लढा अस्तित्वाचा.. भाग- १५
पूर्वाध: कथेच्या मागील भागात आपण पाहिलं की, शंकर कमलाबाईंना न्याय मिळवून देण्यात यशस्वी झाला..आणि त्या एका घटनेनंतर शंकर समाजसेवेकडे खेचला गेला.. तो अडीअडचणीत असणाऱ्या लोकांच्या समस्या ऐकून घेऊन योग्य ते मार्गदर्शन करू लागला.. आठवीच्या वर्गात शिकत असणाऱ्या जॉनच्या वडिलांच्या ओळखीने शंकरने मुंबईत स्वतःचं हक्काचं घर घेतलं..आणि तो मुंबईकर झाला आता पुढे...
लढा अस्तित्वाचा.. भाग- १५
सारं काही सुरळीत सुरू होतं..ध्यासाने झपाटलेल्या शंकरला कामाशिवाय काहीच सुचत नव्हतं.. मुलांना पुरेसा वेळ देता येत नव्हता..सुलक्षणा मुलांच्या सोबत होती.. आई खरंच खूप मोठी योद्धा असते.. ती कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलांचं संगोपण ती उत्तमच करते..काळ पुढे सरकत होता..इवलीशी मुलं आता मोठी झाली..प्रमोद महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षाला होता.. प्रसाद बारावीच्या परीक्षेला आणि सई दहावीच्या परीक्षेला बसणार होते..सर्वात धाकटा मुलगा आठवीत होता.. मुलांनीही आपलं संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केलं.. आणि तिघेही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली.. शंकरचा आनंद गगनात मावेनासा झाला..मुलांनी शंकरने दिवस रात्र केलेल्या काबाडकष्टाचे चीज केलं होतं.. त्याने भोगलेल्या, सोसलेल्या आजवरच्या वेदनांना न्याय मिळाला होता..
शंकर आता कायम बाहेरच्या कामात व्यस्त असायचा.. शंकरचा लहान भाऊ श्रीहरी वाणिज्य शाखेतून पदवीधर झाला..शंकरच्या घरातला दुसरा सुशिक्षित पदवीधर मुलगा.. मग तोही शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीच्या शोधात मुंबईत आला.. शंकर सोबत राहू लागला.. पुढे सेंट्रल बँक मध्ये क्लार्क च्या जागेसाठी भरती निघाली..आणि श्रीहरी बँकिंगच्या स्पर्धा परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला.. सेंट्रल बँक मध्ये क्लार्क म्हणून त्याची निवड झाली.. शंकरला खूप आनंद झाला.. श्रीहरीने आपल्या आईवडिलांचं, शंकरचं स्वप्नं पूर्ण केलं.. एक प्रतिकूल परिस्थितीत गरिबीच्या झळा सोसून मोठ्या कष्टाने मुलं शिकली.. मोठी झाली.. मुंबईत येऊन दोघे सरकारी नोकरीला लागली.. दिनकरही खाजगी असली तरी चांगल्या कंपनीत काम करत होता.. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली होती.. गावात एक सुशिक्षित घराणं म्हणून मान मिळत होता..सर्वजण आदराने नाव घेत होते..त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करत होते..
कालांतराने जागेची समस्या उभी राहिली.. शंकर, सुलक्षणा त्यांची चार मुलं, दिनकर त्याची पत्नी, आणि श्रीहरी इतकी सारी माणसं त्या दहा बाय दहाच्या छोट्या खोलीत राहत होती.. घरात वावरायला सुध्दा जागा नव्हती.. खूप दाटी झाली होती.. पण घर जरी लहान होतं तरी माणसांची मनं मोठी होती.. एकमेकांना सांभाळून घेत रहात होती.. पुढे जाऊन मग शंकरने चेंबूरला त्याच्याच परिचयातील व्यक्तीकडून दिनकरसाठी एक झोपडीवजा खोली विकत घेऊन दिली.. दिनकर आपल्या पत्नीसमवेत चेंबूरला रहायला गेला..तरीही घरात कायम गावाकडचे कोणी ना कोणी भेटायला यायचे… कधी नोकरीनिमित्त तर कधी काही समस्या घेऊन.. कायम वर्दळ असायची..दहा-पंधरा दिवसांचा मुक्काम असायचा.. कधी सुलक्षणा कडे तर कधी दिनकरच्या घरी.. घरात कायम माणसांचा राबता होता..
तिघे भावंडं एकमेकांना साथ देत प्रगतीपथावर वाटचाल करत होते..शंकरच्या गुणांची प्रसिद्धी,त्यांच्या कुटुंबाची झालेली प्रगती गावोगावी दूरवर पर्यंत पोहचली होती..काही दिवसांनी श्रीहरीसाठी एक उत्तम स्थळ चालून आलं..बारावी झालेली दिसायला सुंदर, नाकी डोळी नीटस, संस्कारी मुलगी श्रीहरीसाठी पाहण्यात आली.. वडील शिक्षक असल्याने घरात कडक शिस्त होती त्यांच्या संस्कारात वाढलेली सुनंदा सर्वाना पसंत पडली.. आणि मग शंकरने श्रीहरी आणि सुनंदाचा विवाह थाटामाटाने लावून दिला.. सुनंदा माप ओलांडून सासरी आली.. काही दिवसांनी तिलाही मग श्रीहरी सोबत मुंबईला आणण्यात आले.. सगळे जण आपपल्या मार्गी लागत होते.. संसार फुलू लागला..
कालचक्र त्याच्या गतीने फिरत होते.. प्रमोद, प्रसाद पदवीधर झाला.. सई बारावी परीक्षा उत्तीर्ण झाली.. प्रमोद स्पर्धा परीक्षा देत होता.. प्रसादला पोलीस खात्यात जायचं होतं..त्या अनुषंगाने त्याने प्रशिक्षण घेण्यास, मेहनत घेण्यास सुरुवात केली.. पोस्ट ऑफिसमध्ये सईला तात्पुरत्या तत्वावर नोकरी लागली.. कामाचा अनुभव येत गेला.. तीन चार वर्षे काम केल्यानंतर तीला त्या जागी कायम स्वरूपी कर्मचारी म्हणून नेमण्यात आलं.. प्रमोद एल आय सी मध्ये कामावर रुजू झाला.. प्रसाद पोलीस प्रशिक्षण घेऊन पोलीस खात्यात भरती झाला.. मुलं आपपल्या जागी स्थिरावली..मार्गी लागली..
शंकर पोस्ट ऑफीस मधल्या कामगार युनियनचा अध्यक्ष झाला..तो प्रभावीपणे लोकांच्या समस्या सोडवू लागला.. ओळखी वाढल्या..मोठ्या लोकांत ऊठबस सुरू झाली.. त्याला कठीण परिस्थितीत साथ देणाऱ्या 'शिकवण्या'मूळे मोठ्या घरातली श्रीमंत, सधन असलेली चांगली माणसं त्याच्याशी जोडली गेली.. आपल्या गावाकडच्या शिक्षणाची आवड असणाऱ्या मुलांचा पालक झाला..शिक्षण घेतलेल्या युवकांना त्याने मुंबईत आणलं.. काही दिवसांसाठी आपल्या घरी राहण्याची सोय केली...आणि ओळखीचा फायदा करून घेत गावाकडच्या योग्य गरजू मुलांना नोकरी मिळवून दिली.. गावी आपल्या गरीब शेतकरी भावांच्या मुलींच्या लग्नाची जबाबदारी त्याने स्वतः स्वीकारली..सर्व मुलींची लग्न लावून देऊन त्यांचे संसार फुलवले.. त्याच्या गावाकडचा समाज सुधारत होता..शिक्षण घेऊन प्रगल्भ होत होता..
शंकरचा लहान भाऊ दिनकर चेंबूरला एका झोपडपट्टी परिसरात रहात होता.. त्याला दोन मुलं झाली.. जसजशी मुलं मोठी होत होती.. शंकरची चिंता वाढत होती..मुलांना चांगले संस्कार मिळायला हवेत..चांगलं वळण लागायला हवं याकडे त्याचा ओढा होता.. शंकरने म्हाडाच्या योजनेत पैसे गुंतवले होते.. आणि देवाची कृपा झाली आणि त्याचा नंबर लागला.. अवघे दहा हजार भरायचे होते..मग शंकरने दिनकरची चेंबूर मधली झोपडीवजा खोली विकून टाकली..फक्त दोन हजार किंमत आली होती..दिनकरने ती रक्कम आपल्या भावाला शंकरला दिली..आणि मग शंकरने विक्रोळीच्या ठिकाणी 'वन रूम किचन' घर बुक केलं..आणि आपला भाऊ दिनकर, श्रीहरी यांना त्यांच्या मुलाबाळांसमवेत तिथे राहायला घेऊन आला.. सर्वजण सुखासमाधानानं राहू लागले.. थोडे दिवस मुंबईत जम बसल्यावर श्रीहरीनेही स्वतःचं घर घेतलं.. तो आपल्या बायको मुलांसमवेत नवीन घरी राहायला गेला.. तिन्ही भावांची मुंबई सारख्या शहरात स्वतःची घरं झाली होती.. सर्वजण गुण्यागोविंदाने राहत होते.. सणासुदीला गाठीभेटी होत होत्या.. दूर राहूनही मनात कायम एकमेकांच्या बद्दल प्रेम होतं.. ओल होती..
सर्व सुरळीत सुरू असतानाच नियतीने पुन्हा घात केला.. काळाने डाव साधला..
पुढे काय घडलं? पाहूया पुढील भागात...
क्रमशः
निशा थोरे..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा