लढा अस्तित्वाचा भाग अंतिम

ladha asthtvacha

लढा अस्तित्वाचा.. भाग अंतिम

पूर्वाध: कथेच्या मागील भागात आपण पाहिलं की, शंकरच्या मुलं मोठी झाली होती..प्रमोद प्रसाद सई नोकरीला लागले होते..शंकर, दिनकर आणि श्रीहरी यांची मुंबई सारख्या ठिकाणी स्वतःची घरं झाली होती.. शंकरला मात्र समाजसेवेच्या ध्यासाने पछाडलं होतं.. आपल्या गावातल्या गरजू मुलांचा तो पालक झाला..गावातील तरुण युवकांच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटवला होता.. आता पुढे..

लढा अस्तित्वाचा.. भाग अंतिम

सारं काही सुरळीत सुरू होतं.. मुंबईत तिन्ही भावंडं स्थिरस्थावर झाली होती.. शंकरच्या मुलांनी आपले शिक्षण पूर्ण केलं आणि तिघेही नोकरीला लागली होती..सर्वात लहान प्रशांतचं अजून शिक्षण सुरू  होतं.. गावकडेही सारेजण आनंदाने राहत होते..शंकरने आपल्या पुतण्याला, आणि चुलत भावाला साहेबांना विनंती करून पोस्टातच चिटकवले होते.. शंकरच्या बहिणींची लग्न होऊन सासरी सुखाने नांदत होत्या..सर्वात धाकटी बहीण,जिजा मुंबईतच आपल्या पती, मुलांच्या समवेत राहत होती..  गावी शंकरचे दोन भाऊ शेती करत होते..पहिल्यापेक्षा आर्थिक परिस्थिती खूपच सुधारली होती.. गेणू आणि चंपा आपल्या मुलांचा सुखी संसार पाहून तृप्त झाली होती..वाड्यात गोकूळ नांदत होतं..  ईश्वराच्या कृपेने सारं छान सुरू होतं..

आणि एक दिवस नियतीने घात केला.. मोठा दुःखाचा डोंगर शंकरवर कोसळला.. कॅन्सर सारख्या दुर्धर आजराने जिजाच्या पतीचा मृत्यू झाला.. पाठीमागे तीन मुलांना सोडून ते स्वर्गवासी झाले.. जिजाच्या नशिबी वैधव्य आलं..लवकर लग्न झालेलं.. निराधार जिजा.. त्यात तीन मुलं पदरी.. गावात असताना शंकरच्या हट्टामूळे निदान मुलींची सातवीपर्यंत तरी शाळा झालेली..काय करावं..? आपल्या धाकट्या बहिणीवर आलेल्या संकटामूळे शंकर आणि सर्व कुटुंबच व्यथित झाले होते.. सारेच शोक सागरात बुडून गेले..मग शंकरच या दुःखातून उठून आपल्या बहिणीच्या पाठीशी उभा राहिला.. लहान वयात विधवा झालेल्या जिजाला पशूवत समाजापासून जपणं  खूप गरजेचं होतं.. तिला एकटं सोडणं खूप धोकादायक होतं.. म्हणून मग शंकरने जिजाला थोड्या दिवसांसाठी तिच्या राहत्या घरातून आपल्या घरी आणून त्याच्या ऑफिस मधल्या मित्राला जिजाच्या घरी भाडेकरू म्हणून राहण्याची सोय केली.. महिन्याला येणाऱ्या भाड्यातून जिजाला महिन्याला लागणाऱ्या खर्चाची तरतूद केली होती.. आणि मग दिनकरच्या घरी विक्रोळीच्या खोलीत तिची वेगळी चूल मांडून दिली..तिन्ही भावंडं तिच्या मदतीला धावून आली..  तिच्या पाठीशी कायम उभे राहू ह्या रक्षबंधनाच्या वचनाला तिन्ही भावंडं जागली होती.. आईवडिलांचा आधार असताना किंवा त्यांच्या पश्चात भविष्यात ते जरी नसतील तरी  कायम आपल्या भावंडाना आईवडिलांसारखी माया देईल..हे चंपा आणि गेणूला शंकरने दिलेलं आश्वासन कायम त्याने पाळलं.. कायम तो मागे उभा राहिला.. 'पाच भावंडात एक बहिण काय जड आहे का?' तुम्ही अजिबात काळजी करू नका.." त्याने आपल्या आईवडिलांना दिलेला विश्वास कायम जपला.. आणि बाकीच्या भावंडांनीही आपल्या मोठ्या भावाचा शब्द कायम उचलून धरला.. शंकरला मान दिला.. कायम त्यांच्या ऋणात राहिले..दिनकरचं आपल्या भावावर सर्वात जास्त प्रेम होतं.. आपल्या घरातल्या लहान मोठ्या सगळे निर्णय तो शंकरला विचारल्या शिवाय घेत नसायचा.. आणि त्याने एखादी गोष्ट सांगितली तर ती कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचाच..

विक्रोळीच्या त्या दोन खोलीत दोन संसार मांडले गेले..एका खोलीत दिनकर, त्याची पत्नी आणि त्याची चार मुलं आणि दुसऱ्या खोलीत जिजा आणि तिची चार मुलं.. शंकरने जिजाला कोणावर विसंबून न राहण्यासाठी तिला स्वावलंबनाचे धडे द्यायला सुरुवात केली तिला शिवणकाम, भरतकाम,विणकाम, मोत्यांच्या माळा, तोरणं, घरात शोभेच्या वस्तू बनवायला शिकवणाऱ्या वर्गात पाठवलं.. आणि जिजाला स्वतःच्या उपजीविकेचे मार्ग खुले करून दिले.. जिजा त्या वस्तू बनवून शेजारी पाजारी विकू लागली.. दुसरीकडे शंकर तिच्या नोकरीसाठी प्रयत्न करत होता.. जिजाचे पती सरकारी दवाखान्यात मदतनीस म्हणून काम करत होते..त्यांच्या जागी पण सरकारी दवाखान्याऐवजी सरकारी शाळेत नोकरी मिळावी म्हणून प्रयत्न करू लागला..शिक्षण कमी असल्यामुळे फार अडचणी येत होत्या.. पण शंकरने हार मानली नाही.. राजकीय क्षेत्रातल्या मोठ्या लोकांच्या भेटी घेतल्या.. आपल्या बहिणींसाठी तो वणवण भटकला.. आणि अखेरीस त्याच्या प्रयत्नाना यश आले आणि जिजाला सरकारी शाळेत शिपाई म्हणून नोकरी लागली.. 

जिजा आपल्या पायावर उभी राहिली.. आपल्या भावांच्या कायम ऋणात राहिली.. कालांतराने जिजा थोडी सावरली.. मुलं थोडी मोठी झाली होती..भाडेकरूला खोली रिकामी करायला सांगून ती तिच्या खोलीत राहायला गेली..सक्षम झाली.. सर्व भावंडांची माया, त्यांचं लक्ष होतंच तिच्यावर.. 

एका मोठ्या दुःखातून सारं कुटुंब बाहेर पडलं होतं.. शंकरने एक मोठी जबाबदारी पार पाडली होती..आता शंकरला आपल्या मुलांकडेही लक्ष द्यायला हवं होतं.. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता आपल्या मुलांचं बालपण जगणं  राहून गेलं याची खंत मनात दाटून आली.. सई लग्नाला आली होती..तिच्यासाठी वरसंशोधनला सुरुवात झाली.. शंकरने पोस्टातल्या एका प्रामाणिक तिला अनुरूप असलेल्या मुलाची निवड केली.. आणि मोठ्या थाटामाटात मुलीचं लग्न लावून दिलं..सई सासरी जाताना वडिलांच्या गळ्यात पडून खूप रडली.. काळजाच्या तुकड्याला दुसऱ्याच्या स्वाधीन करताना होणाऱ्या एका बापाची वेदना आज त्याला जाणवत होती साश्रुपूर्ण नयनांनी त्याने सईला निरोप दिला..

सईच्या जाण्याने घरात एक पोकळी निर्माण झाली..सुलक्षणा एकटी पडली होती.. घरात असताना ' आई- आई म्हणून तिच्या भोवती पिंगा घालणारी सई आठवली की तिच्या डोळ्यातलं तळं ओसंडून वाहू लागायचं.. प्रमोदही विवाहयोग्य झाला होता..नोकरी होती.. आयकर विभागात काम करणाऱ्या शंकरच्या मित्राने आपल्या मुलीसाठी मागणी घालायचा निर्णय घेतला..त्याने शंकरला मनातला हा मनसुबा बोलून दाखवला..शंकर आणि काही मोठी माणसं मुलगी पाहायला गेले..'नंदिनी' चहाचा ट्रे घेऊन बाहेर आली..पाहताक्षणी सर्वाना ती आवडली.. विशेषतः प्रमोदला पसंत पडली.. 'नंदिनी' होतीच तशी..!! अगदी नावाप्रमाणेच गोड, सालस, दिसायला देखणी..नुकतीच वाणिज्य शाखेतून शेवटच्या वर्षांची परीक्षा दिली होती.. रीतसर बोलणी झाली आणि प्रमोद आणि नंदिनी एकमेकांच्या पसंतीने विवाह बंधनात गुंफले गेले.. शंकर आणि सुलक्षणा आता सासू सासरे झाले होते..एका नवीन नात्याला सुरुवात झाली होती.. शंकर आणि सुलक्षणाने नेहमी नंदिनीला आपल्या मुलीसारखीच वागणूक दिली होती.. शंकरने नंदिनीला लग्नाच्या नंतर पुढील शिक्षण घायला लावले.. स्पर्धा परीक्षा द्यायला लावल्या.. नंदिनीही अभ्यासात हुशार होती.. ती स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाली.. आयकर विभागात लेखनिक म्हणून नोकरीला लागली.. कालांतराने प्रसाद आणि प्रशांतच ही लग्न झालं.. मुलांचा संसार फुलू लागला.. आणि सुलक्षणाने हळूहळू स्वयंपाक घरातून निवृत्तीच्या दिशेने पाऊल टाकायला सुरुवात केली.. मग काही वर्षांनी पुन्हा नातवंडांनी घर भरून गेलं.. सुलक्षणा आपल्या नातवंडांचं करण्यात रमून गेली.. 'नातवंडं म्हणजे दुधावरची मऊशार साय' आणि ते नशीब दोघांना लाभलं होतं.. जे मुलांचं बालपण जगायचं राहीलं होतं ते शंकर आणि सुलक्षणा पुन्हा नव्याने जगू लागले.. नव्या आयुष्याची नवी पहाट झाली होती.. 

हळूहळू काळ्याभोर केसात रुपेरी कडा डोकावू लागली.. दोघांच्या आयुष्याचा उत्तरार्ध सुरू झाला होता.. सर्व कटुंबीय स्थिरस्थावर झाले होते.. शंकरने लावलेल्या शिक्षणाच्या दिपामुळे  ज्ञानाचा प्रकाश सर्व सर्वत्र पसरला होता.. त्या प्रकाशात सारे जण उजळून गेले होते..,शंकरचंही वय वाढत होतं.. शिकवण्या जरी कमी केल्या असल्या तरी शंकरने शिकवणं थांबवलं नव्हतं.. लहानपणापासून काबाडकष्ट, नंतर शिक्षणासाठी झालेली पायपीट, समाजसेवेची असलेली आवड.. आता वयोमानानुसार शंकरचं शरीर थकत चाललं होतं.. थोडी विश्रांतीची गरज होती..

आज शंकरचा पोस्ट ऑफिसमधला शेवटचा दिवस..  नोकरीतून निवृत्तीची घटिका समीप आली होती.. निरोप समारंभ उरकून घरी परतत असताना वाटेत हा सारा प्रवास शंकरच्या डोळ्यांसमोरून तरळून गेला.. आज शंकरचा मोठा मुलगा प्रमोद एल आय सी मध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत आहे.. त्यांची सून नंदिनीही आयकर विभागात ऑडिट विभागात मुख्य पदावर काम पाहते प्रसाद पोलीस खात्यात कार्यशील आहे.. प्रशांत खाजगी कंपनीत चांगल्या पदावर काम करतो आहे.. मुंबईत प्रत्येक मुलाने स्वतःचं घर घेतलं आहे.. सई पोस्टात पुढच्या पदासाठी परीक्षा देऊन वरिष्ठ क्लार्क झाली आहे.. तिची मुलं सुद्धा मोठी झालीत.. काही वर्षापूर्वी गेणूचे अस्थमाच्या आजाराने निधन झाले आणि चंपानेही त्याच्या मागोमाग काही महिन्यातच या जगाचा निरोप घेतला.. सर्व कुटुंब दुःखात बुडालं होतं.. कितीही मोठं झालं तरी आईवडिलांच्या जाण्याचा वियोग सहन न करता येण्यासारखाच असतो..पोरकेपणाची भावना दाटून आली..देवाज्ञा मानून शंकर आणि भावंडांनी हे दुखःही पचवलं..

आज शंकरने आपल्या गावी अजून थोडी शेती विकत घेतली..गावातच आपल्या नात्यातल्या लोकांना शेती करण्यासाठी दिली आहे..प्रमोदने गावी बंगला बांधला आहे..सुट्टीला सर्वजण एकत्र जमतात..गप्पा गोष्टी होतात..हसत खेळत सुट्टी घालवतात.. आणि परत आपल्या माघारी निघून जातात.. गावात मानाचं स्थान आहे.. मोठ्या लोकांत ऊठबस आहे..शंकर गावी आला की लोक आवर्जून भेटायला येतात..आपल्या समस्या शंकर समोर मांडतात.. शंकर त्याच्या पद्धतीने निरसन करण्याचा प्रयत्न करतो.. आज निवृत्तीनंतरचं आयुष्य सुखासमाधानाने व्यतीत करत आहे.. सुलक्षणाची राहिलेली स्वप्नं आता पुन्हा नव्याने जगण्याचा प्रयत्न करतो आहे.. पुन्हा एकदा नवा सूर्योदय त्याच्या डोळ्यांत तरळताना दिसतो आहे. पुन्हा एक नवीन प्रवास...एका नव्या ध्येयाच्या दिशेने..एक नवीन ध्यासपर्व.. 

पुर्णविराम... 

©® निशा थोरे..

मैत्रिणींनो.., ही एक सत्य कथा..कोणी मोठ्या माणसांची महान व्यक्तीची नाही..पण सामान्य माणसाचा लक्षवेधी खडतर रक्तबंबाळ प्रवास त्याला असामान्य बनवतो..याचा प्रत्यय आला..एका गरीब शेतकरी कुटुंबातील मुलाचा प्रवास मला खूप प्रेरणादायी वाटला..'इच्छा असेल तर मार्ग नक्कीच सापडतो' याचा प्रत्यय आल्यावाचून राहत नाही.. आजवर मी अनेक स्त्रियांचा प्रवास लिहला पण पहिल्यांदा मला एका पुरुषाचा अस्तित्वाचा लढा मनाला भावला.. एका गरीब मुलाने लावलेलं शिक्षणाचं रोपटं आज वटवृक्ष झालंय आणि त्याच्या छायेखाली अजून किती कुटुंब शिकवून सवरून मोठी होतील..प्रगल्भ होतील.. याची गणती करता येणार नाही.. एकट्याने प्रवास करून पुढे जाणं सहज आहे पण सर्वाना सोबत घेऊन जाणं त्यांच्या प्रगतीसाठी झटणं हे निस्वार्थ नात्यांचा पुरावाच नाही का?? 

आजवर तुम्ही माझ्या कथांवर मनापासून प्रेम केलंत.. स्वीकारलंत.. खूप आभार...असाच स्नेह कायम राहो हीच सदिच्छा..कथा कशी वाटली जरूर कळवा..आपल्या प्रतिक्रिया माझे लेखन प्रगल्भ करेल यात शंकाच नाही.

आपली शब्दसखी

©® निशा थोरे

🎭 Series Post

View all