लेडीज डबा

Inside Ladies Coach


तसं बघायला गेलं तर माझा अन् पुणे लोणावळा लोकलचा संबंध बराच जुना, पण मध्ये काही कारणामुळे आमचा संपर्क तुटला होता. त्या दिवशी खूप दिवसांनी मी लोकल ने प्रवास करत होते. संध्याकाळी 7 ची लोकल म्हणजे भरपुर गर्दी. वेळेप्रमाणे लोकल आली. माझ्या अपेक्षेप्रमाणे बसायला जागा नव्हतीच. अन् काही जागा बायकांनी त्यांच्या जिवलग मैत्रिणींसाठी पर्स ठेऊन राखुन ठेवली होती. स्वानुभवावरून सांगते, ह्यांच्याशी भांडुन काहीच फायदा होत नाही, त्यांची जागा आपल्याला कधीच मिळत नाही. मला तर कधीकधी भिती वाटते, ह्या बायकांना निवडणुकीचं तिकीट मिळालं तर तिकडे पण असंच मैत्रिणींसाठी जागा राखुन ठेवतील की काय. शेवटी मी आपली उभी राहिले. शाळेत असताना जेव्हा आम्ही गोंधळ करायचो तेव्हा आमचे शिक्षक आम्हांला म्हणायचे, अरे हा काय मासळी बाजार आहे का? आता त्यांना सांगावसं वाटतं, त्याहीपेक्षा जास्त गोंधळ रेल्वेच्या लेडीज डब्यात असतो.

मला जेव्हा रिकामा वेळ असतो तेव्हा आजुबाजूच्या लोकांच निरीक्षण करणं माझा फेवरेट टाईमपास असतो. मग लक्ष गेलं समोरच्या दोन बायकांकडे. त्यांना आपण नाव देऊयात, अबूताई अन् छबूताई. अबूताई तिच्या नवीन साड्यांचे फोटो प्राईस टँग बरोबर दाखवुन छबूताईला दाखवत होती. अन् छबूताई अशाच साड्या तिच्या ठिकाणी कशा स्वस्त मिळतात हे दाखवुन अबूताईला हरवू पाहत होती. शाब्दिक कुस्ती म्हणतात याला, हा प्रकार महिलावर्गामध्ये खूप प्रचलित अाहे. त्यांची ही शाब्दिक कुस्ती बराच वेळ चालू होती, अखेर ती संपली अन् दोघिही त्यांच्यात्यांच्या मनात विजयी झाल्या.

मग माझं लक्ष गेलं ते चिंगीताईकडे. ति बिचारी खुप वेळ फोन मध्ये काहीतरी टाईप करत होती, अन् तिचे डोळे गच्च भरून आले होते. बहुतेक तिची भांडणं झाली होती. मला तर वाटलं आता ती जोरजोरात रडुन सगळ्यांना गोळा करणार. नशिबाने तसं काही झालं नाही. हुशार होती ती. अश्रुंना तिला आवरता येत होतं. मी म्हणलं हिच्याकडे बघुन अजुन तिला रडवण्यापेक्षा मि दुसरीकडेच बघते. म्हणुन मी माझा मोर्चा दुसरीकडे वळवला. मग मला दिसली, चिनू ताई. ति ट्रेन मध्ये विकायला आलेल्या कानातल्या वालिशी भांडत होती. किती जबरदस्त बार्गेनिंग करत होती ती. 60 रू. चे कानातले तिने 35 रू. ला विकत घेतले. मला वाटतं, बार्गेनिंग हि कला महिलांमध्ये उपजतच असते, त्यासाठी त्यांना मार्केटिंग किंवा सेल्स शिकायची गरज नसते.

जवळजवळ 8 वाजत आले होते, मि तर घरी जाऊन आईच्या हातचं आयतं खाणार होते. पण विचार आला ह्या बायकांचं काय? त्या देखील पुरूषांप्रमाणेच दिवसभर कष्ट करून घरी चालल्या होत्या. पण त्यांच्या चेहर्यावर थकवा नावाला सुद्धा नव्हता. बायकांचं हेच वैशिष्ठ्य असतं. आपल्या घरासाठी त्या नेहमीच तत्पर असतात. मेथिची भाजी निवडण्यापासुन राजकारणा पर्यंतच्या गप्पा मी ह्या डब्यात पाहिल्यात. सणावाराच्या वेळेस सुंदर नटुन थटुन सेल्फी घेणार्या बायका सुद्धा इकडे दिसतात. कामाचं ओझं कितीही असो, ह्या बायका नेहमीच हसतमुख असतात. मुंबईला असताना सुद्धा सकाळच्या लोकल मध्ये स्तोत्रपठणापासून गाण्यांच्या भेंड्या खेळणार्या बायका मी रोज पाहिल्यात. खरंच जिवन असंच एन्जाँय करायला पाहिजे. कोण म्हणलं बायका रडुबाई असतात, कधी लेडीज डब्यात येऊन बघा हसत हसत जगणं काय असत कळेल.?