लग्नाची बेडी.. अंतिम भाग

कथा दोन जीवांची


लग्नाची बेडी.. भाग ३



ते दोघे परत जायला वळणार तोच आकाशचे त्यांच्याकडे लक्ष गेले..
" मेघना.." त्याने तिला ऐकू जाईल अशी हाक मारली..
" माझ्याकडे काही महत्वाचे पाहुणे आले आहेत.. आपण उद्या भेटूया.. चलो बाय.." त्याने सर्वांना तिथून जायला लावले.. त्या हॉलमध्ये आता फक्त दादा, मेघना आणि आकाशच होते.. त्याने बाजूच्या खुर्च्या घेतल्या..
" बसाना.." दादा आणि मेघना यांत्रिक पणे बसले.. त्याने फोन लावला..
" तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी? "
आकाशच्या चेहर्‍यावर त्याला झालेला आनंद स्पष्ट दिसत होता..
" काही नको.." दादाने उत्तर दिले..
" तू हे काम करतोस? नाच्याचे?" दादाने कुत्सितपणे विचारले..
" नाच्या?" आकाशच्या डोळ्यात परत तीच वेदना मेघनाला दिसली..
" हो.. आमच्याकडे अशा माणसांना नाच्याच म्हणतात.. म्हणून एवढ्या लांब मुलगी बघायला आलास का? तरी आम्ही म्हटले, एवढा मुंबईचा मुलगा आणि गावातली मुलगी कशी बघायला आला.." दादा थांबतच नव्हता.. "बरे झाले लग्नाच्या आधीच हे कळले.. नाहीतर.."
" दादा त्यांनीच मला होकार देण्याआधी भेटायला सांगितले होते.. त्यांना फसवायचे असते तर कशाला भेटायला बोलावले असते?" मेघनाने मध्ये बोलायचे धाडस केले..
" ते काही असो.. मला हे लग्न मान्य नाही.. आपण निघूया.." दादा चिडला होता.. मेघनाने आकाशकडे पाहिले. तो दूर कुठेतरी बघत होता..
" दादा, मला यांच्याशी बोलायचे आहे."
" पण.. मेघना.."
" दादा. प्लीज.. मी येते थोड्या वेळात बाहेर.." दणादण पाय आपटत दादा तिथून निघून गेला..
" अजून वेगळे तुला काही बोलायचे आहे?" आकाशने तिच्याकडे न बघता विचारले..
" हो.."
" बोल.. मी ऐकतो आहे.."
" तुम्हाला माझ्याशी लग्न मनापासून करायचे आहे कि घरचे म्हणतात म्हणून करायचे आहे?"
आकाशला हे अनपेक्षित होते..
" हा काय प्रश्न आहे?"
" मला उत्तर हवे आहे.."
" बरे.. मी तिथे आलो ते घरच्यांच्या सांगण्यावरून.. पण मला तू आवडलीस..म्हणून मी तुला माझे कार्ड देऊन आधी भेटायला सांगितले."
" आता दुसरा प्रश्न.. थोडा खाजगी आहे.. विचारू का?"
"जर लग्न करायचे असेल तर आपले खाजगी काही राहणार का?" मेघना लाजली.. तरिही तिने प्रश्न विचारला.
" तुम्ही पुरूष आहात ना?"
तो खदाखदा हसला..
" मी उत्तर देतो.. पण तुला असे का वाटले?"
" ते त्यादिवशी जेव्हा तुम्ही पाठी वळून बघितलेत.. तेव्हा एखादी बाई जशी बघते, तसे तुम्ही वाटलात.. आता ही त्या मुलीसोबत नाचताना तुमचे हावभाव, अदा तिच्यापेक्षा सरस होत्या.."
" बस एवढेच?"
" ते तसं आहे म्हणून तुम्ही एवढ्या लांब स्थळ बघायला आलात का?"
" थोडे बरोबर थोडे चूक.."
" म्हणजे?"
" मला लहानपणापासून नृत्याची खूप आवड.. शाळेत सुद्धा मी जेव्हा भाग घ्यायचो तेव्हा मुलींपेक्षा जास्त छान माझा डान्स व्हायचा.. अनेक स्पर्धा मी जिंकलो.. तेव्हाच ठरवले होते कि यातच करियर करायचे.. पण हा निर्णय माझ्या घरातल्यांना मान्य नव्हता.. खूप विरोध झाला मला घरातून.. मार बसला.. तरिही मी हटलो नाही.. कष्टाने, मेहनतीने मी एका छोट्या क्लास पासून सुरुवात केली.. आणि आता हि मोठी ॲकॅडमी उभारली आहे.. हे यश मिळाल्यावर आता परत सगळे बोलायला लागले आहेत.. तुला आठवते मी तुला विचारले होते कि तू फेसबुक, इंस्टाग्राम वापरतेस का?"
मेघनाने मान हलवली..
"मी सध्या तिकडचा सगळ्यात लोकप्रिय डान्सर आहे.." मेघनाचे डोळे आश्चर्याने विस्फारले.. ते बघून आकाश परत हसला..
"हो.. पण आता त्याचे असे झाले आहे कि तुझ्यासारखेच बर्‍याचजणींना मी पुरूष आहे का हि शंका वाटते. शाळा, कॉलेजमध्ये माझे कधीच कोणाशी अफेयर वगैरे नव्हते.. त्यामुळे काही जणांची खात्रीही पटली.. आणि इथे येणार्‍या मुलींबद्दल मलाच कधी आतून काही वाटले नाही.."
" खरेच?" मेघनाने मध्येच विचारले.
" तुला काय म्हणायचे आहे?"
"म्हणजे तुम्ही त्या मुलीच्या जेवढे जवळ गेला होता.. तसे जाऊनही काही वाटायचे नाही?"
आकाशने मेघनाचा हात हलकेच हातात धरला.. तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले.. आकाशने ते पाहिले..
"हे असे ना मला कोणाबद्दल वाटले, त्यांना वाटले असेल तर माहित नाही.. खरे सांगायचे तर डान्स करताना मी सगळेच विसरून जातो.. तो मुलगा आहे कि मुलगी.. मी आणि फक्त माझे नृत्य.. गावची मुलगी बघायचे एकमेव कारण कि मी शहरात खूपच प्रसिद्ध आहे त्यामुळे काही जणी त्या प्रसिद्धीसाठी लग्न करू इच्छितात तर काही पैशासाठी.. पण मला हवा आहे एक जोडीदार.. जो मला समजून घेईल.. कारण मला माहीत आहे, नृत्य माझ्यामध्ये इतके भिनले आहे कि मधूनच त्या अदा माझ्या बोलण्यात वागण्यात दिसून येतात.. त्यामुळे माझ्या जोडीदारासाठी हे *लग्न म्हणजे बेडीसारखे* असणार आहे..
आमचे आयुष्य हे सर्वसामान्य नसणार आहे.. हे समजून घेणारी कोणीतरी मला तुझ्यामध्ये दिसली होती.. पण असो..तू, तुझ्या घरचे तयार होणार नाहीत हे तर दिसतेच आहे.." उदास स्वरात आकाश बोलला..
" झाले का तुझे बोलून?" दादा दरवाजा उघडून आत आला..
" हो.." मेघना म्हणाली..
" निघायचे मग?"
आकाशचे डोळे अपेक्षेने मेघनाकडे बघत होते..
" हो.. "
आकाश निराश होऊन खिडकीकडे जाऊ लागला..
" पण जाण्याआधी बाबांना सांगायला हवे ना कि मला हि *लग्नाची बेडी* अडकवून घ्यायची आहे.." मेघना हसत बोलली..
" मेघना?" दादा आश्चर्यचकित झाला होता..
" हो दादा.. मला हे स्थळ मान्य आहे."
" अग पण.."
" दादा, आपण म्हणतो ना लग्न हे दोन जीवांचे, मनाचे मिलन असते.. मग आमची मने आधीच जुळली आहेत.. मग त्याचा व्यवसाय वेगळा आहे म्हणून नकार द्यायचा? हे तुला तरी पटते?"
" काय बोलू यावर? म्हणतात ना मिया बिवी राजी तो क्या करेगा काजी?आकाश, तू हिला जपशील?"
"काय करू म्हणजे तुमची खात्री पटेल?" आकाशला हर्षवायू झाला होता..
"सध्या काही नको.. पण लग्नानंतर माझ्या बहिणीच्या डोळ्यात पाणी आले ना तर कान पिळायला मागे बघणार नाही हा.."
तिघेही हसायला लागले.. मेघना आणि आकाश आता वाट पहायला लागले *लग्नाच्या बेडीत* अडकायची..


कथा कशी वाटली ते नक्की सांगा..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all