Login

लढा अस्तित्वाचा भाग ४

Ladha astitvacha

 लढा अस्तित्वाचा.. भाग- ४

पूर्वाध: कथेच्या मागील भागात आपण पाहिलं की वयाच्या नवव्या वर्षातच शंकरला परिस्थितीची जाणीव झाली होती..  आपला खारीचा वाटा का असेना म्हणून शंकर आईला घरकामात मदत करत होता.. आता पुढे...


 

 लढा अस्तित्वाचा.. भाग- ४

१५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला.. साऱ्या देशात आनंदोत्सव साजरी करण्यात आला..सारे देशवासी खूप आनंदात होते.. स्वातंत्र्यवीरांच्या परिश्रमाचा, प्रयत्नांचा विजय झाला होता.. देशावरच खूप मोठं संकट दूर झालं होतं.. देशात लोकशाहीची स्थापना झाली.. आणि स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ राजेंद्र प्रसाद आणि पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांची निवड झाली.. देश स्वतंत्र झाला होता पण अजून समाजात खूप साऱ्या सुधारणा अनिवार्य होत्या.. एक संकट जरी टळलं होतं तरी गरिबी, जातीपाती, वर्णभेद, लिंगभेद या साऱ्या समस्या 'आ' वासून उभ्या होत्या.. त्यात देशात कोरडा दुष्काळ पडला..काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे महापूर आला आणि त्यामुळे महामारीची साथ आली.. बरीच लोकं मृत्यूमुखी पडली.. लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिला.. पोटापाण्यासाठी लोकांना वणवण भटकावे लागत होते.. 

दुष्काळामुळे परिस्थिती खूप बिकट होत चालली होती.. पाण्यासाठी मैल दोन मैल पायी चालत जावं लागे.. पाऊस नसल्यामुळे शेतातल्या कामांनाही वेग नव्हता.. मजुरी कधी मिळायची कधी नाही..मुलं मोठी होत होती.. कितीही काबाडकष्ट केले तरी हातात कमीच पडायचं.. संसाराला ठिगळ  लावता लावता जीव हैराण होत होता.. शंकरची मोठी दोन भावंडं मोलमजुरी करून घराला हातभार लावत होती.. त्यामुळे त्यांच्या शाळेत जाण्याचा प्रश्नच नव्हता.. पण गेणूला नेहमी वाटायचं," माझी मोठी दोन मुलं अडाणी राहिली..   ती दोघं नाही शाळा शिकू शकली..माझ्या पोटी जन्माला येऊन त्यांना काहीच सुख मिळालं नाही.. आयुष्यभराची वणवण मागे लागली.. पण माझा शंकर लई हुशार.. मी त्याला शिकीवणार.. मोठा साहेब करणार" एकटा शंकरच घरातल्या सर्व कामात हातभार लावून नियमित शाळेत जात होता.. शाळेतही तसा हुशार होता.. 

दिवस जसे पुढे जात होते तशी परिस्थिती अजूनच बिकट होत गेली.. एक वेळच्या जेवणाचीही नामुष्की होऊ लागली.. एक दिवस पाटलांच्या घरून गेणूला सांगावा आला..त्यांनी घरी बोलवलं होतं..गेणू महत्वाचं काम असेल म्हणून तो धावतच त्यांच्या घरी गेला.. पाटील म्हणाले," गेणू, तुम्ही दोघे भावंडं आणि तुझी मुलं शेतात काम करताय.. मला शेतातल्या कामाची चिंता वाटत नाही.. पण घरच्या जनावरांचे हाल होत आहेत.. त्यांना चारा मिळत नाही.. माझी जनावरं राखायला कोणी गुराखी आहे का बघ" गेणू विचार करू लागला,' शंकरला गुरे राखायला ठेवलं तर घरात चार पैसे येतील तेवढाच हातभार लागेल.. पण त्याची शाळा बंद करावी लागेल.आपलं स्वप्न तसंच अर्धवट राहील..पण घरातल्या माणसांचा पोटाचा प्रश्न तरी काही अंशी सुटेल..काय करावं?" गेणू थोडा विचार करून पाटलांना म्हणाला," मालक.!, माझ्या धाकल्या पोराला, शंकराला विचारतो..तो व्हय म्हणाला तर धाडतो उद्या तुमच्या घराकडं" असं म्हणून त्याने पाटलांचा निरोप घेतला.

संध्याकाळी घरी आल्यावर गेणूने विषय काढला..," पाटलाला त्यांची गूरं राखण्यासाठी गुराखी पाहिजेल.. आपण सगळे शेतात कामाला जातोय.. जिजा आणि यस्वदा अजून लई बारकी हाईत.. शंकरला धाडूया का?" सर्वांनी त्याच्या बोलण्यावर होकारार्थी माना डोलावल्या.. घराला थोडाफार हातभार लागणार म्हणून सर्वांना थोडासा दिलासा मिळणार होता.. घराची हलाकीची परिस्थिती पाहून शंकर नाईलाजाने गुरे राखण्यासाठी रानात जायला तयार झाला..शाळेत जाणं थांबणार म्हणून दुःखी झाला.. गेणूने पाटलांना शंकरबद्दल सांगितलं..'शंकर गुरे राखेल.. रानात चरायला घेऊन जाईल'. हे ऐकल्यावर पाटलांनी आनंदाने गेणूला शंकरला गुरे राखण्यासाठी परवानगी दिली.. 

रोज पहाटे लवकर उठून, प्रातविधी आटोपून शंकर तयार व्हायचा.. आई न्याहारीला मिर्चीचा ठेचा आणि दोन भाकरी कापडात बांधून द्यायची..ती शिदोरी घेऊन शंकर पाटलांची जनावरे  रानात चरायला घेऊन जाऊ लागला.. दुपारच्या वेळेस गुरं राखता राखता घरची चूल पेटवण्यासाठी शंकर जळण जमा करत असे.. रानावनात फिरताना  धाकट्या बहिणींसाठी चिंचा, बोरं, पेरू घेऊन यायचा.. गुरे पाटलांच्या वाड्यावर सोडल्यावरही तो पाटलांच्या घरी बाया माणसांनी सांगितलेली कामं मुकाट्यानं करायचा.. कोणत्याही कामाला नाही म्हणायचा नाही. पाटलांच्या घरची मंडळीही शंकरच्या स्वभावावर, त्याच्या प्रामाणिकपणावर, कामावर खुश असायची..कौतुकाने कधी एक आणे,कधी दोन आणे बक्षीस म्हणून द्यायच्या.. गुरे राखण्याची मजुरी चार आणे ठरली होती..दिवसभर उन्हातान्हात वणवण केल्यानंतर महिन्याच्या शेवटी चार आणे मिळायचे..शंकर ते पैसे आपल्या वडिलांच्या हाती सोपवायचा.. आणि पाटलांच्या घरच्यांनी बक्षीस म्हणून दिलेले एक, दोन आणे तो गुपचूप आपल्या आईच्या हातावर ठेवायचा..आईला खूप आनंद व्हायचा..आपल्या मुलाचं प्रेम पाहून आईचं काळीज सुपाएवढं मोठं व्हायचं..मुलाची कष्टाची कमाई पाहून आईचा आनंद गगनात मावायचा नाही.. तो आनंद तिच्या डोळ्यांतून वाहू लागायचा..

दिवस पुढे जात होते.. मुलं मोठी होतं होती.. रोज लवकर उठून शंकर नित्यनियमाने जनावरांना चरायला रानात घेऊन जात असे..गावातली अजून काही मुलं गुरे राखायला येत असत.. त्या मुलांची शंकरशी मैत्री झाली.. नवीन सवंगड्यांच्या सहवासात शंकर खूप आनंदी होता.. 

एक दिवस रानात गुरांना चरायला सोडून मुलं एका झाडाखाली खेळत बसली होती.. जमिनीत एकदम त्यांना काहीतरी चमकताना दिसले.."काय आहे ते?" मुलांना प्रश्न पडला.. कुतूहल जागे झाले. सगळी मुलं त्या जागी गोळा झाली.. मुलं ती जागा खणू लागली.. आणि काय आश्चर्य..!! सोन्याच्या मोहरांनी भरलेली तांब्याची कळशी शंकरला सापडली.. मुलं घाबरली..शंकरकडे ती कळशी सोपवून ती घाबरून आपल्या गुरांकडे निघून गेली.. शंकरही घाबरला होता.. कोणाचं असेल काय माहित?? तो धावतच  आपल्या घरी आला.. 

गेणू सोन्याच्या मोहरांनी भरलेली ती तांब्याची कळशी पाहून हैराण झाला.. एकदम त्याला गावातल्या धिंडोबाचं बोलणं आठवलं. तो म्हणाला होता," इंग्रजांच्या काळात स्वातंत्र्यवीर संघटना उभारणीसाठी धन गोळा करायचे कधी कधी इंग्रजांच्याच घरावर दरोडा टाकून त्यांना लुटायचे.  लुटीतून मिळालेलं धन गुप्त राहावं  म्हणून  एखादी खूणगाठ बांधून जमिनीत पुरून ठेवत त्यानंतर ते भूमिगत व्हायचे.. आणि मग गरज पडेल तसं परत येऊन धन घेऊन जात असायचे.. अशा प्रकारचं गुप्तधन कोणाच्या घरात लपवलेले असेल आणि त्याची बातमी सरकारला लागली तर  सरकारशी दगाबाजी केली असा आरोप करून  सरकार शिक्षा करते" हे सारं आठवून गेणू मनातून पुरता घाबरून गेला..परत चोरीचा आळ येईल, सरकारची कटकट मागे लागेल..कोर्टकचेरीच्या वाऱ्या मागे लागतील.. सारं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं.. दिगंबरला तुरुंगातून सोडवून आणताना झालेला त्रास आठवला.. "आताच कुठे या कटकटीतून मोकळा श्वास घेत आहोत..पुन्हा नवीन संकट नको.. ही कष्टाचं धन नाही. हे असलं फुकट मिळालेलं धन आपल्याला नको" स्वतःशीच पुटपुटला.. 

गेणूचा पाटलांवर खूप विश्वास होता.. धनाची कळशी घेऊन तो धावतच पाटलांच्या वाड्यावर आला.. ते सर्व धन त्याने पाटलांच्या स्वाधीन केले.. गेणू पाटलांना म्हणाला," मालक, आज दुपारी शंकरला रानात सोन्याच्या मोहरांनीं भरलेली कळशी सापडली.. पण मला हे धन नको..हे समधं धन घ्या.. याचं काय करायचं  तुमचं तुम्ही ठरवा...मालक एक विनंती आहे..मला काही नको पण कोर्टकचेरीच्या त्या भानगडीत माझी तुम्हाला विकलेली नऊ एकर जमीन मला परत द्या.. लई किरपा हुईल" इतकं सारं धन बघून पाटलांचे डोळेच दिपले..त्यांना खूप आनंद झाला.. इतकं सारं धन आपल्याला मिळणार या विचाराने ते खूप हर्षित झाले.. इतक्या अमाप धनाच्या मोबदल्यात फक्त नऊ एकर जमीन..!!  त्यांनी जास्त विचार न करता, वेळ न दवडता गेणूने मागितलेली नऊ एकर जमीन त्याची त्याला परत देऊन टाकली.. गेणूला खूप आनंद झाला त्याची जमीन त्याला परत मिळाली होती.. डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले.. पाटलांचे आभार मानून गेणू घरी परतला.. पुढे त्या सोन्याच्या धनाचं काय झालं कोणास ठाऊक? ना कधी गेणूने प्रश्न केला ना पाटलांनी काही सांगितलं..ते गुपित कायम गुपितच राहिलं.. 

घरी परत आल्यावर गेणूने ही आनंदाची बातमी घरच्यांना सांगितली.. सारेजण खूप खुश झाले.. साऱ्या गावात पाटलांनी गेणूला नऊ एकर जमीन बक्षीस म्हणून दिली.. शंकरच्या पायगुणामूळेच झाले की काय..!!  शंकरच्या आईच्या मनात विचार चमकून गेला.. दुसऱ्या दिवशी गेणू आपल्या कुटुंबासमवेत आपल्या हक्काच्या शेतात गेला..नारळ फोडून भूमिपूजन केलं.. काळ्या मातीला हातात घेतलं..आणि त्याच्या ओठी नकळत शब्द आले"सोन्याची जमीन" जणू भूमीचं नामकरणच झालं होतं.. सारं कुटुंब आनंदात होतं.. पुन्हा एकदा देवाने कृपा केली होती.. दिवस पालटले होते.. 

सुदैवाने त्या वर्षी छान पाऊस झाला आणि काळ्या आईच्या उदरातून सोन्याचे मोती पिकून आले होते.. घराची अवकळा निघून गेली.. लक्ष्मीआई पुन्हा प्रसन्न झाली.. फार तालेवार नसलं तरी पुन्हा एकदा सुखाने घरात प्रवेश केला.. शंकरच्या पायगुणांमूळे झालं असं समजून सारे जण शंकरचा लाड करू लागले.. गावच्या गुरुजींनी गेणूला बोलावून शंकरला शाळेत पाठवायला सांगितलं.. गेणूने होकार दिला.. आणि शंकरला शाळेत पाठवायला तयार झाला..दुसरीतून शाळा सोडून शंकरला तीन चार वर्षे झाली होती.. एवढ्या मोठ्या मुलाला दुसरीत कसं बसवणार? गुरुजींनी त्याची  प्राथमिक परीक्षा घेऊन थेट चौथीच्या वर्गात बसवले.  पुन्हा शाळेत जायला मिळणार म्हणून शंकर खूप खुश होता.

पुढे काय होतं? शंकरला अजून कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागणार होतं? पाहूया पुढच्या भागात.. 

क्रमशः

©© निशा थोरे..

🎭 Series Post

View all