Mar 02, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

लग्न पत्रिका

Read Later
लग्न पत्रिका
शीर्षक-टपाल

कथेचे नाव-लग्न पत्रिका


एक गाव अगदी छोटं. पण तिथल्या माणसांचं मन फारच मोठं. एकमेकांना मनाने जोडलेली माणसं.. प्रत्येकाच्या सुखदुःखात भाग घेणारी. कुणाला दुःख झालं तर संपूर्ण गावाला दुःख... प्रत्येकाच्या शुभ कार्याला सर्वजण आनंद साजरा करणारी!

एवढ्यात हनुमंतरावांच्या घरी त्यांच्या मुलीचे लग्न जुळलं. संपूर्ण गावाला आनंद झाला. सर्व मंडळी एकमेकांना सांगू लागली, अहो आपल्या हनुमंतरावांच्या मुलीचे लग्न जुळलं.. हो का! हो, आपल्या शेजारच्याच गावात आहे तिचं सासर. सर्वजण त्यांच्या बोलीभाषेत एकमेकांना सांगत होते.

हनुमंतरावांच्या घरी लग्नाची लगबग सुरू झाली. प्रत्येक जण हातभार लावू लागला. हनुमंत रावांनी आपल्या नातेवाईकांना लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी प्रत्येकाच्या नावाची लिस्ट तयार केली.
तसं त्यांच्या लहानशा खेड्यातून प्रत्येक गोष्टीसाठी शेजारच्या मोठ्या गावावर अवलंबून राहावं लागे. लग्न पत्रिका सुद्धा तिथूनच छापून आणल्या गेल्यात. लग्न पत्रिकेवर लिस्ट मधल्या काही लांबच्या राहणाऱ्या नातेवाईकांची नावे लिहून पोस्टातल्या तिकीट लावल्या गेल्यात.
हनुमंत रावांचा एक जवळचा मित्र दररोज शेजारच्या गावाला व्यवसायाच्या निमित्ताने जाणे येणे करीत होता. जवळचा मित्र असल्यामुळे हनुमंत रावांनी आपल्या लांब राहणाऱ्या नातेवाईकांच्या नावाच्या लग्न पत्रिका पत्रपेटी मध्ये टाकण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपविली. आणि ते निश्चिंत झालेत.
घरातील सर्व मंडळी लग्नाच्या कामाला लागले. त्याकाळी असा केटर्स वगैरेचा प्रघात नव्हता . त्यामुळे घरी सर्व शेजारच्या बाया धान्य निवडायला यायच्या. धान्य निवडून झाले. किराणा आणल्या गेला.
लग्नाची तारीख जवळ आली.
लग्नाचा दिवस उजाडला. सर्व गावकरी मंडळी हातभार लावायला आली. लग्नपत्रिका पाठविण्याच्या हिशोबाने स्वयंपाक तयार केल्या गेला. वराकडची मंडळी शेजारच्या गावची असल्यामुळे ती ही आली.

पण.... नातेवाईक कुणीच नाही! लग्नाच्या आदल्या दिवशी यायला पाहिजे होते तेही आले नाहीत. लग्नाच्या दिवशी येतील असे म्हणून सर्वांनी त्यांची वाट पाहिली. पण नातेवाईकांचा पत्ता नाही..
त्याकाळी असे फोन किंवा व्हाट्सअप वगैरे नव्हतेच. निरोप पाठवायचा तर माणूसहीं वेळेवर जाणार कोण? सर्वांना प्रश्न पडला.
मामा, मावशी, आत्या आणि इतर नातेवाईकांचा मंडपात पत्ताच नाही.
जवळच्या मोठ्या गावात एसटीचा थांबा असल्यामुळे तिथे बैलगाडी किंवा दमणी वगैरे ठेवण्यात आलेली होती. पण कोणी नातेवाईक तिथे आलेले नसल्यामुळे सर्व रिकाम्या हाताने परत आले.
मुलीकडची मंडळी पेचात पडली. असं कसं झालं? प्रत्येक जण हनुमंत रावांना विचारत होतं. लग्न पत्रिका पोस्टात व्यवस्थित टाकल्यात ना? ते म्हणाले हो!
मी माझ्या मित्राला शेषराव ला दिल्या की सर्व पत्रिका पोस्ट टाकायला!
शेषराव ला विचारण्यात आले. त्याने सांगितले की मला माझ्या व्यवसायातून वेळ मिळाला नसल्यामुळे माझ्या घरीच काही दिवस त्या पत्रिका होत्या. पण या पत्रिका लवकर पोहोचल्या गेल्या पाहिजे म्हणून मी माझ्या पोस्टमन असलेल्या मित्रावरच ही जबाबदारी सोपविली.
त्याने त्याच्या मित्राला पोस्टमनला बोलावले आणि विचारले, त्या लग्न पत्रिकांचे काय केलं? तो म्हणाला मी त्या पत्रिका पोस्टात न्यायलाच विसरलो... त्या पत्रिका माझ्या घरीच राहिल्यात.
हे ऐकून काही मंडळी हसायला लागली... काही खूप संतापली...
हनुमंतराव मात्र वेगळ्याच विवंचनेत!
आता काय करावं... पाहुण्यांसाठी केलेला संपूर्ण स्वयंपाक वाया गेला. मुलीची पाठवणी थोडक्या लोकांमध्येच झाली.

अशी लग्नपत्रिकेने केली पंचाईत खाशी!
आणि मित्र पडले असे तोंडघशी!!!

छाया राऊत
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Chhaya Raut

//