लढा अस्तित्वाचा भाग २

Ladha astitvacha


 

लढा अस्तित्वाचा.. भाग- २

पूर्वाध: पहिल्या भागात आपण पाहिलं की  पोस्ट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या शंकर नावाच्या इसमाचा आज कामाचा शेवटचा, निवृत्तीचा दिवस होता.. निरोप समारंभाच्या कार्यक्रमात सर्वांनी त्याचे तोंड भरून कौतुक केले. सर्वांच्या प्रेमाने भारावलेल्या शंकरने भावपूर्ण  निरोप घेतला. घरी जात असताना मन भूतकाळ गेलं.आणि सारा जीवनपट डोळ्यासमोरून तरळू लागला.. आता पुढे..

भाग- २

ही कथा आहे भारत स्वतंत्रपूर्व काळातली.. स्वातंत्र्याचे वारे अधिक तीव्रपणे वाहू लागले होते.. इंग्रजांचा अत्याचार दिवसेंदिवस वाढतच होता. देश अजूनही स्वतंत्र झाला नव्हता.. स्वातंत्र्याचा लढा सुरूच होता..एकीकडे काही स्वातंत्र्य सैनानी इंग्रजांच्या तावडीतून देशाची सुटका करण्यासाठी प्राणांची बाजी लावत होते. आणि दुसरीकडे काही स्वातंत्र्यवीर समाजतल्या जुन्या कर्मठ चालीरीती, जातीभेद, वर्णभेद मिटण्यामागे धडपड करत होते.. एकीकडे सुभाषचंद्र बोस यांची हिंद सेना इंग्रजांच्या विरुद्ध लढा देण्यास संघटित होत होती.. आणि दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबडेकर, आगरकर, लोकमान्य टिळक या सारखे सारे समाजसुधारक समाज सुधारण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत होते..  तरीही समाजात अजून अपेक्षित बदल झालेला नव्हता.. वर्णभेद, जातीभेद,स्त्री पुरुष भेद अजूनही तसेच समाजाला कीड बनून पोखरू पाहत होते.. अशा त्या काळातली गोष्ट.. साधारण इ.स. १९४३ सालातली.. महाराष्ट्रातल्या 'सोलापूर' जिल्ह्यातील 'भालेवाडी' नावाच्या एका छोट्या खेडे गावातल्या शेतकरी कुटुंबाची.. 

त्या गावात गेणू आणि दिगंबर ही दोन भावंडं आपल्या कुटुंबासहित गुण्यागोविंदाने राहत होती.. मोठं एकत्र कुटुंब.. भला मोठा वाडा.. गेणू आणि चंपाबाई आपल्या तीन अपत्यासहित.. दिगंबर आणि त्याची धर्मपत्नी लक्ष्मी हे जोडपं हे सारेजण खेळीमेळीने एकत्र राहत होते.. वीस एकर कसदार जमीन होती.. गोठ्यात दोन बैलजोडी, चार दुभत्या गाई म्हशी, पंधरा सोळा शेळ्या, वीस बावीस कोंबड्या..  असा जनावरांचाही छान संसार तिथे नांदत होता.. शेतात राबण्यासाठी, घरातल्या कामांसाठी दोघे घरगडी होते दिमतीला..  घराचं अगदी गोकुळ झालं होतं..गेणू आणि दिगंबर हे दोघेही मजुरांसोबत स्वतः शेतात काम करत असत.. दोघांच्या बायका म्हणजेच चंपा आणि लक्ष्मी घरातील सर्व कामे पाहत.. चुलीवर स्वयंपाक बनवणे, केर काढणे, धुणी भांडी, घरी येणाऱ्या पाहुणे मंडळीचे आदरतिथ्य सारं अगदी मनापासून पाहत असत.. दारात छोटंसं वृंदावन होतं.. अंगणात रांगोळी रेखाटलेली असायची.. घरात वातावरण कायम प्रसन्न असायचं त्यामुळेच की काय…!! देवी लक्ष्मीमातेचा घरात वास कायमच जणू.. संपत्ती ऐश्वर्य पायाशी लोळण घालत होतं..सतत पाहुण्यांचा राबता असायचा.. लोक आवर्जून भेटायला यायचे.. गावातली एक सधन शेतकरी म्हणून मोठ्या आदराने त्यांचं नाव घेतलं जायचं.दोघा भावंडाना गावात मोठा मान होता. अवघ्या घराचं नंदनवन झालं होतं.. 


 

पण एक दिवस गेणू आणि दिगंबर यांच्या सुखी संसाराला कोणाची दृष्ट लागली कोण जाणे..!! खरंतर पैसा, संपत्ती, ऐश्वर्य आलं की त्याच्याबरोबर चांगल्या मित्रांबरोबर हितशत्रूही निर्माण होत असतात.. ज्याप्रमाणे त्या दोघांचं कौतुक करणारी माणसं होती. त्याचप्रमाणे त्यांच्या  प्रगतीवर, त्यांच्या समृद्धीला भरभराटीला पाहून जळणारी माणसंही गावात होती.. तोंडावर गोड बोलणारी माणसं मनात मात्र असूया बाळगून होती.. कमी अवधीत त्यांना मिळालेलं यश काही जणांच्या डोळ्यांत खुपत होतं.. त्या दोघां भावंडाना कमी लेखण्यासाठी कट कारस्थाने रचली जाऊ लागली.. दोघा भावंडामध्ये कलह निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ लागला. पण दोघा भावंडांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं.. विश्वास होता.. त्यामुळे त्यांच्यात फूट पाडण्यात शत्रूंना यश येत नव्हतं.. मग त्यांनी रानात चरायला येणाऱ्या त्यांच्या मुक्या जनावरांना त्रास देण्यास सुरुवात केली. जनावरांना इजा पोहचवू लागले.. गावातल्या एका इरसाल गावकऱ्याने दिगंबरला आपल्या गोड बोलण्यात अडकवलं.. अधिकच्या नफ्याचं आमिष दाखवलं..आणि इथेच दिगंबर अडकला.. त्याच्या खोट्या बोलण्याला फसला.. एका जमिनीच्या खरेदी विक्रीच्या गैरव्यवहारात  दिगंबरला नाहक गोवण्यात आलं आणि त्याचा पूर्ण आळ दिगंबरवर टाकून दिला. पोलीस घरी आले आणि जमिनीच्या खरेदी विक्रीच्या गैरव्यवहाराच्या खोट्या आरोपाखाली दिगंबरला अटक झाली.. सारं कुटुंब देशोधडीला लागवं हाच त्या दुष्मनाचा हेतू होता.. आणि तो जणू साध्य होतं चालला होता.. 

गेणूला काय करावं समजेना.. आपल्या भावाला तुरुंगातून सोडवण्यासाठी तो जीवाचं रान करू लागला.. गावातल्या मोठ्या मोठ्या लोकांना प्रत्यक्ष जाऊन भेटू लागला.. दिगंबरला तुरुंगवासातून सोडवून आणायचं इतकंच त्याचं लक्ष्य होतं.. जे जे शक्य होतील ते प्रयत्न तो करू लागला.. कोणीतरी शहाण्या माणसानं गेणूला वकील करण्याचा सल्ला दिला..त्यांच्याच ओळखीने एका चांगल्या वकीलाशी भेट झाली.. तारखांवर तारीख पडत होती..कोर्ट कचेऱ्यांचा ससेमिरा मागे लागला.. गेणू जिवाच्या आकांताने दिगंबरला तुरुंगातून सोडवण्याचा प्रयत्न करू लागला..पाण्यासारखा पैसा खर्च होत होता… गेणूला दिगंबरपेक्षा,आपल्या भावापेक्षा काहीच महत्वाचं वाटत नव्हतं. नात्यांच्या पुढे पैसा संपत्ती गौण ठरू लागली.. घरातली एक एक वस्तू विकली जाऊ लागली..आणि तिथूनच त्यांच्या कुटुंबाच्या दुर्दशेला खरी सुरवात झाली..साऱ्या कुटुंबाची वाताहत झाली…सारं कुटुंब रसातळाला गेलं..


 

पुढे बरीच वर्षे खटला सुरू होता.. पण दिगंबरची सुटका होत नव्हती.. गेणू खटपट करत होता.. पण यश येत नव्हतं.. सारा पैसा संपत्ती संपत चालली होती.. शेती विकली गेली.. दागदागिने मोडून टाकले. सारी जनावरं विकून टाकली.. कोंबड्या विकल्या., दोन बैलजोडयांपैकी एक बैलजोडी विकली. आता त्यांच्याकडे एक बैलजोडी आणि एक गाय राहिली शिल्लक राहिली होती.. पण गेणूला त्याची पर्वा नव्हती.. त्याच्यासाठी आपला भाऊ परत येणं हेच महत्त्वाचं होतं.. आणि एक दिवस जणू परमेश्वराला गेणूची दया आली असावी..! सत्याचा विजय झाला. त्याच्या अथक प्रयत्नांना जणू न्याय मिळाला होता.. दिगंबरला सोडवून आणण्यात गेणूच्या वकिलांना यश आलं.. आणि दिगंबरची निर्दोष म्हणून सुटका झाली.. तो घरी परत आला होता.. सर्वांनाच खूप आनंद झाला.. घरात उत्सवाचे वातावरण निर्माण झालं होतं.. 

दिगंबर परत आला होता पण आता घराचं चित्र पूर्णपणे पालटलं होतं. ऋतूंनी कुस बदलावी तशी नशिबाने कुस बदलली होती.. दैवाची चक्रे उलटी फिरली होती.. संपूर्ण गावात मोठी असामी म्हणून ओळखलं जाणारी भावंडं आज निर्धन झाली होती.. खूप हलाखीची परिस्थिती झाली होती.. एक सधन कुटुंब रसातळाला गेलं होतं.. स्वतःच्या शेतात शेतीच्या कामासाठी मजूर ठेवणारे गेणू आणि दिगंबर आता दुसऱ्यांच्या शेतात राबताना दिसू लागले.. चूल आणि मूल पाहणाऱ्या घरच्या लक्ष्म्या दुसऱ्यांच्या दारी मजुरी करू लागल्या..गेणूची तिन्ही मुलंही आई वडिलांसोबत शेतात कामाला जाऊ लागली..तरीही सारे जण समाधानाने गुण्या गोविंदयाने एकत्र राहत होते.. आहे त्या परिस्थितीतही सुखात नांदत होते.. 

पुढे काय होतं पाहूया.. पुढील भागात..

क्रमशः

धन्यवाद

आपली शब्दसखी

निशा थोरे..

🎭 Series Post

View all