लग्न समारंभाचे बदललेले स्वरूप

लग्न समारंभाचे बदललेले स्वरूप

कथा मालिका

शीर्षक- लग्न समारंभाचे बदललेले स्वरूप (भाग २ )

विषय - सामाजिक कथा

फेरी- ईरा राज्यस्तरीय कथा मालिका स्पर्धा


आता लग्न/अक्षता त्यानंतर जेवणावळ ( बुफे पद्धती) आणि

आहेर परत (रिटर्न गिफ्ट) इ. पाहूया.


लग्नाचा दिवस तर सर्वात महत्त्वाचा. रात्रभर तयारी. पूर्वी

रात्रीच गोड पदार्थ बनवले जायचे. बुंदी लाडू किंवा बेसन लाडू

मग ते वळण्यासाठी मोठमोठ्या कोपराच्या सभोवती बसून लाडू

वळले जायचे. कारण सर्व स्वयंपाक घरीच किंवा मंगल कार्यालयात

आचारी सांगून तयार केला जायचा. आता केटरर्स ची सोय आहे.

सर्व काही रेडी. फक्त पैसेच मोजावे लागतात.


मग लग्नाच्या काही वेळ आधी नवरदेव नवरी यांना त्यांचे मित्र,

मैत्रिणी सजवायचे. लग्न अगदी वेळेवर लागत असे. कारण

जुन्या विचारांचे लोक म्हणत असत की लग्न वेळेवरच लागले 

पाहिजे. लग्न हा एक विधी आहे. मात्र अलीकडे लग्नातील विधीकडे

कोणाचेच फारसे लक्ष नसते.ना मंत्रोच्चाराचा अर्थ जाणून 

घेण्याची जाणीव. लग्नातील प्रत्येक विधीला अर्थ आहे त्यामागे

शास्त्र आहे. भावी वैवाहिक व संसारिक आयुष्यासाठी त्यातून..

मोलाची नीतिमूल्ये व मंत्र त्यामध्ये सामावलेले आहे. पण मुळातच

विवाह सोहळ्यातून पावित्र्य, मांगल्य व गांभीर्य हेच मुळी गायब

होत आहे साजरीकरणाऐवजी "सादरीकरण"परंपरे ऐवजी

भपकेबाजपणा यात अडकलेले अलीकडचे लग्न सोहळे म्हणजे

पैसा, प्रतिष्ठा व प्रसिद्धी दाखविण्याचा अट्टाहास.


एव्हाना नवरदेव आल्याची खबर मिळते. मंगल कार्यालयात

वऱ्हाडी मंडळी जमा झालेली असतात. लग्न पत्रिकेत वेळ 

टाकलेली असते. ११ वाजून ३० मिनिटे. वेळ पाळणारे अकरा 

वाजताच हजर राहतात. मात्र नवरदेव कार्यालयात पोहोचायला

बराच वेळ लागतो. कारण वाजत गाजत घोड्यावरून येत असताना

मित्रमंडळींसोबत नवरा मुलगा सुद्धा यथेश्च नाचतो. अगदी

चौका चौकात. तोपर्यंत लग्नाची वेळ निघून गेलेली असते.

वऱ्हाडी मंडळी थक्क बसलेली असतात. पण त्याचे कोणाला

काही घेणे देणे नसते.


 नवरदेव मंगल कार्यालयात पोहोचतो. मग काही लग्नापूर्वीचे 

विधी, औक्षण, कपड्यांची अदलाबदल यात एक दीड तास

आरामात निघून जातो. मग हळूच नवरी नवरदेव यांचे रथातून

फुलांच्या वर्षावात स्टेजवर आगमन होते. आणि लग्न लागते.

नंतर सुलग्न. सुलग्न लावतानाचा प्रत्येकाचा फोटो, व्हिडिओ शूटिंग

यातही बराचसा वेळ जातो. आता एवढे बरे झाले की ज्यांना

ड्युटीवर किंवा इतर काही कामानिमित्त लवकर जायचे असेल

ते निदान बुफे पद्धतीमुळे जेवण करून घेतात. व नंतर

सुलग्न लावतात.


आता सर्वांची पावलं वळतात ती जेवणाकडे. उशिरा लग्न 

लागल्यामुळे जेवणाच्या ठिकाणी भरपूर गर्दी झालेली असते. पण 

भुकेची वेळ झाल्यामुळे थांबायची कुणाचीच तयारी नसते.

पूर्वीसारखे मोजके पदार्थ नाहीत तर पदार्थांची रेलचेल. शिवाय

स्नॅक्स आईस्क्रीम वगैरे वगैरे. मग काय प्लेट घेतल्याबरोबर

प्रत्येक पदार्थ ताटात घेतला जातो. वास्तविक बुफे पद्धती/

सुरूचि भोज पद्धतीमध्ये ज्याला जे आवडते ते स्वतःच्या 

आवडीप्रमाणे घेऊन जेवायचे असते पण काहीजण जवळजवळ

सर्वच पदार्थ ताटात घेतो. जिथे जागा मिळेल तिथे बसतो.

कारण गर्दीमुळे खुर्च्यांची संख्या कमी पडते. घरच्या यजमान

मंडळींचे अजिबात लक्ष नसते. मग कुणी खालीच गोल करून

जेवायला बसतात. तर कुणी हातात प्लेट घेऊन जेवायला सुरुवात 

करतात. अशावेळी ज्येष्ठांची खूप अडचण होते. त्यांना हातात

ताट घेऊन जेवता येत नाही. मग कसेबसे जीवन उरकले जाते.

आता जे कोणी ताटभर अन्न घेतात. पण ते पूर्ण न खाता

तसेच टाकून देतात. जेवा . भरपूर जेवा. कारण तुमच्यासाठीच 

हे सर्व पदार्थ केलेले असतात. पण अन्न वाया घालवू नका.

 "अन्न हे पूर्णब्रम्ह "आहे ही शिकवण पार विसरून लग्न

समारंभातील अन्नाची नासाडी बघवत नाही. आणि विशेष म्हणजे

त्याचे कोणालाच काही वाटत नाही. पंगतीच्या जेवणाची

गंमत वेगळीच होती त्यात एक प्रकारचा मानवाईकपणा होता.

लग्न घरची स्त्री पुरुष मंडळी जेवणाऱ्यांची पंगतीत फिरून

आस्थेने चौकशी करायचे. बुफे पद्धतीमध्ये काही फायदेही आहेत.

मोठ्या प्रमाणात जेवायला आलेल्या लोकांना मर्यादित

वाढणारी मंडळी कमी पडतात. त्यामुळे वेळ जातो. त्यांच्या

टोपलीतले लाडू जिलेबी आपल्यापर्यंत पोहोचेल की नाही

याची वाट पहावी लागते. बुफे पद्धतीमध्ये मात्र सगळे पदार्थ

समोर मांडलेले दिसतात. व हाताने घेता येतात. फक्त जेवढे

पोटाला लागतील तेवढेच घ्या विनाकारण अन्नाची नासाडी

करू नका.


आता जेवणावळ आटोपलेली असते. घरी जाणाऱ्यांची घाई सुरू 

होते. मग ज्यांनी ज्यांनी आहेर आणला त्यांना परत आहेर देणे /

गिफ्ट देणे सुरू होते. नवरीच्या आईजवळ निरोप घेणाऱ्यांची गर्दी 

होते. ती मग इतरांच्या मदतीने साड्या/गिफ्ट देते. तिथेही लाईन 

लागते "थोडं थांबा हं."म्हटलं की जाणाऱ्या स्त्रिया थांबतात.

मग प्रत्येकीला कुंकू लावून साडी किंवा गिफ्ट दिले जाते. इथेही

बराच वेळ जातो.


मग "पहा ना कशी साडी दिली मला "

" मी किती भारी आहेर घेतला होता "

नाना प्रकारचे वक्तव्य.

ज्यांना चुकून अशी भेटवस्तू दिली गेली नाही त्यांचे चेहरे तर

पाहण्यासारखे होतात. जणू खूप अनमोल वस्तू हरविल्याप्रमाणे.

खरंच कधी सुटका होईल या सर्व प्रथा परंपरांपासून. 


आता बहुतेक सर्व लग्नासाठी आलेली मंडळी निघून गेलेली 

असतात. फार थोड्या पाहुण्यांच्या उपस्थितीत मुलीची पाठवणी

केली जाते.


लग्नाच्या दुसऱ्या दिवशी स्वागत समारोह/रिसेप्शन.

दुसरा लग्न समारंभचं. तेच व्हिडिओ शूटिंग तेच फोटो तेच जेवण

तीच अन्नाची नासाडी तेच गिफ्ट देणे घेणे. वगैरे वगैरे.

फक्त काय तर एक हौस म्हणून , इतर करतात म्हणून, नाही केलं तर

लोक काय म्हणतील म्हणून. इथेही खर्चाला मर्यादा नाही.

एकंदरीतच लग्न म्हणजे एक खाजगी बाब नसून पब्लिक इव्हेंट

झालेला दिसत आहे. विवाह सोहळा आखीव -रेखीव, हौस-मौजेचा

असावा. मात्र खर्च सीमित ठेवणारा. पुरेशा गांभीर्याने विधींचे

भान ठेवून.


काळानुरूप लग्न सोहळ्यासाठीचे बदल आवश्यक असले तरी

पैशाची उधळपट्टी, अन्नाची नासाडी, केवळ दिखाऊपणा.

टी .व्ही. सिरीयल, चित्रपटाप्रमाणे वागून, प्रदर्शन करून आगाऊ

खर्चात पडू नये. म्हणजे मुला मुलींच्या आई वडिलांना  "लग्न "

डोईजड न वाटता सुखाने तणावमुक्त एन्जॉय करावेसे वाटेल.

जो वारेमाप खर्च लग्नात केला जातो. हा खर्च त्यांच्याच पुढील 

संसारासाठी भवितव्याच्या दृष्टीने गुंतवणूक म्हणून ठेवू शकतो.

अविचार, उथळपणा, दिखाऊ वृत्ती यावर फेरविचार व्हायलाच हवा

ही काळाची गरज आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे

लग्नात पाण्यासारखा खर्च करूनही लग्न किती दिवस टिकेल

हे सांगता येत नाही. अलीकडे घटस्फोटाचे प्रमाणही वाढलेले आहे.

म्हणून पुन्हा एकदा आवर्जून सांगावेसे वाटते की लग्न हे

पवित्र बंधन आहे. दोन जीवांचं पवित्र मिलन आहे.


समाप्त

धन्यवाद

लेखिका- सौ. रेखा देशमुख

टीम - अमरावती