्या ",...... अण्णा

"अहो झाल असेल नजर चुकीने कोणाकडून, चला आता हळदीचा मुहूर्त टाळ्याला नको"....... राधा आत्या

हळद छान पार पडली, तस आहेर देण घेणे सुरू झाल

हिला चांगली साडी दिली, मला हलका बोळा फेकून मारला, सगळीकडे तीच चर्चा, मग एक दोघांनी साड्या बदलून घेतल्या, तेव्हा त्यांच्या जिवात जीव आला

दुसर्‍या दिवशी पहाटे नवरदेव आला, दोन गाड्या होत्या त्यांच्या, एक गाडी वेळेवर आली, दुसरी गाडी रस्ता चुकली, एक तास उशिरा येणार होती ती गाडी,

त्यांची आवरायची धावपळ उडाली, तिकडे चहा नाश्ता मान पान च सगळे बघत होते

मध्ये एकच धावपळ उडाली विहीण बाई रुसल्या होत्या, का तर म्हणे नवरदेवाला अंघोळी साठी टरकीस चा टॉवेल हवा होता, मग कोणाच्या तरी बॅगेत होता नवीन टॉवेल तो पुढे पाठवला,

नवरदेव पारावर गेला, त्याच्यासाठी शेवया पापड दूध घेवून परी राधा आत्ता, मावशीची सून बरीच मंडळी गेली, पारावर एक हास्य फवारे उडत होते, लाडकी साली स्वतःच्या हाताने नवरदेवाला शेवया भरवत होती त्या बदल्यात नवीन ड्रेस साठी तिला पैसे हवे होते, ती मागे हटायला तयार नव्हती, घासाघीस करून बरेच पैसे मिळवून मुली परत आल्या

मिरवणूक खूप रंगली तास दोन तास सगळे नाचत बसले तो पर्यंत ज्याना घाई होती त्या मंडळींनी जेवून घेतल

लग्न लागल, प्रिया खूप छान दिसत होती

दादा वहिनी राधा आत्यांच्या डोळ्यात पाणी होत,पूजा विधी सात फेरे झाले, मुलीच्या पाठवणीची वेळ झाली, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होत, जमलेले नातेवाईक नवरीच्या आई बाबांची समजूत काढत होते, नवरदेव नवरी सगळ्यांचा आशीर्वाद घेत होते, नवरी सासरी गेली

सगळे घरी आले, खूप थकले होते पण लग्न छान झाल, आता कोणी रूसलेले नव्हते, सगळे समजुतीने आपला काम आवरत होते, प्रत्येकाच्या मनात होत आज यांची मुलगी सासरी गेली उद्या आपली मुलीही जाईल सासरी

बरेचसे आलेले नातेवाईक घरी गेले, राधा आत्याने दुसर्‍या दिवशी पूर्ण घर आवरायला मदत केली दुपारच्या गाडीने ते आपल्या घरी निघाले

"कसा वागलो मी या वेळी लग्न घरी",..... अण्णा राधा आत्याला विचारात होते,

"तो एक तुम्ही बाथरूम मध्ये अडकले होते हा प्रसंग सोडला तर सगळ नीट झाल ",...... राधा आत्या आणी परी खूप हसत होते,......

आता अण्णा खरच रुसले होते........