Aug 18, 2022
प्रेम

लाडकी सूनबाई

Read Later
लाडकी सूनबाई

#लाडकी_सूनबाई

"श्री,अरे नलुआजी आली आहे रे. आज जरा लवकरच निघ ऑफिसातून नि येताना तिच्या आवडीचा माझा आणायला विसरु नकोस हो,"आई फोनवर म्हणाली.

नलुआज्जी,माझ्या आईची मावशी. माझ्या आईचा तिच्यावर भारी जीव. मला माझ्या स्वतःच्या आजीआजोबांचा सहवास फारच कमी काळ लाभला पण नलुआज्जी नि तिचे यजमान भिडेआजोबा यांच्याकडे मात्र लहानपणी आई मला न्हेऊन सोडायची.  आई नोकरीला होती असल्याने माझी जबाबदारी सुट्टीचे दोन महिन्याकरता नलुआज्जी घ्यायची.

मी रेल्वेच्या डब्यात चढलो. दुसरा शनिवार असल्याने गर्दी फारशी नव्हती. खिडकीजवळच्या सीटवर बसून बाहेरचं धावतं रान पाहू लागलो पण माझं मन मात्र मागे भूतकाळात पोहोचलं. हो नलुआज्जीच्या चिरेबंदी घरात. घराच्या बाजूचा पांढरा,लालदेठाचा व आतमधे पिवळसर झाक असणारा देवचाफा आठवला मला. त्याचबरोबर सुमी आठवली..सुमती गोडांबे. फुलाफुलांचा झगा नाहीतर खणाचा परकरपोलका घातलेली,दोन वेण्या गळ्यात घेऊन इकडेतिकडे बागडणारी सुमी आठवली मला. लहानपणी कितीदातरी सुमीशी धाटुमाटूचं लग्न झालं होतं माझं. लग्न वगैरेचा खेळ खेळताना दिसलं की भिडेआजोबा करवादायचे. त्यांचे निळसरघारे डोळे शरीरावर चाबुक मारल्यासारखं फिरायचे. मला खूप भीती वाटायची त्यांच्या डोळ्यांची पण सुमी भारी आगाऊ. तिने पाठल्यादारला आंब्याखाली चार काठ्या ठोकून,सारवण वगैरे करून छोटीशी खोली तयार केली होती. दुपारी सगळी निरवानिरव झाली की आम्ही आमच्या सवंगड्यांसह तिथे भातुकली खेळायचो. सुमी चिंचेचा पाला आणायची,भाजी करायला. कधी साखरफुटाणे,कधी गुळचणे,बोरं,असं बरंच काही असायचं तिच्या स्वैंपाकात. आजुबाजूच्या एखाद्या ताईची ओढणी आणून ती डोक्यावर पदर वगैरे घेऊन स्वैंपाक करायची. मला रागे भरायची,म्हणायची,"अहो,तो टिव्ही बंद करा बघू. पोरं जेवत नैत. पोरंही होती दोन..तीनचार वर्षाची मुलं.

मी थोडा मोठा झालो तसं आज्जीकडे गेल्यावर इतर मैदानी खेळ खेळण्यात रमू लागलो. सुमी कधीतरी नजरेस पडायची,विहिरीवर पाणी शेंदण्यास आलेली,देवाच्या पुजेसाठी फुलं काढताना पण तिच्यासोबत तिची काकू असायची. 

सुमीचे वडील सैन्यात होते. एका लढाईत ते बेपत्ता झाल्यापासनं सुमीची आई भ्रमिष्ट झाली होती. सुमीला काकू सांगेल ती सारी कामं करावी लागायची.  तिचा पुर्वीचा निरागसपणा हरवला होता. गाल बसले होते. विहिरीतलं पाणी आटावं तसे डोळे खोलवर गेले होते. फारच लवकर तिला मोठं व्हावं लागलं होतं. गोवऱ्या थापणं,अंगण सारवणं,लाकडांसाठी जंगलात जाणं,गाईला चरायला घेऊन जाणं..एक ना दोन कामं पण ही काम करुन ती रात्री रॉकेलच्या दिव्यावर अभ्यास करायची. माझ्या माहितीप्रमाणे ती बारावी झाली होती. पुढचं शिक्षण काही तिला घेता आलं नाही. 

मी घरी पोहोचलो. आज्जीच्या पाया पडत होतो तर आज्ज्जीने मला जवळ घेतलं. माझ्या गालावर हात फिरवत ती मला चाचपू लागली. कितीतरी बोलके भाव होते तिच्या डोळ्यांत. आईने नलुआज्जीसाठी तिच्या आवडीचे बटाटेवडे केले होते. आजीसोबत मीही बटाटेवडे व चटणी खाल्ली. चटणी आजीने बनवलेली. सेम तीच चव..जरासुद्धा उन्नीस बीस नाही. माझा बघितल्यावर आज्जी खुदकन हसली.  मी लहान असताना आज्जीकडे आमरसात न्हायलोच असेन एवढा आमरस ओरपला होता. 

आज्जीने माझी ख्यालीखुशाली घेतली. मला  परमनंट नोकरी मिळाल्याचं ऐकून फार खूश झाली ती. "श्री,लग्नाचं वय झालं रे तुझं. तुझ्या अनुरुप मुलगी बघायला हवी आता पण तुझी आई तर म्हणतेय,तुला लग्नच नाही करायचं,"आजीने मला विचारलं.

"आज्जी मी आईबाबांना माझं म्हणणं स्पष्ट सांगितलय. तुलाही सांगतो. मला एकाच मुलीशी लग्न करायचं होतं ती म्हणजे सुमी पण सुमीचं लग्न इतक्या लवकर होईल असं वाटलं नव्हतं मला. माझ्या मनात पत्नी म्हणून दुसरी मुलगी येणं शक्य नाही आज्जी."

"मग तू हे मला आधी का नाही सांगितलंस?"

"आज्जी, दोन वर्षांपूर्वी तुझ्याकडे आलेलो तेंव्हा वाटेत सुमीला पाहिलं. तिच्या गळ्यात मंगळसूत्र,हातात हिरवा चुडा होता. तिच्यासोबत काही बायका होत्या. आज्जी,अगं एवढ्या लवकर सुमीचं लग्न होईलसं वाटलच नव्हतं गं मला."

"खरंय श्री तुझं. सुमीच्या काकांना बरेच नाद होते. त्याने सोनाराकडे सुमीच्या आईचे व काकूचे दागिने गहाण ठेवले होते. दारु,जुगार यात त्याची नितिमत्ता नष्ट झाली होती. सोनाराने त्याच्या या परिस्थितीचा फायदा घेतला नि आपल्या वेडगळ मुलासाठी सुमीचा हात मागितला. सुमीची काकूही दागिने परत मिळतील म्हणून हरखली नि सुमीचं लग्न सोनाराच्या वेडसर मुलाशी लावून दिलं.

 सोनाराचा समज होता की लग्न झाल्यावर त्याचा मुलगा सुधारेल पण तसं झालं नाही. सुमी म्हणजे त्या वेडसर मुलाच्या लैंगिक भावना शमवण्याचं खेळणं बनून राहिली. सुमीची आईही एका रात्री झोपेत देवाघरी गेली.सुमीच्या पदरात एक मुलगी टाकून मेंदूत रक्तस्त्राव की काय झाल्याने सुमीचा पती सुमीला सोडून गेला. पांढऱ्या पायाची म्हणून सोनाराने सुमीला घराबाहेर काढले. काकाकाकूकडे गेली तर त्यांनीही तिला अवदसा,कुलक्षणी अशा शिव्या दिल्या. मुलीला घेऊन ती शेतातली विहीर जवळ करत होती. मी खेचून आणलं तिला. आपल्या घरातल्या मागच्या खोलीत रहाते सध्या ती. मुलगी फार गोड आहे तिची. आता वर्षाची होईल. माझा जणू उजवा हात झालेय सुमी. घराभोवतालची,घरातली सगळी कामं करते पोर."

"नलुआज्जी,मला लग्न करायचंय गं सुमीशी. मी तिच्या मुलीचाही स्वीकार करेन. तिला बापाची माया देईन,"मी नलुआजीच्या जवळ बसत तिला सांगितलं खरं पण माझं हे बोलणं ऐकताच आई किचनमधून धावत आली..म्हणाली,"कसले खोटे गुण लागले रे तुला! जगातल्या सगळ्या मुली गायब झाल्या का त्या सुमीशी लग्न करु पहातोयस ते! अरे लोकं शेण घालतील आमच्या तोंडात."

"आई,मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मी लग्न करणार तर सुमीशीच,"मी प्रत्येक शब्दावर जोर देत म्हणालो.

चारेक दिवस जेवलोच नाही. पाणीच प्यायचो फक्त. शेवटी बाबा माझ्या खोलीत आले,म्हणाले,"आम्ही हरलो तुझ्या हट्टापुढे. कर त्या सुमीशी लग्न पण तिच्यावर दया म्हणून करु नकोस जर ती तुला मनापासून आवडत असेल आणि तू तिला तिच्या मुलीसह स्वीकारणार असशील तरच आपण पुढे जाऊया. मी बाबांना मिठी मारली. माझा खांदा त्यांच्या अश्रुंनी भिजला.

 नलुआज्जीसोबत मी,आईबाबा सगळे नलुआज्जीच्या घरी गेलो. सुमीची गोबऱ्या गालांची,अपऱ्या नाकाची लेक ओसरीत फिरत होती. तोंडाने बब्बा बब्बा म्हणत होती. नलुआज्जीला पाहून ती पायरी उतरु लागली. मी तिला उचलून घेतलं. ती माझ्याकडे टुकुटुकु बघू लागली. मी पाठीमागच्या खोलीत गेलो. सुमीचं पोथीवाचन चाललं होतं. पोथी वाचून झाल्यावर तिने वर पाहिलं. सुमीच्या लेकीने तिच्याकडे झेप घेतली व माझ्याकडे बघत बब्बा बब्बा म्हणू लागली. 

सुमी म्हणाली,"कधी आलास?"

"हे काय आताच."

"एकटाच?"

"नाही,नलुआज्जी, आईबाबा सगळे आलेत. मागल्यादारी हातपाय धुवायला गेले ते. मी हिच्यासोबत आलो. मला बब्बा म्हणाली ती."

"ही गौरी लेक माझी, सगळ्यांनाच बब्बा म्हणते. थांब मी चहा ठेवते सगळ्यांसाठी."

"सुमे,मला खरंच तिचा बाबा व्हायला आवडेल."

"वेडा आहेस का तू श्री. तू एवढा शिकलेला,निर्व्यसनी. तुला कितीतरी देखण्या,सुशिक्षित मुली मिळतील. असा वेडेपणा नको करुस. मला दया दाखवण्यासाठी स्वतःच्या आयुष्याची आहुती नको देऊस."

"मी दया नाही करतय तुझ्यावर. मला खरंच तू खूप आवडते सुमी."

इतक्यात माझे आईबाबा तिथे आले. "आम्हालाही तू सून म्हणून पसंत आहेस,"आई म्हणाली. सुमी रडू लागली. तिने आईला मिठी मारली." म्हणताम्हणता माझ्या व सुमीच्या लग्नाची बातमी सुमीच्या काकापर्यत पोहोचली. तो चारपास साथीदार हातात दांडे वगैरे घेऊन आला. 

"श्री,माझ्या इस्टेटीवर तुझा डोळा आहे. सुमीशी लग्न केलं की तिच्या वाटची जमीन,मालमत्ता तुला मिळणार हे ओळखून तू सुमीशी लग्न करु पहातोयस."
मी सुमीला घेऊन त्या काकासोबत तलाठ्याकडे गेलो. 'मला वडीलोपार्जित मिळकतीत हिस्सा नको आहे' असा अर्ज सुमीने तलाठी व मामलेदार यांच्याकडे दिला.  सुमीची आई तर केंव्हाच गेली होती.  वडिलोपार्जित मिळकतीत हक्क नको असल्याचा अर्ज देऊन त्या घराशी असलेले उरलेसुरले बंधही तोडले. 

सुमीला घेऊन मुंबईला आलो. लग्न केलं. समाजात उलटसुलट चर्चा झाली पण ती काही काळच. समाजालाही एकाच विषयात गुंतून रहाण्याएवढा वेळ नसतो. सुमीने बीए  पुर्ण केलं. आमची लेक गौरीच्या पाठीवर भाऊ आला तिच्यासोबत खेळायला. सुमीच्या प्रेमळ वागण्याने व नातवंडांच्या बोबड्या बोलांनी माझ्या आईवडिलांचा रागही निवळला. आता सुमी त्यांची लाडकी सून आहे. नलुआज्जीही अधनंमधनं पतरुवांना भेटायला येते.

समाप्त

-------सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now