Oct 22, 2020
स्पर्धा

लढा अस्तित्वाचा भाग १२

Read Later
लढा अस्तित्वाचा भाग १२

लढा अस्तित्वाचा.. भाग- १२

 

पूर्वाध: कथेच्या मागील भागात आपण पाहिलं की, शंकरला मुलगा झाला..मुलाचं नाव प्रमोद ठेवण्यात आलं..संसाराला सुरुवात झाली होती..आणि आता शंकरची जबाबदाऱ्या सुद्धा वाढल्या होत्या.. शंकरने गावावरून आपल्या भावाला दिनकरला मुंबईत आणलं.. त्याला त्याच्या योग्यतेचं काम पाहून दिलं.. त्यानंतर सुलक्षणाच्या माहेरी त्या लहान खोलीत पाच कुटुंबं एकत्र राहणं शक्य नव्हतं.. त्यामुळे शंकर आपल्या परिवारासमवेत जवळपासच भाड्याने खोली घेऊन राहू लागला.. आता पुढे..


 

लढा अस्तित्वाचा.. भाग- १२

 

शंकर आपल्या कुटुंबासमवेत सुधाकररावांच्या भाड्याच्या घरात राहायला आला.. शंकरने आपली पत्नी सुलक्षणा मुलगा प्रमोद आणि दिनकर सोबत नवीन घरात नवा शुभारंभ केला.. रोजचा दिनक्रम सुरू झाला.. दिनकर कंपनीत कामाला जाऊ लागला.. शंकर पोस्टातली नोकरी करून शिकवण्या घेण्यासाठी जाऊ लागला.. त्याच्या शिकवण्याचा प्रभाव मुलांवर पडत गेला.. विद्यार्थी चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होत होते.. पालकांचाही त्याच्यावर विश्वास बसू लागला.. छान जम बसला होता..शिकवणीच्या मुलांची संख्या वाढत होती.. माजगावमधल्या माणकेश्वर परिसरपासून ते वाडीबंदर नाका ,ताडवाडी लवलेनपर्यंत शंकरच्या शिकवण्याची ख्याती पसरली.. शंकर  पायी चालत प्रत्येक घरी जाऊन शिकवत असे.. मग नंतर शंकरने आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेत आणि महागाई  पाहता 'शिकवणी फी' वाढवली.. पूर्ण माजगाव परिसरात शंकर आता उत्तम शिक्षक म्हणून ओळखला जावू लागला.. सर्वजण त्याला 'शंकर मास्तर' म्हणू लागले.. 

 

सुलक्षणाही त्या जागेत छान रुळली होती..कमलाबाईंशी तिची छान गट्टी जमली होती.. कमलाबाईंशी बोलता बोलता सुलक्षणाला समजलं की, कमलाबाई सुधाकररावांची दुसरी पत्नी होती.. पाच वर्षांपूर्वी सुधाकररावांची पत्नी दुर्धर आजाराने मरण पावली..दोन मोठी मुलं होती त्यांना.. पण दोघेही आपपल्या संसारात, स्वतःच्या व्यापात व्यस्त.. दोघांची स्वतःची घरं होती.. कुटुंबं होती.. दोघेही चांगल्या ठिकाणी नोकरीला होते.. अगदी सधन कुटुंब.. त्यांच्या पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर सुधाकरराव एकटे पडले होते.. मुलांनी सुधाकरला घरी घेऊन जाऊन  खोली विकून पैसे गडप करण्यासाठी चंग बांधला होता.. पण सुधाकररावही खमके होते.. ते काही कोणाला बधले नाहीत.. ते खोली विकण्यास नकार दिला आणि ते एकटेच राहू लागले.. पण मग त्यांच्या जेवण्याचे हाल होऊ लागले.. मग कोणीतरी जवळच्याच नातेवाईकांनी कमलाबाईंचं स्थळ सुचवलं.. कमलाबाई सुधाकर रावांपेक्षा निम्या वयाच्या होत्या.. खूपच लहान होत्या पण कमलाबाई गरीब, निराधार होत्या.. पोटाला जेवण आणि राहायला आसरा इतकीच अपेक्षा होती.. आणि मग त्याही एका बीजवराशी लग्न करायला तयार झाल्या.. खूप साध्या पद्धतीने त्यांचा विवाह संपन्न झाला.. दोघे उर्वरित आयुष्य सुखा समाधानाने व्यतीत करू लागले... कामलाबाईनी मुलांशी प्रेमाने वागण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांच्या मुलांनी कधीच कमलाबाईना आईच्या रुपात स्वीकारलं नव्हतं.. कमलाबाईना मूल- बाळ नव्हतं..घरात शंकरच्या रूपाने सुधाकर आणि कमलाबाईंना एक मुलगा, सुलक्षणाच्या रुपात सून आणि प्रमोदच्या रूपाने नातू मिळाला होता..अवघ्या घराचं अगदी नंदनवन झालं होतं.. सर्वजण आनंदात होते. पण अजूनही शंकरच्या वाट्याचा संघर्ष संपला नव्हता.. खूप काही सोसायचं होतं..खूप काही भोगायचं होतं.. अस्तित्वाचा लढा संपला नव्हता.. 

 

मुंबईत शंकरच्या कामाचा व्याप वाढत होता.. दोन प्रपंच संभाळायचे होते..सर्व भागवता भागवता जीव मेटाकुटीला यायचा.. पण तरीही शंकर काटकसरीने रहात होता.. कुटुंबालाही तीच शिस्त होती.. त्याचं एकच तत्व होतं.. "आपण जर  दहा रुपये कमवत असू तर निदान दोन रुपयांची तरी बचत असायला हवी.." भविष्यातील अडीअडचणींत कामी यावेत म्हणून ती एक तरतूद..गरिबीनं कंबरडं मोडलं होतं.. तरी शंकरने धीर सोडला नव्हता.. प्रमोद हळूहळू मोठा होत होता.. तिथल्याच जवळच्या शाळेत जाऊ लागला होता.. बघता बघता तब्बल दहा वर्षे लोटली होती.. प्रमोदच्या पाठीवर शंकर आणि सुलक्षणाला अजून तीन मुलं झाली.. दोन मुलगे आणि एक मुलगी.. प्रमोद,प्रसाद आणि प्रशांत या तीन भावात एक बहीण.. शंकरने तिचं सई नाव ठेवलं..गोड गोजिरी 'सई'..शंकरच्या काळजाचा  तुकडा.. तिच्या येण्याने शंकरच्या जगण्याला अर्थ प्राप्त झाला होता..मुलं मोठी होतं होती.. शंकर दिवस रात्र कष्ट करत होता.. पहाटे पाच वाजता कामानिमित्त घराबाहेर पडणारा शंकर रात्री अकरा  वाजता घरी परतायचा.. मुलांचीही भेट व्हायची नाही..सुलक्षणाने मात्र मुलांची जबाबदारी उत्तम रीतीने सांभाळली होती..त्यांच्या पालनपोषणात, मुलांच्या शाळा, पालकसभा, त्यांना हवं-नको सारं तिने निभावून नेलं होतं.. त्यामुळे शंकरला कधी मुलांची जास्त काळजी करावी लागली नाही..

 

शंकरला आपल्या आईवडिलांना, भावंडांना सुद्धा पाहायचं होतं.. शंकरने आपल्या धाकट्या बहिणींची योग्य स्थळ बघून लग्न लावून दिली..बहिणी सासरी गेल्या..नंतर दिनकरचं सुद्धा लग्न शंकरनेच करून दिलं.. अजून एक धाकटा भाऊ श्रीहरी शाळा शिकत होता.. त्याच्या शिक्षणासाठीही शंकर पैसे पाठवत असे.. सर्वाना घेऊन पुढे जायचं होतं.. शंकरने आपल्या आईवडिलांची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती..संपूर्ण घराण्यात शंकर पहिला आणि एकमेव शिकलेला मूलगा होता.. त्याच्यामूळे संपुर्ण घर सुशिक्षित होणार होतं.गरिबीच्या, दुःखाच्या दलदलीतून बाहेर पडणार होतं.. त्यामूळे शंकरवर साऱ्यांचीच भिस्त होती.. घरात सर्वजण शंकरला आदराने वागवत होते.. घरात त्याचा शब्द कोणीच खाली पडू देत नसत.. शंकरने तितका दबदबा निर्माण केला होता.. आपल्या कर्तृत्वाने सर्वांच्या मनात ते स्थान, ती जागा मिळवली होती..शंकर एक एक कर्तव्य बिनचूक, बिनतक्रार पार पाडत होता..प्रत्येक महिन्यात गावाकडे स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन आईवडिलांना उदरनिर्वाहासाठी पैसे पाठवत होता.. कधी कधी सुलक्षणा चिडायची.. रागावायची.. "किती कष्ट करता..!!जीवाला खात जा.. सर्वांसाठी झटता.. कधी स्वतःकडे पण बघा.." ती बडबड करत राहायची.. शंकर फक्त स्मित हास्य करत विषय टाळायाचा..तिला समजावायचा..,"आपण मोठे आहोत.. आईवडिलांची सर्व जबाबदारी आपलीच.. आपल्याशिवाय कोण आहे त्यांना??सगळे शिकले सवरले तर आपल्याच घराचं नाव मोठं होईल ना..!!" नेहमीच अशी चर्चा घरात सुरू असायची..आणि मग "तुमचंच बरोबर" म्हणून सुलक्षणा हसून माघार घ्यायची.. 

 

सुधाकरराव आणि कमलाबाईंच्या समवेत छान सुरळीत दिवस सरत होते..शंकरने कधीच त्यांना त्यांच्या मुलांची उणीव भासू दिली नाही.. आपल्या आईवडिलांसारखीच त्यांची तो सेवा करत असे..पुढे जिव्हाळा वाढला..नातं दिवसागणिक दृढ होतं गेलं.. दोघेही शंकरलाच आपला मुलगा मानू लागले.. पुढे पुढे घरमालक- भाडेकरू हा भेद मिटत चालला होता.. कमलाबाई आणि सुलक्षणा समवयस्क असल्याने दोघी एकमेकींत छान रुळल्या होत्या..मैत्रिणी झाल्या होत्या.. सुधाकररावही आपल्या पत्नीला आनंदात पाहून खुश होते..

 

सारं छान सुरळीत चालू असताना एक दिवस नियतीने घात केला..काळाने झडप घातली.. सुधाकररावांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला..आणि जागच्या जागीच त्यांची प्राणज्योत मालवली.. कमलाबाई पूर्णपणे कोसळून गेल्या.. आयुष्यभरासाठी साथ देण्याची वचनं देताना सुधाकरराव अचानकपणे निघून गेले होते..कमलाबाई निराधार झाल्या..

 

पुढे काय होतं..? पाहूया पुढील भागात..

 

क्रमशः

निशा थोरे..