Oct 20, 2020
स्पर्धा

लढाई

Read Later
लढाई

लढाई

डॉ. अपर्णा प्रल्हाद निजाई

माहीममध्ये दोन मजली चाळीत.. लहानशा घरात राहणाऱ्या सविताचा दिवस नेहमीप्रमाणे उगवला. सकाळी उठून घाईघाईत तिने नवऱ्याचा.. विष्णूचा डब्बा तयार केला. आठ वाजता विष्णूने फॅक्टरीत जाण्यासाठी घर सोडले. विष्णू पंधरा वर्षांपासून एकाच फॅक्टरीत कामाला होता.  तिथे साधा कामगार म्हणून लागलेला विष्णू इमानेइतबारे काम करून  आता सुपरवायझरच्या पोस्टवर पोहोचला होता. त्याला मिळणाऱ्या पगारातून खूप जास्त शिल्लक जरी बाजूला पडत नसली तरी त्यांचा संसार मात्र व्यवस्थित चालला होता. विष्णूच्या पाठोपाठ त्याची दोन्ही मुलं, नववीतला शिव आणि पाचवीतली मानसीही शाळेत गेले. आज दोघांचाही वार्षिक परिक्षेचा शेवटचा पेपर होता. मागची सर्व आवराआवर करून सविताने घड्याळात बघितलं.. साडेनऊ वाजले होते. 'कपडे धुवून घेऊया' असा विचार तिच्या मनात यायला आणि मोबाईलची रिंग वाजायला एकच गाठ पडली. 
'ह्यांचा फोन.. आणि या वेळेस' कारणाशिवाय उगीच कॉल न करणाऱ्या विष्णूचा अवेळी आलेला फोन बघून तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली..

 घाईघाईतच तिने फोन कानाला लावला.
"हॅलो, वहिनी.. मी विलास बोलतोय.." विलास विष्णूचा फॅक्टरीतला मित्र होता. सविता त्याला ओळखत होती.
"विलासभाऊ यांचा फोन तुमच्याकडे कसा?" घाबरून सविताने विलासला विचारले.
"वाहिनी.. विष्णूला थोडासा मार लागलाय. तसं फार काही लागलेलं नाही पण तुम्हाला इथे.. केइएम हॉस्पिटलला लगेच यायला जमेल का?"
'नक्कीच काहीतरी वाईट घडलंय!' विलासच्या घाबरलेल्या आवाजाने सविताची खात्री पटली होती. अंगावरची होती तीच साडी ठाकठीक करून मुलांसाठी चावी ठेवायला म्हणून सविताने शेजारच्या नलूकाकींचा दरवाजा ठोकला.

"काकी बारा वाजेपर्यंत शिव आणि मानसी घरी येतील.. चावी द्याल ही त्यांना?" काकींनी दरवाजा उघडताच सविता बोलली.
 "सविता काय झालं ग.. चेहेरा का असा दिसतोय तुझा?" नलुकाकींनी सविताचा हात प्रेमाने हातात घेताच इतका वेळ दाबून ठेवलेला हुंदका तिच्या तोंडातून बाहेर पडला. रडतच तिने सर्व प्रकार रामकाका आणि नलूकाकींच्या कानावर घातला.
"थांब पोरी, मी येतो तुझ्यासोबत. काही मदत लागली तर सोबत असलेली बरी.." अस म्हणून रामकाकांनी खुंटीला अडकवलेला शर्ट अंगात चढवला. त्याक्षणी सविताला सोबतीची खूप गरज होती. चाळीत राहण्याचा हा एक खूप मोठा फायदा होता.. सुखदुःखात एकमेकांना सोबत देण्याची माणुसकी त्या मध्यमवर्गीय लोकांमध्ये होती.
 
 रामकाकांसोबत..सविताने तडक केईम गाठलं. तिथे पोहोचल्यावर विलासकडून तिला जे काही कळलं त्याने मात्र तिच्या पायाखालची जमीनच सरकली..

नेहमीप्रमाणे विष्णू ट्रेनमधून परळ स्टेशनला उतरत होता. अगदी दरवाजातच उभा होता तो. त्याच्यासोबत विलास आणि त्याचे आणखी दोन-तीन मित्रही होते. प्लॅटफॉर्म आल्यामुळे ट्रेन स्लो झाली होती. अचानक विष्णूचा हात निसटला.. काही कळायच्या आतच तो प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मधल्या फटीतून खाली रुळांवर पडला. हे सर्व निमिषार्धात घडले होते. त्याच्या मित्रांचा ओरडण्याचा आवाज ऐकून आतून  कोणीतरी ट्रेनची साखळी खेचली. ट्रेन फारशी पुढे न जाता थांबली म्हणून विष्णूचा जीव तरी वाचला. पण त्याचा एक पाय पूर्णपणे छिन्नविच्छिन्न झाला होता. तो अजूनही बेशुद्धावस्थेत होता. मित्रांनी.. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याला तिथून बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये आणून ऍडमिट केले होते. सविता-विष्णूच्या छोट्याशा कुटुंबावर खूप मोठं संकट कोसळलं होतं.

१५-२० दिवस सविताच्या हॉस्पिटलच्या फेऱ्या सुरू होत्या. अपघाताची बातमी कळताच.. विष्णूचा मुंबईत राहणारा मोठा भाऊ, तसच सविताचा गावी राहणारा मोठा भाऊ मदतीला आले होते. चाळीतली सर्व लोक, विष्णूने स्वतःच्या दिलदार स्वभावाने जमवलेले अनेक मित्रही सविताच्या सोबत होतेच. विष्णूचा एक पाय गूढघ्याखालून कापावा लागला होता. दुसऱ्या पायाला फ्रॅक्चर होते पण ते प्लास्टरने बरे होण्याजोगे आहे असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. 'पाय गेला.. पण आपला माणूस तर वाचला' फक्त इतकाच विचार करून सविता वारंवार देवाचे आभार मानत होती.

त्या दिवशी हसत खेळत फॅक्टरीत जाण्यासाठी बाहेर पडलेला विष्णू तब्बल वीस दिवसांनी कुबड्यांच्या आधाराने घरी परतला होता. विष्णू घरी परतल्याचा आनंद सविता आणि मुलांना झाला होता खरा पण इथून पुढे खरा संकटाचा काळ त्या कुटुंबापुढे उभा होता आणि ती लढाई सविताला एकटीनेच लढावी लागणार होती. घरातला एकुलता एक कमावणारा, कर्ता पुरुष खाटेवर पडला होता. घरातली पैशांची आवक पूर्णपणे बंद झाली होती. अपघात फॅक्टरीत झाला नसल्यामुळे फॅक्टरीतून पैसे मिळण्याची अपेक्षाच सविता-विष्णूला नव्हती. त्यांच्या गाठीशीही फारसा पैसा नव्हताच. होता तोही पैसा विष्णूच्या औषधात, घरच्या नेहमीच्या खर्चात संपत चालला होता. 

सविताचा भाऊ आता गावी निघून गेला होता. शेवटी त्यालाही त्याचा संसार होताच. सविताच्या कुटुंबाविषयी.. त्यांचे नातेवाईक,  मित्र, चाळीतले लोक या सर्वांनाच सहानुभूती होती. पण या सर्वांची आर्थिक परिस्थिती यथातथाच असल्याने ते  सहानुभूती व्यक्त करण्याशिवाय दुसरी कोणतीही मदत सविता-विष्णूला करू शकत नव्हते.  'विष्णू पैसे मागेल' या भीतीने विष्णूच्या.. त्यातल्या त्यात सुस्थितीत असलेल्या मोठया भावाने तर त्याला फोन करणंही बंद केलं होतं. पैशांसाठी कोणाकडे हात पसरावेत हे विष्णू-सविताला पटत नव्हतं. पण नक्की काय करावं हेही समजत नव्हतं. भविष्यकाळातील खर्चाच्या चिंतेने दोघांनाही अन्न गोड लागत नव्हतं की रात्री धड झोपही लागत नव्हती. आईबाबांची उतरलेली तोंड बघून मुलंसुध्दा कोमेजून गेली होती. नेहमी हसतखेळत असणार घर उदास, हतबल झालं होतं.
  
"अहो !" आता विष्णूशी बोलावंच लागेल या निर्धाराने दोन महिन्यांनंतर एका रात्री सविताने बँकेचे पासबुक विष्णूसमोर धरलं. "तुम्हाला त्रास होईल हे कळतंय मला पण खात्यात इतकेच पैसे उरलेत. आपल्या घराचे बँकेचे हप्ते थकतील की काय याची भीती वाटतेय मला." पाच वर्षांपूर्वी बँकेतुन कर्ज काढून विष्णूने रहाती खोली विकत घेतली होती.
"तुझी चिंता, घालमेल सर्व समजतंय मला सविता. मीही सतत तोच विचार करत असतो. मुलांच्या शाळाही सुरू होतील आता. त्यांची शाळा, ट्युशनची फी, आपला रोजचा खर्च, बँकेचे हप्ते..कस काय करायचं? माझं तर डोकच चालत नाही बघ.  देव गरिबांनाच अशा परिस्थितीत का ढकलतो? काय घोड मारलं होत आपण कुणाचं म्हणून आज आपल्यावर ही अवस्था आलीये.."  विष्णूच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. समोर बसलेल्या मुलांचाही जणू विसर पडला होता त्याला. अपघात आणि परिस्थिती दोघांनीही विष्णूला हळवं बनवलं होतं.
त्याच परिस्थितीने सविताला मात्र कणखर बनवलं होतं. विष्णूचे गालावरून ओघळणारे अश्रू पुसत सविता विष्णूला समजावत बोलली..
"नशिबाला, देवाला दोष देऊन काय उपयोग सांगा बघू? काहीतरी उपाय तर शोधायलाच हवा न आपल्याला. तुम्हीच असे हातपाय गाळलेत तर आम्ही कोणाकडे बघायचं. गावावरून दादाचा फोन आलेला आज.. 'गावीच या एक वर्षासाठी' अस बोलत होता तो. ही रूम भाडयाने दिली तर घराचे हप्ते तरी थकणार नाहीत. गावातल्या शाळेत मुलांची ऍडमिशन होऊन जाईल असं ही बोलला तो. मी गावीच करेन काहीतरी काम. तुमच्या पायाचा पुढचा इलाजही होईल तिथेच.."
"गावी जायचं.. कायमचं? गावातली शाळा? माझं दहावीचं वर्ष आहे आई.." बोलताबोलताच शिवला हुंदका फुटला.
रडवेल्या झालेल्या शिवला जवळ घेत सविता बोलली..
"बाळा, समजतंय रे तुझं दुःख मला. हे दोन खोल्यांच घर म्हणजे माझाही स्वर्गच आहे रे. ते सोडून जायचं ही कल्पनाही मला सहन होत नाहीये." डोळ्यातले अश्रू लपवत सविता बोलली. भावाच्या घरी मिंध्यासारख जाऊन रहाणं स्वाभिमानी सविताला पटत नव्हतं. पण दुसरा कोणताही उपायही तिला सुचत नव्हता. 

"मी एक सुचवू आई.. गावी जाऊन तू काम करणारच आहेस न? मग इथेच का नाही करत तू काही काम?" शिव डोळे पुसत बोलला.
खरतर सविता बारावीपर्यंत शिकलेली होती. लग्न होऊन ती गावावरून माहीमला आली.. त्यानंतर दोन मुलं झाली. या सर्वात कधी कुठे काम करावं असं तिला वाटलं नाही की विष्णूनेही तसं तिला कधी सांगितलं नाही. पण तिने दोन मुलांना मात्र खूप शिस्तीत वाढवलं होतं. 
"मला कोण देणार रे काम बाळा?" सविताने असहाय्यपणे विष्णुकडे बघितलं. 
"सविता तुझी काम करायची तयारी असेल तर बघ एकदा माझ्या फॅक्टरीच्या मालकांकडे जाऊन काही काम मिळतंय का.. नाहीच झालं काही तर मग निघून जाऊ गावी." 
खरतर हे घर सोडून गावी जायची कोणाचीच तयारी नव्हती. सर्वांच्या आशेचा शेवटचा किरण होता..'फॅक्टरीचे मालक'.

विष्णूच्या सांगण्यानुसार सविता आज बरोबर अकरा वाजता फॅक्टरीत आली होती. 'विलासभाऊ मालकांना भेटायचं आहे. भेटतील न ते मला..' असा फोनही तिने अगोदरच विलासला करून भेटीची वेळ ठरवली होती.

"बस सविता .. कसा आहे आमचा विष्णू?" केबिनमध्ये येताच साहेबांनी सविताला सहानुभूतीने विचारले. साहेबांच्या त्या प्रश्नाने सविताच्या डोळ्यात पाणी तरळलं.
"कुबड्यांच्या आधाराने चालतात हळूहळू ते पण अशक्तपणा खूप आहे अजूनही त्यांना..  दुसऱ्या पायाच प्लास्टर काढलंय डॉक्टरांनी पण त्या पायावरही फारसा जोर देऊ शकत नाहीत ते. बघवत नाही हो त्यांच्याकडे साहेब. खूप वाईट परिस्थितीत आहोत आम्ही." आवंढा गिळून सविता पुढे बोलली, " एक काम होतं तुमच्याकडे साहेब. मी बारावी शिकलेय. हा माझा bio-data." खास फॅक्टरीत देण्यासाठी शिवच्या मदतीने तयार केलेला bio-data चा कागद साहेबांसमोर ठेवत सविता म्हणाली.. "तुम्ही मला तुमच्या या फॅक्टरीत काही काम दिलंत तर खूप उपकार होतील तुमचे आमच्यावर." हात जोडून गहिवरल्या आवाजात सविता बोलली.
"सविता .. आमच्या या फॅक्टरीत तुला काम देता आलं असतं तर खूप बरं वाटलं असतं मला. पण या फॅक्टरीत फक्त पुरुषांनाच कामावर ठेवायचं अशी आमच्या फॅक्टरीची पॉलीसी आहे." तिच्यासमोर एक सफेद लिफाफा धरून साहेब बोलले.. "हा विष्णूचा गेल्या महिन्याचा पगार आणि थोडे पैसे माझ्याकडून मदत म्हणून मी दिले आहेत. विष्णू पूर्ण बरा झाला की मी त्याला परत कामावर घेईन याची मी तुला हमी देतो सविता. सध्यातरी मी तुमच्यासाठी फक्त इतकंच करू शकतो. तुझा हा bio-data मी माझ्या इतर मित्रांकडे पाठवतो. तिथे तुला काही काम मिळालं तर नक्की कळवतो तुला.." साहेबांचं बोलणं संपतं न संपतं तोच त्यांची बायको.. लीना मॅडम केबिनमध्ये आल्या.
"लीना, अग ही विष्णूची बायको सविता. काही काम आहे का म्हणून विचारण्यासाठी आली होती." सविताची ओळख करून देत साहेब बोलले.
"ओह! सविता.. खूप वाईट वाटलं ग मला विष्णुबद्दल ऐकून.." लीना मॅडम बोलल्या आणि थोडा विचार करून त्यांनी सविताला विचारलं, "सविता.. मला घरी कूकची गरज आहे. तू करशील का माझ्या घरी जेवणाचं काम?" 
"अग लीना, बारावी शिकलेय ती. हा बघ तिचा bio-data.." तिला अडवत साहेब बोलले.
"ओह सॉरी.. मला माहित नव्हतं सविता तू शिकली आहेस ती..."
त्यांचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच क्षणाचा ही विलंब न करता सविता बोलली..
"मॅडम, मी करेन तुमच्याकडे स्वयंपाकाचं काम. खरतर या कामाचा मला अनुभव नाही. पण .."
"अग पण तुला कोणत्यातरी कंपनीत मिळेल जॉब. मीही करते प्रयत्न तुझ्यासाठी.."
"तो जॉब मिळेल तेव्हा मिळेल मॅडम.. पण सध्या मला कामाची खूप गरज आहे.. प्लिज नाही म्हणू नका मला.." मॅडमनी घेतलेले आढेवेढे बघून हातचं काम जातंय की काय या भीतीने घाबरून सविता बोलली. मॅडमची संमती मिळताच दुसऱ्याच दिवशी त्यांच्याकडे जाण्याचं कबूल करून सविता घरी आली.

घरी येताच तिने घडलेला सर्व किस्सा विष्णू आणि मुलांच्या कानावर घातला..
"सविता, कशाला हो बोललीस स्वयंपाकाच्या कामाला? शिकलेली आहेस तू.. तुला कंपनीत काम मिळालं असतं तर ठीक होतं. माझ्यामुळे तुला लोकांच्या घरी स्वयंपाकाची काम करावी लागतायत. लाज वाटते मला माझी." विष्णूच्या डोळ्यात पाणी होतं.
"अस का बोलताय तुम्ही.. लाज वाटायला आपण चोरी थोडीच न करतोय? इतके दिवस तुम्ही आमच्यासाठी कष्ट घेतलेतच न. किती नशीबवान आहे मी की तुम्हाला कसलंही व्यसन नाही. ही रुमही आपली स्वतःची आहे. मुलंही किती गुणी आहेत आपली. कुठेतरी जाऊन कामच करायचं आहे न मग हे स्वयंपाकाचं काम कुठे वाईट आहे?  गावी जाऊन भावाच्या घरात राहून उपकारांच्या ओझ्याखाली दबण्यापेक्षा आपण आपल्याच घरी राहिलेलं काय वाईट?" सविता आता लढाईला सज्ज झाली होती. विष्णूलाही तिचं बोलणं पटलं होतं.

"आई..  बर झालं तू हो बोललीस या कामाला.." मानसी मध्येच बोलली. "आता शाळेत कुठचाही फॉर्म भरताना.. mother's job च्या रकान्यात मी 'शेफ' अस लिहिणार.." 
मानसीच्या या बोलण्याचं सर्वांनाच हसू आलं. इतका वेळ असलेला वातावरणातील ताण क्षणात कमी झाला.
सविताने हसूनच मानसीला जवळ घेतलं..
"बघा किती शहाणी आहे आपली लेक! मला काम मिळालय खर बाळांनो पण आता मला तुमच्या मदतीची खरी गरज लागेल." सविता मुलांना विश्वासात घेत बोलली. "एका कामाच्या पगारावर आपलं भागणार नाही. मला अजून एक-दोन काम करावी लागतील. मी कामावर गेले की तुम्हाला बाबांची काळजी घ्यावी लागेल."
"आई तू बाबांची काळजीच करू नकोस..मी शाळेत गेल्यावर मानसी बाबांजवळ असेल." शिव बोलला.
"आणि मी दुपारी शाळेत गेले की दादा बघेल बाबांना आणि तू कपडे भांड्यांचही टेन्शन नको घेऊस आई. मी करून टाकेन सर्व." छोटी मानसी प्रौढ होऊन बोलत होती.
"आणि बर का आई, मला ट्युशन नको यावर्षी.. मी घरीच अभ्यास करेन. मानसीची ट्युशनही तू बंद कर. मी तिला मदत करेन अभ्यासात." मुलांची ही अनपेक्षितरीतीने मिळणारी मदत बघून सविता-विष्णूच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या होत्या.

दुसऱ्या दिवशी देवाला नमस्कार करून सविता कामावर जायला निघाली तेव्हा विष्णू तिला बोलला
"सविता आजपर्यंत मी कामावर एकच तत्व पाळलं ते म्हणजे 'जे काम करायचं ते नीट, मनापासून करायचं.' म्हणूनच तर साध्या कामगाराचा सुपरवायझर झालो. 'वाईट परिस्थिती आलीये म्हणून हे काम करावं लागतंय असं मनातही आणू नकोस. महत्वाचं म्हणजे घरातली टेंशन्स कामावर घेऊन जाऊ नकोस."

विष्णूचा लाखमोलाचा सल्ला सविताने मनापासून अमलात आणला. लीना मॅडमच्या घरचं जेवण ती अगदी मन लावून.. लीना मॅडमने सांगितल्याप्रमाणे करत होती. तीच जेवण घरातल्या सर्वांना आवडू लागलं होतं. स्वयंपाक झाल्यावर न विसरता ओटा साफ करणं, बेसिनमध्ये पडलेली सर्व भांडी घासणे यामुळे लीना मॅडमही तिच्यावर खुश होत्या.

लीना मॅडमच्या ओळखीने तिला अजून तीन स्वयंपाकाची काम मिळाली. ती तिन्ही काम सविताने स्वीकारली याला कारण घरातून मिळणारी विष्णू आणि शिव-जाईची मदत. मुलांनी बाबांची काळजी घेताघेता घराचाही ताबा घेतला होता. छोटीछोटी भांडी घासणे, कपडे धुणे ही काम मानसी शिवच्या मदतीने आनंदाने करत होती. शिव वरणभाताचा कुकर लावायला, चपातीचं कणिक मळायला शिकला होता. एक दिवशी तर 'आईला उशीर झाला' म्हणून वेड्यावाकड्या आकाराच्या चपात्या करून शिव-जाईने आईला आश्चर्याचा धक्का दिला होता. विष्णूही बसल्याबसल्या.. तांदूळ साफ कर, भाजी साफ करून, चिरून ठेव अशी छोटीछोटी काम करत होता. 

लिना मॅडमच्या ओळखीने सविताला डॉक्टर दिघेंच्या घरचं अजून एक काम मिळालं होतं. सविताच्या मनापासून काम करण्यावर ते डॉक्टर दाम्पत्यही खुश होतं. लीनाकडून त्यांना सविता-विष्णू ची पूर्ण कहाणी कळली होती.
"सविता, कसाय ग तुझ्या नवऱ्याचा पाय आता?" एका रविवारी डॉक्टर मॅडमनी सविताला विचारलं.
"कुबड्यांच्या मदतीने चालतात हे हळूहळू.." काम करताकरता सविता बोलली.
"विष्णूला कृत्रिम पाय लावण्याबद्दल तुम्ही का विचार करत नाहीत ग?"
"चौकशी केलीये मॅडम आम्ही. खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यासाठी खूप खर्च होतो. तितके पैसे नाहीत आमच्याकडे.. आणि सरकारीतही ही सुविधा उपलब्ध आहे पण तिथे नाव नोंदवल्यावरही पाय मिळायला खूप वेळ लागतो. सरकारीत नाव नोंदवायला जाणार आहोत आम्ही पुढच्या आठवड्यात."
"तू एक काम कर सविता.. विष्णूला उद्या संध्याकाळी आमच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन ये.. सर हाडांचेच डॉक्टर आहेत.. बघू काय करता येत का तुमच्यासाठी.." सविताच्या प्रामाणिकपणे, मन लावून काम करण्याचं फळ तिला मिळत होतं.

पुढच्या घटना खूप जलदगतीने घडल्या. डॉक्टर दिघेनी विष्णूला पूर्ण तपासले. Prosthetic पायाच्या मदतीने विष्णू पूर्वीसारखा चालू शकतो हे कळल्यावर तर विष्णू आणि सविताचा आनंद गगनात मावत नव्हता. डॉक्टरांच्या ओळखीने.. एका ट्रस्टच्या मदतीने.. योग्य ती कागदपत्र दिल्यावर विष्णूला योग्य मापाचा कृत्रिम पाय दिला गेला. १५-२० दिवसांच्या ट्रेनिंगनंतर.. विष्णू ट्रेनरच्या मदतीशिवाय  ज्यादिवशी पहिल्यांदा चालला त्यादिवशी मात्र तो अगदी लहान बाळासारखा सविताच्या कुशीत शिरून रडला. व्यवस्थित चालणं जमू लागल्यावर, साहेबांनी कबूल केल्याप्रमाणे विष्णूला कामावरही घेतले. सविता-विष्णूच्या कुटुंबावरचे संकटाचे ढग हळूहळू वीरू लागले होते. सविताने मोठ्या हिमतीने संकटांचा सामना करून सर्वांच्या मदतीने ही लढाई जिंकली होती.

अनेक दिवस मनात असलेली गोष्ट आज बोलायचीच अस ठरवून, रात्री जेवताजेवता विष्णू सविताला म्हणाला..
"सविता, फक्त तुझ्यामुळेच मी आजचा हा दिवस पाहू शकलो..बारावीपर्यंत शिकलेल्या तू.. स्वयंपाकाची काम करावीत हे खरतर मनापासून मला पटलं नव्हतं. पण त्यात कोणताही कमीपणा न मानता तू ती काम मनापासून केलीस.. त्यातूनच डॉक्टरांची ओळख होऊन आज मला हे पुनर्जीवन मिळालं. मागच्या जन्मी मी केलेलं पुण्याईच फळ म्हणून मला तुझ्यासारखी बायको मिळाली. आता आपलं घर पूर्वपदावर आलंय, मीही कामावर जातोय.. आता मात्र तू ही काम सोडून द्यावीस अस मला वाटत.."
"मी काहीच केलं नाहीये हो.." गहिवरल्या आवाजात सविता म्हणाली, " तुमची, शिव-जाईची घरातून मिळणारी मदतच मला या लढाईसाठी बळ देत होती. लीनामॅडमचे आणि डॉक्टरसाहेबांचे मात्र आपल्यावर अनंत उपकार आहेत. त्यांना विसरून कसं चालेल?"
"खरय तुझं, देव माणसं आहेत ती.." 
"त्या देवमाणसांचे उपकार फेडण्याची तुमची पद्धत मात्र मला नाही आवडली.." सविता किंचित रोषाने म्हणाली. विष्णूच्या प्रश्नार्थक मुद्रेकडे बघत सविता पुढे बोलली.. "आपलं काम झालं म्हणून त्यांच्याकडील स्वयंपाकाचं काम सोडायचं हे कितपत बरोबर आहे? विश्वासघात नाही का हा! मी तस केलं तर काय मत होईल आपल्याबद्दल लीनामॅडमच, डॉक्टरांचं?" 'मी तर हा विचारच केला नव्हता' विष्णू मनातल्या मनातच बोलला. स्वतःच्या स्वार्थी विचारांची विष्णूला लाज वाटली.
सविता पुढे बोलली..
"आणि तसंही देव करतो ते भल्यासाठीच करतो असं नाही का वाटत तुम्हाला?ह्यागोदर आपल्या घरात तुम्ही एकटेच कमावत होतात. पण आता तुमचा पगार आणि माझी कमाई.. पूर्वीपेक्षा खूप जास्त शिल्लक आपण खात्यात टाकतोय. असाच पैसा जमत गेला तर मला खात्री आहे.. आपण आपल्या दोन्ही मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकू." सविता भावूकपणे बोलत होती. सविताच बोलणं विष्णूला पटलं होतं.
"तू अजीबात काम सोडू नकोस आई." शिव निग्रहपूर्वक बोलला, "बाबा तशीही आई 'स्वयंपाकिणबाई' नाही तर 'शेफ' आहे, कस विसरता हो तुम्ही ?" शिव मानसीकडे बघत बाबांना डोळा मारत हसून बोलला आणि सविताच घर पुन्हा एकदा हास्य रंगात रंगून गेलं.

आज खऱ्या अर्थाने सविताने तिच्यावर केलेल्या उपकारांचे स्मरण ठेऊन तिची लढाई सन्मानाने जिंकली होती.

(प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन रहातील.)

डॉ अपर्णा प्रल्हाद निजाई.

फॅमिली फिजिशयन
नालासोपारा

(टीप: तुमच्या-माझ्यात लपलेल्या या सविताच्या लढाईची कथा तुम्हाला कशी वाटली.. तुमच्या अभिप्रायातून मला नक्की सांगा..)