लढा अस्तित्वाचा भाग १३

Ladha astitvacha

लढा अस्तित्वाचा.. भाग- १३

पूर्वाध: कथेच्या मागील भागात आपण पाहिलं की, शंकर आणि सुलक्षणा सुधाकररावांच्या घरी भाडेकरू म्हणून राहायला गेले..कमलाबाई आणि सुलक्षणा यांच्यात छान नातं निर्माण झालं.. शंकर त्या घरात भाडेकरू म्हणून राहून दहा वर्षे झाली होती..प्रमोदच्या पाठीवर शंकर आणि सुलक्षणाला तीन अपत्ये म्हणजेच अजून दोन मुले आणि एक मुलगी झाली.. गावच्या कुटुंबाकडेही शंकर लक्ष देत होता.. धाकट्या दोन बहिणींचा, आणि दिनकरचा विवाह शंकरने स्वतः करून दिला..दोघी जणी सासरी गेल्या..सुधाकररावांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांची प्राणज्योत मालवली.. आता पुढे..

लढा अस्तित्वाचा.. भाग- १३

सुधाकररावांच्या मृत्यूनंतर कमलाबाईंवर दुःखांचा डोंगरच कोसळला होता.. त्या दुःखात बुडाल्या होत्या..निराधार झाल्या.. ना स्वतःचं मुलंबाळ होतं ना माहेरचा आधार.. सुधाकररावांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आयुष्यचं रंगरूपच पालटून गेलं.. कपाळावर शोभणारं लालभडक कुंकू पुसलं गेलं होतं..पांढऱ्या फटफटीत कपाळावर हिरवं गोंदण उठून दिसत होतं.. सुधाकररावांचा अंतिम विधी झाला.. सर्वजण  घरी निघुन गेले..कमलाबाई एकट्या पडल्या होत्या.. कमलाबाईंच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न होता.. राहतं घर इतकाच आधार होता.. डोक्यावर निदान छप्पर तरी होतं.. पण त्यावरही  आता त्यांच्या सावत्र मुलांचा डोळा होता. सुधाकररावांच्या मुलांनी आईची जबाबदारी नाकारली.. त्यांना सांभाळण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला.. कमलाबाईंच्या पोटी जन्म नव्हता न घेतला..!! कुठे त्यांच्या दुधावर निपजली होती..!! मुलांनी सावत्रपणाचे रंग दाखवायला सुरवात केली..  त्यांना सांभाळण्याच्या ऐवजी उलट राहत्या घराबाहेर काढण्यासाठी ते नवनवीन कट रचू लागले.. पण शंकर मात्र कायम त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला.. 

शंकरने कमलाबाईंची जबाबदारी स्वीकारली.. आजवर सुधाकररावांनी आणि कमलाबाईंनी शंकरवर आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम केलं होतं.. मग शंकर कसा कृतघ्न होईल? घराचं भाडं त्याने स्वतःहून वाढवून कमलाबाईंना द्यायचं ठरवलं..सुलक्षणाही कमलाबाईंना आधार देत होती.. त्यांची काळजी घेत होती.. कमलाबाईंच्या सावत्र मुलांना ही गोष्ट खपत नव्हती..त्यामुळे कमलाबाईंचा महत्वाचा आधार असलेल्या  शंकरला त्रास द्यायला सुरुवात केली.. "खोली खाली कर नाहीतर जीवे मारून टाकू" धमक्या यायला सुरुवात झाली.. पण शंकर डगमगला नाही.. सुलक्षणा घाबरली..आपल्या नवऱ्याच्या जीवाला काही होणार नाही न? या चिंतेने तिला ग्रासलं होतं.. ती नेहमी  काळजीत राहू लागली.. पण शंकर खूप धीराचा होता.. प्रत्येक संकटाला तोंड देत होता.. 

सुधाकरराव खाजगी कंपनीत काम करत होते.. सुधाकररावांची सोसायटी रक्कम कंपनीत ठेव म्हणून होती.. ती रक्कम होती 'अठेचाळीस हजार फक्त'.., आणि आता त्यांची मुलं त्या पैशावर आपला हक्क सांगत होती.. कंपनीचे अधिकारीही पेचात पडले होते.. त्यांनी सुधाकररावांच्या मुलांना आणि कमलाबाईना कंपनीत भेटायला बोलावले.. शंकर आणि कमलाबाई कंपनीत गेले..  सुधाकररावांच्या मोठ्या मुलाने कंपनीच्या मालकाला स्पष्ट सांगितलं होतं," ही आमची आई नाही.. आमच्या वडिलांनी ठेवलेली बाई आहे.. त्यामुळे राहत्या घरावर आणि वडिलांच्या संपत्तीवर आमचा अधिकार आहे" 

त्याचे शब्द कानावर पडताच कोणीतरी कानात गरम शिसे ओतत आहे की काय..!!  वीज चमकावी आणि त्यात भस्मासात व्हावं..! असं कमलाबाईंना वाटून गेलं.. डोळ्यांत पाणी दाटून आलं.. शंकर रागाने लालबुंद झाला..एका स्त्रीचा अपमान होता.. एका निराधार स्त्रीवर अन्याय होत होता.. कोणास ठाऊक कोणती दिव्य शक्ती शंकरच्या अंगात संचारली होती..! या अन्यायाविरुद्ध लढण्याचं बळ आलं होतं..! शंकर ठामपणे कमलाबाईंच्या बाजूने उभा राहिला.. हीच किमया होती शिक्षणाची.. आजवर मिळवलेल्या ज्ञानाची.. त्या शिक्षणातून आलेल्या प्रगल्भतेची.. कायम स्त्रियांना तुच्छ लेखणाऱ्या समाजाविरुद्ध बंड पुकारण्याची.. स्त्रियांना सुद्धा मन असतं, भावना असतात ही शंकरला आलेली समज, स्त्री पुरूष समान वागणूकतेची जाण आली ती केवळ शिक्षणामूळेच.. तो कमलाबाईंच्या हक्कासाठी लढला.. पण तरीही स्त्री म्हटलं की दुसरं काहीच मिळालं नाही की मग हाच समाज तिच्या चारित्र्यावर घाला करतो.. मग ती कमकुवत होते.. हे समाजाने पक्कं ओळखलं होतं.. मग काय.!! त्यांनीही तेच केलं सुधाकररावांच्या धाकट्या मुलाने कमलाबाईंच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायला सुरवात केली अर्वाच शिव्या दयायला सुरुवात केली..," हा कोण आहे आमच्याबद्दल बोलणारा? याचा काय संबंध ह्या बाईशी? काहीतरी असल्याशिवाय का कोणी इतकं करतं?मी सांगतो साहेब,नक्कीच यांचं लफडं आहे..या माणसाला आमचं घर बळकावायचं आहे म्हणून त्याने ह्या बाईला फितूर केलंय." तो असाच कितीतरी वेळ बरळत होता..सगळे तोंडाकडे पाहत होते..कमलाबाई तर पुरत्या कोसळल्या.. शंकर आणि त्यांचे अनैतिक संबंध..!!

हे सगळं ऐकण्यापेक्षा मरण बरं असं वाटू लागलं..त्या रडू लागल्या.. माय लेकांच्या नात्याला लोकांनी कलंकित करायला सुरुवात केली..शंकर स्तंभित होऊन पाहू लागला.. मनात विचारधारा बरसू लागल्या,'ज्या स्त्रीला मातेचा दर्जा दिला..दिवंगत सुधाकररावांना पितासमान मानलं.. त्यांच्या बद्दल इतकी नीच विचारसरणी..का?? रक्ताचं नातं नाही म्हणून?? इतकं महत्वाचं आहे ते? एखाद्या स्त्रीचा हक्क डावलण्यासाठी थेट तिच्या चारित्र्यावर घाला? वर्षानुवर्षे हेच होत आलंय.. स्त्री कायम शोषितच..कायम पीडितच.. पण मी असं होऊ देणार नाही..मी हा अन्याय होऊ देणार नाही.. मी त्यांना न्याय मिळवून देणार..काहीही झालं तरी..!!'  स्वतःच्याच तंद्रीत, विचारात तो गुंग होता..

कंपनीच्या मालकाने शंकरकडे पाहिलं..शंकरच्या चेहऱ्यावर उफाळून आलेला राग, चीड संताप  स्पष्ट दिसत होता.. पण शंकरने शांतपणे थोडा विचार करून बोलायला सुरवात केली," साहेब, मी आणि माझे कुटुंब कमलाबाईंच्या घरी गेली दहा वर्षे झाली भाडेकरू म्हणून राहतोय.. माझी वागणूक, माझ्या चारित्र्याचं प्रमाणपत्र देण्याची मला गरज नाही.. पण तरीही तुमच्या शंकेच्या निरसनासाठी तुम्ही आमच्या शेजारी राहणाऱ्या लोकांना विचारू शकता..दुसरी गोष्ट कमलाबाई, एक निराधार स्त्री आहे म्हणून तिची अशा रीतीने कुचंबणा करण्यात येत आहे.. त्या सुधाकररावांच्या धर्मपत्नी आहेत.. तुम्ही त्यांच्या गावी राहणाऱ्या नातेवाईकांना विचारू शकता..जर सुधाकररावांच्या पहिल्या पत्नी हयात असत्या तर सुधाकररावांच्या पश्चात त्यांचा वारसदार म्हणून सुधाकररावांच्या मिळकतीवर त्यांच्या पत्नीचाच अधिकार असला असता म्हणून त्याच नियमाने आताही कमलाबाईंचाच अधिकार आहे..तरी ती रक्कम त्यांनाच मिळायला हवी.. आपला कायदा तेच सांगतो." शंकरचा प्रभावी पवित्रा पाहून सुधाकररावांची मुलं थोडी वरमली.. शंकरच्या शब्दांचा प्रभाव कंपनी मालकांवरही पडत होता..त्या सर्वांना त्याचं म्हणणं पटलं.. मग कंपनीच्या मालकांनी यावर एक तोडगा काढला.. रुपये तीस हजार कमलाबाईंना आणि नऊ हजार रुपये प्रत्येकी दोन्ही भावाना देऊन टाकले.. दोन्ही भावानी थोडी कुरकुर केली.. पण कंपनीच्या मालकांचं ऐकल्याशिवाय गत्यंतर नव्हतं..'हेही नसे थोडके' असं म्हणत त्यांनी ती रक्कम स्वीकारली..

सत्याचा विजय झाला होता.. शंकरने पहिल्यांदा अन्यायाविरुद्ध आवाज उठवला होता..  शिक्षण असण्याचं महत्त्व त्याला समजून चुकलं होतं.. शंकर आणि कमलाबाईंच्या आनंदाला पारावार उरला नाही.. आपली रक्कम स्वीकारली आणि ते कंपनीबाहेर पडले...

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात...

क्रमशः

निशा थोरे..

🎭 Series Post

View all