लढा अस्तित्वाचा भाग ३

Ladha astitvacha

लढा अस्तित्वाचा.. भाग- ३

पूर्वाध: कथेच्या मागील भागात आपण पाहिलं की  आपल्या भावाला तुरुंगातून सोडवून आणण्यासाठी गेणूने अतोनात प्रयत्न केले..सर्व संपत्ती, जमीन-जुमला पणाला लावला.. आणि अखेरीस आपल्या भावाची तुरुंगातून सुटका करून घेतली..कोणे एके काळी गर्भ श्रीमंतीत लोळणारी भावंडं आज देशोधडीला लागली होती.. सर्व श्रीमंती लयास जाऊन गरिबीचे दिवस आले होते.. आता पुढे..

लढा अस्तित्वाचा.. भाग- ३

संपूर्ण कुटुंब काबाडकष्ट करून आपला उदरनिर्वाह करत होतं. दिगंबर आणि लक्ष्मी दोघे गेणूला शेतीत मदत करायचे.. गरिबीतही सारं कुटुंब सुखासमाधानाने राहत होतं..काही दिवसांतच दिगंबर आणि लक्ष्मी यांच्या संसाराच्या वंशवेलीला लवकरच सुंदर पुष्प उमलणार होतं.. आणि गेणूची पत्नी चंपाही गरोदर होती. चौथं अपत्य होणार होतं..  गेणू  'ठेवीले अनंते, तैसेचि राहावे, चित्ती असू द्यावे समाधान..' या उक्तीप्रमाणे आपलं आयुष्य आनंदाने जगत होता.. पण अजूनही दुःखाने पाठ सोडली नव्हती..

सर्व ऐश्वर्य जाऊनही दोघे भावंडे सुखात आनंदात कशी राहू शकतात? गावातल्या काही हितशत्रूंना प्रश्न पडत होता.. आणि त्यांनी पुन्हा नव्याने कट कारस्थान करायला सुरुवात केली. गेणूच्या कुटुंबाला त्रास देण्यास सुरुवात केली.. 

काही दिवसांपूर्वीच घरात एक दुर्घटना घडली.. गेणूच्या कुटुंबीयांना त्रास देण्यासाठी काही नाठाळ लोकांनी त्यांच्या गाईला 'कपिलेला' तिच्या खाद्यात विष मिसळून ठार मारलं.. सारे कुटुंब दुःखात बुडालं..आपल्या कपिलेला  मृत अवस्थेत पाहून दुःखाने गेणूने मोठ्याने हंबरडा फोडला.. काय ही विकृती..!! काय बिघडवलं होतं त्या मुक्या जनावरांनं?? प्रत्यक्ष न पाहता कोणावर आरोप करणार? एक एक करून सगळे आधार निसटून जात होते.. गेणूचा त्याच्या ' शंकऱ्या-पाखऱ्या' या बैलजोडीवर प्रचंड जीव होता.. पोटच्या मुलांसारखं त्यांना त्याने जतन केलं होतं.. शंकऱ्या दिसायला एकदम भारी..अगदी धतपुष्ट देहाचा, रेखीव शिंगं, काळेभोर डोळे..एकदम मोहक रूप त्याचं.. ,मनाला भूरळ पडायची..गळ्यातला घुंगरांचा आवाज सभोवताली पसरायचा.. आणि गेणूची बैलजोडी आलीय लगेच लक्षात यायचं.., ,मुकी जनावरं ती..!!त्यांना काय उमजणार द्वेष आणि ईर्षा..!! मालकाने माया लावली की त्याच्यासाठी कायम सेवेला हजर राहणार.. अशीच गोंडस होती शंकऱ्या पाखऱ्याची जोडी..

असेच दिवस सरत होते.. गेणूच्या बायकोचे, चंपाचे दिवस भरत आले होते. एक दिवस काय झालं..रात्रीचा प्रहर होता..सारा गाव शांत साखर झोपेत होता..अचानक जनावरांच्या गोठ्यातून मोठमोठ्याने हंबरण्याचा आवाज येऊ लागला.. गाढ झोपेत असलेला गेणू खाडकन जागा झाला.. 'काय झालंय गोठ्यात कोणास ठाऊक..!!' स्वतःशीच पुटपुटत तो  जरा त्रासिक मुद्रा करून गोठ्याकडे जाऊ लागला.. आणि पाहतो तर काय..!! शंकऱ्या निपचित जमिनीवर पडला होता.. कोणीतरी नीच माणसाने शंकऱ्याचा शेपूट कापला होता.. रक्तबंबाळ शंकऱ्या मोठंमोठ्याने हंबरत होता.. गेणूला काय करावं समजेना..!! त्याने धावत येऊन घरातल्या सर्वांना उठवलं.. डोळ्यांत पाणी होतं. त्याने घडलेला प्रकार सांगितला.. सगळेच रडू लागले.. सर्वजण गोठ्याच्या दिशेने धावले.. दिगंबर धावतच गावातल्या पशुवैद्याच्या घरी गेला.. आणि विनवणी करून त्यांना सोबत घेऊन आला.. वैद्यांनी त्याला नीट तपासले.. औषध दिली.. 'काळजी करू नका शंकऱ्या ठीक होईल'  असं सांगून त्यांनी तिथून निरोप घेतला.. दिगंबर परत वैद्यांना त्यांच्या घरी पोहचवून आला.. शंकऱ्याच्या खाद्यातून औषधे दिली जात होती.. पण त्याची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली होती.. जखमेमुळे शंकऱ्याला धनुर्वात झाला होता. वरचेवर वैद्य घरी येत होते..त्याला तपासून औषधं देत होते.. पण  प्रकृती सुधारत नव्हती.. घरातले सारेजण चिंतीत होते.. गेणूला नेहमी प्रश्न पडायचा..," मी काही चुकीचं करत नाही..कोणाला त्रास देत नाही मग का? का ही लोकं माझ्या वाईटावर टपलेले आहेत?" माझं एक ठीक आहे पण या मुक्या जनावरांनी काय कोणाचं बिघडवलं आहे? का त्यांच्या जीवावर उठलेत सारे?? पण सारेच प्रश्न निरुत्तर..!! 

बेलपोळ्याचा सण आला होता.. आज सकाळपासूनच चंपाच्या पोटात थोडं दुखत होतं.. पण सण होता..तिचा धनी थोडा आनंदी दिसत होता.. गेणूने बैलांना अंघोळ घातली. छान सजवलं होतं.. पण आज शंकऱ्या जरा जास्तच मलूल दिसत होता.. दिवसभरात त्याने काहीच खाल्लं नव्हतं.. तो सारखा खाली बसत होता.. कसंबसं घरच्यांनी त्यांचं औक्षण केलं होतं.. घरात गोडाधोडाचा, पुरणपोळीचा नैवेद्य केला होता.. सगळ्यांची रात्रीची जेवणं आटोपली.. आणि सारे झोपण्यासाठी आपापल्या  खोलीत गेले.. अचानक चंपाचं पोट दुखू लागलं..ती वेदनेने विव्हळू लागली.. गेणू ने दिगंबरला आणि लक्ष्मीला आवाज दिला..लक्ष्मी तातडीने गावात राहणाऱ्या सुईंनीकडे जाऊन तिला घेऊन आली.. साऱ्यांनी चंपाला गोठ्याजवळ आणलं.. एकीकडे आजारपणाने शंकऱ्याने जीव सोडला आणि दुसरीकडे चंपा बाळंत झाली.. तिला मुलगा झाला होता..  शंकऱ्याच्या मृत्यूने गेणू खूप सैरभैर झाला.. डोक्यावर हाणून घेत तो आक्रोश करू लागला.. मुलगा झाला म्हणून आनंद व्यक्त करायला हवा.. की माझा प्राणप्रिय शंकऱ्या मरण पावला म्हणून दुःखी होऊ? मन आक्रंदत राहीलं.. शंकऱ्याच्या जाण्याने खूप दिवस घरावर शोककळा पसरली होती.. कोणालाही अन्न गोड लागत नव्हतं..

पण म्हणतात ना..!! 'काळ हे प्रत्येक दुःखावरचं जालीम औषध आहे'. हळूहळू दुःखाची तीव्रता कमी होत होती. नवजात बालकाच्या येण्याने घरात थोडाफार आनंद नांदू लागला.. शंकऱ्याच्या स्मरणार्थ गेणूने त्या नवजात बालकाचे नाव 'शंकर' ठेवले होते.. आता सारेजण त्याला 'शंकर' म्हणून आवाज देऊ लागले.. थोड्या दिवसांनी पुन्हा रोजचा जीवनक्रम सुरू झाला..  लक्ष्मीलाही मुलगी झाली..  दोन्ही भावंडं हळूहळू आई वडिलांच्या छत्र छायेखाली वाढत होती..मोठी होत होती.. 

त्या वर्षी नेमका कोरडा दुष्काळ पडला.. परिस्थिती अजून बिकट होत होती..हातात पैसा नाही, पोटाला अन्न नाही..  शेतातही काम कमी झालं. गेणूला कुटुंबासाठी, त्यांच्या पोटापाण्यासाठी उरलेल्या एका बैलाला, 'पाखऱ्या'लाही विकावं लागलं.. इथे माणसाचं जगणं कठीण होऊन बसलं होतं. मग त्या मुक्या जनावराचे हाल का करावं? म्हणून पाखऱ्याला पाटलांना विकून टाकलं. गेणू आणि दिगंबर पाटलांच्या मळ्यात काम करू लागले..मुलं हळूहळू मोठी होत होती..मग मोठ्या मुलांच्या ताब्यात त्या दोन लहानग्यांना सोडून लक्ष्मी आणि चंपा दोघी शेतावर कामाला जाऊ लागल्या.. शंकर मोठा होत होता..

काही वर्षे सरली होती.. पण अजूनही नशिबाचे भोग काही संपत नव्हते.. खाणारी तोंड जास्त आणि कष्ट करून येणारी मिळकत कमी येत होती..सगळं अगदी हाता-तोंडाशी आलं होतं.. संकटाशी हातमिळवणी करता करता गेणू आणि दिगंबरचा जीव मेंतकुटीला आला होता. आजचा आलेला दिवस पुढे ढकलत, रेटत जगणं सुरू होतं.. शंकर हळूहळू मोठा होत चालला होता..

शंकर नऊ वर्षाचा झाला.. त्याच्या जन्मांनंतर शंकरला अजून दोन बहिणी झाल्या होत्या.. कसंबसं जगणं सुरू होतं..खूप कमी वयातच शंकरला समज आली होती.. वयाच्या मनानं फार लवकर परिस्थितीचं भान आलं होतं.. 'परिस्थिती माणसाला सगळं शिकवते' या उक्तीचा प्रत्येय येत होता.. इवलासा शंकर घरातली सर्व कामे करायचा.. जणू घराची, भावंडाना सांभाळण्याची जबाबदारी त्याने स्वतःच्या इवल्याशा खांद्यावर बिनतक्रार घेतली होती.. अगदी लहानपणापासून शंकर आईला तिच्या छोट्या मोठ्या कामात मदत करू लागला.. वाण्याच्या दुकानातून समान आणून देणं, झाडलोट करणं, केर काढणं, पिण्याच्या पाण्याचा रांजण धुवून पुसून साफ करणं, पुन्हा रांजण पाण्यानं भरून ठेवणं, देवाला दिवा लावणं.. छपरावर वाळवण नेऊन टाकणं, पुन्हा उन्हं खाली उतरली की छप्परावरील वाळवण खाली आणणं, लहान बहिणींना अंघोळ घालणं, त्यांचे केस विंचरून वेण्या घालणं..त्यांना जेवण भरवणं ही सारी घरातली कामे  करून मग शंकर उशिरा शाळेत जायचा.. पुन्हा शाळेतून घरी परतत असताना आईने सांगितल्याप्रमाणे सावकाराच्या घरी मळ्यातली कणसं पोहचवणं, हिरव्या मिरच्या तोडून त्यांना आणून देणं, सावकाराच्या घरी बायकांना त्यांनी सांगितलेल्या  लहान सहान कामात मदत करणं.. ही बाहेरची सगळी कामे उरकून तो घरी यायचा.. घरी आई काकू कोणीच नसायचं.. ,मग पुन्हा संध्याकाळी चूल पेटवण्यासाठी लाकूड तोडून, जळण मोडून चुलीपाशी नेऊन ठेवायचा.. आई मळ्यातल्या कामावरून परत आली की तिला चहा बनवून द्यायचा..आईलाही घरकामात मदत करायचा कधी दह्याचं ताक करायला मदत करायचा.. कधी इवल्याशा हातांनी छोट्या छोट्या भाकरी करायचा.. आईचे डोळे पाण्याने डबडबून यायचे.. मोठी भावंडं शेतात राबत होती.. कष्ट करत होती आणि हा इवलासा जीव किती कष्ट उपसत होता..!! सारखं आईच्या मागे मागे असणाऱ्या शंकरला आईला कामाचा होणारा त्रास उमजत होता.. आईची वेदना त्यांचं हृदय पिळवटून टाकायची.. आई जेंव्हा सर्वांच्या नजरा चुकवून पोटावर हिरव्या मिरच्या बांधून घरी घेऊन यायची.. मिरच्यांची धग उसळायची. पोटाची आग व्हायची.. मग शंकर तिच्या पोटाला तेल लावून देई.. आईच्या भेगाळलेल्या पायाला गरम तेल लावून देताना शंकरच्या डोळ्यांतले कढत अश्रू तिच्या पायावर नकळत ओघळायचे..  आई जागी व्हायची.. शंकरचे अश्रू पुसत पोटाशी घट्ट धरायची.. ,तिचा गुणी बाळ आई वडिलांची मनापासून सेवा करत होता.. कशाची पुण्याई कोणास ठाऊक..!! इतका गुणी बाळ तिच्या पोटी जन्मास आला होता.. शंकर आईचा सर्वात लाडका मुलगा बनला होता.. 

पण अचानक शंकरला शाळा सोडणं भाग पडलं.. काय कारण होतं? पुढे काय होतं पाहूया.. पुढील भागात..

धन्यवाद

आपली शब्दसखी

निशा थोरे..

🎭 Series Post

View all