Login

लढा अस्तित्वाचा भाग ११

Ladha astitvacha

लढा अस्तित्वाचा.. भाग- ११

पूर्वाध: कथेच्या मागील भागात आपण पाहिलं की, शंकरच्या वेशभूषेवरून त्याला शिपाई समजून पोस्टाच्या 'डिलिव्हरी डिपार्टमेंट'या विभागात काम करण्यास सांगितले

नंतर तो क्लार्क असल्याचे समजल्यावर त्याचा टेबल खुर्ची देण्यात आले.. साहेब म्हणून सर्वजण ओळखू लागले.. पैशांची चणचण होती म्हणून शंकरने कामाच्या व्यतिरिक्त शिकवण्या घ्यायला सुरुवात केली.. आणि आपली व आपल्या कुटुंबाची उपजीविका करू लागला..त्यातच सुलक्षणा आई झाली तिने एका मुलाला जन्म दिला.. आता पुढे..

लढा अस्तित्वाचा.. भाग- ११

शंकर आणि सुलक्षणाला मुलगा झाला..गावी निरोप पोहचला..सर्व कुटुंबियांना खूप आनंद झाला..शंकरची जबाबदारी मात्र आता वाढली होती.. शंकर आणि सुलक्षणा आपल्या मुलाला घेऊन गावी आले..शंकरच्या आईवडिलांना नातवाचं तोंड पाहायचं होतं.. छान बारसं करण्यात आलं आणि मुलाचं नाव 'प्रमोद' ठेवण्यात आलं..बाळाच्या नाजूक पावलांनी 'आनंद' घरी आला होता.. म्हणूनच आत्यानी मिळून त्याचं नाव 'प्रमोद' ठेवलं.. शंकरचं शिक्षण झालं.. नोकरी मिळाली.. लग्न झालं.. मुलगा झाला शंकरचं कुटुंब झालं.. खरंतर शंकरने स्वतः पुरता स्वार्थी विचार केला असता तर..!! तो स्थिरावला होता..सरकारी नोकरी, पत्नी ,एक मुलगा  सारं काही होतं.. पण मग असा स्वार्थी माणूस 'युगपुरुष' कसा ठरेल? जो एकटाच यश संपादन करतो  तो योद्धा होऊ शकतो पण जो सर्वाना घेऊन विजयी होतो.. सर्वांना विजयी करतो तोच खरा राजा.. मनावर राज्य करणारा.. शंकर असाच एक राजा होता.. सर्वांच्या मनावर राज्य करणारा.. कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या सुखासाठी धडपडणारा.. त्यांच्या आनंदासाठी जीवाचं रान करणारा.. 

शंकरच्या वाटेवरची अग्निफुले अजून तशीच विखुरली होती.. तो रक्तबंबाळ प्रवास अजून संपलेला नव्हता.. शंकर गावाला गेला होता तेंव्हा त्याच्या वडिलांनी, गेणूने शंकरला त्याच्या धाकट्या भावाबद्दल, दिनकर बद्दल सांगितलं होतं.. दिनकर अभ्यासात कच्चा होता..चौथीतूनच शाळा सोडून दिली होती.. जनावरांना घेऊन रानावनात भटकत असे.. दिवसभर उनाडक्या करत, गावातल्या लोकांशी वाद घालत असे.. हाणामाऱ्या करत असे.. कुटुंबातले सर्वजण त्याच्या वागण्याने त्रस्त झाले होते.. आई मात्र कायम त्याला आपल्या पदराआड घ्यायची.. आईची माया..!! मुलगा कितीही खोडकर असला तरी आईसाठी प्रियच असतो.. गेणूला वाटलं घरापासून दूर राहील तर थोडं व्यावहारिक ज्ञान येईल.. समाजात वावरण्याची समज येईल.. गेणू शंकरला म्हणाला,"  बा शंकर..!! तू दिनकरला मुंबईला घेऊन जा.. तिथेच एखादी नोकरी बघून त्याला मार्गी लाव..इथं लय उनाडक्या करत फिरतोय तो.. तुला जरा घाबरतो..तुझ्या शब्दाबाहेर नाही जायचा..बघ तेवढं काय जमतंय का?" शंकर विचारात पडला.." एवढ्या छोट्या खोलीत आमच्या दोघांनाच जागा होत नाही तर  दिनकर कसा आणि कुठे राहील..? " थोडा वेळ विचार केला आणि "बघू पुढे होईल तसं..!!" असं मनाशीच ठरवून तो दिनकरला मुंबईला घेऊन आला.. 

मुंबईला आपल्या पत्नीच्या सुलक्षणाच्या घरी राहणं आता कठीण होऊ लागलं होतं.. लहान बाळाला घेऊन बाहेर झोपणं शक्य नव्हतं..आणि आता दिनकरची भर पडली होती..चौथी पास दिनकर..!! कसा निभाव लागणार होता..? पण दिनकरला आपल्या भावावर, शंकरवर प्रचंड विश्वास होता.. त्याच्या ठायी श्रद्धा होती.. "आपला मोठा भाऊ वडिलांच्या जागी आहे..त्याचा शब्द आपल्यासाठी जीव की प्राण..!!" दिनकर त्यांच्या सोबत राहू लागला.. रात्रीच्या वेळेस रस्त्याच्या कडेला काही पावडर वाहतुकीचे ट्रकड्रायव्हर आपले ट्रक लावून विश्रांती घेत असत..दिनकर त्या ट्रक मध्ये जाऊन झोपू लागला.. सकाळच्या वेळेत पावडरच्या गोण्या चढवू उतरवू लागला..त्यात त्याला थोडे पैसे मिळू लागले होते.. पण आपल्या भावाला वाईट वाटेल.. त्याला त्रास होईल म्हणून त्याने घरात याविषयी कोणालाच काही सांगितले नव्हते.. 

एक दिवस  गोण्या चढ-उतार करताना दिनकरचा हाताला मार बसला.. उजव्या हाताचा अंगठा खूप सुजला होता.. खूप ठणकत होता..सुलक्षणा दिनकरला घेऊन दवाखान्यात आली.. डॉक्टरांनी त्याचं बोट पाहिलं.. जखम चिघळली होती.. त्याला धनुर्वाताचं इंजेक्शन द्यावं लागणार होतं.. सुलक्षणाला बाहेर बसायला सांगून डॉक्टरांनी दिनकरच्या बोटावर उपचार करायला सुरवात केली..जखम स्वच्छ करत असताना डॉक्टरांनी दिनकरला विचारलं," कुठे काम करतोस? काय लागलं बोटाला?" दिनकरला लहानपणाची  आईने सांगितलेली गोष्ट आठवली..एकदा गावी असताना आई दवाखान्यात घेऊन गेल्यावर म्हणाली होती," डॉक्टर म्हणजे देवच.. त्यांच्या पासून काही लपवू नये.. खरं नाही सांगितलं तर ते उपचार कसं करणार?" मग दिनकरने आपली सगळी कर्मकहाणी डॉक्टरांना सांगितली.. डॉक्टरांनी सुलक्षणाला आत बोलावून घेतलं..तिला दिनकरने सांगितलेली गोष्ट सांगत ते म्हणाले," याला धनुर्वाताचं इंजेक्शन द्यावं लागेल.. नाहीतर याचा दुष्परिणाम होऊन विष पसरेल.." सुलक्षणा अवाक झाली तिला दिनकरच्या कामाबद्दल काहीच माहित नव्हतं.. योग्य तो औषधोपचार करून सुलक्षणा आणि दिनकर घरी आले..  शंकर शिकवण्या करून घरी आला.. आणि सुलक्षणाने दिनकरच्या कामाबद्दल त्याला सांगितलं.. त्याला झालेल्या इजेविषयी सांगितलं.. शंकरच्या डोळ्यात पाणी आलं.. आपल्या भावाला भोगाव्या लागणाऱ्या हालअपेष्टा पाहून तो व्यथित झाला.. भावासाठी दुसरं एखादं काम पाहिलं पाहिजे.. तो विचार करू लागला..

शंकरच्या पोस्टात एका कंपनीचे मालक पोस्टाच्या कामानिमित्त नेहमी यायचे.. शंकरची आणि त्यांची छान ओळख झाली होती.. त्यांचं काम झालं की ते शंकरला त्या कामाचं बक्षीस देऊ करायचे.. शंकर कधीच बक्षीस घ्यायचा नाही.. "मला माझ्या कामाचा मोबदला मिळतो..महिन्याला पगार मिळतो त्यात मी आनंदी आहे..बिनाकष्टाचा पैसा मला नको" मनाशीच निर्धार करून तो ठामपणे नकार द्यायचा.. त्या साहेबांनाही शंकरच्या प्रामाणिकपणाचं कौतुक वाटायचं.. त्या दिवशीही ते साहेब पोस्टात आले होते..शंकरने हात जोडून त्यांना नमस्कार करत विनंती केली," साहेब तुम्ही मला जे पैसे देता ते नकोय मला.. फक्त एक मेहरबानी करू शकाल का?  माझ्या भावासाठी तुमच्या कंपनीत कामाला ठेवून घ्याल?" साहेबांनी शंकरकडून दिनकरची सर्व माहिती घेतली आणि 'कंपनीत भेटायला या' म्हणून सांगितलं.. शंकरने मनापासून त्यांचे आभार मानले.. भावाला ते गोण्या उचलण्याचं काम करावं लागणार नाही.. चांगली नोकरी मिळेल..दिनकर मार्गी लागेल.. या कल्पनेने तो थोडा सुखावला..

दुसऱ्या दिवशी शंकर साहेबांनी दिलेल्या पत्त्यावर "बॉम्बे मेटल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी.,रे रोड., मुंबई या कंपनीच्या गेटवर पोहचला.. सुरक्षारक्षकाने चौकशी करून आत जायला सांगितले.. शंकर स्वागतिका कक्षात बसून राहिला.. साहेबांनी आत बोलावलं..ते म्हणाले," तुमचा भाऊ फक्त चौथी शाळा शिकलेला आहे..त्यामुळे मजूर कामगार म्हणून मी त्याला कामाला ठेवू शकतो..दर आठवड्याला चाळीस रुपये पगार मिळेल.. तुम्ही आधी' उत्पादन विभाग' बघून घ्या..आमची कंपनी शिसे, तांबे वितळवून विमानाचे भाग , रेल्वेचे चक्र उत्पादन करणारी कंपनी आहे.. ,तुमचा भाऊ या विभागात काम करू शकेल का?ते बघा.. आणि होकार असेल तर उद्याच त्याला सर्टिफिकेट सोबत घेऊन कामाला पाठवून द्या"  शंकर उत्पादन विभाग पाहता पाहता विचार करू लागला.. "चौथीतून शाळा सोडलेल्या मुलाला मुंबईत कशी नोकरी मिळणार? गोण्या उचलण्यापेक्षा हे काम ठीक.. कायमस्वरूपी नोकरीची हमी राहील.." आणि शंकरने मग सारासार विचार करून साहेबांना होकार कळवून टाकला..

दुसऱ्या दिवसापासून दिनकर शंकरने सांगितलेल्या कंपनीत कामावर जाऊ लागला.. आणि निवृत्तीपर्यंत तो त्याच ठिकाणी काम करत राहिला..आपल्या भावाने साहेबांना दिलेला शब्द त्याने त्याच्या कामाच्या निवृत्तीपर्यंत पाळला.. प्रामाणिकपणे नोकरी करत राहिला.. 

शंकरने आपल्या भावाच्या, दिनकरच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटवला होता..आता प्रश्न होता सर्वांच्या राहण्याचा.. शंकरने दुसरीकडे राहायला जाण्याचा निर्णय घेतला. आणि तो राहण्यासाठी त्याच्या नियोजनात बसणारी भाडेतत्वावर कोणी खोली देतंय का ते शोधू लागला.. मुंबई सारख्या शहरात राहायला भाड्याने खोली मिळणं म्हणजे निव्वळ अशक्य..  पण शंकरने प्रयत्न सोडले नाही..तो प्रयत्न करत होता..

खोलीच्या शोधात असताना काही दिवसांनी शंकरच्या पोस्टातल्या एका मित्राच्या ओळखीने त्यांच्या जवळपास एका चाळीत एक खोली मिळाली.. शंकरच्या मित्राने  घर मालकाशी जुजबी बोलणं करून घेतलं आणि "संध्याकाळी  खोली पाहण्यासाठी माझ्या मित्राला घेऊन येतो.." असं सांगून त्यांचा निरोप घेतला.. दुसऱ्या दिवशी शंकर आणि शंकरचा मित्र खोली पाहण्यासाठी आले.. घरमालकांशी ओळख झाली.. सुधाकरराव आणि कमलाबाई हे दाम्पत्य तिथे फार वर्षांपासून तिथे राहत होते.. त्यांच्या दोन खोल्या होत्या एक खोलीत ते स्वतः राहत होते आणि दुसऱ्या खोली भाडेकरूंसाठी राखून ठेवली होती.. शंकरला खोली पसंत पडली.. खोलीचं भाडंही त्याच्या आवाक्यात होतं..आणि त्याला त्याच्या कामाच्या ठिकाणापासून जवळ होतं.. आणि त्याला शिकवण्याही करू शकणार होता..  त्यामूळे लगेच दुसऱ्याच दिवशी तो आपल्या कुटुंबाला घेऊन राहण्यासाठी आला.. दिनकर आपल्या भावासोबतच राहत होता.. डोक्यावर भाड्याचं का असेना पण छप्पर होतं.. शंकरने सुटकेचा निश्वास टाकला.. 

पुढे काय होतं..? पाहूया पुढील भागात..

क्रमशः

निशा थोरे..

🎭 Series Post

View all