लढा अस्तित्वाचा.. भाग- ५
पूर्वाध: कथेच्या मागील भागात आपण पाहिलं की शंकरच्या घरची परिस्थिती अतिशय हलाखीची झाली होती.. त्यामुळे घरच्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून शंकरने शाळा सोडून रानात गुरे राखण्याचे काम स्वीकारले..अचानकपणे झालेल्या धनलाभामुळे गेणूची पाटलांच्या ताब्यात असलेली जमीन त्याला परत मिळाली होती.. शंकरच्या पायगुणामूळे घडले असे वाटून त्याचे सारेजण लाड करू लागले..त्याला पुन्हा शाळेत चौथीच्या वर्गात बसवण्यात आले.. आता पुढे...
लढा अस्तित्वाचा.. भाग- ५
पूर्वीच्या काळी मुलांची लग्नं लहान वयातच व्हायची.. त्याप्रमाणे गेणू मुलांसाठी आपल्या जवळच्या नात्यांतच स्थळ पाहू लागला.शंकरची दोन्ही मोठी भावंडं स्वतःच्या आपल्या शेतात राबू लागली.. आपसातलंच स्थळ पाहून गेणूने आपल्या मोठ्या मुलीचं, सरूचं लग्न कर्नाटकात बेळगाव येथे शेतकरी कुटुंबात फार थाटामाटात न करता साध्या पध्दतीने लावून दिले.. सरू बेळगावला आपल्या सासरी निघून गेली.. त्यानंतर शंकरच्या दोन्ही भावांची लग्न एकाच मांडवात करण्यात आली.. सरू सासरी नांदायला गेली आणि दुसऱ्या घरच्या दोन गोड मुली सुना बनून घरी आल्या.. पार्वती, रखमा, दोन्ही सुना घरात छान रमू लागल्या..स्वयंपाकघर सांभाळून शेतातल्या खुरपण्याच्या, रोप लावणीच्या कामात मदत करू लागल्या..
आज शंकर खूप आनंदात होता.. शाळेत जायला मिळणार होतं.. आपल्या वडिलांचं स्वप्न साकार करण्याची संधी चालून आली होती.. अगदी उत्साहात तो शाळेत पोहचला.. चौथीच्या वर्गासमोर येऊन उभा राहिला.. गुरुजींनी त्याला वर्गात यायला सांगितलं आणि म्हणाले, "मुलांनो, आजपासून आपल्या वर्गात एक नवीन मित्र सहभागी होणार आहे.. हा शंकर..!! त्याचं सर्वांनी मिळून स्वागत करूया.." शंकरने संपूर्ण वर्गात नजर फिरवली.. सगळी मुलं त्याच्यापेक्षा वयाने लहान वाटत होती.. एकदम दुसरीतून थेट चौथीचा वर्ग..!! तेही वयाच्या पंधराव्या वर्षी..!! थोडं नवलच..!! गुरुजींनी शंकरला आपल्या जागेवर, राजारामच्या शेजारी जाऊन बसायला सांगितलं.. शंकर जागेवर जाऊन बसला.. नवीन गोष्टी शिकण्यासाठी सज्ज झाला.. आणि मग सुरू झाला शंकरचा शालेय जीवनाचा एक नवीन अध्याय..
शंकर रोज सकाळी पहाटे लवकर उठून आईला घरकामात थोडी फार मदत करून शाळेत जाऊ लागला.. दुसरीतून शाळा सोडल्यामूळे सुरुवातीला शंकरला वर्गात शिकवलेले काहीच समजत नव्हते..तेंव्हा त्यांना शिकवायला शेळके गुरुजी होते..कडक स्वभावाचे,प्रचंड शिस्तप्रिय होते.. ते मुलांना कधीच मारत नसत.तरीही वर्गातली सारी मुलं त्यांना खूप घाबरत..पूर्वी पाठांतरावर जास्त भर दिला जायचा.. मराठीच्या कविता असो, इतिहासातील सणावळी असो, भुगालातील देशाटन असो, विज्ञानाचे प्रयोग असो किंवा गणिताचे पाढे असो.. सारं तोंडपाठ करावं लागायचं.. शेळके गुरुजींच्या वर्गात एक नियम होता. गुरुजी वर्गातल्या कोणालाही अचानक उभं करत आणि प्रश्न विचारत.. अचूक उत्तर दिलं तर ठीक.., नाहीतर उत्तर चुकलं तर जो विद्यार्थी अचूक उत्तर देईल तो उत्तर चुकणाऱ्या विद्यार्थ्याच्या कानाखाली आवाज काढायचा.. शंकरची अभ्यासाची सवय पूर्णपणे मोडली होती.. आजवर मोकळ्या रानात स्वच्छंदी जीवन जगलेल्या शंकरला सुरुवातीच्या काळात खूप त्रास झाला.. रोज कोणाच्या ना कोणाच्या तरी हातचा मार खावा लागायचा.. त्याच्या वर्गात त्यांच्याच गावातल्या धनाजी पाटलांची आनंदी नावाची मुलगी नुकतीच शाळेत दाखल झाली होती..अभ्यासात प्रचंड हुशार होती.. गुरुजींनी विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरं द्यायची.. मग काय..!! नियम म्हणजे नियम..!! गुरुजी तिलाही शंकरच्या थोबाडीत मारायला सांगायचे.. आनंदीला फार अवघडल्यासारखं वाटायचं.. तेंव्हाच्या काळात फक्त उच्च कुळातल्याच मुली शाळेत शिकायला येत होत्या.. हीच खूप मोठी गोष्ट होती..स्त्री-पुरुष हा भेद होताच..वर्गात मुली मुलांशी त्या फारशा बोलत नसत.. पण मग गुरुजींच्या नियमांचे उल्लंघन कोण करणार? मग नाईलाजाने आनंदीला शंकरच्या गालावर चापट मारावी लागायची.. एका मुलीच्या हातून मार मिळाला म्हणून साऱ्या वर्गात हशा पिकायच्या.. मुलं शंकरला चिडवायची.. शंकरला खूप वाईट वाटायचं.. रोज अपमान व्हायचा..
शाळा सुटल्यावर घराकडे परतत असताना पूर्ण रस्ताभर शंकर आसवं टिपायचा.. घरी आल्यावर शाळेची पिशवी रागाने भिरकावून कुठल्यातरी कोनाड्यात जाऊन रडत बसायचा.. कधी कधी घरच्यांच्या नजरेत यायचं.. काय झालं? म्हणून विचारणा व्हायची.. पण शंकर काहीच बोलायचा नाही.. बरेच दिवस असंच सुरू राहिलं..
एक दिवस शंकरने यातून मार्ग काढण्याचा,अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा निश्चय केला.. "आता हे सर्व थांबायला हवं. मार खाणं बंद व्हायला हवं.. का आणि कसं होत नाही पाठ मला? तेच बघतो " मनाशी निर्धार केला.. शंकर मित्रांसोबत अभ्यास करू लागला..शाळा सुटल्यावर गावातल्या महादेवाच्या मठात शंकर आणि त्याचे मित्र जमू लागले.. अजूनही जातीभेद पूर्णपणे मिटला नव्हता.. त्यावेळीस गावातल्या मठात फक्त ब्राम्हण समाजातील लोकांना प्रवेश होता..बाकीच्या कोणत्याच लोकांना मठात प्रवेश निषिद्ध होता.. त्यामुळे शंकरला आणि त्याच्या सोबतच्या काही मुलांना मठात प्रवेश नव्हता.. शंकर मठाच्या बाहेर एका वडाच्या झाडाखाली बसून अभ्यास करू लागला.. रोज त्याचे मित्र त्याच्या कडून पाठांतर करून घेऊ लागले.. हळूहळू शंकरची अभ्यासातली रुची वाढू लागली.. सर्व विषयांची छान तयारी होऊ लागली.. पाढे पाठ होऊ लागले.. उत्तम पाठांतर होऊ लागलं.. आणि वर्षाअखेरीस सहामाही परिक्षेत नापास झालेला शंकर वार्षिक परीक्षेत शाळेत दुसरा आला..
शंकर चौथीच्या वर्गात शाळेतून दुसरा आला होता.. सर्वांसाठी नवलच होतं.. शंकरचा आनंद गगनात मावेनासा झाला.. आकाश ठेंगणं वाटू लागलं होतं.. शेळके गुरुजींनाही खूप आनंद झाला..सुरुवातीला मार खाणारा, सहामाही परीक्षेत भोपळा मिळालेला आपला विद्यार्थी आज शाळेत दुसरा आला याचा आनंद त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता.. शाळेच्या मुख्याध्यापकांनी वार्षिक स्नेहसंमेलनात शंकरचे तोंडभरून कौतुक केलं.. विद्यार्थ्यांच्या पालकांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं. गेणू आणि चंपा कार्यक्रमाला हजर होते.. भाषण करते वेळी मुख्याध्यापकानी शंकरला जवळ बोलावून घेतलं. सर्व विद्यार्थ्यांसमोर त्याचं कौतुक करत ते म्हणाले,"मुलांनो, 'जिथे इच्छा असते तिथे मार्ग नक्कीच असतो' हे आज शंकरने शाळेतून दुसरा येऊन सिद्ध करून दाखवले आहे.. त्याने आपल्या कमजोरीवर, कमकुवतपणावर मात केली आणि यश खेचून आणलं.. मला अभिमान वाटतो त्याचा.." त्यांनी शंकरची पाठ थोपटली.. आपल्या मुलाचं कौतुक पाहून गेणू आणि चंपाचे डोळे आनंदांश्रूनी डबडबले.. मुलाचा अभिमान वाटला.. आपल्या मुलाने आपलं नाव काढलं अभिमानाने छाती फुलून गेली..
त्यानंतर मात्र शंकरने अभ्यासाच्या बाबतीत कधीच मागे वळून पाहिलं नाही.. शंकरची गणना आता हुशार मुलांमध्ये होऊ लागली..पूर्वी नाके डोळी मुरडणारी मुलं त्याच्याशी स्वतःहून बोलू लागली.. आनंदीच्याही मनात त्याच्या विषयी आदर, जिव्हाळा निर्माण होऊ लागला..
अजाणत्या वयातला हा जिव्हाळा कोणते रंग दाखवणार? पाहूया पुढच्या भागात..
क्रमशः
©® निशा थोरे..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा