Aug 09, 2022
General

लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ नव्हे!

Read Later
लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ नव्हे!

#लग्न_म्हणजे_भातुकलीचा_खेळ_नव्हे!

चार दिवसांसाठी माहेरी आलेली नंदिनी आठवडा झाला तरी सासरी जायचं नाव काढत नव्हती. शालिनीला थोडी शंका येऊ लागली तिची. शालिनीचा नातू,टिंकूही गप्प गप्प असायचा. आज्जीकडे गोष्टीसाठी हट्ट नाही कि आजोबांकडे सायकलवरुन रपेट मारण्यासाठी हट्ट नाही. 
नंदिनीही पुर्वीसारखी हसतखेळत नव्हती. 

शालिनीने नंदिनीच्या वडिलांकडे नंदिनीचा विषय काढला,"काय दोघांमधे बिनसलय काही कळत नाही. नंदिनी दोन दिवस जरी माहेरी आली तरी विनितचे सतत फोन यायचे,कधी येऊ न्यायला म्हणून." शालिनीचं बोलणं ऐकून तिचे यजमानही चिंतेत पडले.

रात्री जेवणं झाल्यावर टिंकू व आजोबा अंगणात फिरत होते. निळ्याभोर आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या. मधुनच पानांच्या सळसळीचा आवाज होत होता.

घरातली आवराआवर करुन नंदू व तिची आई बाहेरच्या सोप्यावर येऊन बसल्या. कोणी कोणाशी बोलत नव्हतं. आजोबांनी दहा शब्द बोलले कि टिंकू नुसता हूँ हूँ करत होता. 

"गाडी बरी चालवलीस इथवर नंदू. हात बसला म्हणायचा तुझा. नंदू तुला आठवतं,सायकलसाठी किती हट्ट धरलेलास तू. हे रोज आले कि तुला डांबरी रस्त्यावर घेऊन जायचे सायकल शिकवायला. एकदा पडलीस सायकल चालवताना,पाय असा टम्म सुजला होता. नाहीच म्हणत होतीस परत सायकल हातात घ्यायला पण तुझ्या बाबांनी दोन छड्या दिल्या हातावर नि परत बसायला लावलं सायकलच्या सीटवर. नंतरही दोनतीनदा पडलीस पण मग स्वतः स्वतःला सावरत गेलीस. पोहायचंही तसंच. माझा पदर सोडायलाच तयार नव्हतीस. शेवटी हेच जबरदस्ती घेऊन गेले तुला नदीवर. तुझ्या पोटाखिली हात ठेवून पोहायला शिकवलं यांनी तुला. लग्नाला तरी कुठे तयार होतीस! 

"खरंय आई,तुम्ही दोघांनी घडवलय मला. एखादी मुर्ती घडवतात तसं. आता यापुढे तर माझी सगळीच कामं मला एकटीने करायची आहेत. तू साथ देशील नं मला?"

"म्हणजे..मी नाही समजले."

"आई,मी घटस्फोट घ्यायचं ठरवलय."

शालिनीला धक्काच बसला. नंदूच्या घरी भांडणं व्हायची पण ती इतक्या टोकाला गेली असतील याची कल्पना नव्हती तिला.

"नंदू,लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ नव्हे गं..गरज असेल तेंव्हा मांडला. गरज संपली..गुंडाळून ठेवला."

"आई,मला का कळत नाही ते! विनितची बहीण लग्न नाही करायचं म्हणतेय. तिचं नि माझं अजिबात पटत नाही. मला वाटलेलं,लग्न झालं कि जाईल ती पण.. शिवाय हा विनित..हल्ली बोलणंच होत नाही आमच्यात. तो त्याच्या मोबाईलवर गुंग असतो. सगळी कामं मी एकटीनेच करायची,अगदी भाजी निवडण्यापासून ते पोळ्या करेपर्यंत. पगार झाला की सासुबाई काहीतरी मोठा खर्च काढून पैसे मागतात. बचत वगैरे काही नाही त्यांच्यात. खायचं नि ढुंगणाला हात पुसायचे. घरात नेहमीची चिडचिड. सासुबाई मोठ्या आवाजात टिव्ही बघत बसतात. टिंकू आता तिसरीला आहे. नाही म्हंटलं तरी अभ्यास असतोच. टिंकू सासुबाईंच्यासोबत टिव्हीवरच्या मालिका बघत बसतो. सासुबाईंना केवढं कौतुक नातू म्हणे देवासारखा बसतो. अरे पण अभ्यास करायला नको का त्याने? मी किती साद घालते पण टिंकू माझ्याजवळ येत नाही. हेच मी कुठे लग्नाला,कुठच्या फंक्शला जायचं म्हंटलं तर मात्र तुमच्या टिंकूला सोबत घेऊन जा. मला सांभाळायला झेपत नाही सांगतात. धाकटी जाऊ सणादिवशी दुपारी येते तोवर मी सगळा स्वैंपाक करुन ठेवायचा. धाकटीने साधी कोशिंबीर किंवा लिंबूसरबत केलं तरी तिचं कौतुक. मी एवढं घरकाम करते,नोकरी करते तर माझं कधी दोन शब्दाने कौतुक नाही.  माझा पगार त्यांच्या हातात द्यावा हे त्यांच म्हणणं. मी नाही देत पण घरातली किराण्यासकट बरीचशी बीलं मीच भागवते तरी  समाधानी नाहीत. 

विनित नोकरी सोडायची म्हणतोय. नोकऱ्या का रस्त्यावर पडल्याहेत,एक सोडली कि दुसरी मिळायला. जरा सुद्धा गांभीर्य नाही. हल्ली सिगारेट ओढू लागलाय. मला तो वास सहन नाही होत. टिंकूलाही त्या वासाने श्वास घ्यायला त्रास होतो. काही बोलायला गेलं की भांडायला उठतो. घरातली सगळी त्याच्या बाजूने नि मी एकटी एका बाजूला अशी गत होते माझी आणि त्यापेक्षा भयंकर  माझ्या टिंकूचं दोन्ही पक्षांच्यामधे लोंबत रहाणं. असली जॉईंट फेमिली काय कामाची,त्यापेक्षा मी टिंकूला घेऊन इथेच रहाते. वीसेक वर्षात मोठा होईल माझा बाळ मग मी सुटले."

"सुटले..असं सुटता येतं नंदू? बाई गं,तू आता तीशीची झालीस तरी आम्ही सुटलोय का तुझ्या काळजीतून? आईवडिलांना त्यांचं मुल हे लहानच वाटतं मग ते वयाने कितीही मोठं होवो. सासू,सासरे,नवरा,नणंद यांच्याशी नातेसंबंध हे भावनिक बंध असतात. असे सहजासहजी सुटत नाहीत ते. विनितच्या बहिणीचं म्हणशील तर बिचारीचं लग्न जुळत नाही आहे. कितीतरी ठिकाणी तुझ्या सासऱ्यांनी तिची पत्रिका दाखवली. रुपही अगदी साधारण. आजकालच्या मुलांना बाह्यसौंदर्य लागतं. सततच्या नकारामुळे चिडचिडी झालेय गं ती. तिच्या आरशातून विचार कर नंदू. तिला जरा अपटूडेट बनव. यांना सांगते मी तिच्यासाठी स्थळ शोधायला. एकदा लग्न ठरलं की खूश होईल बघ ती. 

सासुबाईंचं म्हणशील तर घरात नियम करा,एवढ्या एवढ्या वेळेतच टिव्ही बघायचा. सासुबाईंना एखाद्या महिलामंडळाचं सभासदत्व घेऊन दे किंवा त्यांचा एखादा छंद हुडक..अगं आठवलं. रुखवत किती छान बनवतात त्या,शिवाय हलव्याचे दागिने. या वस्तुंची ऑर्डर घेऊन दे त्यांना. एकदा स्वकष्टाचा पैसा हाती आला कि खर्च आपसूक आटोक्यात आणतील नि सतत तुमच्याकडे पैसे मागणार नाहीत त्या. 

यांना सांगते विनितशी बोलायला. गुणी मुलगा आहे तो. सिगारेट ओढू लागलाय,नोकरी सोडतो म्हणतो म्हणजे काहीतरी वरीष्ठांचा जाच असावा,तसं असलं तर तूच त्याला यातून बाहेर काढू शकशील. त्याच्या निगेटिव्ह पॉइंट्सवर बोट ठेवत राहिलीस तर तो अजून बिथरेल. गरज वाटल्यास मनाच्या डॉक्टराची मदत घेऊ."

नंदूचे बाबा,मायलेकींचं बोलणं फेऱ्या मारतमारत ऐकत होते. तेही आता त्यांच्यात सहभागी होत म्हणाले,"नंदू बाळा,तुझी आई सांगते ते अगदी बरोबर आहे. तोडणं सोप्पं असतं बेटा जोडणं कठीण. मीच का नेहमी जोडायचं हा विचारही घातकच. असं समज की या व्यक्तींना काहीतरी मनाचे आजार आहेत आणि तू ते बरे करणार आहेस,कधी एकटीने तर कधी आमची,तज्ञांची मदत घेऊन. या तुझ्या बाळालाच बघ. तुमच्यातल्या भांडणामुळे तुम्ही वेगळे होणार हे कुठेतरी कळलय त्याला. गोठ्यात आपला बाळू बैल दिसला नाही तर म्हणत होता कपिलाचा नि बाळूचा डिव्होर्स झाला का आणि कपिलेचं वासरु आता कोणाकडे रहाणार? या लेकरासाठी जरा ताठा सोडा नि लवचिक व्हा. मी बोललोय विनीतशी. त्याने त्याच्या चुका मान्य केल्यात. तुझ्या सासुसासरे,नणंदेलाही भेटून चार समजुतीच्या गोष्टी सांगून आलोय बेटा. 

खरंतर तू इथे राहिलीस तर आम्हाला म्हातारपणाची काठी होईल पण आमची लेक तिच्या सासरी गुण्यागोविंदाने नांदो हीच इच्छा आमची. अगदीच जमलं नाही तर हे घर तुझंच आहे. आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत हे लक्षात ठेव."

दुसऱ्या दिवशी विनित स्वतः येऊन नंदिनी व टिंकूला घेऊन गेला. नंदिनीने नणंदेला तिच्या आरशातून बघायला सुरुवात केली. तिला छान ड्रेस घेऊन दिले. तिचा जरा मेकओव्हर करुन तिचे फोटो वधुवरसुचक मंडळात पाठवले आणि काही महिन्यांतच तिला सुयोग्य जोडीदार मिळाला. सून एवढं आपल्या मुलीसाठी करतेय म्हंटल्यावर सासुसासरेही नंदिनीशी प्रेमाने वागू लागले. टिंकूच्या अभ्यासाच्या वेळात त्याचे आजीआजोबा बाहेर फिरायला जाऊ लागले. 

विनितही आता ऑफिसची ओझी दाराबाहेर ठेवून घरात येऊ लागला. मागे वळून बघितलं कि नंदू म्हणते,आईबाबा मला अगदी टोकाचा निर्णय घेण्यापासून वाचवलंत तुम्ही. सगळं सुरळीत होतं. ज्याला त्याला त्याची स्पेस दिली पाहिजे हेच सत्य.

समाप्त

-----सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now