लग्नाची बेडी..(भाग ३)

आर्थिक आणि वैचारिक मतभेदांमुळे लग्नाच्या बेडीतून सुटका करण्यासाठी एकताची सुरु असलेली धडपड.


लग्नाची बेडी - एक अधुरी प्रेमकहाणी
(जलद कथा मालिका लेखन स्पर्धा)

"एकताने कितीही चुका केल्या तरी घरात सगळेच जण नेहमी तिला समजूनच घेतात. आई, वहिनी दरवेळी तिला सपोर्ट करतात. मग अशावेळी एकता असा विचार करूच कशी शकते?"
या विचाराने अनिकेत आणि एकतामध्ये वारंवार वाद होवू लागले.

"मान्य आहे सद्ध्या तुला पाहिजे तशी लाइफ तू नाही जगू शकत पण हा विचार तू आधी करायला हवा होतास. इतक्या वेळा समजावून सांगूनही तू लग्नासाठीचा तुझा  हट्ट सोडलाच नाही. अविचाराने निर्णय घेवून लग्नासाठी सर्वांना मनवलेच पण आता पुन्हा एकदा मी तुझ्या शब्दात अडकेल अशी चुकीची अपेक्षा ठेवू नकोस. माझीही काही तत्व आहेत. प्रेमासाठी ती गहाण नाही ठेवू शकत मी. तुला जर इथे राहणे शक्य नसेल तर तू जावू शकतेस तूझ्या आई वडिलांकडे. पण मी तिकडे येणार नाही. आणि तुझ्या वडिलांकडून एक रुपयाची पण मदत घेणार नाही. त्यामुळे आज ना उद्या मी तुझे ऐकेल ही खोटी आशा काढून टाक मनातून. तसे काहीही होणार नाही."

अनिकेतने जरा स्पष्टच भाषेत ऐकवले एकताला. आता तिचाही नाईलाज झाला होता. पण त्याला नोकरी मिळेपर्यंत  वाट पाहण्याची तिच्यात सहनशक्तीच नव्हती. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी एकता आपले सर्व सामान घेवून माहेरी जाण्यासाठी निघाली.

घरातल्या सर्वांनी दोघांचीही खूप समजूत घातली. अनिकेतला देखील तिच्यासोबत जाण्याचा सल्ला दिला. पण त्याला तेच तर नको होते. त्यानेही नाही अडवले एकताला. कारण ती सोबत असताना तो त्याचे करिअर बरबाद होताना उघड्या डोळ्याने पाहत होता. हे जर असेच सुरू राहिले तर सक्सेस तर लांबच राहिले पण आहे ते देखील हातातून निसटण्याची भीती त्याला मनोमन वाटत होती. रोजचे तेच ते वाद नको होते त्याला आता.

कोणाचेही न ऐकता एकता माहेरी निघून गेली. एवढे सगळे होवूनही अनिकेतच्या अपरोक्ष घरच्यांनी एकताच्या आई वडीलांना फोन करुन त्यांची माफी मागितली.
"अनिकेतचे चुकले असेल. मुलेच आहेत ती. आपणच त्यांना समजून घ्यायला हवे."
असे वारंवार सांगूनही, एकताचे आई वडील अनिकेतलाच दोष देत होते.

"अनिकेतने असे करायला नको होते. थोडे आमचेही ऐकले असते तर सुखी समाधानी जीवन त्याला नक्कीच आम्ही मिळवून दिले असते."
असे बोलून एकताच्या वडीलांनी पुन्हा एकदा लेकीला पाठीशी घातले नि तिच्या म्हणण्याप्रमाणे पुन्हा एकदा आंधळेपणाने तिला पाठिंबा दर्शवला.

एकता माहेरी गेल्यानंतर अनिकेतने मात्र फक्त अभ्यासावर फोकस करायचे ठरवले. जेव्हा कधी एकताचा राग शांत होईल तेव्हा नक्कीच तिचा आणि तिच्या आई वडिलांचा विचार बदलेल असे अनिकेतला मनोमन वाटत होते.

अनिकेतच्या मते,"थोडा तरी सर्वांनी माझ्यावर विश्वास दाखवायला हवा होता. नक्कीच दिवस बदलणार याची खात्री आहे मला. पण तेव्हढा वेळ तर द्यायला हवा होता. जिथे बायकोलाच आपल्यावर विश्वास नाही तिथे जगाचे काय घेवून बसलात."
अनिकेतचे विचारचक्र थांबायचे नावच घेईना.

"लग्न म्हणजे काय भातुकलीचा खेळ आहे, मनात आलं मांडला, मनात आलं की मोडला. एकताला नाही निदान तिच्या आई बाबांना तरी समजायला हवे. त्यावेळीही ते म्हणतील तसे वागलो मी आणि आताही त्यांची तीच अपेक्षा. घेतात मला माझ्या घरचे समजून म्हणून ठिक आहे. नाहीतर कधीच मलाही घराबाहेर पडायला लागले असते."

विचार करुन करुन अनिकेत सुन्न झाला.

तिकडे एकताचे बाबा मात्र लेकीला समजुतीच्या चार गोष्टी सांगायचे सोडून तिलाच सपोर्ट करत होते.

"बेटा तू काळजी करु नकोस, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी भक्कम उभे. अनिकेतला त्याच्या चुकीचा एक ना एक दिवस नक्कीच पश्र्चाताप होईल याची खात्री आहे मला."
वडील आपल्या लाडक्या लेकीची एकताची समजूत काढत होते.

"अनिकेतचे माहित नाही पण, एकता तुला नक्की पश्र्चाताप होणार याची खात्री मी देतो तुला. आज तू सोन्यासारख्या संसाराला लाथ मारून निघून आलीस. अगं अशी माणसं शोधून सुद्धा सापडणार नाहीत. अनिकेत काय मुलगा आहे ना, हे तुला समजलेच नाही ग. इतका स्वाभिमानी, हुशार नवरा देवाच्या कृपेने लाभला होता तुला. अनिकेतची आई, वहिनी...
खरंच खूप  लकी आहेस तू. तुला अशी सासू आणि जावू मिळाली. पण तू फक्त पैशातच सुख शोधत आहेस.
एक ना एक दिवस त्याच्याकडेही कदाचित पप्पांपेक्षाही जास्त पैसा असेल आणि प्रतिष्ठा देखील. पण असा माज तो कधीच दाखवणार नाही."

एकताच्या भावाचा मात्र तिच्या या अशा बेजबाबदार आणि अविचारी वागण्याने संताप संताप होत होता.

"आई बाबा निदान तुम्हाला तरी हे कळायला हवे होते. हे असेच वागायचे होते तर लग्नाची घाईच का केलीत मग? अहो अनिकेत कितीतरी वेळा म्हणाला होता, "मला आधी सेटल होवू द्यात मग पाहू लग्नाचे." पण नाही ऐकले तुम्ही. त्यावेळीही तुम्ही हिच्या मूर्खपणाला असाच सपोर्ट केलात आणि आताही तुम्ही पुन्हा तीच चूक करत आहात बाबा."

"अरे तो मूर्ख मुलगा, निदान लग्न झाल्यावर तरी माझी ऑफर स्वीकारेल असे वाटत होते मला त्यावेळी. पण अर्धवट जग पाहिलेल्या अशा मूर्ख माणसाला काय कळणार स्वतःचे हित?"

"अहो पप्पा, पण त्यामुळे आपल्याच एकताच्या आयुष्याचे नुकसान होणार आहे. कसे समजत नाही तुम्हाला?"

"असे हजार अनिकेत मी उभे करील माझ्या लेकीसाठी. माझ्यासाठी ती काही जास्त अवघड गोष्ट नाही."

वडिलांच्या वागण्याचा आणि बोलण्याचा खरा अर्थ आता कुठे समजत होता अमेयला. ते खूप चुकीचे वागत आहेत हे त्याला दिसत होते पण तो काहीच करु शकत नाही. याची त्याला खंत वाटत होती.

क्रमशः

काय होईल आता या साताजन्माच्या लग्नाच्या बेडीचे? एकता आणि अनिकेतची प्रेमकहाणी पुढे फुलेल की मधेच ब्रेक होईल. काय वाटतंय तुम्हाला??
जाणून घेण्यासाठी पुढील भाग जरुर वाचा.

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all