Jan 26, 2021
Poem

बायांनो शान्या व्हा

Read Later
बायांनो शान्या व्हा

#बायांनो_शान्या_व्हा

लगीन झाल्यावर पुरुष बिघडत्यात
म्हणे बायकोच्या हो ला हो मिळवित्यात
नि जन्मदात्या आईबापाला इसरत्यात
अरे राव,मेंदू आसतो ना पुरुषांले
आसतं ना काळीज त्यांले
मंग का बरं बायकोच्या पदराआड लपत्यात
नि तिले बदनाम करत्यात
सासूचं म्हणणं,माझा लेक देवाच्या गुणाचा
त्या सटवीने बिघडविला
मला इचारीनासा झाला
माझ्याशी बोलिनासा झाला
अगं पण तुझे पोराले अक्कल न्हाई?
का तुझी याद येत न्हाई?
तुझंच नाणं खोटं समज
हिच्यामुळं असं नि तिच्यामुळं तसं
असं नसतय बया
लोकाच्या पोरीला दोष देण्याअगुदर
पयलं आपलं नाणं तपासून बघ
तुझं नाणं खणखणीत आसलं
तर कायबी होऊंदे चालणारच
तुझा लेक खरा आसलं..
 तर तुझी सेवा करणारच
बाईच बाईला बोल लाविती
म्हनूनशान पुरषांच फावतं
तवा बायांनो वायच टकुरं वापरा
येकीमेकींला शत्रुसारखं बघणं थांबवा
लेकीसाठी मायेचा झरा वाहितो तो जरा
सुनेकडंबी वळवा आन्
आईसाठी मन गलबलतं ते जरा 
सासूसाठीबी गलबलू द्या
जावाजावांची भांडणं सोडा
न्हाई भैनीवानी रवा न्हाई म्हनीत
पर येकीमेकीस्नी मान देवा
आरं मान देवा नि मान घेवा
हाय काय नि नाय काय
येका हातिन देवा नि
दुसऱ्या हातिन घेवा
मंग काय टाप लागून राहिल पुरषाची
बायांना नावं ठेवण्याची!
आपलाच पक्ष भक्कम बनवा
फितुरी सोडा गं फितुरी सोडा
नि मंग आपलाच झेंडा कसा
फडफडितो बघा.

----सौ.गीता गजानन गरुड.