लढा अस्तित्वाचा..

Ha ek ladha astitvacha

लढा अस्तित्वाचा.. 

असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर

नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर..

नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची

आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची

असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर

नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर..

पाय असावे जमिनीवरती  कवेत अंबर घेताना

हसू असावे ओठांवरती काळीज काढुन देताना

संकटासही ठणकावुन सांगावे आता ये बेहत्तर

नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर..

करुन जावे असेही काही दुनियेतुनी या जाताना

गहिवर यावा जगास सा-या निरोप शेवट देताना

स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर

नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर..

                   ©® विं. दा. करंदीकर

काही कविता मनाला अगदी स्पर्शून जातात.. अगदी भारावून टाकतात.. जगण्याची ऊर्मी देतात.. प्रेरणादायी बनतात.. नुकतीच विं.दा. करंदीकर कविता वाचनात आली.. अगदी भारावून गेले.. मन भूतकाळात गेलं.. जुन्या आठवणी मनात रुंजी घालू लागल्या.. आणि त्या कवितेशी साधर्म्य असणारं, माझ्या आयुष्यातलं अनन्यसाधारण महत्त्व असणारं एक व्यक्तिमत्त्व डोळ्यांसमोर रेंगाळू लागलं.. त्या व्यक्तीच्या प्रेरणादायी प्रवासातून मी जगायला शिकले..मी संकटाशी लढायला शिकले. मी माझ्या पायावर उभी राहू शकले.. त्यांचा तो रक्तबंबाळ प्रवास ऐकताना 'इच्छा असेल तिथे नक्कीच मार्ग आहे' या उक्तीची जाणीव झाली.. आज यशाच्या शिखरावर त्यांना पाहतांना केलेल्या कष्टाचं चीज झालं याची अनुभूती आली.. त्याच प्रवासाची कहाणी, ती यशोगाथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. ही कहाणी काही फार मोठ्या नामांकित व्यक्तीची  नाही.. पण ही कथा आहे एका प्रेरणास्रोताची..यशाच्या दिशेने वाटचाल करत असताना वाटेत येणाऱ्या संकटांनी न डगमगता त्याच्याशी दोन हात करण्याची इच्छाशक्ती असणाऱ्या.. प्रतिकुल परिस्थितीतही 'लाथ मारेन तिथे पाणी काढेन' अशी धमक असणाऱ्या एका शेतकरी कुटुंबातील युवकाची ही कथा..

आज त्याचा 'पोस्टऑफिस' मधला शेवटचा दिवस.. त्याच्या निवृत्तीचा दिवस..संध्याकाळी 'निरोप समारंभ' करण्यासाठी  पोस्टातले सर्व कर्मचारी एकत्र जमले होते.. सर्वांनी त्याचा सत्कार करण्याचं ठरवलं होतं.. श्रीफळ, शाल, पुष्पगुच्छ, पुष्पहार आणि भेटवस्तू देऊन त्याचा सत्कार झाला.. सर्वजण त्याचं तोंड भरून कौतुक करत होते..उद्यापासून तो इथे कामावर नसणार याची हुरहुर होती.. पोस्टातल्या वरिष्ठांनाही त्याचं कौतुक केलं.. त्यानंतर दोन शब्द बोलण्यासाठी त्याला विनंती करण्यात आली.. तो बोलण्यासाठी  उभा राहिला.. सर्वांच्या प्रेमाने तो भारावून गेला होता..  त्याने बोलण्यास सुरुवात केली..,"  आदरणीय महोदय आणि उपस्थित असलेल्या माझ्या प्रिय मित्रांनो, या सत्काराच्या मी योग्य आहे नाही मला माहित नाही पण तुमच्या प्रेमाने मी भारावून गेलोय.. उद्यापासून मी तुमच्यात इथे काम करू शकणार नाही.. पण तुमच्या आठवणी माझ्या मनात कायम राहतील.. एका छोट्या खेडयातून भाकरीच्या शोधात मुंबईत आलेला मी एक मुलगा.. तुम्ही मला आपलंसं केलंत.. मला तुमच्यात सामावून घेतलंत त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.. आणि त्याच्या डोळ्यांत आपसूक पाणी तरळून गेले..काही वेळाने कार्यक्रमाची सांगता झाली. सर्व लोकांचे आभार मानून तो आपल्या घराच्या वाटेकडे वळत असताना आजपर्यंतचा सारा खडतर प्रवास  त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला.. 

महाराष्ट्रातल्या 'सोलापूर' जिल्ह्यातील  'भालेवाडी' नावाच्या एका छोट्या खेडेगावातल्या शेतकरी कुटुंबातल्या 'शंकर' नावाच्या मुलाची ही कथा.. 

कोण होता हा शंकर?  पाहूया पुढच्या भागात..


 

क्रमशः

निशा थोरे..

नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या मागील 'सावत्र आई'  या कथेला भरभरून प्रेम दिलंत, स्नेह दिलात माझ्या बाळबोध लिखाणावरही कौतुकाचा वर्षाव करून तुम्ही मला सन्मानित केलंत खरंच मनापासून खूप खूप आभार.. मी कायम माझ्या वाचक मित्रमैत्रिणींच्या ऋणात.. हा स्नेह असाच राहो हीच सदिच्छा.. 

पुन्हा एकदा  एका नवीन कथेसह एक नवीन ऊर्जा घेऊन   मी आपली शब्दसखी निशा थोरे आपल्या भेटीला आलेय.. ही कथा कशी वाटली जरूर कळवा… आपल्या  प्रतिक्रिया माझे लेखन प्रगल्भ करतील यात शंकाच नाही..

धन्यवाद

आपली शब्दसखी

निशा थोरे..

🎭 Series Post

View all