लढा अस्तित्वाचा.. भाग- ६
पूर्वाध: कथेच्या मागील भागात आपण पाहिलं की शंकर शाळेतून दुसरा आला होता.. साऱ्यांनी त्याच्या बुद्धिमत्तेचं कौतुक केलं..आणि शंकरला शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली.. पाचवी ते सातवी पुढील शिक्षण मोफत होणार होतं आता पुढे..
लढा अस्तित्वाचा.. भाग- ६
शंकर पुढील शिक्षणासाठी मरवडे, सोलापूर इथे जाऊ लागला.. पाचवीच्या वर्गात प्रवेश झाला..भालेवाडी ते मरवडे हा प्रवास सुरु झाला.. रोज सकाळ संध्याकाळ एस.टी. ने प्रवास सुरु झाला.. घरातली माणसं त्याच्या हुषारीवर खुश होती.. पण त्याच्या मागची घरातली कामे अजून सुटली नव्हती.. शाळातून येताना आई मरवड्याहून दळण दळून आणायला सांगायची.. तेंव्हा फक्त एकच पिठाची गिरणी मरवडे इथे होती.. आईलाही जात्यावर दळणाचा त्रास नको म्हणून शंकर पिठाच्या गिरणीवर दळण दळून घरी घेऊन यायचा.. एक दिसाआड कोणी ना कोणी तरी दळण दळून आणायला सांगायचं.. कधी आई, कधी काकू, कधी शेजारच्या बायका..शंकर मुकाट्यानं सर्वाची कामे करत असे.. कोणाला दुखावत नसे.. एका खांद्यावर दप्तर आणि एका हातात दळणाची पिशवी असायची..ओझ्याने खांदा हात दुखून यायचा पण शंकरने कधीच कंटाळा केला नाही..कधी तक्रार केली नाही..
शंकरला लहानपणापासूनचं मैदानी खेळांत रुची होती.. कब्बडी, खो खो, कुस्ती या खेळांच्या आंतरशालेय स्पर्धा व्हायच्या. शंकर आणि त्याचा संघ त्याच्या शाळेच्या वतीनं प्रतिनिधित्व करायचा.. खेळात विशेष प्राविण्य दाखवून त्यांचा संघ कायम विजयी होऊ लागला.. त्यामुळे शाळेची प्रतिष्ठा दिवसागणिक वाढू लागली..क्रीडा क्षेत्रात दाखवलेल्या नैपुण्यामूळे सारेजण त्याला मान देऊ लागले.. आजूबाजूच्या गावातही आता शंकरला सर्वजण ओळखू लागले.. वर्गमित्रही त्याच्याशी चांगलं बोलत होती.. गावातली लहान-थोर माणसे प्रेमाने आदराने वागवत होती.. शंकरही खूप खुष होता.. प्राथमिक शाळेतील 'सर्वोत्कृष्ट विद्यार्थी' म्हणून सर्वजण ओळखू लागले होते..
शंकर हळूहळू मोठा होत होता.. सातवी इयत्तेत असला तरी वयाने सतरा वर्षाचा झाला होता..नुकतंच तारुण्यात पदार्पण केलेलं..मिसरूड फुटू लागलेलं.. रुबाबदार बाणा, काबाडकष्ट करून कमावलेलं पिळदार शरीर, पाहणाऱ्याच्या मनात वेगळी छाप पाडत होतं..त्यात मैदानी खेळ खेळण्याची आवड होती.. त्यामुळे वेगळा व्यायाम करण्याची गरज नव्हती.. आईला आपल्या मुलांचं भारी कौतुक..!! त्यात शंकर सर्व भावंडांमध्ये लाडका.. दर दोन चार दिवसांनी आई शंकरची दृष्ट काढायची.. वेड्या आईची वेडी माया..!!
आनंदीच्या मनातही शंकरने विशेष जागा मिळवली.. शाळा सुटल्यानंतर आनंदीच्या घरी अभ्यासासाठी सारे जमू लागले. शंकरच्या वह्या पुस्तकांची देवाणघेवाण होऊ लागली.. तर कधी डब्यातून शंकर साठी गोड पदार्थ असायचा.. शंकर आनंदीला कठीण विषयही सहज सोप्पा करून शिकवत असे..शंकरच्या बोलण्याने, त्याच्या बुद्धिमत्तेने प्रभावित झाली होती.. कळत नकळत स्नेह वाढत होता..अजाणत्या वयातली ही ओढ.. की प्रेम?? काय होतं? कोणास ठाऊक..!! पण आनंदीला शंकर आवडू लागला होता.. दोघांच्याही मनात प्रेमांकुर फुटू लागला होता.. त्यालाही तिचं लाघवी बोलणं आवडू लागलं होतं.. आनंदीचं प्रेम त्याला उमजत होतं. रेशीमबंध जुळू लागले होते.. आपल्या वर्तनाला नेहमीच संयमाचा बांध हवा.. शंकर खूप विचारी मुलगा होता…आनंदी उच्चभ्रू कुटुंबातील मुलगी आणि शंकर गरीब शेतकरी कुटुंबातला मुलगा.. समाज या नात्याला कधीच मान्यता देणार नाही हे तो ओळखून होता. त्याचं ध्येय वेगळं होतं.. आजवर अज्ञानाने दारिद्र्यात खितपत पडलेल्या आपल्या कुटुंबाला पुढे घेऊन जायचं होतं.. कुटुंबाला सुशिक्षित करायचं होतं.. आपल्या भावनांपेक्षा त्याने कुटुंबाला पाहिलं प्राधान्य दिलं. त्यामुळे तारुण्याच्या उंबरठ्यावर मनातल्या प्रेमळ भावनांचा तिथेचं अंत करण्याचा त्याने निर्णय घेतला.. आनंदीला समजावून सांगितलं.. दोघांनी साश्रुपूर्ण नयनांनी एकमेकांचा कायमचा निरोप घेतला.. आणि मनातल्या प्रेमाकुरांचा मनातच अंत करून टाकला.. त्यानंतर काही दिवसातच आनंदीच्या आईवडिलांनी आनंदीसाठी अनुरूप मुलगा पाहून तिचं लग्न करून टाकलं.. आनंदीही सारे पाश तिथेच सोडून आपल्या सासरी निघून गेली..
त्यानंतर मात्र शंकरने कधीच मागे वळून पाहिलं नाही.. ध्येयाने झपाटलेल्या ध्येयवेड्या मुलाचा प्रवास सुरु झाला.. ध्येय अजून बरंच होतं. खूप लांबचा पल्ला गाठायचा होता.. खेळाडू म्हणून त्याने चांगलंच नाव कमावलं होतं.. पण त्यामुळे कधी त्याचं अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं नव्हतं.. सातवीच्या इयत्तेतही शंकर चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला.. त्यांच्या पूर्ण घराण्यात सातवीपर्यंत शिकलेला कदाचित तोच पहिला मुलगा होता.. गेणूचा आनंद गगनात मावेना.. आपल्या मुलाने आपल्या घराण्याचं नाव उज्ज्वल केलं याचा अभिमान वाटू लागला.. पुन्हा एकदा शाळेने शंकरचा सत्कार केला.. मुख्याध्यापकांनी शंकरचे तोंड भरून कौतुक केलं..मनापासून आशीर्वाद देत पुढील उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या..
शंकरने माध्यमिक शिक्षणासाठी 'न्यू इंग्लिश स्कुल, मंगळवेढा, सोलापूर' या शाळेत प्रवेश घेतला.. काकासाहेब विद्यार्थी वसतिगृह,मंगळवेढा' इथे मुलांच्या वसतिगृहात दाखल झाला.. खेळाडू असल्याने त्याला प्रवेश मिळायला जास्त प्रयास पडले नाही.. नवीन शाळेतही तालुका पातळीवर होण्याऱ्या खो खो कबड्डी या सामन्यात शंकरने उत्तुंग यश मिळवून, क्रीडाक्षेत्रात उत्तम कामगिरी करून शाळेची कीर्ती सर्व गावात पसरवलेली होतीच पण त्याच बरोबरीने अभ्यासातही आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवून दिली.. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत तो वरच्या वर्गात जात होता.. पण सगळंच छान कसं असणार..!! शंकरच्या शालेय जीवनात चांगल्या मित्रांबरोबर बरेच शत्रूही निर्माण झाले होते.. त्याच्या खेळावर जळणारे, असूया बाळगणारे हितशत्रू बरेच निर्माण होत होते.. एका गरीब कुटुंबातला मुलगा सर्वांच्या पुढे जातोय म्हटल्यावर असूया बाळगणारे ही विद्यार्थी होतेच.. शंकरचं यश पाहून काही विद्यार्थ्यांच्या पोटात दुखत होतेच.. हा आमच्याशी बरोबरी करतो..! काय लायकी याची..? तिथेही काही मुलांनी त्रास दयायला सुरुवात केली.. तो खेळातून बाद व्हावा म्हणून तालुक्यातील दुसऱ्या गावाच्या मुलांचा प्रयत्न होऊ लागला.. वसतिगृहातल्या शंकरच्या जिवलग मित्रांनी शंकरला बातमी दिली.. "उद्याचा सामना जपून खेळ..प्रतिस्पर्धी शाळेच्या मुलांनी खेळात तूझ्या पायाला इजा पोहचवून पाय तोडण्याचा बेत आखला आहे..आपण हरलो तरी हरकत नाही पण कायमच अपंगत्व नको ओढवून घेऊ" मुलांनी शंकरला काळजी घ्यायला सांगितली.. त्यांनी शाळेतल्या शारीरिक शिक्षणाच्या प्रशिक्षकाना,जाधव सरांना सांगितलं.. मग त्यांनीही शंकरला समजावून सांगितलं.." स्वतःच्या जीवापेक्षा काही महत्वाचं नाही..हा खेळ आहे जिंकणं, हरणं चालूच राहतं.. तू जीव धोक्यात घालून खेळू नकोस..आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी आहोत" जाधव गुरुजींच्या बोलण्याने शंकरला धीर आला..
वसतिगृहातल्या मित्रांच्या, शाळेतल्या शिक्षकांच्या प्रेमामुळे, त्यांच्या सहकार्यामूळे शंकर सर्व सामने खेळू शकला..खेळ सुरू असताना जाधव गुरुजी कायम त्याच्या मागेच उभे राहत..प्रतिस्पर्धी मुलांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवत.. आणि अशा सर्व प्रतिकूल परिस्थितीतही शंकर विजयी झाला..आणि पुन्हा एकदा विजयाचा ट्रॉफी ' न्यू इंग्लिश स्कुल' च्या नावावर नोंदवली गेली.. सर्वजण खूप आनंदी झाले..साऱ्यांनी शंकर आणि त्याच्या संघाचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन केलं..
पुढे मात्र शंकरला सामन्यात खेळू दिलं नाही कारण यंदाच्या वर्षी शंकर अकरावीच्या परीक्षेला बसणार होता.. पूर्वीची अकरावी म्हणजे आजची दहावी.. अकरावी बोर्डाच्या परीक्षेच्या अभ्यासाची तयारी करायची होती..त्यात व्यत्यय नको म्हणून शाळेने पूर्ण अकरावीचा वर्गच सामन्यातून वगळण्यात आला.. आता फक्त जिल्हा पातळीवर कुस्तीच्या स्पर्धेत भाग घेता येणार होतं..
शंकरचं विशीत पदार्पण झालं होतं.. घरच्यांच्या मनात त्याच्या लग्नाचा विचार घोळू लागला.. शिकल्या सवरलेल्या शंकरला स्वतःहून चांगल्या घरच्या मुली सांगून येत होत्या.. आपल्या कुटुंबाचं, आपल्या गावाचं, आपल्या तालुक्याचं, जिल्ह्याचं नाव उज्ज्वल करणारा मुलगा जावई म्हणून कोणाला नाही आवडणार..?? घरची आर्थिक परिस्थिती नाजूक होती..पण मुलगा शिकलेला, संस्कारी..परिस्थिती आज ना उद्या सुधारेलच.. असा विचार समोरचे पाहुणे मंडळी करत होती.. घरी पाहुण्या मंडळींचा राबता वाढू लागला..
शंकरच्या नकळत घरच्यांनी त्याच्या लग्नाविषयी विचार करायला सुरुवात केली होती.. मुलगी पाहिली.. मुलगी पसंत पडली.. मोठ्या मंडळींची बैठक बसली..लग्नाची बोलणी झाली.. देण्याघेण्याच्या छोट्या मोठ्या वार्ता करून १०जून ही लग्नाची तारीख काढण्यात आली.
पुढे काय होईल? शंकर लग्नाला तयार होईल का? पुन्हा शिक्षणामध्ये अडथळे येतील का पाहूया पुढच्या भागात..
क्रमशः
©® निशा थोरे..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा