Oct 20, 2020
स्पर्धा

लढा अस्तित्वाचा भाग ८

Read Later
लढा अस्तित्वाचा भाग ८


 

लढा अस्तित्वाचा.. भाग- ८

 

पूर्वाध: कथेच्या मागील भागात आपण पाहिलं की शंकरच्या घरच्यांनी त्याचं लग्न ठरवलं.. सुलक्षणा आणि शंकर विवाहाच्या रेशीम बंधनात बांधले गेले.. शंकरचं लग्न करून शिक्षणात व्यत्यय आणला म्हणून गोविंद पाटील गुरुजी खूप चिडले होते.. शाळेतून काढून टाकण्यापर्यंत वेळ आली होती.. गुरुजींच्या वडिलांनी गुरुजींना समजावून  सांगितले.. गुरुजींचा राग शांत झाला.. त्यांनी शंकरला शाळेत बसण्याची परवानगी दिली.. आता पुढे..

 

लढा अस्तित्वाचा.. भाग- ८

 

शंकर खूप आनंदात होता.. गुरुजींनी वर्गात बसण्याची परवानगी दिली होती..शंकरने अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित केलं.. दिवस रात्र एक करून अभ्यास केला..डोळ्यासमोर फक्त एकच ध्येय होतं.. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणं.. गुरुजींनी आव्हान दिलं होतं.. तू पास होणार नाही..हे त्यांचं वाक्य खोटं सिद्ध करायचं होतं.. आणि त्यांना उत्तीर्ण होऊन दाखवायचं होतं.. शंकर खूप मेहनत घेत होता..

 

दिवस पुढे जात होते.. शाळेतल्या इतर स्पर्धा दहावीच्या मुलांसाठी रद्द केल्या होत्या.. फक्त जिल्हास्तरीय कुस्तीच्या स्पर्धा खुल्या ठेवण्यात आल्या होत्या.. शंकरला आवड होतीच..मरवडेला असताना अनेक स्पर्धा तो जिंकला होता.. म्हणून जाधव गुरुजींच्या सांगण्यावरून त्याने फक्त कुस्तीच्या स्पर्धेत भाग घेतला आणि कुस्तीच्या स्पर्धेत जिल्हा पातळीवर  एकशे पाच पौंडच्या गटात शंकर पहिला आला. पुन्हा एकदा शंकरने हे यश मिळवून शाळेला नावलौकिक प्राप्त करून दिला होता.. वसतिगृहात शंकरचा मान वाढला.. शाळेच्या वसतिगृहाकडून विजयी झालेल्या शंकरला महिन्याला तीस रुपये भत्ता आणि काजू बदामाचा खुराक सुरू झाला.. त्याच सोबत दोन वेळच्या मोफत जेवणाची सोय करण्यात आली.. शंकर आनंदात होता..

 

परिक्षा जवळ आली.. अभ्यासाची तयारी सुरू झाली..सर्वच मुलं अभ्यासाला लागली.. शालांत परीक्षा सुरू झाली..  शंकरने पूर्ण तयारीनिशी सर्व पेपर सोडवले होते … पण तरीही मनात धाकधूक होतीच.. लग्न केल्यावर कुठे कोण शाळा शिकत का? आता कसला उत्तीर्ण होतोय? बायकोकडे सारं लक्ष आता? लोकांचे टोमणे ऐकावे लागत होते.. 

 

आणि शेवटी निकालाचा दिवस उजाडला.. सर्व विद्यार्थी शाळेत जमले होते.. नोटीस बोर्डवर लावलेल्या यादीत  आपापली नावे तपासून पाहत होते.. शंकरही होता त्या गर्दीत.. काही मुलं उत्तीर्ण झाल्यामुळे आनंदात होती.. तर काही  अनुत्तीर्ण झाल्यामुळे व्यथित.. शंकरही यादीत त्याचं नाव शोधत होता.. आणि पाहतो तर काय..!! यादीत त्याचं नावचं नव्हतं.. तो घाबरला..धावत मुख्याध्यापकांच्या केबिनच्या बाहेर आला.. गुरुजींनी आत बोलावून घेतले..शंकरने भीतभीतच गुरुजींना विचारले," गुरुजी, माझं नाव त्या बाहेर लावलेल्या यादीत नाही.. काय झालंय? मी नापास झालोय का.?" पाटील गुरुजी गालातल्या गालात हसत होते.. म्हणाले," काय झालं शंकर ? नाव नाही का तुझं.? कसं असेल.? अरे वेड्या..!! तू संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात दुसरा आला आहेस.. तुझं नाव तर सर्व वर्तमानपत्रात आलंय.. यादीचं काय घेऊन बसलास?  यादीत तुझं नाव काय शोधत बसलास..? " खुर्चीतून उठून शंकरच्या जवळ येत त्याच्या पाठीवर थाप टाकत गुरुजी म्हणाले," शाब्बास शंकर, तू आपल्या शाळेचं नाव पूर्ण जिल्ह्यात उज्ज्वल केलंस..मला वाटलं होतं पास तरी होतोस की नाही? पण तू तर कमाल केलीस बघ तू..!! आई वडिलांना निरोप धाड आता..गावात साखर वाटा म्हणावं" शंकर भान हरपल्यासारखं सारं ऐकत होता..त्याचा स्वतःच्याच कानावर विश्वास बसेना.. गुरुजी कौतुकाने त्याची पाठ थोपटत होते.. हातातलं वर्तमानपत्र त्याला त्याचं नाव दाखवत होते.. आपलं नाव वर्तमानपत्रात पाहून शंकरला खूप खूप आनंद झाला होता.. 

 

त्याच दिवशी दुपारच्या एसटी ने शंकर आपल्या गावी घरी आला..आईवडिलांच्या पाया पडला.. खाली वाकून नमस्कार करत असताना डोळ्यातल्या आसवांनी आईच्या पायांवर अभिषेक होत होता..आईने मायेने जवळ घेतलं.." काय झालं बाळा? कोणी काही बोललं का? का रडतोय तू" ती माऊली काळजीने विचारू लागली.. शंकरने तो संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात दुसरा आल्याची बातमी सांगितली.. कुटुंबातल्या सर्वांनाच खूप आनंद झाला.. घरात आईने गोडधोड बनवलं.. देवापुढे साखर ठेवली.. इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही शंकरने हार नव्हती मानली.. तो झुंज देत राहिला.. आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा त्याने पार केला होता.. अडाणी लोकांच्या समाजात तो पहिला मुलगा होता ज्याने ज्ञानाचा दिवा प्रज्वलित केला होता… 'आयुष्यभर तुम्ही याच चिखलात खितपत पडणार' गोविंदराव गुरुजींचे शब्द त्याच्या कानात घुमत होते.. त्याने ते शब्द खोटे करून दाखवले होते.. गावातली मोठी मोठी असामी शंकरच्या घरी येऊन त्याचं अभिनंदन करत होती.. शुभेच्छा देत होती.. 'भालेवाडी' गावाचं नाव साऱ्या पंचक्रोशीत मानानं घेतलं जात होतं.. एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा शालांत परीक्षा फक्त उत्तीर्णच नव्हे तर जिल्ह्यात दुसरा आला होता..खूपच कौतुकाची गोष्ट होती ही..!! गावातल्या लोकांत शंकर हा कौतुकाचा विषय बनला होता..सर्वच लहान थोर त्याच्याशी आदराने वागू लागले.. मार्गदर्शन घेऊ लागले..शाळेने वार्षिक स्नेह सम्मेलनात शंकरचं विशेष कौतुक केलं होतं.. त्याचा सत्कार केला होता..

 

पण शंकर इतक्याने संतुष्ट होणार नव्हता.. शिक्षणाचा भुकेने वेड्या झालेल्या शंकरचा हा छोटासा अल्पविराम.. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा होता. काही दिवसांनी सुट्टी संपल्यावर शंकरने  महाविद्यालयाच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेतला..एका नवीन विश्वात प्रवेश केला.. आता महाविद्यालय म्हणजे 'कोल्हापूर युनिव्हर्सिटी'..आता त्याच्या कक्षा अजूनच रुंदावल्या होत्या.. त्याला कुपातील बेडुक बनून नव्हतं राहायचं.. शिक्षणाने माणूस प्रगल्भ होतो.गरिबीच्या दलदलीतून बाहेर पडायचं असेल तर सर्वात आधी अज्ञानाचा अंधःकार दूर करायला हवा.. कुटुंबातील प्रत्येक सदस्य सुशिक्षित व्हायलाच हवा.. मुलींना शिकवायला हवं.. हे  त्याला चांगलंच उमगलं होतं.. शंकरच्या पाठीवर झालेल्या दोन लहान बहिणींना आणि दोन धाकट्या भावंडांना शंकरने शाळेत घातलं..  त्याला मिळणाऱ्या तीस रुपयातून तो त्यांचा शाळेचा खर्च भागवत होता.. भावंडांची काळजी, निस्वार्थ प्रेम, त्यांनाही शिकावं म्हणून चाललेली त्याची धडपड स्पष्ट दिसत होती.. 

 

शंकरच्या गावी त्याच्या धाकट्या बहिणी शाळेत जात होत्या.. घरातल्या कामात आईला मदत करत होत्या.. शेतातही शेतीची कामे करत होत्या.. सुलक्षणाही सासरी छान रमली होती.. इतक्या लहान वयातही तिने घराला छान सांभाळले होते.. घरातल्या कामात सासूला मदत करून तिच्या सोबत कधी शेतीच्या कामातही मदत करत होती.. खुरपणी करायला, मिरच्या तोडायला.. सासुसोबत जात होती.. नवीन लग्न झालं होतं.. शंकर शिक्षणासाठी सोलापूर मध्ये.. नवीन असताना एकमेकांच्या विषयी जिव्हाळा, प्रेम वाटणं साहजिकच होतं.. घरात इतकी माणसं असतानाही सुलक्षणाला आपल्या नवऱ्याची आठवण यायची.. पण तिने कधीही कोणाजवळ तक्रार केली नाही.. रडारड केली नाही.. खूप समंजस होती ती.. 

 

दुष्काळाने त्रस्त झालेला सोलापूर जिल्हा दिवसेंदिवस त्या दुष्काळाच्या आगीत होरपळून निघत होता.. पाण्यासाठी मैल,दोन मैल फिरावं लागत होतं.. म्हणूनच फक्त शेतीवर विसंबून राहून चालणार नव्हतं.. जोडधंदा गरजेचा होता. एवढं मोठं कुटुंब इतक्या तुटपुंज्या मिळकतीवर कसं भागणार? म्हणून गेणूचा मोठा मुलगा लक्ष्मण आणि भरत  आपल्या पत्नीसमवेत मुलांना घेऊन दुसऱ्या गावी मजुरी करू लागले.. पोटापाण्याचा प्रश्न आपपल्या परीने सोडविण्याचा प्रयत्न करू लागले.. पिल्ले मोठी झाली.. पंख फुटले की ते भरारी मारणारच.. विशाल अवकाशात स्वछंद विहार करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार होता.. आणि   गेणूही कधी त्यांना अडवले नाही.. स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची पूर्ण मुभा दिली होती.. जो तो आपपल्या पायावर उभं राहण्यासाठी धडपड करत होता.. असं असलं तरीही गेणूचे दोघांवर पूर्ण लक्ष होतं.. तो त्यांना नेहमी मार्गदर्शन करत असायचा.. कमी जास्तीला पाठीशी त्यांच्या उभं राहायचा..गेणू आणि चंपा आपल्या मुलांचा गुण्यागोविंदाने नांदणारा संसार पाहून तृप्त झाले होते.. 

 

काळजी होती ती फक्त धाकट्या मुलांची.. जिजा, यशोदा, राम आणि विठ्ठल अजून खूप लहान होते.. त्यांच्या भविष्याचा विचार करून ते चिंतीत होत होते..आता सारी भिस्त शंकरवर राहिली होती..

 

शंकर कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असताना अवघ्या सहा महिण्यात शंकरसाठी एक नामी संधी चालून आली.. आणि त्या संधीने शंकरच्या पूर्ण आयुष्यात कायापालट घडवून आला..


 

काय होती ती संधी? पाहूया पुढील भागात..

 

क्रमशः

निशा थोरे