लढा अस्तित्वाचा.. भाग- १०
पूर्वाध: कथेच्या मागील भागात आपण पाहिलं की, शंकर पोस्ट खात्यात सरकारी नोकरी लागली.. आईवडिलांचं स्वप्नं पुर्ण झालं होतं.. सुलक्षणाला घेऊन शंकर नोकरीसाठी मुंबईत आला..मुंबईच्या वातावरणात तग धरून राहणं कठीण होतं.. सुरुवातीच्या दिवसात शंकर सुलक्षणासोबत तिच्या माहेरी राहिला..कामावर रुजू झाल्यावर त्याची ग्रामीण वेशभूषा पाहून त्याला 'डिलिव्हरी डिपार्टमेंट' मध्ये टाकण्यात आले.. आता पुढे..
लढा अस्तित्वाचा.. भाग- १०
हळूहळू शंकरला मुंबईच्या धकाधकीच्या जीवनाची सवय होऊ लागली होती..पहाटे सहा ते दुपारी दोन अशी पोस्टाच्या कार्यालयाची वेळ होती.. शंकर खूप लवकर उठत असे..प्रातःविधी उरकून थंड पाण्याने स्नान करत असे.. लवकर तयार होऊन शंकरला घरातून पहाटे पाच वाजता निघावं लागे.. पोस्ट ऑफिसमध्ये पोहचल्यावर सकाळी सात वाजता मेल मोटार यायची.. शंभर- दीडशे मोठ्या पिशव्या गाडीतून खाली ओढायच्या.. 'डिलिव्हरी विभागात' आणायच्या.. पत्रांची बंडलं वेगळी करायची..पोस्ट कार्ड, पोस्ट पाकीट, आंतरदेशीय पत्र, वेगवेगळी करायची.. पोस्ट पिनकोड नंबर प्रमाणे वेगळी करून त्या त्या कप्यात ठेवायची पुन्हा वेगळी केलेली सगळी बंडलं पिशवीत भरून त्या त्या परिसरानुसार पिशव्यांना सील करायचं.. आणि त्या पिशव्या पुन्हा ओढून मेल गाडीत भरून ठेवायचं.. असं सगळं शंकरच्या कामाचं स्वरूप होतं.. एकतर गावाकडून आलेला, कुस्ती खेळून कमावलेलं शरीर, त्यामुळे सर्वजण सगळी अवजड कामे शंकरला सांगू लागले.. रोजचा दिनक्रम सुरू झाला..
दिवसांमागून दिवस सरत होते.. पंधरा-वीस दिवस उलटून गेले.. शंकर तिथेच 'डिलिव्हरी डिपार्टमेंट' मध्ये काम करत होता..आणि आज पगार वाटपाचा दिवस होता.. सारेजण पगार घेण्यासाठी एका रांगेत उभे राहिले.. खिडकीतून एक क्लार्क नीट पैसे मोजून, पगार दिल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांची यादीत सही घेत होता.. एक एक जण पगार घेऊन, यादीत आपल्या नावासमोर सही करून पुढे जात होते.. सर्वांना पगार देऊन झाला.. पण शंकरचा नंबर आलाच नाही..त्याने क्लार्कला विचारले," माझा पगार? मला तुम्ही पगार घेण्यासाठी बोलावलं नाही?" खिडकीतून डोकावणाऱ्या शंकरकडे क्लार्कने आपल्या चष्मा खाली सरकवत एक कटाक्ष टाकला.. पुन्हा पगाराची यादी चाळून पाहिली.. पुन्हा पुन्हा तपासून पाहिली.. पण यादीत शंकरच्या नावाची नोंद नव्हती.. त्याने शंकरला त्याच्या वरच्या मोठ्या साहेबांकडे जायला सांगितलं..सर्व कर्मचारी आणि शंकर मोठ्या साहेबांकडे गेले..त्यांना घडलेला सारा वृतांत सांगितला.. साहेबांनी यादी तपासून पाहिली.. शंकरची रुजू झाल्याची सगळी कागदपत्रे पाहिली.. त्यांना आश्चर्य वाटले..ते म्हणाले," अरे ही यादी 'पोस्ट डिलिव्हरी कर्मचाऱ्यांची.. या यादीत शंकरचं नाव कसं असेल? शंकरची नेमणूक क्लार्क म्हणून झाली आहे..क्लार्क कर्मचाऱ्यांची यादी वेगळी.. त्यात नाव आहे.." साहेबांचं बोलणं ऐकून सारे कर्मचारी चपापले.. शंकर डिलिव्हरी बॉय, पिशव्या ओढणारा शिपाई नव्हता.. तो क्लार्क होता..त्या सर्वांचा साहेब होता.. आता मात्र शंकरच्या पक्कं ध्यानात आलं.. वेशभूषा खूप परिणामकारक असते.. त्यावरून लोकं आपल्याला वागणूक देत असतात..आज एक नवीन अनुभव.. जीवनाच्या विद्यालयात एक नवीन धडा तो शिकला होता..
दुसऱ्या दिवशी मात्र शंकरला टेबल खुर्ची देण्यात आली.. सारेजण नमस्कार करू लागले.. आदराने बोलू लागले.. 'शंकर साहेब' म्हणून आवाज देऊ लागले.. आता त्याची ग्रामीण वेशभूषा बदली होती.. पांढरा सदरा, लेंहंगा,गांधी टोपी जाऊन त्याची जागा सफारी ड्रेसने घेतली होती.. शर्ट-पॅन्टने घेतली होती..आता शंकर शिपाई नव्हता.. पोस्ट ऑफिसमधला 'साहेब' होता.. दुसऱ्या दिवशी शंकरचा पगार हाती येणार होता...आणि शंकरचा पहिला पगार मिळाला.. त्याचा पहिला पगार होता रुपये एकशे दहा फक्त.. शंकरची आयुष्यातली पहिली कमाई.. पगाराचं पाकीट त्याने जपून पेटीत तसंच ठेवलं.. दोन महिन्यांनी शंकर दोन दिवसांची सुट्टी काढून आईवडिलांना भेटायला गावी आला.. आपल्याला मुलाला समोर पाहून आईवडिलांना खूप आनंद झाला.. परक्या शहरात माझा मुलगा सून कसे राहत असतील? या विचारांनी दोघांच्याही डोळ्यांत पाणी आलं.. मुलाला सुखरूप पाहून त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.. गावी आल्यावर शंकरने आपला पहिला पगार आपल्या वडिलांच्या हाती दिला.. आपल्या मुलाची ती पहिली कमाई पाहून गेनूचे डोळे पाण्याने डबडबले..आईलाही गहिवरून आलं.. आपल्या मुलांनं आपल्या कष्टाचं चीज केलं..मुलाने आपलं, आपल्या घराण्याचं नाव काढलं.. गेणूने देव्हाऱ्यात देवापुढे पगाराचं पाकिट ठेवलं..देवापुढे दिवा लावला..मनोमन देवाचे आभार मानले..दोन दिवस आईवडिलांच्या प्रेमात नाहून घेतलं.. आणि मग त्यांचा निरोप घेऊन तो मुंबईला परत आला..
इ.स. १९६४ ते १९६६ चा तो खडतर काळ शंकर आणि सुलक्षणाने मोठ्या हिमतीने पार पाडला होता.. संसाराला ठिगळ लावता लावता जीव मेटाकुटीला यायचा.. शंकरला इथलं सारं पाहून गावाकडे आपल्या आईवडिलांना, भावंडांना सुद्धा पाहायचं होतं.. धाकट्या दोन बहिणींची लग्न करायची होती.. लहाण्या भावांची शिक्षणं पूर्ण करायची होती.. सगळे सुशिक्षित झाल्याशिवाय घर सुधारणार नव्हते.. मोजकेच पैसे स्वतः कडे ठेवून बाकीचे सर्व पैसे शंकर गावी मनऑर्डर करून आईवडिलांना पाठवून देत असे.. सासऱ्यांच्या घरात राहत असूनही शंकरने आपला स्वाभिमान कधीच सोडला नव्हता.. सासरे नको म्हणत असतानाही तो तिथे राहण्याचे दरमहा दहा रुपये भाडे देत होता.. पैशांची चणचण भासू लागली.. अशातच सुलक्षणाला दिवस गेले..लवकरच शंकर आणि सुलक्षणाच्या संसार वंशवेलीला एक सुंदर पुष्प येणार होते.. आता परिवार वाढत जाणार होता..मुलांच्या भविष्याचा विचार करायला हवा होता..शंकरच्या कार्यालयाची वेळ सकाळी सहा ते दुपारी दोन ही होती.. त्या नंतर शंकर घरीच असायचा..दुपारी दोन नंतरच्या फावल्या वेळेत अजून काहीतरी आर्थिक उत्पन्न कसं वाढवता येईल? याचा तो विचार करू लागला.. गरज होती..इच्छा होती..मग मार्ग नक्कीच मिळणार..
भायखळा माजगाव.. मुंबईतील या भागात ख्रिस्ती आणि गुजराती समाजाची जनसंख्या जास्त प्रमाणात राहत होती.. इंग्रजांनी बांधलेल्या इमारती, मोठे बंगले, ती चर्च, व्हीकटोरिया टर्मिनस रेल्वे स्टेशन, चर्चगेट स्टेशन, राणीचा बाग अजून तसेच होते.. तीच संस्कृती पुढे सुरू होती.. त्या परिसरातील मुलांच्या शाळाही चर्चमध्ये भरायच्या.. मुलांना शाळेच्या अभ्यासक्रमात असलेले मराठी आणि हिंदी हे विषय कठीण जात होते.. शंकरच्या चाळीसमोर एक मोठा बंगला होता..तिथे अनेक खोल्या होत्या..अनेक गुजराती, ख्रिस्ती कुटुंब त्या बंगल्यात राहत होते.. शंकरची त्यापैकी एका कुटुंबाशी ओळख झाली.. शंकरचं शिक्षण मराठीतून झाल्याचं त्यांना समजलं..आणि त्यांनी शंकरला मुलांना मराठी आणि हिंदी शिकवण्याची विनंती केली.. एका विषयाची शिकवणी होती..महिना पाच रुपये..दोन विषयांची दहा रुपये.. पैशांची गरज होती आणि कष्ट करण्याची तयारी.. त्यामुळे शंकरसाठी ही सुवर्णसंधीच चालून आली होती..त्याने पटकन होकार देऊन टाकला.. दुपारी दोन च्या नंतर घरी आल्यावर जेवण करून थोडी विश्रांती घेऊन शंकर पुन्हा चार वाजता घराच्या बाहेर पडत असे.. चार ते रात्री दहा वाजेपर्यंत प्रत्येकाच्या घरी जाऊन शिकवण्या घेत असे.. आयुष्यात अजून एक नवीन अध्याय सुरू झाला होता..
दिवस रात्र कष्ट सुरू झाले..सुरुवातीला शिकण्यासाठी पाचवी, सहावी सातवी मुलं होती.. सहा शिकवण्या होत्या..
सुरुवातीच्या काळात त्या गुजराती, कॉन्व्हेंट शाळेत शिकणाऱ्या मुलांना शिकवताना शंकरला भाषेचा त्रास होऊ लागला.. तो मराठी ग्रामीण बोलीत शिकलेला.. ती मुलं फाडफाड इंग्रजी बोलायची.. कसं समजून सांगणार? काही ताळमेळ बसेना.. मग शंकरने स्वतः त्या विषयात प्राविण्य मिळवायचं ठरवलं.. बारावी नंतर रात्रीच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला.. तिथेही इंग्रजी विषयाची बोंब होती.. पहिल्या सहा महिन्यात शंकरला काहीच समजत नव्हतं.. मग हळूहळू शंकरला विषय समजायला लागले.. इग्रंजीची पुस्तके तो सतत चाळू लागला.. मुलांना शिकवताना आता त्याचा आत्मविश्वास वाढत चालला होता.. एकीकडे रोज पोस्टात जाऊन आपली नोकरी सांभाळून रात्रीच्या महाविद्यालयात जाऊन शंकर आपलं स्वतःचं अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करत होता आणि दुसरीकडे मुलांच्या शिकवण्या घेत होता..शंकरची शिकवण्याची पद्धत वेगळी होती.. पूर्ण पाठांतरावर भर दिलेला असायचा.. मुलांनाही शंकरने शिकवलेलं समजू लागलं.. सहाही मुलं मराठी आणि हिंदी विषयात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली होती..
पालकांनाही खूप आनंद झाला.. मग शेजारच्या अजून दोन घरांतल्या मुलांची शिकवणी मिळाली.. शंकर एक चांगला शिक्षक म्हणून ओळखला जाऊ लागला.. एक एक करता करता पूर्ण बंगल्यातल्या मुलांना शिकवू लागला..
एकीकडे शंकर यशाच्या दिशेने वाटचाल करत होता.. तर दुसरीकडे सुलक्षणाचे दिवस भरत आले होते.. कामाच्या व्यापामुळे शंकरला तिच्याकडे लक्ष दयायला कधी वेळच मिळाला नाही..कधी तिची हौसमौज भागवता आली नाही.. शंकरला वाईट वाटायचं.. पण मग मनात यायचं," त्यांच्या साठीच करतोय ना दिवस-रात्र कष्ट.. आपण कष्ट केले तरच मुलांचं भविष्य सुरक्षित होईल..सारं कुटुंब वेदनेच्या दलदलीतून मुक्त होईल..सर्वांची दारिद्र्याच्या विळख्यातून सुटका होईल.." आणि मग मात्र मन नव्या उमेदीनं कामाला लागायचं.. शंकरच्या अंगात नवीन ऊर्मी संचारायची.. आणि तो नव्या जोमाने कामाला लागायचा..
दिवस पुढे सरत होते.. ऋतूमागून ऋतू जात होते..आणि एक दिवस सुलक्षणाने आनंदाची बातमी दिली.. सुलक्षणाने एका मुलाला जन्म दिला होता.. शंकर पिता झाला होता..
इवल्याशा जीवाला हातात घेताना त्याचा जीव किती रडला होता.. एका मुलाचा बापापर्यंतचा प्रवास सुरु झाला होता.. आज त्याला आपल्या वडिलांच्या वेदनांचा अर्थ कळला होता..
पुढे काय होतं? शंकरच्या आयुष्यात सुखाची बरसात होते की अजून नव्या संकटांना तोंड द्यावे लागते... पाहूया पुढील भागात..
क्रमशः
निशा थोरे..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा