लढा अस्तित्वाचा.. भाग- ९
पूर्वाध: कथेच्या मागील भागात आपण पाहिलं की, शालांत परीक्षा जवळ येत होत्या म्हणून दहावीच्या मुलांसाठी स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या.. जाधव गुरुजींच्या सांगण्यावरून फक्त कुस्तीच्या स्पर्धेत शंकरने भाग घेतला आणि तो जिल्ह्यात पहिला आला.. पुन्हा एकदा शाळेचे नाव उज्वल केले. अथक परिश्रम करून शंकर शालांत परीक्षेतही संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात दुसरा आला.. शंकरला खूप आनंद झाला..सर्वांनी त्याचं कौतुक केलं.. आता पुढे...
लढा अस्तित्वाचा.. भाग- ९
साधारण इ.स.१९६४ सालातली गोष्ट.. शंकरचं महाविद्यालयात दुसरं वर्ष सुरू होतं.. जोरात अभ्यास सुरू होता.. एकीकडे शिक्षण आणि दुसरीकडे आपल्या कुटुंबाला सांभाळण्याची जबाबदारीही.. रोज उठून तोच विचार मनाला भेडसावत असे..
बघता बघता कॉलेजचे सहा महिने संपत आले होते.. दिवाळी तोंडावर आली होती.. दिवाळीच्या सुट्या सुरू झाल्या. शंकर दिवाळीच्या सुट्टीत आपल्या गावी भालेवाडीला आला होता.. त्याच दिवशी पोस्टातून त्याच्यासाठी आलेलं एक पत्र पोस्टमन काकांनी शंकरच्या हातात दिलं.. ' काय आहे आत? कसलं पत्र? मनात प्रश्नमालिका सुरू झाली.. त्याने उघडून पाहिलं..आणि डोळ्यांतून धारा वाहू लागल्या.. त्याने आईला मोठ्याने आवाज दिला.. स्वयंपाकघरातून आई बाहेर आली.. धावत जाऊन त्याने आईला मिठी मारली," आई ग..,! मला नोकरी मिळाली.. तीही सरकारी.. त्याचंच हे पत्र..मुंबईला जावं लागेल.."डोळ्यातून मेघ बरसत राहिले.. आनंदाश्रू होते ते..! त्याला आठवलं, सोलापूरमध्ये कॉलेजला असताना त्याला त्याच्या वसतिगृहातल्या मित्राने सांगितलं होतं..,पोस्ट खात्यात भरती सुरू झाली होती. महाराष्ट्रात पोस्टखात्यात 'क्लीरीकल कामासाठी' भरती निघाली होती.. संपूर्ण महाराष्ट्रातून फक्त एक हजार पाचशे वीस जागांसाठी भरती होती..शंकरनेही अर्ज दिला होता.. आणि काय आश्चर्य..!! त्या एक हजार पाचशे वीस मध्ये सोलापूरच्या शंकरचं नाव होतं..शंकरची निवड झाली.. शंकरच्या आयुष्यात ही एक सुवर्णसंधी चालून आली होती.. या संधीनं त्याच्या संपूर्ण आयुष्याचा कायापालट होणार होता.. एक आमूलाग्र बदल घडणार होता..
आपल्या मुलाला सरकारी नोकरी लागली हे ऐकताच आईचं काळीज सुपाएवढं मोठं झालं.. आनंद गगनात मावेनासा झाला.. पण दिवाळीत कामावर रुजू व्हायचं होतं.. ऐन दिवाळीत आपला मुलगा नोकरीसाठी आपल्याला सोडून जाणार या कल्पनेने आई थोडी दुःखी कष्टी झाली.. घरी सर्वाना खूप आनंद झाला होता.. शंकरने आपल्या वडिलांना चरणस्पर्श केला.. गेणूही खूप आनंदात होता.. आपल्या मुलाने आपलं नाव कमावलं..याचा रास्त अभिमान वाटू लागला.. ' मुलाला शिकवून साहेब करायचं' हे त्याचं स्वप्नं शंकरने पूर्ण केलं होतं.. साऱ्या घराण्याचा नाव लौकिक वाढवला होता.. अभिमानाने त्याची छाती फुलून आली होती.. गेणू आपल्या मुलाला म्हणाला, " बाळ शंकर, दिवाळी आली..वर्षातला सर्वात मोठा सण..पाहुणे येणार..तुझ्या आत्या, तुझी आक्का दिवाळीच्या सणाला घरी येईल.. आणि तू जाणार मुंबईला.. दिवाळी करून जा रे बाबा.." शंकरला वडिलांचं मन मोडवेना.. पुढे जाऊन कधी अशी एकत्र दिवाळी साजरी करायला भेटणार? सगळे नातेवाईकांना भेटून जाऊ.. हा विचार मनाला स्पर्शून गेला.. "विचारून बघतो उद्या सोलापूरला जाऊन" असं म्हणत त्याने ते पत्र त्याच्या पेटीत जपून ठेवलं..
दुसऱ्या दिवशी शंकर सोलापूरला आला जिथे अर्ज दिला होता त्या साहेबांना भेटला.., त्यांनी विचारलं," कधी रुजू होणार कामावर? तसं पुढे कळवतो" शंकरने त्यांना दिवाळीनंतरची तारीख सांगितली.. आणि साहेबांचे आभार मानून तो आपल्या गावी परतला..दिवाळी आली.. फार धूमधडाक्यात नाही पण साधेपणाने का होईना..!! गरिबीतही दिवाळी साजरी झाली वाड्यात मातीच्या दिव्यांची, पणत्यांची रोषणाई.. थोड्या फार फटाक्यांची आतिषबाजी.. घरात दिवाळीच्या गोड जिन्नसांची थोडीशी तयारी झाली.. दिवाळीचे चार दिवस खूपच आनंदात सुखात गेले.. या चार दिवसात सारं सुख, आईची माया, भावंडांचं प्रेम सारं हृदयात साठवून घेतलं..सर्व नातेवाईकांना, मित्रांना, गावातल्या थोर लोकांना भेटून त्यांचा आशीर्वाद घेतला.. आणि नोकरीसाठी मुंबईला जाण्यासाठी सज्ज झाला.. आई म्हणाली," बाळा, एकटा नग जाऊस रे.! सुलूला पण घेऊन जा.. आताच लगीन झालंय..लगीन झाल्यापासून एकटीच राहतेय ती.. आता तिला घेऊन जा.." आईच्या इच्छेचा मान ठेवत शंकर सुलक्षणाला सोबत घेऊन जाण्यास तयार झाला.. भालेवाडी एसटी थांब्यावर शंकर आणि सुलक्षणाला निरोप देण्यासाठी सारं गाव जमा झालं होतं.. गावातल्या एका गरीब शेतकरी कुटुंबातला पहिला मुलगा सरकारी नोकरीत रुजू होण्यासाठी चालला होता.. एसटी आली.. शंकर आणि सुलक्षणा गाडीत बसले.. सर्वानाच गहिवरून आलं होतं.. सर्वांनी शंकरला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत साश्रुपूर्ण नयनांनी निरोप दिला.. आणि गाडी मुंबईच्या दिशेने निघाली..
सात तासांचा प्रवास.. मुंबईचं प्रचंड आकर्षण मनात.. गावाकडे असताना मुंबईत राहणाऱ्या आणि सुट्टीला गावी येणाऱ्या लोकांकडून खूप ऐकलं होतं.. गाडी मायानगरी मुंबईत दाखल झाली.. दमट वातावरण..घामाच्या धारा वाहत होत्या..आजवर मोकळ्या रानात फिरलेल्या गावाकडच्या स्वच्छ निरोगी वातावरणात वाढलेल्या शंकरला हे सगळं नवीन होतं..मुंबईची गर्दी, तो कलकलाट, गोंधळ सारंच नवीन...पण हीच आता कर्मभूमी होती.. जुळवून घेणं गरजेचं होतं.. 'देश तैसा वेष' करण्याची गरज होती… गाडी स्टॅण्डवर रवाना झाली.. सुलक्षणाचे वडील त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी आधीच एसटी स्टॅण्डवर येऊन थांबले होते.. मुंबईत राहण्याची सोय होईपर्यंत ती दोघं सुलक्षणाच्या माहेरीच राहणार होती.. सर्वजण सुलक्षणाच्या घरी पोहचले..
माजगाव भायखळा, मुंबई इथे एक दहा बाय दहाची चाळीतली खोली..त्या खोलीत शंकरचे सासरे त्यांची तीन मुलं आणि त्यांची बिऱ्हाडं, एवढ्याशा खोलीत चार चुली आणि आता शंकरची पाचवी चूल.. मोठ्या वाड्यात राहिलेल्या शंकरला खूपच विचित्र वाटत होतं.. इतक्या लहान खोलीत कसे राहू शकतात? याचं आश्चर्यही वाटत होतं.. प्रचंड उकाडा.. जीवाची लाही लाही करणारा दाह.. पण शंकरकडे पर्याय नव्हता.. 'पुढच्यास ठेच तेंव्हा मागचा शहाणा' या उक्तीप्रमाणे शंकरला माहीत होतं कुटुंबाला या गरिबीतून बाहेर काढायचं असेल तर आधी त्याला तिथे तग धरून राहता येणं गरजेचं होतं.. 'टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही' हे त्याला उमगलं होतं.. आणि म्हणून कुटुंबाच्या भवितव्यासाठी शंकरने मुंबईचं धकाधकीचं जीवन मनापासून स्वीकारलं.. पाच कुटुंब एकत्र राहणं निव्वळ अशक्य होतं.. एकाच खोलीत सर्वजण वावरणार, झोपणार कसे? मोठा प्रश्न होता.. त्या खोलीत एका पलंगावर शंकराचे मोठे मेव्हणे आणि त्यांची पत्नी झोपायची..त्याच पलंगाखाली दुसरे मेव्हणे आणि त्याचं कुटुंब.. आणि शेजारी तीन नंबरचे मेव्हणे आणि त्यांचं कुटुंब.. शिवाय सुलक्षणाचे वडीलसुद्धा होते.. शंकर आणि सुलक्षणाला जागाच उरत नसे..मग आता काय करायचं..?? त्या चाळीसमोरून जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एक पिंपळाचं झाड होतं.. त्या झाडाखाली शंकर आणि सुलक्षणा गोधडी टाकून रात्री झोपू लागले.. किती वाईट अवस्था..!! गावात भल्या मोठ्या वाड्यात वावरणारा शंकर रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली सुलक्षणा सोबत राहत होता..त्या रस्त्याच्या कडेला त्याने आपला संसार मांडला होता..
दुसऱ्या दिवशी सकाळी शंकर लवकर उठला.. प्रातविधी आटोपून सकाळची न्याहारी करून कामाच्या ठिकाणी जाण्यास तयार झाला.. कामावर रुजू होण्याचा पहिलाच दिवस होता.. त्यामूळे धाकट्या मेव्हण्याने त्याला नीट पत्ता समजावून सांगितला.. लोकल ट्रेन मध्ये बसवून दिलं.. लोकल ट्रेनचा प्रवास.. ती माणसांची गर्दी..लोकल पकडण्यासाठी उडालेली झुंबड.. एकदमच जीवघेणी.. शंकरसाठी सारंच नवीन होतं.. धावत पडत शंकर कसाबसा मुंबई GPO (जनरल पोस्ट ऑफिस) ला पोहचला..
शंकरला आत बोलावण्यात आलं.. शंकरचा अवतार पाहण्यासारखा झाला होता.. गावाकडची खेडवळ वेशभूषा… अंगात पांढरा सदरा आणि लेंहंगा., डोक्यावर गांधीटोपी.. काहीजण शंकरकडे पाहून नाक डोळे मुरडत होते..'कुठून आलंय हे ध्यान..!!' असा विचार करून काहीजण कुत्सितपणे हसत होते.. पण 'खरंच वेशभूषा माणसाचं चारित्र्य, त्याची लायकी ठरवते..??' पोस्ट ऑफिसमधल्या साहेबांनी सारे सोपस्कार उरकून त्याला कामावर रुजू करून घेतलं.. आणि 'डिलिव्हरी डिपार्टमेंट' नेमणूक करून टाकली.. शिक्षण झालेले, संपूर्ण महाराष्ट्रातून पंधराशे वीस क्लार्कच्या जागांपैकी, क्लार्कच्या पदासाठी निवड झालेली असतानाही शंकरला शिपायांचे काम देण्यात आले.. शंकरला तरी कुठे माहीत होतं..? त्याला वाटलं हेच काम असेल.. साहेबानी सांगितलं म्हटल्यावर त्याने निमूटपणे 'डिलिव्हरी डिपार्टमेंट' मध्ये कामाला सुरुवात केली..
आणि शंकरच्या आयुष्यातल्या एक नवीन अस्तित्त्वाच्या लढ्याला सुरुवात झाली.. एक नव्या ध्यासपर्वाचा प्रारंभ झाला..
पुढे काय होतं शंकर या लढाईंत टिकून राहील? मुंबईत त्याचा निभाव लागेल? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
निशा थोरे..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा