लग्न समारंभाचे बदललेले स्वरूप

लग्न समारंभाचे बदललेले स्वरूप

       कथा मालिका

       शीर्षक -लग्न समारंभाचे बदललेले स्वरूप ( भाग १ )

        विषय - सामाजिक कथा

        फेरी - ईरा राज्यस्तरीय करंडक कथा मालिका स्पर्धा


लग्न हा प्रत्येक मुला मुलींच्या जीवनातील अत्यंत आनंददायी प्रसंग.

सुखाचा परमोच्च बिंदू. प्रत्येकाच्या आपल्या भावी आयुष्याच्या

अपेक्षा असतात. त्या अपेक्षा ती स्वप्ने पूर्ण होण्याची ही वेळ.

लग्न म्हटले की अगदी ते जुळल्यापासून तर लग्न व नंतर

स्वागत समारोह आटोपत पर्यंत उत्साह जणू ओसंडून वाहत असतो.

मग त्यासाठी खर्च किती करावा, त्या सोहळ्याचे तारतम्य ठेवण्याची

गरज नवीन पिढीला सांगावीशी वाटते. भरपूर पैसा असेल तर

ठीकच पण काही ठिकाणी तर अगदी कर्जबाजारी होऊन सुद्धा

हौस करणाऱ्यांची संख्या कमी नाही. मुलं ,मुली इतरांचे पाहून

आपल्याही सर्व आवडी, इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे असा

अट्टाहास करतात.


आई वडील सुद्धा लग्न एकदाच होते म्हणून थोडे भावनिक होऊन

भरपूर खर्च करतात. लग्न जुळल्यानंतर पहिला विधी होतो तो

साक्षगंध/साखरपुडा (रिंग सेरेमनी). अगदी लग्नासारखाच.

विशेषतः हा समारंभ दोघांचाही म्हणजे नवरा मुलगा व मुलगी

यांचा एकत्रच होतो. अगदी सर्व विधी यथासांग. अगदी हार

घालण्यापासून सुद्धा. फक्त मुंडावळ्या, फेरे सोडले तर

एक लग्नच. पूर्वी मुलाची असो वा मुलीचे साक्षगंध लग्नाच्या

अगोदरच्या दिवशी होई. काही ठराविक दोन ते तीन लोकं....

(नवरदेव सोडून) नवरी कडे जायचे. तिथे विधीपूर्वक पण

अगदी साध्या समारंभात साक्षगंध पार पडायचे. तीच पद्धती 

मुलाच्या बाबतीत मुलाकडेच. साक्षगंधासाठी आलेली मंडळी

लग्न घरीच थांबायची. कारण आजच्यासारखी वाहन व्यवस्था 

नव्हती. आणि अगदी कमी खर्चात हा समारंभ पार पडायचा.


आजची स्थिती मात्र अगदी वेगळी. बदल हा सृष्टीचा स्थायीभाव 

आहे. पण म्हणून लग्नपरंपरेत झालेला हा प्रत्येक बदल चांगलाच

आहे असं आपण म्हणू शकत नाही. बदल अपरिहार्य जरूर आहे.

पण भावना बदलत बदलायला नकोत. मात्र तेच आज सर्वत्र 

दिसून येत आहे.


मग लग्न ठरल्यापासून लग्नाचा दिवस येईपर्यंत खरेदी सुरू.

नवरदेव नवरीचे कपडे व सोने, व इतर साहित्याची खरेदी 

दोघांच्याही पसंतीने , एकमेकांना विचारून केली जाते.

अर्थातच साडी, पोशाख खूप महागडे. त्यातही शालू, पैठणी, सिल्क

हे तर पारंपरिक. व त्याचबरोबर फॅशनेबल चमचमणाऱ्या...

झगझगीत साड्यांची प्रसंगानुरूप नेसणी. हिरव्या मांडवात

बांगड्या भरतेवेळी हिरवी कंच साडी. तसेच मेहंदी, संगीत,

हळद, लग्न म्हणजेच अक्षता आणि स्वागत समारोह यांच्या

वेगवेगळ्या महागड्या साड्या किंवा वेगळे काही पोशाखांचे...

प्रकार. लग्नातल्या महागड्या साड्या म्हणजे अलमारीचे धन.

चुडीदार, जीन्स, टी-शर्टच्या जमान्यात त्या साईडला पडणारच.

शिवाय फॅशन बदलत असते." अगं काय ही जुन्या फॅशनची साडी"

झालं. एखादी ने जरी असं म्हटलं तर ती महागडी साडी बाजूला.

शिवाय चप्पल, नेल पेंट, बांगड्या, परफ्युम, लिपस्टिक, रुमाल,

टिकली यांचीही भलतीच क्रेझ. परफेक्ट मॅचिंग व लेटेस्ट फॅशन

यांचा जणू अतिरेकी हव्यास. वडीलधारी मंडळी बघ्यांची भूमिका

घेत नाहीत तर संमतीही देतात. लग्न एकदाच होतं. मग

त्यांना कशाला नाराज करायचं असं त्यांचं मत.


पूर्वी साक्षगंधाच्या वेळी आणि लग्नाच्या वेळी सुद्धा नवरदेवाकडून

जे कपडे आणले जायचे तेच अप्रूप वाटायचे. इतर बाकी गोष्टी तर 

सोडाच.


आता हळूहळू लग्नाची तारीख जवळ यायला लागते. लग्नाच्या

तीन-चार दिवस आधी लग्न घरी (अर्थात दोन्हीकडे) हिरवा

मांडव घातला जातो. परंपरेप्रमाणे हिरव्या मांडवाखाली बांगड्या 

भरण्याचा कार्यक्रम असतो. त्यातही आता व्हरायटी. पूर्वी

कासार (पूर्वीच्या स्वयंपूर्ण खेडी पद्धतीमधील बारा बलुतेदारापैकी

एक) समाजाचा बांगडीचा व्यवसाय असे. मग लग्न घरी

कासारीन बाईला बोलवले जाई. त्यांच्या जवळील हिरव्या बांगड्या

सर्वांना सरसकट भरल्या जायच्या. त्यासाठी चॉईस नव्हती.

आताही घरी बांगडी वाली ला बोलावले जाते. पण बांगड्या मात्र

प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार भरतो.टी.व्ही. चित्रपटा मध्ये

हल्ली स्त्री पात्रे हातभर बांगड्या घातलेली, गोठ, पाटल्या, तोडे

यांना श्रीमंत घरातल्या बायकांच्या काचेच्या बांगड्यांमध्ये स्थान 

असते. त्याचेच अनुकरण करण्यात येते. अर्थात त्यामुळे बांगड्यांचा

खर्चही वाढतो. आणि त्याचा भुर्दंड मात्र घरच्या व्यक्तींवर बसतो.


त्यानंतर मेहंदी. मेहंदीवरही हजारोंचा खर्च. ब्युटी पार्लर मधून

मुलगी बोलावून नवरी नवरदेव एवढेच नव्हे तर अगदी वऱ्हाडी

मंडळींना सुद्धा मेहंदी साठी आग्रह केला जातो. मग त्या 

काढलेल्या मेहंदीचे फोटो अगदी वेगवेगळ्या पोजमध्ये.

आम्ही मेहंदीचा कोन आणायचो. मग कुणीतरी हातावर एखादी

फुलाची डिझाईन काढून देई. मग बोटे रंगवायची. झाली मेहंदी.

तीही फक्त नवरीला.


अलीकडे कोणताही कार्यक्रम असो फोटो, व्हिडिओ शूटिंग यांचं

फॅड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. इतके की अल्बम, कॅसेट

यांच्या खर्चाचा आकडा जुन्या वडीलधाऱ्यांना गरगरायला लावेल.


त्यानंतरचा कार्यक्रम म्हणजे हळद. घरातील तसेच पाहुणे मंडळी

या सर्वांचा पिवळ्या रंगाचा पेहराव असतो. मग हळदीचा

विधी सुरू होतो. नवरीला (नवरदेवाच्या घरी नवरदेवाला) विधिपूर्वक

हळद लावली जाते. मग सुरु होतो वऱ्हाडी मंडळींचा, आलेल्या

पाहुण्यांचा हलदी उत्सव. प्रत्येक जण एकमेकांच्या तोंडाला

हळद लावतात. व्हिडिओ शूटिंग चालूच असतं. जिकडे तिकडे

हळदच हळद. मग डीजेच्या तालावर फेर धरून नाचगाणी.


मग दुसऱ्या दिवशी संगीत. हा सुद्धा अलीकडचा महत्वाचा कार्यक्रम.

यावरही बराच खर्च केला जातो. अगदी चित्रपट, टी.व्ही. वरील

दृश्यांप्रमाणेच नाचगाणी होतात. अगदी आनंदाला उधाण.


नंतर देव कुंडी होते म्हणजे एक विधी. आणि त्यानंतर सुरू होतो

आहेराचा कार्यक्रम. हा कार्यक्रम नवरदेवाकडे वेगळा व

नवरी कडे वेगळा. मध्ये चौरंग टाकला जातो. दोन्ही बाजूला

दोन पाट ठेवले जातात. चौरंगावर नवरी व आजूबाजूच्या पाटावर

मुलीचे आई वडील बसतात. शेजारी एक दोन मुली पेन वही

घेऊन बसलेले असतात. त्यावर आलेल्या आहेरांची नोंद केली

जाते. मग रांग लागते ती आहेर करणाऱ्यांची. फोटोसेशन सुरू होतं.

प्रत्येक जण समोर येऊन नवरीला पैशाचे पाकीट किंवा काही गिफ्ट

व आई-वडिलांना साडी कपडे, आजी असेल तर आजीलाही

पातळ किंवा साडी दिली जाते. प्रत्येकाचा आहेर देतांनाच्या..

पोज मध्ये फोटो. अशावेळी जर घाईगडबडीत किंवा...

परिस्थितीप्रमाणे कुणी आहेर आणला नसेल तर तेथील दृश्य पाहून

त्यांची अवस्था केविलवाणी होऊन जाते. अगदी एखादा

गुन्हा केल्याप्रमाणे भाव त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसतात.

त्यांच्यापैकी एखादी ने महाग कपडे घेतले असतील तर तिथेच 

  'मी महाग साडी आणली आहे बरं ,तुच नेसशील. '

मुलीच्या वडिलांना 'अहो भाऊजी तुमच्यासाठी हा महागडा ड्रेस.'

कसा वाटतो? मात्र एखादी ने घरच्या अलमारीतील आलेल्या

आहेरांपैकीच साडी, ड्रेस आणला असेल तर ती गुपचूप देते व

मोकळी होते. लग्न म्हटल्यानंतर आई-वडिलांना कितीतरी कामे 

असतात. तरीही ते आवर्जून बसतात. व हसऱ्या चेहऱ्याने आहेर

स्वीकारतात. काही आहेर म्हणजे आलेल्या साड्या, कपड्यांची

देवाण-घेवाण. एक साडी किंवा एक ड्रेसचा कापड शंभर ठिकाणी 

फिरतो. म्हणजे ह्या आहेराच्या कपड्याला फार मोठी बाजारपेठ

आहे.


हल्ली' आहेर, भेटवस्तू, पुष्पगुच्छ स्वीकारले जाणार नाहीत. '

असाही सूचना वजा मजकूर लिहिण्याचा प्रघात सुरू झाला आहे.

पण तरीही जबरदस्तीने देणारे आहेतच. मग केवळ देणाऱ्याचा

मान म्हणून ते स्वीकारले जातात.


लग्न पुरुष व स्त्री अशा दोन व्यक्तींमधील सामाजिक बंधन आहे.

त्यामुळे दोन व्यक्तीच नव्हे तर दोन कुटुंब आणि त्यांचे नातेवाईक

नात्याने जोडले जातात. या नात्याला लग्न गाठ म्हणतात.

म्हणजेच लग्न हे पवित्र बंधन आहे.


आता दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम म्हणजे लग्न, अक्षता

त्यानंतर जेवणावळ, बुफे पद्धती, आहेराची परतफेड (रिटर्न गिफ्ट)

हे पुढल्या भागात पाहूया.


क्रमशः

धन्यवाद

लेखिका - सौ. रेखा देशमुख

टीम -अमरावती